https://goodworld.in A website by Madhav Bhope

Adi Shankaracharya and Samartha Ramdas

आदि शंकराचार्य आणि समर्थ रामदास 

 

लेखक: श्री पांडुरंग देशपांडे 

आपल्या देशात संत आणि महापुरुषांची कमी नाही. त्याबाबतीत आपला देश हा खूप भाग्यवान आहे. त्यापैकी काही सत्पुरुष ही ‘अवतार’ या श्रेणीमध्ये येतात. इसवी सनाच्या 8 व्या आणि नवव्या शतकात होऊन गेलेले, आदि शंकराचार्य हे अवतार या श्रेणीत येतात. आपण त्यांना भगवान शंकरांचा अवतार मानतो. अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी येणाऱ्या अनेक शतकांत उपयोगी पडणारे कार्य करून ठेवले आहे. तसेच त्यामानाने अलिकडच्या काळात झालेले दुसरे सत्पुरुष म्हणजे समर्थ रामदास. रामदास हेही मारूतीचा अवतार आहेत असे आपण मानतो.

रामदासांनी त्या काळात अत्यंत आवश्यक असे समाज प्रबोधनाचे आणि शक्ति उपासनेचे  कार्य तर केलेच. पण व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड घालून, सामान्यातल्या सामान्याला परमार्थ सोपा करून सांगितला.

समर्थ रामदासांनी मुख्यतः जरी भक्तिमार्ग प्रशस्त केला असला, तरी त्यांच्यावर आदि शंकराचार्य यांच्या अद्वैत मार्गाचाही खूप प्रभाव होता.

लग्नमंडपात ‘सावधान ‘ शब्द ऐकून पळालेले नारायण काही दिवसांनी पंचवटी,नाशिक येथे आले. तिथे ते सुरुवातीला राम मंदिरात आणि नंतर शंकराचार्यांच्या  आश्रमात राहिले असावेत. .तिथेच  सेवा  करताना त्यांना आचार्यांच्या कार्याचा परिचय झाला असावा.

आचार्यांचे स्तोत्र वाङ्मय व  त्यांचे ‘प्रकरण’ ग्रंथ, विशेषतः हस्तामलक, शुकाष्टक, अद्वैतानुभूती,पंचीकरण, आत्मबोध,शतश्लोकी  वगैरेंचे अध्ययन या मठात प्रारंभी त्यांनी केले असावे. संस्कृत भाषेचा परिचय करून घेऊन गीता,भागवत रामायण, महाभारत,योगवासिष्ठ वगैरे ग्रंथांचे त्यांनी श्रवण,अध्ययन केले असावे. संगीताचे ज्ञानही त्यांनी करून घेतले असावे.  त्यामुळेच रागज्ञान, तालज्ञान इत्यादि विषयी त्यांचे दासबॊधामध्ये उल्लेख आले आहेत.

मठात राहत असताना त्यांनी आचार्यांची स्तोत्रे,भगवदगीता आत्मसात केली.आद्य शंकराचार्यांच्या वैदिक संस्कृतीच्या पुनरुत्थानाच्या कार्याचाही त्याच्या मनावर पूर्ण ठसा उमटला आहे असे समर्थ साहित्य वाचताना आपणास जाणवते. ‘त्वं तत्वमसि’ या तेथील महावाक्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम आपणाला  दासबोधात दिसतो.

‘समर्थप्रताप ‘ या ग्रंथात श्री गिरिधरस्वामींनी त्या दोघांमधील साम्य दाखविले आहे:

समर्थ अवतार निरोपमा / आचार्य स्वामींची साजे उपमा /

ब्रह्मचर्याश्रमी  परमहंसमहिमा / ब्राह्मण्यरक्षणी अवतारु //

ब्रह्मसूत्र आचार्यदेवी रक्षिले / ब्रह्मआरण्य समर्थदेवे संरक्षिले /

कलयुगीं संन्यासग्रहण आश्चर्ये चालविले/ विचार संन्यास समर्थांचे //

आचार्यस्वामी शंकरमूर्ती / समर्थस्वामी महारूद्रमूर्ती /

आत्मलिंग आत्माराममूर्ती / दक्षिणामूर्ती दक्षिणे  //

अद्वैत आणि भक्ती हे समर्थानी मांडलेले प्रमुख सिद्धांत आहेत.

अद्वैताच्या दृष्टीने पहिले तर मायावाद आणि निर्गुणाचा पुरस्कार या दृष्टीने समर्थ आचार्यांच्या जवळ वाटतात. समर्थांनी आचार्यांचा कर्मसंन्यास स्वीकारलेला नाही आणि ज्ञानापेक्षा भक्तीला त्यांनी अधिक महत्व दिलेले आहे.समर्थांचे मायाब्रह्माचे निरूपण पहिले की आचार्यांचा मायावाद त्यांनी  स्वीकारला आहे याची खात्री पटते. मायेच्या रूपाचा आणि कार्याचा अगोदर छडा लावावा लागतो .

आधी मिथ्या उभारावे  /मग ते वोळखोन सांडावे /

पुढे सत्य ते स्वभावे / अंतरी बाणे // (दास. ७.३.४ )

शंकराचार्यांनीही आपल्या ब्रह्मसूत्रभाष्याचा प्रारंभ अध्यासाच्या (Superimposition) विवेचनाने  केला आहे.

समर्थ पंचवटीतील ज्या शंकरमठात राहत होते तो स्वरूपसंप्रदाय मठ तत्कालीन द्वारिकापीठाच्या अधिकाराखाली होता. त्या द्वारिकापीठाचे आद्य आचार्य हस्तामलक  होते. प्रत्येक मठात

  • नाव व कार्यक्षेत्र ( पश्चिम,पू्र्व ,उत्तर आणि दक्षिण),
  • त्याचे आचार्य,क्षेत्र,देव,देवता,संप्रदाय (स्वरूप,प्रकाश,आनंद व चैतन्यमय),
  • त्या मठाचा वेद(अनुक्रमे साम,ऋक्,अथर्व आणि यजुस्) व
  • महावाक्य (तत्वमसि,प्रज्ञानं ब्रह्म,अयतात्मा ब्रह्म व अहं ब्रह्मास्मि)

आद्य शंकराचार्यांनी अनुशासित करून दिले होते.

आपण द्वारका,पुरी ,बदरिकाश्रम,व शृंगेरी  ही आद्य पीठे जाणतोच. याशिवायही अजून तीन पंथाचे-आम्नायांचे मठ आहेत.

या मठात राहून, शिकूनच समर्थानी आपल्या स्वतंत्र बुद्धीने आपल्या कुळात  चालत असलेल्या रामोपासनेचा तसेच रामाचा दास असलेल्या एकनिष्ठ मारुतीचा  समावेश करून आपला स्वतंत्र नवा ‘स्वरूप’ संप्रदाय उभारला. त्यांनी आचार्यांच्या मठ अनुशासनातील वरील  सर्व संकल्पनांचा उपयोग करून घेतला आहे हे त्यांच्या दासबोधाच्या (आपण सर्व पठण करत असलेल्या) आत्मनिवेदनपर ओव्यांतून व्यक्त होतात…

हनुमंत आमची कुळवल्ली  / राममंडपा वेला गेली /  श्रीरामभजने फळली /रामदास बोले या नावे //

आमुचे कुळी हनुमंत /हनुमंत आमुचे दैवत /तयवीण आमुचा परमार्थ /सिद्धीते ना पावे सर्वथा //

साह्य आम्हांसी हनुमंत /आराध्यदैवत श्री रघुनाथ / श्रीगुरुश्रीराम समर्थ /काय उणे दासासी  //

दाता  एक रघुनंदन / वरकड लंडी देई कोण /तया सोडोन आम्ही जन जे /कोणा प्रति मागावे //

म्हणोनि आम्ही रामदास /श्रीरामचंद्रानी आमुचा विश्वास /कोसळोनि पडो हे आकाश /आणिकाची वास ना पाहू //

स्वरूपसंप्रदाय अयोध्यामठ / जानकीदेवी श्रीरघुनाथ दैवत / मारुती उपासना नेमस्त /वाढविला परमार्थ रामदासी //

नवा अयोध्यामठ,देव रघुनाथ,देवता जानकी ,नेमस्त (ब्रह्मचारी)मारुतीसारखी उपासना आहे… अशा नव्या परमार्थपर ‘स्वरूप ‘संप्रदायाची समर्थानी स्थापना करून लोकप्रबोधन आणि उद्धाराचे मोठे कार्य  दासबोध इत्यादि साहित्यलेखन करून हाती घेतले  आणि ‘ जय जय रघुवीर समर्थ ‘ अशा जयघोषाने  अवघा भारतवर्ष  चेतनामय करून   टाकला !  आचार्य शंकरांसारखेच त्यांनीही देशभर भ्रमण केले आणि नंतर हिंदुस्थानभर हजार मठ उभारले व लोकांना  उपासनामार्गाला लावले.

सनातन धर्माच्या या दोन महान अवतारी सत्पुरुषांना मनोभावे वंदन!

लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.

pandurang deshpande
pandurang deshpande

लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.