A glimpse of Vedic Knowledge-1
वेदांची झलक
काही वर्षांपूर्वी यू ट्यूब वर एक व्हीडिओ पाहण्यात आला- व्लादिमीर यातसेन्को (Vladimir Yatsenko) असे नांव असलेल्या, रशियन माणसाचा तो व्हीडिओ होता.
व्हीडिओ 9 वर्षांपूर्वीचा आहे. ( एप्रिल 2015 चा). त्याचे शीर्षक होते- Introduction to Vedas- Part-1. काही भागांमध्ये हा व्हीडिओ होता. सांगणारा माणूस इंग्लिश मध्ये बोलत होता. त्याचा वेष जरी पाश्चात्य असला, तरी तो एखादा ऋषितुल्य भारतीय वाटत होता.
या व्हीडिओमध्ये, एखाद्या भारतीयालाही नसेल, इतकी सखोल माहिती तो आपल्या वेदांबद्दल सांगत होता. व्हीडिओ ऐकल्यानंतर मला खूप नवीन गोष्टी कळल्या. मी भारतीय असून, आणि तथाकथित उच्च कुळात जन्म घेतलेला असूनही, मला त्यातील बहुतेक गोष्टींचे शून्य ज्ञान होते. त्यामुळे माझीच मला लाज वाटली. आपण स्वतःला भारतीय म्हणवतो, आणि वेद हे आपले धर्मग्रंथ आहेत, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नसते. आणि हा रशियन माणूसच नाही, तर अक्षरशः शेकडो, हजारो इतर देशांतील, इतर धर्मीय जिज्ञासू, तिथे राहून किंवा भारतात येऊन, आपल्या ज्ञानाचा अभ्यास करतात, आपले पूर्ण आयुष्य सनातन संस्कृतीला वाहून घेतात, असे मला त्यानंतर समजू लागले. आणि असे अनेक लोक- स्त्री, पुरुष, धांडोळा घेतांना दिसू लागले.
या सर्व गोष्टी आपण इतरांसोबत शेअर केल्या पाहिजेत असे प्रकर्षाने वाटू लागले. आता हा ब्लॉगिंगचा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे यातील काही गोष्टी, वाचकांसोबत शेअर करायचा विचार आहे.
हा विषय trending म्हणजे पटकन कोणाला आकर्षित करणारा नाही. त्यामुळे किती लोकांच्या वाचण्यात येईल हे माहित नाही. पण आपल्या आनंदासाठी, अशा काही विषयांची मांडणी करतांना, आपलीच त्या विषयाची उजळणी होते आणि वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते, म्हणून हा लेखन प्रपंच करणार आहे.
या लेखांमध्ये आपल्याला काही गोष्टींची आणि काही शब्दांची तोंडओळख होणार आहे-
- वेद किती आहेत, त्यांच्यात किती मंत्र आहेत- श्रुति म्हणजे काय, स्मृति म्हणजे काय, वेदांचे भाग- संहिता, ब्राह्मण, आरण्यक, आणि उपनिषद म्हणजे काय, त्रैविद्या म्हणजे काय, प्रस्थानत्रयी म्हणजे काय.
- पुरातन काळापासून आजपर्यंत वेद अत्यंत शुद्ध स्वरूपात कोणत्या पद्धतीने जतन केले गेले, भारताच्या कुठल्याही भागात गेले तरी वेदांचे शब्द आणि स्वर अगदी अचूक एकसारखे कसे येतात, याबद्दल माहिती
- द्याौ, पृथ्वी, अंतरिक्ष या संकल्पना,
- अग्निहोत्र, किंवा यज्ञ करतांना निरनिराळे कर्म कर्ते – होतार, अध्वर्यू आणि उद्गातृ किंवा उद्गात्र आणि ब्राह्मण आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या.
प्रस्थानत्रयी –
वरील विषयाची चर्चा सुरू करण्याआधी प्रस्थानत्रयी म्हणजे काय याबद्दल थोडे समजून घेणे आवश्यक आहे.
या शब्दाचा अर्थ कुठल्या डिक्शनरीत मिळाला नाही. पण आपल्याला केंव्हा ना केंव्हा इथून ‘प्रस्थान’ करायचे आहे- म्हणजे जायचे आहे- तर ते- आपल्या ‘मूळ गावाला’ जाणे सुलभ व्हावे म्हणून जे ग्रंथ सहायक आहेत असे तीन ग्रंथ म्हणून प्रस्थानत्रयी म्हणत असावेत असे माझ्या अल्पबुद्धीला वाटत होते. पण मला एका ठिकाणी खालील अर्थ बघायला मिळाला-
प्रस्थानत्रयी
सनातन धर्मात असे मत आहे की कोणाला कुठला सिद्धांत सिद्ध करायचा असेल तर त्याला तीन प्रस्थानांमधून जावे लागेल. ते तीन प्रस्थान म्हणजे- श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान. तर आपल्याकडे उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र या तीन रचना श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणून ओळखल्या जातात.
श्रुति म्हणजे आपल्या ऋषिंना त्यांच्या ध्यान अवस्थेत ज्या ज्ञानाची ‘जाणीव’ झाली, जो ‘शब्द’ त्यांना ध्यानाच्या अवस्थेत ऐकू आला- तो शब्द किंवा ते शब्द म्हणजे श्रुति. म्हणजेच ‘वेद’. वेद हे अपौरुषेय आहेत असे जे म्हणतात ते त्याचमुळे. वेद हे कोणी ‘रचले’ नाहीत किंवा बनवले नाहीत, तर ते ‘स्फुरले’. म्हणून ते अपौरुषेय. आणि त्या प्रत्येक वेदांतील शेवटचा आणि अत्यंत सारगर्भ असलेला भाग म्हणजे उपनिषद. उपनिषदें अनेक आहेत, पण आद्य शंकराचार्यांनी ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, मांडूक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, बृहदारण्यक आणि छान्दोग्योपनिषद् या १० मुख्य उपनिषदांवर भाष्य लिहिले आहे.
तर उपनिषद हे प्रस्थानत्रयीमधील प्रथम म्हणजे ‘श्रुति प्रस्थान’ म्हणून ओळखले जातात.
स्मृति म्हणजे आठवणीतून लिहिलेले इतर साहित्य. मग त्यात भगवद्गीता आली, सगळे शास्त्र आले, दर्शन, योगसूत्र, सांख्य, रामायण, महाभारत इत्यादि रचना आल्या.
प्रमाणांच्या, पुराव्यांच्या आधारावर कुठल्या तरी निष्कर्षाला पोंचणे, याला ‘न्याय’ म्हणतात. ब्रह्मसूत्र हे स्वतः वेदव्यास (बादरायण) यांनी रचलेले आहे. आणि ते ‘न्याय’ या संज्ञेत येते. त्यात उपनिषदांतील इतस्ततः विखुरलेले ज्ञान एका ठिकाणी आणून, ५५५ ‘सूत्रां’ मध्ये क्रमवार आणि पद्धतशीर एकत्र केले आहे. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ या सूत्राने त्याची सुरुवात होते, आणि प्रमाणांच्या, पुराव्यांच्या आधारावर ‘ब्रह्म’ म्हणजे काय याचे विवेचन केलेले आढळते.
भारतवर्षात जेंव्हा कुठल्याही आचार्यांना आपले मत मांडायचे असेल, तेंव्हा त्यांनी प्रथम या प्रस्थानत्रयींवर भाष्य करून आपले मत मांडणे अपेक्षित असे. आद्य शंकराचार्य यांनी या तिन्हींवर आपले भाष्य लिहिले आहे. निम्बार्काचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य इत्यादि आचार्यांनीही या प्रस्थानत्रयींवर भाष्य केले आहे.
यापुढील लेखात आपण वेद किती आहेत, त्यांच्यात किती मंत्र आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतरच्या एका लेखात आपण छांदोग्योपनिषदात आलेली सत्यकाम जाबाल याची अत्यंत रोचक कथा पाहणार आहोत.
वरील सर्व विषयांवर मला मिळालेली माहिती आपल्यासोबत शेअर करणार आहे. या विषयात रस असणाऱ्या वाचकांनी येणारे लेख नक्की वाचावे.
माधव भोपे
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.