

या पूर्वी आपण 10 जानेवारी ला भेटलो होतो. त्यात आपण समर्थांच्या दासबोधातील, दुसऱ्या समासातील एक श्लोक उद्धृत केला होता.
रूप लावण्य अभ्यासिता न ये |
सहज गुणास न चले उपाये |
कांही तरी धरावी सोये |
आगंतुक गुणाची || (दासबोध- २-८-३१)
अर्थात, “जन्मजात सगळ्यांना सगळे गुण असतातच असे नाही. पण काही गुण अभ्यासाने, प्रयत्नाने, आत्मसात करता येतात”
जगातील सगळ्यात मोठी समस्या, जगातील जास्तीत जास्त दुःखांचे कारण काय आहे असा प्रश्न जर कोणाला विचारला, तर त्याची अनेक उत्तरें येतील. कोणाच्या दृष्टीने गरिबी हे जगातल्या सर्व दुःखांचे मूळ कारण असेल, तर कोणाला बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या वाटत असेल. कोणाला वाढत चालणारा हिंसाचार हा सर्व दुःखांचे आणि समस्येचे मूळ वाटत असेल, तर कोणाला, आजकालच्या जगात वाढत असलेला भोगवाद, चंगळवाद, आणि माणसांचा वाढत चाललेला स्वार्थीपणा, निसर्गाला ओरबाडण्याची वृत्ती, ही सगळ्या दुःखांच्या मुळात आहे असे वाटू शकते.
वरील सर्व कारणे नक्कीच कमी अधिक प्रमाणात माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण, आज आपल्या अवतीभवती पाहिले असता, माणसाच्या दुःखाचे एक मोठे आणि मुख्य कारण हे सुसंवादाचा अभाव हेच आहे. सुसंवाद तर दूरची गोष्ट राहिली, आज माणसा माणसात, इतकेच काय, अगदी जवळच्या नातेसंबंधात संवाद सुद्धा होणे दुर्मिळ आणि दुर्धर झाले आहे. आणि यात विडंबना अशी की, विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे लागणारे नवीन नवीन शोध आणि वाढलेली संवादाची साधने यांचा या ‘संवादाच्या अभावात’ प्रमुख सहभाग आहे. घराघरात लहानांपासून थोराच्या हातात दिसणारा मोबाईल हे याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. पण त्याबद्दल नंतर कधी बोलूत. कारण या विषयावर वरवर पाहता सर्वांचे एकमत असले तरी, आपण सोडून इतर सर्व लोकांनी याबाबत जागरूक होण्याची गरज आहे, आपण तर याबाबतीत जागरूक आहोतच, हे प्रत्येकाचे प्रामाणिक मत असते.
पण माझा विषय वेगळाच आहे. वर समर्थांनी म्हटले आहे की जन्मजात सगळ्यांना सगळे गुण असतातच असे नाही. पण काही गुण अभ्यासाने, प्रयत्नाने, आत्मसात करता येतात. ‘बोलावे कसे’ याबद्दल आपल्याकडे, आपल्या पारंपरिक ग्रंथांमध्ये, संत साहित्यामध्ये विस्ताराने मार्गदर्शन केलेले आढळते. गीतेमध्ये, सांगितल्याप्रमाणे-
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङमयं तप उच्यते || गीत १७ -१५ 15||
अर्थात, दुसऱ्यांना उद्विग्न न करणारे, सत्य, प्रिय वाटणारे आणि हितकारी असे बोलणे, तसेच नित्य वेद आणि शास्त्र यांचा अभ्यास वाणीने करणे यांना वाणीचे तप म्हणतात.
तसेच, मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे,
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् ।
प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥ ४-१३८ ||
अर्थात, सत्य बोलना चाहिये, प्रिय बोलना चाहिये, सत्य किन्तु अप्रिय नहीं बोलना चाहिये । प्रिय किन्तु असत्य नहीं बोलना चाहिये ; यही सनातन धर्म है ॥
पण माझा मुद्दा असा आहे, की आपण संवादाचा, भाषेचा उपयोग दोन कारणांसाठी करतो: एक- माहितीचे संप्रेषण करण्यासाठी(उदा. अमुक वस्तु अमुक ठिकाणी ठेवली आहे), दुसरे- भावना व्यक्त करण्यासाठी.
पण संवादाचा एक अत्यंत महत्वाचा उपयोग किंवा उद्देश, हा, दुसऱ्याच्या भावना समजून घेणे, दुसऱ्याला बोलते करणे, हाही असतो, आणि त्याचबरोबर एखाद्या विषयावर सम्यक माहिती मिळविणे, आपल्या ज्ञानात भर घालणे, हाही असतो, याची जाणीव फार कमी जणांना आणि फार कमी वेळेस होते. त्यामुळेच, आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, “वक्ता भवति प्रत्येकः, श्रोता भवति वा न वा” असे म्हणण्यासारखी परिस्थिती दिसून येते. कुठल्याही संवादात, आपल्याला असलेली माहिती, किंवा आपले विचार, हे ठासून आणि आग्रहपूर्वक सांगण्याची प्रवृत्ती दिसून येते. वास्तविक आपण सांगत असलेल्या गोष्टी, या मूळ आपले विचार नसून, नुकतेच कुठेतरी वाचलेले, ऐकलेले, पाहिलेले, आणि आपल्याला भावलेले असे input असते. पण ते आपण आपलेच म्हणून रेटून मांडत असतो. बरे, जो मनुष्य, असे एकतर्फी बोलतो, त्या माणसाच्या ज्ञानात, त्या पूर्ण संवादानंतर काय भर पडते? कारण तो जे बोलला, ते तर त्याला आधीच माहिती होते.(वाचून किंवा ऐकून). मग त्याच्यात value addition काय झाले? त्यामुळे, दुतर्फा संवाद नसेल, तर एकतर्फी बोलणाऱ्याचा घडा रिकामाच राहतो. त्या ऐवजी, जर आपण समोरच्या माणसाशी बोलतांना, लक्षपूर्वक, पूर्वग्रह सोडून ऐकले, आणि ऐकतांना, त्या माणसाला बोलण्याला प्रवृत्त करण्यासाठी काही योग्य ते प्रश्न विचारत गेलो, तर आपल्याला कल्पनाही नसलेल्या अनेक गोष्टी कळू शकतात, माहिती होऊ शकतात. बऱ्याचदा त्यामुळे, जी माहिती, खूप उशिरा, कालांतराने कळाली असती, ती विनासायास कळू शकते. पण त्यासाठी, ‘ऐकण्याची कला’ अशी काही असते, हे मान्य करावे लागेल. ऐकण्याच्या कलेमुळे झाला तर आपला फायदाच होऊ शकतो. नुकसान काही व्हायचा प्रश्न नाही. कारण प्रत्येकाला आपले आपले स्वातंत्र्य असतेच.
त्यामुळे, पुढील लेखात आपण, “ The Art of listening” अर्थात, ‘ऐकण्याची कला’ याबद्दल काही चर्चा करूयात. तसेच, संवादात, communication मध्ये, non verbal communication, अर्थात, ‘गैरमौखिक, किंवा, अशाब्दिक संप्रेषण’ याची किती भूमिका आहे, याविषयीही काही चर्चा करूयात.
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
माधव भोपे
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.