https://goodworld.in A website by Madhav Bhope

बारा राशींचे बारा स्वभाव

12 zodiac signs nature

खूप वर्षांपूर्वी शरद उपाध्ये यांचे  ‘भविष्यावर बोलू काही’, आणि ‘राशीचक्र’, यासारखे टीव्ही शोज मराठी टीव्ही चॅनेल्स वर खूप लोकप्रिय झाले होते. राशीभविष्य या विषयावर हलक्या फुलक्या भाषेत दिलेली माहिती श्रोत्यांना खूप आवडत असे. त्यामुळे राशीभविष्य या विषयाविषयी लोकांना वाटणारी एक प्रकारची भीती असायची ती कमी होण्यास मदत झाली.

माणसाचे भविष्य घडविणे हे त्याच्या हातात असते, असे कर्तृत्ववान लोकांचे मानणे असते, आणि ते अगदी खरे आहे. पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांचे म्हणणे असे असते, की या शास्त्राचा उपयोग माणसाला सतर्क करण्यासाठी होऊ शकतो.

अर्थात, या विषयावरील विविध मतांमध्ये आपल्याला जायचे नाही.

पण ढोबळ मानाने पहायचे झाल्यास ज्या काही विषयांवर जवळ जवळ सर्व ज्योतिषकारांचे एकमत आढळते, ते म्हणजे विशिष्ट राशींचे विशिष्ट स्वभाव. आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसानेही आपल्या आजूबाजूस पाहिल्यास यातील काही गोष्टी खूप प्रमाणात लागू पडतात असे दिसते. सगळ्याच गोष्टी लागू पडत नाहीत. पण काही राशींचे स्वभाव अगदी ठळकपणे दिसून येतात उदा. कन्या राशीचा चिकित्सक आणि शंकेखोर स्वभाव- घराला लावलेले कुलूप तीन तीनदा ओढून बरोबर लागले आहे की नाही ते पाहणारी माणसे आपल्या आजूबाजूला दिसतात. वृषभ राशीच्या व्यक्ति देखण्या, रसिक आणि चैनी असलेल्या बर्‍याच प्रमाणात दिसतात. नेतृत्व गुण आणि अहंकार असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला दिसतात. अजून एक गोष्ट म्हणजे, कोणत्या राशीचा शरीराच्या कुठल्या भागावर अंमल जास्त असतो, आणि त्या त्या राशीच्या लोकांना जास्त करून त्याच अवयवांचे त्रास हे प्रामुख्याने होतात, हे नमूद केलेल्यानुसार खूप प्रमाणात जुळते.  त्यामुळे त्या त्या राशीच्या लोकांनी त्या त्या अवयवांची जास्त काळजी घेतल्यास पुढे होणारा त्रास ते टाळू शकतील.

बर्‍याच वेळा आपल्या आजूबाजूची माणसे आपल्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी वागतात. काही वेळा आपण केलेल्या उपकाराची फेड अपकाराने करतात, कारण नसतांना आपल्याशी डूख धरतात, तेंव्हा असे का होते, ते असे का वागतात, हे जेंव्हा समजत नाही.

अशा वेळी , हा राशींच्या स्वभावाचा चार्ट पाहिल्यास एखाद्या व्यक्तीच्या वागण्याची संगती काही प्रमाणात लागू शकते- जन्मतःच जो स्वभाव व्यक्ति घेऊन आलेली असते, त्याप्रमाणे ती वागते.

सर्वसाधारणपणे बारा राशींची स्वभाव वैशिष्ट्यें खाली  दिली आहेत. आपल्या आजूबाजूला पाहिले तर या पैकी बहुतेक स्वभाव वैशिष्ट्यें त्या त्या राशींच्या लोकांसोबत खूप प्रमाणात जुळतांना आढळतात.

एकेका राशीत पुन्हा कोणत्या नक्षत्रावर जन्म झाला आहे,त्यानुसार स्वभावात फरक दिसू शकतो. पण एक सहज छंद म्हणून जर आपण हे गुणधर्म ताडून पाहिले तर बऱ्याच प्रमाणात आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येऊ शकतो.

रासस्वभाव वैशिष्ठ्ये
मेषधाडसी, धडपडे, रागीट, अविचारी, उतावळे, धैर्यवान, पराक्रमी, पुरुषी अहंभाव बाळगणारे, बेभान, लढाऊ, दिलदार, अतिरेकी वृत्तीचे, अति प्रेम करणारे..
वृषभभोगी, चैनी, कलंदर स्वभाव, परिश्रमी, मिरवण्याची हौस असलेले, रसिक, स्तुतिप्रिय, स्त्रीजित, सौन्दर्यवादी, सर्जनशील, गीतसंगीत आवड असणारे.
मिथुनअस्थिर, पोरकट, घाबरट, कचखाऊ, गोडबोले, मनकवडे, मिस्किल, कृश शरीर, वाक् चातुर्य, चांगली स्मरणशक्ती असणारे.
कर्कबोलका चेहरा, संवेदनशील, चंचल, चपळ , चिडचिडे, प्रवासाची आवड असणारे, हळवे(रडके), स्त्रीवश, आतिथ्यशील, सेवाभावी
सिंहमानी, अभिमानी, शूर, गिर्यारोहक, हेकेखोर, स्पष्टवक्ता, धीरोदात्त, बेडर, दुराग्रही, हुकूमशहा, ताठर, अहंमन्य
कन्यासंकोची, सेवाभावी, शंकेखोर, कवीमनाचे, दातृत्व, भित्र्या स्वभावाचे, व्यवस्थित, अतिकाळजी करणारे, काटकसरी, दुसर्‍याला न दुखावणारे, लाजाळू
तूळउत्तम सल्लागार, धनवान, जुगारी प्रवृत्तीचे, व्यवहार चतुर, संधीचा फायदा घेणारे, जगन्मित्र, व्यापारी व व्यावसायिक वृत्तीचे, शांत, कलावंत, मृदू भाषी, हिशेबी वृत्ती, जोखीम घेणारे.
वृश्चिकमुत्सद्दी, मेहनती, भेदक वृत्तीचे, महत्त्वाकांक्षी, क्रूर, पाताळयंत्री, निश्चयी वृत्तीचे, अबोला धरणारे, धारदार बोलणारे, छिद्रान्वेषी
धनुमजबूत शरीर, मैदानी खेळांची आवड असणारे, आशावादी, आनंदी, तेजस्वी, स्तुतिप्रिय, बेदरकार, बेजबाबदार, धरसोड वृत्तीचे, धार्मिक
मकरचिवट, सहनशील, मितव्ययी, दीर्घोद्योगी, कडवट, तुसडे, न्यायनिष्ठुर, राजकारणी, आत्मकेंद्रित, स्वावलंबी, जिद्दी, वास्तववादी, वाक् चातुर्याचा अभाव असणारे, शिस्तप्रिय, तडफदार.
कुंभमानवतावादी, समजाभिमुख, नवमतवादी, संशोधक, दुसर्‍याला अक्कल शिकवणारे, संग्राहक वृत्तीचे, आत्ममग्न, विक्षिप्त, अलिप्त, निरुत्साही, प्रगल्भ बुद्धिवंत, वैराग्य वृत्तीचे, ध्येयवेडे, गंभीर.
मीनअंतःस्फूर्ति, भूतदयावादी, दूरदर्शी, स्वप्नदर्शी, आळशी, परावलंबी, गोंधळी, सोशीक, पापभीरू, अपयशाची भीती वाटणारे, नमते घेणारे, प्रसन्न चेहरा.

आता एखादा मनुष्य त्याच राशीत का जन्म घेतो?- तर प्रत्येकजण आपले पूर्वकर्म बरोबर घेऊन येतो, आणि गेल्या जन्मीचे हिशोब या जन्मी पूर्ण करतो- आणि  या जन्माच्या कर्मांनी नवीन जन्माची तयारी करतो! असो.

तसेंच प्रत्येक राशीच्या लोकांना शरीराच्या कुठल्या भागाचे रोग होण्याची शक्यता असते हे खालील चार्ट पाहिला तर समजू शकते. त्या त्या राशीच्या लोकांनी त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेंच त्या त्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या दैवताची उपासना करावी हेही खालील चार्ट मध्ये दिलेले आहे.

एकेका राशीचा एकेक स्वामी असतो, म्हणजे त्या राशीवर त्या त्या ग्रहाचा अंमल असतो असे मानले जाते.

सूर्य आणि चंद्र हे प्रत्येकी एका राशीचे स्वामी आहेत. सूर्य सिंह राशीचा तर चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे.

मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनि हे प्रत्येकी 2-2 राशींचे स्वामी आहेत.

रासराशीस्वामीनक्षत्रउपास्य देवताशरीरावर अम्मलStrong Pointsआनंदमय जीवनासाठी
मेषमंगळअश्विनी व भरणी नक्षत्राचे प्रत्येकी 4 चरण व कृत्तिका नक्षत्राचा 1 चरणगणपती, कुलदेवता, मनोवांछित देवताडोके, कवटी, केस, कपाळधडाडी आणि धडपडी वृत्तिउतावीळ व अविचारी पणावर मात करावी॰
वृषभशुक्रकृत्तिका नक्षत्राचे 3, रोहिणीचे 4, मृग नक्षत्राचे पहिले 2 चरणलक्ष्मी, कुलदेवता, मनोवांछित देवताचेहरा, घसा, दात, तोंड, डोके, गळाकष्टाळू वृत्ति व एकाग्रताचैनी व दिखाऊ वृत्तीला आवर घालावा.
मिथुनबुधमृग नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, आर्द्राचे 4 चरण, पुनर्वसूचे पहिले 3 चरण.विष्णू, कुलदेवता, मनोवांछित देवतावाणी, मान, खांदे, कान, नर्व्हस सिस्टिम, श्वसन विकारबोलण्याची कला आणि भाषा प्रभुत्त्वकचखाऊ वृत्ती व अस्थिरपणा सोडावा.
कर्कचंद्रपुनर्वसू नक्षत्राचे शेवटचे 1 चरण, पुष्य नक्षत्राचे 4 चरण, आश्लेषा नक्षत्राचे 4 चरणशंकर, कुलदेवता, मनोवांछित देवताहृदय, स्तन, छाती, रक्तसमर्पण भाव व चपळपणाचंचलपणा व हळवेपणावर ताबा मिळवावा.
सिंहसूर्यमघा नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा नक्षत्राचे 4 चरण, उत्तरा नक्षत्राचा 1 चरणखंडोबा, सूर्य, कुलदेवता, मनोवांछित देवताकुक्षी, शरीराचे नाभीचक्र, पाठ, पाठीचा कणातत्त्वनिष्ठा आणि मनाचा कणखरपणाअहंकारी व हेकेखोर वृत्तीवर नियंत्रण ठेवावे.
कन्याबुधउत्तरा नक्षत्राचे 3, हस्ता नक्षत्राचे 4 चरण, चित्रा नक्षत्राचे 2 चरण.विठ्ठल रुखमाई, कुलदेवता, मनोवांछित देवताकंबर, त्वचा, पोट, जठर, गर्भाशयधोरणीपणा आणि कौशल्यापूर्ण नियोजनअतिविचार व अतिचौकशा करू नयेत.
तूळशुक्रचित्रा नक्षत्राचे 2 चरण, स्वाति नक्षत्राचे 4 चरण, विशाखा नक्षत्राचे 3 चरण.महालक्ष्मी, कुलदेवता, मनोवांछित देवताओटीपोट, नितंब, बस्ती, मूत्राशय, स्त्रीबीज, पुंबीजउच्च अभिरुचि आणि व्यावसायिक दृष्टिकोनसंधीसाधू व हिशेबी वृत्तीला काबूत ठेवावे.
वृश्चिकमंगळविशाखा नक्षत्राचा शेवटचा 1 चरण, अनुराधा नक्षत्राचे 4 आणि ज्येष्ठा नक्षत्राचे 4 चरण.शंकर, कुलदेवता, मनोवांछित देवतागुदद्वार, गुह्येंद्रिय, स्नायू संस्थामर्मज्ञ व महत्त्वाकांक्षीगूढ आणि खुनशी वृत्तीचा त्याग करावा.
धनुगुरूमूळ नक्षत्राचे 4 चरण, पूर्वाषाढा नक्षत्राचे 4 चरण, उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरणश्री दत्त, कुलदेवता, मनोवांछित देवतामांड्या, सायटिका, यकृत, मेद(चरबी)सामर्थ्य व आशावादगाफील व बेदरकार वृत्तीला लगाम घालावा.
मकरशनिउत्तराषाढा नक्षत्राचे 3 चरण, श्रवण नक्षत्राचे 4, धनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण.मारुति, कुलदेवता, मनोवांछित देवताशरीरातील सर्व सांधे व हाडे, विशेषतः गुडघेजिद्दी व वास्तववादी वृत्तिकडवट व न्याय निष्ठूर वृत्तीवर विजय मिळवावा.
कुंभशनिधनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण, शततारका नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा भाद्रपदाचे 3 चरण.श्री दत्त, कुलदेवता, मनोवांछित देवताडावा कान, पोटर्‍या, घोटेनवमतवाद आणि उच्च बुद्धिमत्ताविक्षिप्त व अलिप्त वृत्तीवर अंकुश ठेवावा.
मीनगुरूपूर्वा भाद्रपदाचा 1 चरण, उत्तरा भाद्रपदाचे 4 चरण, रेवती नक्षत्राचे 4 चरण.लक्ष्मीनारायण, श्री दत्त, कुलदेवता, मनोवांछित देवतापावले, तळवे, डावा डोळा, घामाद्वारे उत्सर्जनअंतः स्फूर्ति आणि दूरदर्शी वृत्तीऐषारामी व स्वप्नाळू वृत्तीला मुरड घालावी.

मला स्वतःला ज्योतिष या विषयाची काही माहिती नाही, त्यामुळे या विषयातील विद्वान मंडळींची आधीच माफी मागतो.

सदरील माहिती ही केवळ मनोरंजन या स्वरूपात घ्यावी अशी विनंती आहे. आणि यात दिलेली माहिती, आपल्या स्वतःच्या स्वभावाला, किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या (ज्यांच्या राशी आपल्याला माहित आहेत) स्वभावाशी ताडून पाहून, हे कितपत लागू होते हे आपणच ठरवावे.

आपल्याला आवडल्यास इतरांनाही जरूर शेअर करावे.

या विषयी आपले अनुभव असतील ते comments मध्ये नक्की कळवा. तसेच आपले विचार ही comments  मध्ये लिहून कळवा.

माधव भोपे 

ring
SILVERSPOT JEWEL 925 Sterling Silver Blue Sapphire Birth stone (Pisces, Taurus, Virgo, Libra, Sagittarius)

Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.