श्री गणेश पुराणात मागील भागात आपण पाहिले की प्राचीन काळी सोमकांत नांवाचा राजा कुष्ठरोगाने त्रस्त होऊन, आपली राणी आणि प्रधानासह अरण्यात गेला. तिथे त्याला आधी ऋषिकुमार च्यवन आणि नंतर त्यांचे वडील भृगू ऋषींची भेट झाली. भृगू ऋषीं नी आपल्या ज्ञानाने राजाच्या पूर्वजन्मीचा वृत्तान्त जाणून राजाला त्याच्या पूर्व जन्मी केलेल्या पापांची जाणीव करून दिली.
याआधील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आता पुढे-
भृगू ऋषींच्या तोंडून आपले पूर्वजन्मीचे चरित्र ऐकून राजाच्या मनात संशय निर्माण झाला, आणि त्यावर त्याचा सहजी विश्वास बसेना. तो बराच वेळ काही न बोलता बसून राहिला.
तेवढ्यात त्याच्या सर्वांगातून अनेक पक्षी अकस्मात प्रकट झाले. ते राजावर आपल्या चोंचींनी प्रहार करू लागले, त्यामुळे आधीच क्षतिग्रस्त असलेल्या राजाला असह्य वेदना होऊ लागल्या. तो ओरडू आणि तडफडू लागला. त्याने भृगू ऋषींना तळमळून विचारले, “ हा काय प्रकार आहे? हे पक्षी माझ्यावर असे का तुटून पडले आहेत?”
त्यावर भृगू ऋषी म्हणाले, “हे राजन, तुझ्या मनात माझ्या बोलण्याबद्दल विकल्प निर्माण झाला, म्हणून तुला हे फळ भोगावे लागत आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या अंतःकरणात विश्वास निर्माण झाला, तर माझ्या एका हुंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील.”
त्यावर सोमकांताने मनातील विकल्प टाकून दिले आणि तो भृगू ऋषींना शरण गेला. तेंव्हा ऋषींनी मोठ्याने हुंकार भरला, आणि काय आश्चर्य! ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले.
भृगू ऋषी पुढे म्हणाले, “राजा, तुझी पूर्वीची दुष्कर्मे एवढी भयानक आहेत की त्यांचे निरसन करायला काय करावे हा मला मोठा प्रश्न पडला आहे.
तथापि गणपतीचे माहात्म्य फार थोर आहे. तो सुखकर्ता आणि भक्तांच्या दोषांचा नाश करून त्यांना पवित्र करणारा आहे. म्हणून तू आता ‘गणेश पुराण’ श्रवण कर. त्यामुळे तू निष्पाप होशील.”
सोमकांत राजाचे अंतःकरण भरून आले, आणि तो ऋषींना म्हणाला, महाराज, तुम्ही माझे कल्याणच करणार याबद्दल माझी खात्री आहे. कृपया मला या रोगातून सोडवा.
तेंव्हा भृगू ऋषींनी श्री गणेशाच्या 108 नामांनी अभिमंत्रित केलेले जल राजाच्या रोगजर्जर देहावर शिंपडले. त्या जलाच्या प्रभावाने राजाच्या नाकातून सूक्ष्मरूपाने एक काळाकभिन्न पुरुष बाहेर पडला. पाहता पाहता त्याने महाकाय रूप धारण केले. त्याचे डोळे लालबुंद होते. जीभ बाहेर लोंबत होती, त्याच्या विक्राळ मुखातून अग्निज्वाला आणि रक्त, पू, इत्यादि घाण पदार्थ बाहेर पडत होते. तो आपल्या विक्राळ दाढा चावीत भृगू ऋषींकडे पाहू लागला. मात्र भृगू ऋषीं शांत होते. त्यांनी त्याला विचारले, “तू कोण आहेस?’ तो विकट हास्य करून म्हणाला, “मी पापपुरुष आहे. सर्व प्राण्यांच्या देहात सूक्ष्मरूपाने राहतो. तुझ्या अभिमंत्रित जलामुळे मला राजाच्या देहातून बाहेर यावे लागले. मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला काहीतरी खायला दे. नाहीतर मी या राजासह सर्वांचा फडशा पाडीन. तू मला बेघर केले आहेस म्हणून माझ्या राहण्याचीही व्यवस्था तूच कर.
भृगुंनी त्याच्या म्हणण्याने विचलित न होता, त्याला म्हटले, ” तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याचा काहीही उपयोग होणाऱ् नाही. आता यापुढे तो समोरच्या आम्रवृक्षाच्या ढोलीत रहा आणि वाळलेली पाने खाऊन गुजराण कर.” ऋषींपुढे आपले काही चालणार नाही हे ओळखून तो पापपुरुष मुकाट्याने त्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत जाऊन बसला. त्याच क्षणी त्याच्या स्पर्शाने तो महाकाय वृक्ष जळून भस्मसात झाला. जमिनीवर राखेचा ढीग पडला. भृगुंच्या भीतीने तो पुरुष त्या राखेतच लपून राहिला. तेंव्हा भृगु सोमकांताला म्हणाले, “राजा, तुझ्या पापांचा प्रभाव समोरच दिसत आहे. आता तू गणेश पुराण श्रवण कर. त्यायोगे तू निष्पाप होशील, आणि हा आम्रवृक्षही पूर्वीप्रमाणे सजीव होईल.

त्यानंतर भृगु ऋषींनी राजाला गणेश पुराण सांगितले. गणेश पुराण हे एक उप पुराण असून त्याचे 155 अध्याय आहेत. मूळ पुराण संस्कृतात असून, आजवर बऱ्याच जणांनी त्याचे मराठीत सुलभ भाषांतर केले आहे.
त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत. कोणाला जर ते amazon वरून खरेदी करायचे असल्यास खालील लिंक वरून घेऊ शकतात.
1. श्री गणेश पुराण कथासार – धार्मिक प्रकाशन
2. श्री गणेश पुराण कथासार- ह. भ. प. रंगनाथ महाराज खरात
3. श्री गणेश पुराण कथासार-गोविंदराय
माधव भोपे
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.