https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*एटीएम नाट्य..*  (क्रमशः 2)

(अंक दुसरा – प्रवेश पहिला)

दुसरा दिवस उजाडला. आज संध्याकाळी हवालदार जमदाडे वरिष्ठांना घेऊन बँकेत येणार होते. त्यावेळी त्यांना काय उत्तर द्यावे हे अजूनही न सुचल्यामुळे सकाळ पासूनच मनाला एक अनामिक हुरहूर व चिंता लागून राहिली होती.

त्या दिवशी बँकेत ग्राहकांची खूप गर्दी होती. कामाच्या गडबडीत संध्याकाळ कधी झाली ते कळलंही नाही. मात्र तशा घाईगर्दीतही या प्रकरणाशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. सरकारी दवाखान्यातील डॉ. विक्रम भोसले आणि बँकेसमोर आईसक्रीम विकणारा नंदू हे दोघेही काही कामानिमित्त बँकेत आले होते. त्यांना पाहताच अकाऊंटंट साहेब त्या दोघांनाही घेऊन माझ्या केबिनमध्ये आले. सुरवातीला मी डॉक्टरसाहेबांना विचारलं..

“पंधरा तारखेला रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी बँकेच्या एटीएम मधून एक हजार काढून बाहेर आल्यावर तुम्हाला एटीएम रूमच्या आसपास कोणी दिसलं होतं का ?”

माझ्या या प्रश्नावर नकारार्थी मान हलवित डॉक्टर साहेब म्हणाले..

“एटीएम रूमच्या आसपास तेंव्हा कुणीही नव्हतं. एटीएम रूम पासून बँकेच्या कंपाऊंडचे फाटक पंचवीस ते तीस मीटर इतके दूर आहे. परत जाताना हे पूर्ण अंतर पार करीत असताना मला कुणीही दिसलं नाही. मात्र बँकिंग हॉलच्या ग्रील गेट जवळ उभ्या असलेल्या तुमच्या सिक्युरिटी गार्डने त्यावेळी मला सॅल्युट ठोकलेला अजून आठवतो. कारण मी जरी त्याला ओळखलं नाही, तरी तो मात्र मला जरूर ओळखत असावा. शिवाय, त्यादिवशी त्या गार्डच्या खांद्यावर नेहमी सारखी रायफल सुद्धा नव्हती हे देखील मी त्यावेळी मार्क केलं होतं.”

“ठीक आहे डॉक्टरसाहेब, आपले खूप खूप धन्यवाद !”

एवढं बोलून डॉक्टर साहेबांना निरोप दिल्यानंतर आईसक्रीम गाडीवाल्या नंदूला विचारलं..

“पंधरा तारखेला रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी तू येथील एटीएम मधून पाचशे रुपये काढले होतेस. त्यावेळी एटीएम रूम कडे जाताना किंवा परतताना तुला कुणी अन्य व्यक्ती दिसली का ?”

त्यावर नंदू म्हणाला..

“नेहमी सारखी रात्री नऊ सव्वा नऊ वाजता मी कुलुपं लावून आईसक्रीमची गाडी बंद केली आणि घरी निघालो होतो. तेवढ्यात सगळीकडची वीज गेली. वीज गेल्यावर मला आठवलं की माझ्या घराचं गेल्या चार महिन्यांचं वीज बिल भरणं बाकी आहे. मी खिशातील पैसे काढून मोजले व हिशोब केला. बिलासाठी फक्त पाचशे रुपये कमी पडत होते. एवढ्यात वीज परत आली आणि बीज बिल भरण्यासाठी एटीएम मधून मी पाचशे रुपये काढले. मात्र एटीएम रूम कडे जाताना किंवा तेथून परतताना वाटेत मला कुणीही दिसलं नाही.”

नंदू गेल्यावर मी विचारमग्न झालो. डॉ. भोसले किंवा नंदू यापैकी कुणीच कसं त्यादिवशी एटीएम रुमच्या आसपास कुणालाच पाहिलं नाही ? अर्थात गावात विनाकारण चर्चा नको म्हणून मुद्दामच मी हवालदार जमदाडेंच्या खात्यातून दहा हजार रुपये काढले गेल्याच्या घटनेचा त्या दोघांजवळही उल्लेख केला केला नव्हता. हे ATM withdrawal चं प्रकरण हळूहळू गूढ होत चाललं होतं.

डॉ. भोसलेंनी बोलता बोलता रायफल नसलेल्या सिक्युरिटी गार्डचा उल्लेख केला होता. त्यामुळे हेड गार्डकडून “गार्ड ड्युटी रजिस्टर” मागवून पंधरा तारखेला रात्री नऊ वाजता कोणत्या गार्डची ड्युटी होती ? हे तपासून पाहिलं. तेव्हा, पंधरा तारखेला रेग्युलर गार्ड सुटीवर असल्याने टेम्पररी गार्ड गणपत हा त्या दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री दहा या काळात ड्युटीवर होता असे समजले. हा गणपत होमगार्ड असल्याने त्याच्याजवळ रायफल बाळगण्याचा परवाना नव्हता. तसंच, तो सरकारी दवाखान्यातही टेम्पररी वॉचमन म्हणून काम करीत असल्याने डॉ. भोसलेंना ओळखत असावा असाही खुलासा झाला.

टीव्हीवरील “Crime Patrol” सिरीयल मध्ये दाखवतात, तशाच धर्तीवर विविध अँगल्स पडताळून माझा तपास सुरू होता. हवालदार खुशाल जमदाडे यांच्याविषयी जमेल तितकी माहिती गोळा करण्यासही मी सुरुवात केली होती. विशेषतः खरोखरीच गेले वीस दिवस ते मुंबईला गेले होते की अधून मधून वैजापूरला ही येऊन जात होते, हे जाणून घेण्यावर माझा भर होता.

संध्याकाळचे सात वाजले होते. बँकेतली गर्दी आता बरीच ओसरली होती. हवालदार जमदाडे आता कोणत्याही क्षणी बँकेत प्रवेश करतील असा विचार मनात येतो न येतो तोच केबिनच्या काचेतून हवालदार खुशालराव एका उंच, सडपातळ इन्स्पेक्टर सह बँकेत शिरताना दिसले.

ते दोघेही माझ्या केबिन मधल्या खुर्चीवर स्थानापन्न झाल्यावर हवालदार जमदाडेंनी अगोदर त्याच्या वरिष्ठांना माझा परिचय करून दिला आणि म्हणाले..

“हे वैजापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार इन्स्पेक्टर खराटे. माझ्यावर झालेल्या अन्याया संदर्भात आता तेच माझी बाजू मांडतील..”

गोरापान वर्ण, लांब उभट चेहरा, पिंगट डोळे, सरळ धारदार नाक आणि बारीक मिशा असलेले इन्स्पेक्टर खराटे अत्यंत मृदु आवाजात म्हणाले..

“वेल sss ! मला एवढंच सांगायचं आहे की एका अत्यंत गुप्त व महत्वाच्या कामासंदर्भात आमच्या पोलिस स्टेशनचे हवालदार श्री जमदाडे यांना पाच तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत मुंबई येथे पाठविण्यात आले होते. काम अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना सदैव कामाच्या ठिकाणीच हजर राहणे अनिवार्य होते. तसंच मुंबईला जाताना बँकेचे एटीएम कार्डही सोबत नेले असल्याचे त्यांनी मला प्रतिज्ञा पूर्वक सांगितले आहे.

त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खात्यातून एटीएम द्वारे दहा हजार रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीद्वारे काढून घेण्यात आली ही अत्यंत गंभीर बाब आहे. श्री जमदाडे हे आमच्या ठाण्याचे अत्यंत ईमानदार, कर्तव्यदक्ष व सिनियर हवालदार असून त्यांना त्यांची रक्कम ताबडतोब परत करण्यात यावी अशी तुमच्याकडे मी मागणी करतो.

या घटनेला अगोदरच दहा ते बारा दिवस होऊन गेले असल्याने आधी हवालदार साहेबांना त्यांची रक्कम परत करावी आणि बँकेची अंतर्गत चौकशी चालूच ठेवावी. चौकशी संदर्भात आवश्यकता भासल्यास आम्ही आपणांस सर्व प्रकारे सहाय्य करू.

गेले दोन दिवस, आपण स्वतःहूनच पैसे परत कराल याची आम्ही वाट पाहिली. परंतु आपल्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आपल्या बँकेविरुद्ध लेखी तक्रार आपल्याकडेच नोंदवित आहोत. कृपया या कागदाच्या सत्य-प्रतीवर “Received” असे लिहून सही शिक्का द्यावा.”

असं म्हणून इन्स्पेक्टर खराटेंनी खिशातून दोन कागद काढून ते माझ्यासमोर ठेवले.

मी कागदावरून झरझर नजर फिरवली. हवालदार जमदाडेंनी पूर्वी मला सांगितलेला घटनाक्रमच त्या तक्रारीत लिहिलेला होता. ते मुंबई येथे गुप्त कामगिरीवर गेले असल्याचा उल्लेखही त्यात होता. एटीएम रूम मधील सीसीटीव्ही चे रेकॉर्डिंग तपासून प्रकरणाची शहानिशा करून त्वरित पैसे परत मिळावेत अशी मागणीही त्यात केलेली होती. लगेच त्या तक्रारीच्या सत्य-प्रतीवर Received असं लिहून सही शिक्क्यासह ती प्रत जमदाडेंना परत केली. माझ्याशी हस्तांदोलन करून इन्स्पेक्टर खराटे केबिन बाहेर पडले. त्यांना गेटपर्यंत सोडण्यासाठी हवालदार जमदाडेही त्यांच्या मागोमाग बाहेर गेले.

पाचच मिनिटांनी खुशालराव जमदाडे पुन्हा माझ्या केबिन मध्ये परत आले. मघाशी इन्स्पेक्टर साहेबांसोबत असतानाचे त्यांच्या चेहऱ्यावरील नम्र, मवाळ, सभ्य, आज्ञाधारक भाव आता पार बदललेले होते. त्या चेहऱ्यावर आता भीषण क्रौर्य दिसत होते. आधीच मोठे, बटबटीत असलेले डोळे आता क्रोधाने लालबुंद झाले होते. त्यांची नजर खुनशी वाटत होती. कुटिल, कावेबाज, छद्मी हास्य करीत ते म्हणाले..

“मी तुम्हाला पैसे परत करण्यासाठी दिलेली मुदत कालच संपली. आता उद्यापासून “पोलिसी खाक्या” कसा असतो, ते तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा तयार रहा..”

हवालदार जमदाडे बोलत असताना त्यांच्यात क्षणोक्षणी अमरीश पुरी, परेश रावळ, सदाशिव अमरापूरकर अशा क्रूर, बेरकी फिल्मी खलनायकांचा भास होत होता. ज्यावेळी त्यांच्या दोन्ही हातांच्या मुठी वळल्या जाऊन त्यांचे उग्र डोळे आग ओकीत होते त्यावेळी तर ते हुबेहूब नाना पाटेकरच्या “तिरंगा” चित्रपटातील क्रूर व्हिलन दीपक शिर्के उर्फ “प्रलयनाथ गेंडास्वामी”च भासत होते.

टेबलावर मूठ आपटीत आणि सवयीप्रमाणे आपल्या जाडजूड मिशांना हळुवारपणे कुरवाळीत, त्यांना हलकेच पीळ देत खुशालराव तरातरा बँकेतून निघून गेले.

ते गेल्यावर त्यांनी दिलेली तक्रार पुन्हा वाचून काढली. तक्रारीच्या प्रति  पोलिस स्टेशन, वैजापूर, पोलिस कमिशनर (ग्रामीण), औरंगाबाद, जिल्हाधिकारी, औरंगाबाद तसेच बँकेच्या रिजनल मॅनेजर साहेबांना दिलेल्या होत्या. ताबडतोब त्या तक्रारीचे उत्तर लिहायला घेतले.

“बँकेने आपल्या तक्रारीची ताबडतोब दखल घेतली असून प्रकरणाचा तपास चालू आहे. CCTV फुटेज तसेच अन्य तांत्रिक तपास पूर्ण झाल्यावर बँकेच्या नियमाप्रमाणे आपल्या तक्रारीचे योग्य ते निराकरण केले जाईल..” असा उल्लेख करून ते उत्तर ताबडतोब हवालदार जमदाडेंना चपराशा मार्फत हॅण्ड डिलिव्हरीने पाठवून दिले. तसेच त्या उत्तराच्या प्रति वैजापूर पोलिस स्टेशन, रिजनल मॅनेजर, जिल्हाधिकारी व पोलिस कमिशनर, औरंगाबाद यांनाही पाठवून दिल्या.

त्या दिवशी रात्रभर मला झोप आली नाही. सारखी खुशालरावांनी दिलेली “पोलिसी खाक्या” दाखवण्याची धमकी आठवत होती. त्यांचा  लालभडक डोळ्यांतून आग ओकणारा, त्वेषाने मुठी वळलेला, काळा कभिन्न, उर्मट, खडबडीत, राक्षसी चेहरा सतत डोळ्यांपुढे येत होता.

पहाटे पहाटे माझा डोळा लागला आणि मला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात महिनाभरापूर्वी बँकेत येऊन गेलेले एटीएम टेक्निशियन श्री. गाडेकर हे मला दिसले. बोलता बोलता श्री. गाडेकर म्हणाले..

“प्रत्येक एटीएम मशीन मध्ये एक अदृश्य, छुपा, गुप्त कॅमेरा (in-visible, hidden, discreet camera) सुद्धा असतो. हा कॅमेरा सामान्यत: आकाराने अत्यंत छोटा, सूक्ष्म छिद्र पद्धतीचा, पिन होल भिंगांचा (small, pin- hole lenses) असून तो पॅनेलच्या अग्रभागी मशीनच्या आत बसवलेला, अंतर्निहित (in-built) असतो. या कॅमेऱ्यामुळे एटीएम वापरणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याची स्पष्ट प्रतिमा (clear image) घेतली जाते.

काही एटीएम मशीन मधील अंतर्निहित गुप्त कॅमेरे हे सतत (continuous) रेकॉर्डिंग करीत असतात तर काही मशीन मधील कॅमेरे हे घटना-प्रवृत्त (event-triggered) असतात. म्हणजेच मशीनमध्ये एटीएम कार्ड सारताच किंवा पॅनेल समोर कसलीही हालचाल होताच हे कॅमेरे आपोआप कार्यरत (active) होतात.

तसंच या गुप्त कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग हे जास्तीतजास्त 90 दिवसांपर्यंतच मशीनमध्ये साठवून (store) ठेवले जाऊ शकते. एटीएम टेक्निशियनच्या मदतीने हे गुप्त रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता तसंच ते रेकॉर्डिंग Pen-drive मध्ये सुद्धा घेता येतं.”

मला झोपेतून जाग आली तेंव्हा पहाटे पहाटे पडलेलं ते स्वप्न मला पुन्हा आठवलं. खरं म्हणजे गेल्याच महिन्यात बँकेत येऊन गेलेल्या एटीएम टेक्निशियनने मला ह्या मशीनमधील इन-बिल्ट कॅमेऱ्याबद्दल सांगितलं होतं. पण माझा एटीएमशी पूर्वी कधीच संबंध आलेला नसल्याने मला त्यात फारसे स्वारस्य नव्हते त्यामुळेच त्यांचे ते बोलणे त्यावेळी मी लक्षपूर्वक ऐकले नव्हते.

सुदैवाने ते एटीएम टेक्निशियन श्री गाडेकर यांचा मोबाईल नंबर मी सेव्ह करून ठेवला होता. ताबडतोब त्यांना फोन केला आणि घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले..

“काही काळजी करू नका. वीज गेली असली तरी मशीन मधील इन-बिल्ट कॅमेरा आपले काम व्यवस्थितपणे करीत राहतो. मीच तिथे येऊन तुम्हाला त्या दिवशीचे रेकॉर्डिंग काढून दिलं असतं.. पण गेल्याच आठवड्यात माझी बदली परभणी रिजनला झाली असल्यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. मात्र माझ्या जागी श्री डोंगरे हे टेक्निशियन तिथे आलेले आहेत. त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वैजापूरला बोलावून घ्या.”

श्री. गाडेकरांचे आभार मानून लगेच नवीन टेक्निशियन श्री. डोंगरे यांच्याशी संपर्क साधला. दुर्दैवाने माझ्या फोनला श्री. डोंगरे यांचा प्रतिसाद अगदी थंड असाच होता. “पुढील काही दिवसांचा टूर प्रोग्राम फिक्स असल्याने किमान एक आठवडा तरी वैजापूरला येणे शक्य होणार नाही..” असे ते म्हणाले. मी हर तऱ्हेने त्यांना विनंती केली.. “पाहिजे तर रिजनल मॅनेजर साहेबां करवी तुम्हाला इथे बोलावून घेतो..” असेही सांगितले.. पण श्री डोंगरे एखाद्या पर्वताप्रमाणे आपल्या म्हणण्यावर ठाम, अडीग होते.

शेवटी हताश होऊन “तुमचा आजचा प्रोग्राम काय आहे ?” असे त्यांना विचारले तेंव्हा ते म्हणाले..

 “आज मी मनमाड येथे जाणार आहे तर उद्या सिन्नर येथे..! या दोन्ही ठिकाणी भरपूर काम असल्याने तिथून परतायला मला खूप उशीर होईल. त्यामुळे निदान हे दोन दिवस तरी वैजापूरला येणं मला मुळीच शक्य नाही. “

स्वतःशीच चरफडत मी फोन खाली ठेवला. अजूनही हवालदार जमदाडेंची कालची ती हिंस्त्र, खुनशी नजर, त्या क्रोधाने घट्ट वळलेल्या दोन्ही हातांच्या मुठी, ते खदिरांगारासारखे लालबुंद, तप्त, क्रुद्ध, भेदक डोळे.. हे सारं डोळ्यापुढे येत होतं.

या प्रकरणाचा लवकरात लवकर काहीतरी साक्षमोक्ष लावलाच पाहिजे. नाहीतर तो माजलेला “पुलिसवाला गुंडा” काहीतरी आततायी कृत्य केल्याशिवाय राहणार नाही. कसंही करून एखादा एटीएम टेक्निशियन ताबडतोब वैजापूरला आणायलाच हवा. अधीर होऊन मी रिजनल मॅनेजर (AGM) व उपमहाप्रबंधक (DGM) या दोघांनाही फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या दुर्दैवाने ते दोघेही त्यावेळी मुंबईला GM साहेबां सोबतच्या मीटिंग मध्ये व्यस्त होते.

या सर्व खटपटीत सकाळचे दहा वाजून गेले होते. बँकेत जायची वेळ झाली होती. आजचा दिवस हा प्रचंड वेगवान आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेला असणार आहे अशी माझा “सिक्स्थ सेन्स” ग्वाही देत होतं..

एटीएम नाट्याचा अतिशय उत्कंठापूर्ण असा हा दुसरा अंक आज निर्णायक वळण घेणार होता..

                          (क्रमशः 3)

                   🙏🏻🌹🙏🏻

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Say what you feel