काल आपण २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाविषयी माहिती घेतली. तत्पूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीला “वक्ता दशसहस्रेषु” च्या धर्तीवर “श्रोता दशसहस्रेषु” या ब्लॉग द्वारे काही हितगुज केले. त्यात म्हटल्याप्रमाणे, आजकाल असे वाटते की एकीकडे बोलणाऱ्यांचा सुकाळ आहे, आणि ‘ऐकणारे’ किंवा ‘वाचणारे’ यांचा दुष्काळ आहे, तर दुसरीकडे असेही दिसून येते की ‘meaningful communication’ (‘अर्थवाही संवाद’, किंवा दुसऱ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने ‘पोचणारा’ संवाद) कुठेतरी हरवत चालले आहे. खरे तर, Good listening is the first step of good communication. पण ऐकणारा कान आणि समजून घेणारे मन ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे, किंवा असे म्हणता येईल की समोरची व्यक्ति, मग ती किती का जवळची असेना, आपल्या मनाची व्यथा ऐकेल आणि आपले मन समजून घेईल असा विश्वास, trust कुणाला वाटेनासा झाला आहे. यात न बोलणाऱ्याचा दोष की न ऐकणाऱ्याचा दोष हे सांगणे कठीण आहे. आणि आणि त्यामुळे, यापूर्वी कधीही न ऐकलेल्या मानसिक समस्या, मानसिक आजार दिसून येत आहेत. न सांगता येण्याजोग्या समस्या, न बदलता येणारी परिस्थिती, नात्यातील आणि परस्पर संबंधातील घुसमट, या गोष्टी, जर मनाची बैठक सुदृढ नसेल तर, माणसाला हतबल करून टाकतात, आणि माणसे एक तर विचित्र वागतात, नाही तर जीवनातील त्यांचा रसच संपून जातो, आणि ते, घाण्याच्या बैलाप्रमाणे निरर्थकपणे जीवनाचे ओझे ओढीत राहतात.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका तरुणाने सुरुवात केलेल्या, “Listeners’ Army” या संस्थेविषयी वाचले. राज डगवार या तरुणाने, डिसेंबर २०२० मध्ये एक उपक्रम सुरू केला-
ListenersArmy
“Tell me your story, and I will give you Rs.10” अशी हस्तलिखित पाटी घेऊन तो पुण्याच्या वर्दळीच्या फर्ग्युसन रोडवर उभा राहिला.
सुरुवातीला लोक येऊन, कुतूहलाने, काहीशा संशयाने पाहून निघून जात, पण ४ दिवसांनंतर त्याला पहिली व्यक्ति मिळाली, जिने की आपल्या मनातील सारी खळबळ, दुःख, असहायता, या परक्या आणि अनोळखी व्यक्तीसमोर ओकली आणि आपल्या दुःखाला वाट करून दिली. या तरुणाची कहाणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे. आज त्याच्या Listeners Army या एनजीओ चे काम भारतभर पसरले आहे, आणि त्याच्यासोबत ६०० volunteers म्हणजे स्वयंसेवक काम करीत आहेत. आणि ५००० लोक या चळवळी सोबत जोडले गेले आहेत.
“माझे कोणी ऐकून घेत नाही”, आणि, “माझे कोणी ऐकत नाही” या दोन तक्रारी सगळ्यांच्याच मनात असतात. या दोन वाक्यांत सूक्ष्म फरक आहे. त्यातील दुसरे वाक्य हे पालकांकडून जास्त करून ऐकायला मिळते, जे, “माझा सल्ला कोणी ऐकत नाही, किंवा, माझ्या आज्ञा कोणी (विशेषतः आपले पाल्य) पाळत नाही” अशा अर्थानेही वापरले जाते.
वरील चर्चा आपल्याला आपल्या मूळ विषयाकडे घेऊन येते. ती म्हणजे “संवाद कौशल्य”, ज्याला इंग्लिश मध्ये, “Communication skill” म्हटले जाते. या विषयात माझ्यासारख्याने उडी मारणे म्हणजे एक मोठा विनोद आहे असेच कोणाला वाटेल. कारण कम्युनिकेशन मधील ‘क’ ही ज्याला माहीत नाही, त्याने या विषयावर कशाला बोलावे असेही काही जणांना वाटू शकते. तर ज्ञानेश्वर माउली म्हणतात तसे,
राजहंसाचे चालणे |
भूतळी जालिया शहाणे |
पण आणिके काय कोणे |
चालावेचि ना ? ||
(ज्ञानेश्वरी १८-१७१३)
आणि समर्थांनी म्हटल्याप्रमाणे, माणसाला काही गुण उपजत असतात, पण काही गुण ‘अर्जित’ करावे लागतात, आणि करता येतातही. तसेच, काही माणसांना संभाषण कला किंवा संवाद कौशल्य हे उपजत किंवा जन्मजात असते, पण ते ज्यांना जन्मजात नाही, त्यांना ते ‘अर्जित’ करता येऊ शकते, हा विषय घेऊन आपण पुढे जाणार आहोत.