आजकाल समाजाभिमुख असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे, आणि ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आणि करोनाच्या नंतर तर, वर्क फ्रॉम होम हा परवलीचा शब्द झाला आहे. पूर्वी ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्याही, जेंव्हा ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ होत्या, तेंव्हा, काही प्रमाणात का होईना, पण ह्यूमन इंटरअॅक्शन एकमेकांसोबत होत असेल. पण आता, ते प्रमाण ही कमी झाले आहे. असो. हा काळाचा महिमा आहे.
बँकेतील माझ्या कार्यकाळापैकी, जवळ जवळ नव्वद टक्के काळ, ‘समाजाभिमुख’ असण्यात गेला. त्यामुळे अनेक धडे शिकायला मिळाले. अहंकाराचे कंगोरे, घासून घासून गुळगळीत करावे लागले. लवचिकपणा अंगी बाणवावा लागला. काय करावे, आणि काय करू नये, याचे धडे, प्रत्यक्ष अनुभवातून मिळत गेले. असाच एक किस्सा, येथे सांगावासा वाटतो. त्यावेळी मी अजिंठा या गावी फील्ड ऑफिसर (क्षेत्र अधिकारी) म्हणून होतो. मी आणि माझा मॅनेजर, असे दोघेच अधिकारी, आणि ३-४ जणांचा स्टाफ तिथे होतो. अजिंठा इथे सरपंच ‘चाउस’ होते, आणि त्यांचा भयंकर दरारा होता. भले भले सरकारी अधिकारी त्यांना टरकून असत. मी एक वर्षांनंतर अजिंठ्यालाच मॅनेजर म्हणून राहिलो, त्यावेळी त्यांच्याशी यशस्वीपणे चांगले संबंध ठेवता आले, आणि तेही कुठलेही कॉम्प्रोमाइज न करता, पण तो किस्सा पुढे कधीतरी.
मला का कुणास ठाऊक, पण शक्य असूनही पैसे न भरणारे, विशेषतः पैसेवाले असून कर्ज न फेडणाऱ्या थकबाकीदारांबद्दल फार राग असे. आणि एखादा हट्टी कर्जदार, असा असला, की त्याचे खाते वसूल करणे हे मला वैयक्तिक आव्हान वाटत असे. तरुण रक्त होते, आणि कुठल्याही परिणामांची परवा वाटत नव्हती. त्यामुळे कोणतेही साहस करायला काहीच वाटत नसे.
आमच्या शाखेची मुख्य कर्जे शेतीविषयक होती. पण काही कर्जे ही व्यापाऱ्यांना खेळते भांडवल इत्यादिसाठी ही होती. त्यातील बँकेपासून अगदी जवळ, कोपऱ्यावर असणारे एक कापड दुकानासाठी एक लाखाचे कर्ज होते. त्या माणसाचे नांव असेच काही पठाण वगैरे होते. तो त्याच्या खात्यात मूळ रक्कम तर जाऊदे, व्याजही अजिबात भरत नव्हता. दुकान त्याचे चांगले चालत होते.
मी अनेकदा त्याच्या दुकानात चकरा मारून त्याला सारखे विनवीत होतो, की कमीत कमी व्याज भरून, खाते नविनीकरण करून घ्या, स्टॉक स्टेटमेंट द्या, इत्यादि. पण तो प्रत्येक वेळी गोड बोलून नुसतेच हो हो म्हणत असे. त्याला अनेक नोटिसा पाठवून झाल्या. शेवटी एक नोटिस वकिलातर्फेही पाठवली. पण त्याच्यावर ढिम्म परिणाम नव्हता. शेवटी मी त्याला, तुमच्या दुकानाचा लिलाव करू, अशीही नोटिस पाठवली. पण त्याच्यावर काही परिणाम नव्हता. ही गोष्ट साधारण १९९१-९२ सालची आहे. तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने मला फारच राग येत होता. अशातच एके दिवशी, मी आणि माझे मॅनेजर, एका शेतावर, पाहणी करायला गेलो होतो. तो शेतकरी बहुतेक त्या दुकानदाराचा ओळखीचा असावा असा माझा कयास होता. त्याचा बिझनेस ही होता. आमची तिथली पाहणी झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“ आपसे एक बात करनेकी थी. ये ऐसा कापड दुकान है. वो हम नीलाम करने जा रहे है. अगर आपके जानकारी मे, कोई उसे लेनेवाला हो, तो बताइये.”. हा माझा पूर्ण आगाऊपणा होता. वास्तविक माझे मॅनेजर सोबत होते. ते काही बोलले असते तर गोष्ट वेगळी. पण माझा स्वभाव अशा गोष्टी वैय्यक्तीक आव्हान म्हणून घेण्याचा असल्यामुळे, काहीही करून हे खाते वसूल करायचेच, अशी जिद्द होती. मी त्या माणसाजवळ मुद्दामहून बोललो, जेणे करून की त्याने त्याच्या त्या ओळखीच्या मित्राला सांगावे, आणि त्याच्या लक्षात आम्ही किती सिरीयस आहोत, हे यावे. तो माणूस काही बोलला नाही. आम्ही बँकेत परत आलो.
त्या घटनेनंतर एक दोन दिवस झाले. मी त्यावेळी अजिंठा गावाच्या बाहेर, अगदी एका बाजूला एक चार खोल्यांचा वाडा होता, त्यातील दोन खोल्यांत फॅमिली मुलांसकट राहत होतो. इतर दोन खोल्यांमध्ये आमचे Head Cashier राहत होते. त्या दिवशी बँकेतून घरी येऊन, नंतर बाहेर फिरायला जाऊन आल्यानंतर, तिन्ही सांजेच्या अंधारात, मी वाड्यातील अंगणात बाजेवर एकटाच बसलो होतो. त्यावेळी वाड्याच्या दरवाजातून तो दुकानदार ‘पठाण’ “ अंदर आऊ क्या साब?” असे म्हणून आत आला. अशा वेळी अनपेक्षितपणे त्याला असा घरी आलेला पाहून मला क्षणभर काहीच समजले नाही. पण दुसऱ्याच क्षणी मी स्वतःला सावरून, अरे, आइये, आईए पठाण साब! आओ, बैठो! असे म्हणून त्याचे अगदी तोंड भरून स्वागत केले. बाजूलाच बसायला त्याला खुर्ची दिली. आतमध्ये जाऊन, त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, आणि घरात चहा टाकायला सांगितला. आधी तो बिचकत बिचकत बोलत होता. त्याचे डोळे भिरभरत होते. आधीच मोठे असलेल्या त्याच्या डोळ्यांत एक लाल झाक दिसत होती. पण मी त्याच्याशी अगदी जिवलग मित्र असल्यासारखा बोलत होतो. आणि हळू हळू त्याचे डोळे स्थिर झाले. रिलॅक्स झाले. आणि तोही तितक्याच आत्मीयतेने बोलू लागला. बोलण्यात मी चुकूनही त्याच्या दुकानाच्या थकबाकीचा विषय येऊ दिला नाही. धंदा कसा चाललाय, शेती काय म्हणते आहे, इत्यादि विषयांवर बोलत राहिलो. तोही त्याच्या अडचणी सांगत राहीला. चहा आला. आम्ही दोघांनी चहा घेतला. आणि मग एका क्षणी तो एकदम उठून उभा राहिला, आणि म्हणाला, “अच्छा, खुदा हाफिज, साब! चलता हूं!” मग थोडे थांबून, त्याने डोळे बारीक करून विचारले, “क्या साब, आप हमारा शॉप नीलाम करने वाले है बोलके सुने. क्या बात है?” माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. मी त्याला म्हणालो, “देखो भाई, नोकरी है. बँक के टार्गेट रहते है. मेरी तुम्हारी कोई पर्सनल दुशमनी तो है नही. लेकिन बोलना पडता है. आप बुरा मत मानिये. मै आपको दोस्त की हैसियत से दरखवास्त करूंगा कि आपने अगर पैसे भर दिये तो अच्छा रहेगा. इसके उपर आपकी मर्जी!”
“साब, आज हम दोनोकी किस्मत अच्छी है. बहुत अच्छी बात हुई. आपसे बात करके अच्छा लगा. लेकिन कुछ ऐसी वैसी बात होती, तो न जाने आज क्या हो जाता.” इतका वेळ त्याने त्याचा एक हात पाठीमागे ठेवलेला होता. तिकडे इशारा करून तो म्हणाला, “आज मैं खमिस के अंदर ये डण्डा साथ में लेके आया था. मैं बहुत गुस्से में था. न जाने क्या हो जाता.!” अच्छा साब, चलता हूँ, खुदा हाफिज!” असे म्हणून तो बाहेरच्या अंधारात दिसेनासा झाला.
तो गेल्यावर मी बराच वेळ सुन्न होऊन तो गेला त्या दिशेकडे पहात होतो. त्यादिवशी असे तसे काही न बोलता, अगदी योग्य तेच, योग्य त्या टोनमध्ये, न कळतच माझ्या तोंडून निघाले होते, आणि अशा वेळी परमेश्वरच आपल्याला बुद्धि देतो, हा माझा विश्वास अधिक दृढ झाला. माझ्या ‘त्या शेतावरील’ बोलण्याचा त्याच्यावर अपेक्षित परिणाम न होता, उलटाच परिणाम झालेला दिसत होता. आणि तो तावातावात थेट माझ्या घरी येऊन ठेपला होता. त्यादिवशी मी एक धडा शिकलो. अगदी टोकाचे कोणाला बोलायचे नाही, कायद्याने जे होईल ते करायचे, पण कोणाला दुखवेल असे बोलायचे नाही, हा धडा या प्रसंगाने मला शिकायला मिळाला.
पोस्ट स्क्रिप्ट: त्या कर्जाचे पुढे काय झाले, ही उत्सुकता असेल. तर आम्ही नंतर रीतसर नोटिसा वगैरे पाठवून, कोर्टात केस दाखल केली. कोर्टात केस चालत राहिली. आणि मी तिथे असेपर्यंत तरी ते कर्ज काही वसूल होऊ शकले नाही.
अशाच अजून काही ‘साहसांच्या’ कथा यथावकाश पुढील भागांत .
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.
