मानसिक ताणतणावामुळे शुगर वाढलेला एक रुग्ण आमच्या मधुमेह तज्ञ मित्राने समुपदेशनासाठी पाठवला होता.
ऑफिसमधला कामाचा ताण,उत्पन्नामध्ये वाढ व्हावी म्हणून सुरु केलेला छोटा व्यवसाय ,त्याची वाढती जबाबदारी ,कौटुबिक ताण ,वाढणारी रक्त शर्करा एकंदर बऱ्यापैकी वैतागलेला,पत्नीच्या भाषेत चिडचिडा स्वभाव अशी एकंदर रुग्णाची परिस्थिती होती.त्याचा मनात सतत आपण कुठे कमी पडणार तर नाही ,मला कुटुंबातले सदस्य समजावून घेत नाहीत असे विचार येत व त्या मुळे निद्रानाश , डोकेदुखी सारखे आणखी विकार मागे लागले होते.
सुरवातीला, तुम्ही डायनिंग टेबल वरचं खाण्याचं सामान नेहमी बेडरूम मध्ये ठेवता का ? किंवा रोज हॉलमधल्या चपला स्वयंपाक घरात आणता का ? असा प्रश्र्न मी विचारल्यावर
आता हा अजून काय नवीन प्रकार, अशा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पहिले.
नंतर त्याच्यांशी संवाद साधताना मी कंपार्टमेंट विचार पद्धती ची मजा सांगितली .
आपण कोणत्याही घटनेचा विचार करताना त्याचा संबंध अनेक घटनांशी लावत असतो. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये काही वादावादी झाली असेल आणि घरी आल्यावर मुलांचा गोंधळ चालू असेल किंवा पत्नीशी मतमतांतर झाले असेल तर आपण ऑफिसमधला ताणतणाव डोक्यात ठेवून मुलांवर किंवा पत्नीवर रागवतो .त्यांच्याशी नीट बोलत नाही.
तसंच निर्णयाच्या बाबतीत कौटुंबिक मतभेद झाले तर आपण मतभेद झाले हाच विषय डोक्यात ठेवून इतर वेळी सामान्य पण वागत नाही .आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना मतभेद झालेला विषय डोक्यात ठेवून पूर्वग्रह दूषित संवाद करतो. त्यामुळे तो विसंवादच जास्त होतो .
आपण आपली भूमिका नेमकी ठेवत नाही.आपल्या सगळ्या भूमिकांची सरमिसळ आपण करत असतो. जेव्हा वडील म्हणून काही संवाद साधायचा असेल तेव्हा आपली ऑफिसरची भूमिका आपण सोडून द्यायला पाहिजे पण मुलांची बोलताना बऱ्याच वेळा ऑफिसर च्या भूमिकेतूनच आपण बोलतो कुटुंबियांशी संवाद साधताना किंवा पत्नीशी संवाद साधताना अगोदर झालेल्या घटना, मतभेद डोक्यात ठेवून आपला संवाद होतो प्रत्येक वेळी मागे झालेल्या चुका संदर्भासाठी ठेवूनच आपण त्यांच्याशी बोलतो.
हा भूमिकांची सरमिसळ असलेला संवाद खूप त्रासदायक होतो. साधं “पाणी दे” हे वाक्य बोलताना सुद्धा मागच्या वेळेस पाणी थोडं सांडलं होतं हा रेफरन्स डोक्यात ठेवून पाणी न सांडता आण , असं बोलल्यास समोरची व्यक्ती सुद्धा आपल्या चुका आठवून बोलण्याची तयारी करते . त्यामुळे मूळ उद्देश बाजूला राहून वादविवादाची ठिणगी पडते.
एखाद्या सुनेला स्वयंपाक जमत नाही म्हणून ती वाईट किंवा सासूंचे कामात सहकार्य नाही म्हणून बेबनाव अशा विचारांच्या गोंधळामुळे त्या व्यक्तीचे चांगले गुण आपल्या लक्षात येत नाही. जरी सुनेला स्वयंपाक येत नसेल, तरी ती नोकरी करते घर टापटीप ठेवते ,चांगलं लिहिते ,मुलांचा अभ्यास घेते सामाजिक संपर्क चांगला आहे ,कुटुंबियांची काळजी घेते घरातील महत्त्वाच्या गोष्टी मध्ये लक्ष घालते असे चांगले गुण तिच्यामध्ये असू शकतात पण आपण कंपार्टमेंटचा गोंधळ घातल्यामुळे आपल्या दृष्टीने ती वाईटच असं दृष्टिकोन होऊ शकतो.
तसेच सासूबाईंना नातवांच्या जबाबदारी मधे , आज्ञार्थक बोलण्यामुळे, मतमतांतर असले तरी पण त्यांचे अनुभव ,त्यांचं घरातल्या अस्तित्व त्यांनी घराला घरपण देण्यासाठी आजवर केलेली मेहनत इतर कामात केलेली मदत या बाबींकडे पण लक्ष देणे आवश्यक असते दोघांनीही पूर्वग्रह दूषित ठेवला तर त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतच आपल्याला चूक वाटू शकते .
अशाच प्रकारे एखाद्याशी वाद-विवाद झाले तर त्याचा राग इतर व्यक्तीशी बोलताना सुद्धा आपल्या मनात असतो आणि त्याच्याशी नीट बोलत नाही.त्यामुळे त्या व्यक्तीचा आपल्याबद्दल गैरसमज होऊ असाच गोंधळ ऑफिस मधील कामात सामाजिक कामामध्ये सुद्धा होतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी पूर्वी वाद घातलेला असेल तर आपल्याला त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्याच्या कौतुकासाठी अडचणी येते आणि नंतर आपण सुख संवाद न ठेवल्यामुळे पुन्हा वाद वाढण्याची शक्यता असते.
यासाठी आपल्याला कंपार्टमेंट विचार पद्धती आवश्यक असते म्हणजेच आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा त्या विचारांना काल्पनिक कंपार्टमेंटमध्ये ठेवणे आवश्यक म्हणजेच समजा ऑफिसमधला ताण तणाव हा एका वेगळ्या कंपार्टमेंट मध्ये ठेवावा. त्यामुळे आपल्या मुलांशी ,पत्नीशी वागताना त्याचा परिणाम होणार नाही. आपलं कौटुंबिक जीवन हे एक वेगळं कंपार्टमेंट आहे त्याचा परिणाम आपल्या ऑफिसवर, कामावर, व्यवसायावर झाला नाही पाहिजे .Free-pik image
एखादी व्यक्ती एखादं काम व्यवस्थित करू शकत नसेल तर आपले मतभेद त्या कामापुरतेच असावेत इतर वेळी आपण त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा कौतुक निश्चित केलं पाहिजे सतत त्याच्या चुकाबद्दल बोलणं हे त्या व्यक्ती सोबतच्या व्यवहारात अडचणी निर्माण करू शकते माझा आनंद, माझे छंद, माझी मित्र मंडळी, माझे कुटुंब, माझा व्यवसाय हे आपले वेगवेगळे काल्पनिक कंपार्टमेंट आहेत.
जसं आपण एका खोलीतील वस्तू दुसऱ्या खोलीत शक्यतो ठेवत नाही तसंच या कंपार्टमेंट मधल्या विषयांची सरमिसळ आपण एकमेकांशी करू नये. या प्रत्येक कंपार्टमेंटच्या काल्पनिक चाव्या सुद्धा आपल्याच हातात पाहिजे ज्यामुळे कितीही ताण तणाव असला तरी आपण कुटुंबासाठी, आपल्या छंदासाठी वेळ देऊ शकू .
एखादी घटना दुर्दैवी असेल, त्रासदायक असेल तरीसुद्धा त्या घटने शिवाय आपली काही वेगळी जबाबदारी, जीवन, आनंद असू शकतो. त्या दुर्दैवी घटनेचाच विचार सतत आपण करत राहिलो म्हणजेच त्या कंपार्टमेंट मधले विचार इतर कंपार्टमेंट मध्ये जाऊ लागले तर आपल्या जीवनातले जबाबदारी, कर्तव्य, आनंद आपण व्यवस्थित उपभोगू शकणार नाही.पण जर आपली कंपार्टमेंटची भूमिका स्पष्ट असेल तर आपण या सगळ्यांमध्ये सरमिसळ होऊ देणार नाही आणि प्रत्येक भूमिका, जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकू आणि समजा परिस्थिती आपल्या हाताबाहेर असेल समोरची व्यक्ती अगदीच असमजुतदार असेल तर त्या ताणतणावामुळे आपल्या जीवनातील उत्साह, आपल्या छंद, आपला आनंद ,आपली आवड याच्यावर अश्या कंपार्टमेंट विचार पद्धतीमुळे निश्चितच कमी परिणाम होईल आणि कठीण परिस्थिती सुद्धा आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकु.
मी सो…पा…
वैद्य सोहन पाठक
9822303175
sohanpathak@gmail.com
सदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक आणि समुपदेशक वैद्य सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे.
30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.
For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link.
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra and practising advocate in District Court of Aurangabad
मित्रांनो, मी विष्णू भोपे, निवृत्त कार्यकारी अभियंता, आणि निवृत्तींनंतर, औरंगाबाद(संभाजीनगर) येथील कोर्टात वकिली करणारा हौशी वकील!
मी अधून मधून माझे कांही अनुभव, कांही किस्से, थोडेसे रंजक आणि विनोदी पध्दतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.
पण आज मी दि. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी अहमदनगरच्या सेशन्स कोर्टात कोपर्डीच्या गाजलेल्या खटल्याच्या निकालाबद्दल सांगणार आहे. वरील खटल्याचा निकाल २९ नोवेंबर २०१७ रोजी लागणार होता, आणि एक practising advocate म्हणून मला या खटल्याच्या निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. (मी सेवेत असतांनाच, माझ्या आवडीचा विषय म्हणून LL.B केले, आणि सेवा निवृत्तीनंतर औरंगाबाद येथील कोर्टात प्रॅक्टिस सुरू केली)
त्या दिवशी कोर्टात खूप गर्दी होणार होती, म्हणून २९ नोव्हेंबरला सकाळीच सातची बस पकडून मी साडेनऊ वाजता मा. न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्या कोर्ट रूममध्ये जाऊन बसलो. हा खटला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजला होता व तिन्ही आरोपींना फाशीच व्हावी या मागणी साठी राज्यभर ठिकठिकाणी मोर्चे निघाले होते व आंदोलनही झाले होती. प्रसार माध्यमांनीही हे प्रकरण खूप लावून धरले होते.
दहा वाजेपर्यंत कोर्ट हॉल खचाखच भरला .सुमारे १५ पोलिस व ४ कमांडोज हॉललध्ये बंदोबस्तासाठी तैनात होते.चौघे पिस्तुलधारी होते. तिन्ही आरोपींना सकाळी ९ वाजताच सशस्त्र पोलिसांनी कोर्ट हॉलमध्ये आणून सगळ्यात मागच्या बेंचवर आणून बसवले होते .कोर्टाच्या इमारतीच्या आवारात सुमारे २०० पोलिस तैनात केले होते. TV चे पंधरा चॅनल्सचे कॅमेरामेन व रिपोर्टर्स बातम्यांचे बाईट्स घेण्यासाठी सज्ज होऊन ताटकळत बसले होते. कोर्टाच्या प्रांगणात सुमारे एक हजार लोक असावेत . येणाऱ्या प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात होती.कोर्टाच्या परिसराला एखाद्या सैन्याच्या छावणीचे स्वरुप आले होते.
कोर्टात निर्भयाचे( पीडित मुलीचे नांव प्रसिद्ध करण्यास कायद्यानुसार मनाई आहे) आई वडील , बहीण भाऊ इतर नातेवाईक निकाल ऐकण्यासाठी हजर होते. त्यांच्या गावातील लोक पण होते. तिन्ही आरोपींचे वकील गैरहजर होते तसेच त्यांचे नातेवाईकही गैरहजर होते. कोर्ट हाॅलमध्ये माझ्यासह सुमारे १५ वकील हजर होते. हॉलच्या बाहेर व कॉरिडॉरमध्ये प्रचंड गर्दी होती.कोर्टहॉलमध्ये शिक्षेबद्दल कुजबुज सुरू होती.बहुतेकांचा सूर असा होता की आरोपी नंबर एकला फाशी होईल व बाकीच्या दोघांना जन्मठेप होईल.
सुमारे ११:०० वाजता ॲड. उज्वल निकम दोन पोलिस व दोन कमांडोज यांच्या संरक्षणात कोर्टात दाखल झाले.नंतर ११:२३ ला शिपायाने ‘ होशियार’ असा पुकारा केला.सगळे जण उभे राहिले. नंतर लगेच न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले आल्या. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. उपस्थितांनी व मी ही त्यांना प्रथेप्रमाणेवाकून नमस्कार केला. हॉलमध्ये कुजबुज वाढली.तशा जज्ज मॅडम रागावल्या . त्यांनी लगेच तंबी दिली ,सगळे जण एकदम शांत रहा. कुणाचाही आवाज ऐकू आला तर मी contempt ची नोटीस देईन .यानंतर सगळे एकदम चिडीचूप झाले. कोर्टात एकदम टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता झाली. मग न्यायाधिशांनी तिन्ही आरोपींना त्यांच्या शिक्षा त्यांना स्पष्टपणे ऐकू याव्यात म्हणून समोर आणण्याचे फर्मावले . तसे पोलिसांनी तिन्ही आरोपींना समोर आणून उभे केले.तिन्ही आरोपी कोर्टासमोर हात जोडून उभे होते.अवघ्या सहा मिनिटांमध्ये कोर्टाने तिन्ही आरोपींना त्यांचे नाव व पत्ता वाचून वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा सुनावली. तिघांनाही ३ वर्षांची शिक्षा, जन्मठेपेची शिक्षा व फाशीची शिक्षा व दंड रू २००००/- अशी शिक्षा वेगवेगळ्या कलमांखाली सुनावली. यापैकी फाशीची शिक्षा मात्र हायकोर्टाकडून कन्फर्मेशन आल्यानंतरच अमलात आणता येते. ( CRPC Section 366 )
शिक्षेचे वाचन ( operative part ) करून न्यायाधीश त्यांच्या ॲंटीचेंबर मध्ये गेल्या. हॉलमध्ये दाटीवाटीने बसलेल्या सर्वांच्या चेहेऱ्यावर समाधान दिसत होतं .निकाल ऐकताच इतका वेळ नि:शब्द बसलेल्या निर्भयाच्या आईला रडू कोसळले.तिचे नातेवाईक तिचे सांत्वन करता करता स्वत:पण रडत होते.
हळूहळू कोर्टहॉल मध्ये असलेले पन्नास साठ लोक बाहेर निघू लागले. ॲड. उज्वल निकमही त्यांच्या कमांडोजच्या संरक्षणात बाहेर पडले. मी चपळाईने त्यांच्या पुढे गेलो व त्यांच्याशी शेक हॅंड करून त्यांना म्हटले , Congratulations Sir , very well done ‘
एका क्षणात फाशीच्या शिक्षेची बातमी आसमंतात पसरली.
नंतर मी कोर्टाच्या प्रांगणात आलो. तिथे गर्दी केलेल्या हजारएक स्त्री पुरूषांच्या चेहेऱ्यावर फाशीच्या शिक्षेचा निकाल ऐकून समाधान पसरले होते. जमलेले लोक खूपच उत्तेजित झाले होते.
दहा पंधरा चॅनलवाल्यांनी अॅड .उज्वल निकम यांना गराडा घातला.त्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये कोर्टाचा निकाल सांगितला. त्यावेळी सर्व लोक जे दूरदर्शनवर पाहत होते, ते मी प्रत्यक्ष तिथे हजर राहून पाहत आणि अनुभवत होतो.
कांही चॅनलवाल्यांनी निर्भयाच्या कुटुंबियांची मुलाखत घेतली .
हा संपूर्ण निकल १४५ पानांचा आहे.ततो जवळपास पूर्ण माझ्या वाचनात आला .त्यातला निर्भयाचा पोस्ट मोर्टेम रिपोर्ट वाचून अंगावर शहारे आले आणि या तिन्ही माणसांच्या रूपात वावरणाऱ्या क्रूर नराधम राक्षसांना फाशीची शिक्षाच होणे आवश्यक होते असे वाटले. १५ वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून , तिच्या शरीराचे लचके तोडून तिच्या शरीराची विटंबना करून तिचे नरड्यात बोळे कोंबून तिची मान १८० अंशात पिरगाळून या नराधमांनी तिचा खून केला.
कोर्टाने हा गुन्हा Rarest of the rare असे मत नोंदवून तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. ही बातमी बाहेर पसरताच कोर्टाच्या आवारात जमलेल्या हजारएक लोकांनी प्रचंड जल्लोष सुरू केला व नारेबाजी सुरू केली..
कोर्टहॉल मध्ये ज्यावेळी न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तिन्ही नराधम आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी माझ्या मनात क्षणभर विचार आला की महिषासूर मर्दिनी देवीने न्यायाधीश सुवर्णा केवले यांचे रूप धारण केले आहे व आरोपींच्या रूपात वावरणाऱ्या तिन्ही राक्षसांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे.
एक संवेदनशील माणूस म्हणून मी न्यायदेवते समोर नतमस्तक होतो.
न्यायदेवतेला शतश: प्रणाम
लेखक:- श्री व्ही. डी. भोपे
निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, महाराष्ट्र सरकार
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
पाठांतर स्पर्धेची गोष्ट
——————–
मित्रांनो
आपण लहानपणी अभावितपणे अशा काही गोष्टी करतो, की त्यावेळी त्या किती हास्यास्पद आहेत याचा आपल्याला तेंव्हा पत्ता ही नसतो. पण नंतर कधी त्या गोष्टी आठवल्यानंतर आपल्याला त्या आठवून आपलेच आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही.
ही साधारण १९६१-६२ सालची गोष्ट आहे.
त्यावेळी आम्ही जाफ्राबादला होतो.
त्या काळात तिथे लाईट नव्हते . कंदील चिमण्यांचा वापर करावा लागायचा.
तसेच नळाचे पाणी नव्हते. विहीरीचे पाणीच प्यायला व धुण्याभांड्याला उपलब्ध होते . मी सरकारी शाळेत त्यावेळी आठवीत शिकत होतो.
आमच्या शाळेत दरवर्षी मी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची आतुरतेने वाट पहायचो कारण या दोन दिवशी खूप धमाल करायला मिळायची.
वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या . उदा. चमचा लिंबू रेस, तीनटांगी दौड, पोत्यात दोन्ही पाय घालून उड्या मारीत जाणे, हात बांधून उड्या मारून उंच दोरीला बांधलेली जिलबी खाणे, निबंध स्पर्धा , कविता पाठांतर स्पर्धा .
या सगळ्यांमध्ये मी हिरिरी ने भाग घ्यायचो . निबंध स्पर्धा आणि कविता पाठांतर स्पर्धांमध्ये मला हमखास पहिले बक्षीस मिळायचे . मी फार हुशार होतो अशातला अजिबात भाग नाही . फक्त इतर विद्यार्थ्यांचे पालक बहुधा अशिक्षित होते, त्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण नव्हते त्यामुळे ते अभ्यासात मागे असत .म्हणून मी म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार होता…
तर मी पाठांतर स्पर्धेत भाग घेतला होता .एकूण वीसएक स्पर्धक होते .आमच्या हेडमास्तरांना ( वाघमारे ) सरांना मी बाळबोधपणे विचारले,
” सर किती कविता म्हणून दाखवायच्या ?”
सर म्हणाले , तांदुळजे सर परिक्षक आहेत .जेवढ्या कविता तुला पाठ आहेत तेवढ्या त्यांना म्हणून दाखव.”
…झालं… मला तर पडत्या फळाची आज्ञा मिळाली होती .
स्पर्धा सुरु झाली . तांदुळजे सरांनी माझा नंबर सगळ्यात शेवटी ठेवला होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कविता म्हणून दाखवल्या . कुणी २ कुणी ३ कुणी चार अशा ..माझ्या आधीच्या मुलांपैकी चारच्या वर कुणी गेले नाही. याचा अर्थ सरळ होता की मी पाच कविता म्हटल्या तरी पुरेसे होते .पहिला नंबर पक्का होता.माझा शेवटचा नंबर होता.
तो आल्यानंतर मी कविता म्हणायला सुरुवात केली …. सहा कविता म्हणून झाल्या .
शाळा संपल्याची घंटा झाली.
तांदुळजे सर म्हणाले. चल आता . तुझ्या सहा कविता झाल्या . शिपायाला शाळा बंद करायची आहे.’
पण माझी मुख्याध्यापकांवर फार दृढ श्रध्दा होती. मी तांदुळजे सरांना म्हटले . ‘सर शिपायाला खुशाल शाळा बंद करू द्या . मला हेडसरांनी सांगितले की तुला जितक्या कविता येतात तेवढ्या म्हण. तेंव्हा आता माघार नाही. मी तुमच्या घरी येतो व तिथे उरलेल्या कविता म्हणून दाखवतो!!’
सर फार भिडस्त होते. मी सगळ्याच सरांचा लाडका विद्यार्थी होतो. तसाच या सरांचाही लाडका विद्यार्थी होतो. सर म्हणाले ,ठीक आहे बाबा..माझ्या घरी चल . तिथे उरलेल्या कविता म्हण. ‘
आम्ही सरांच्या घरी आलो की मी लगेच उरलेल्या कविता सुरु केल्या. सरांचं लग्न झालं नव्हतं. म्हणून ते स्वत:च घरी स्वयंपाक करायचे. सर मला म्हणाले मी स्वयंपाक करतो. तू तुझं चालू दे. इकडे माझ्या कविता चालूच होत्या.
सरांनी कमालीचा संयम राखीत शांतपणे खिचडी टाकली.
सुमारे वीस मिनिटांनी माझ्या मराठी कविता संपल्या. मी म्हटले सर आता हिंदीच्या आणि इंग्रजीच्या कविता राहिल्यात , त्या म्हणू का ? सरांनी समयसूचकपणा दाखवत म्हटले , नको नको.ही स्पर्धा फक्त मराठी कवितांचीच आहे…
सरांना इतका वेळ पीडा देऊन मी घरी परतलो….
मित्रांनो आपल्या मराठी विनोदी साहित्यात कवी आणि कविता हे दोन्ही सातत्याने चेष्टेचा विषय राहिले आहेत .पण मी हेडमास्तरांनी दिलेल्या सूचना पाळतांना तारतम्य न बाळगल्यामुळे तांदुळजे सरांना आपण खूप पीडा देत आहोत हा विचार त्यावेळी माझ्या मनाला शिवला पण नाही.
तांदुळजे सरांच्या पेशन्सला मात्र माझा त्रिवार सलाम….त्या काळच्या शिक्षकांचे आणि मुलांचे असे वेगळेच नाते होते…
लेखक:- श्री व्ही. डी. भोपे
निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, महाराष्ट्र सरकार
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
एका गाढवाची गोष्ट
ही साधारण १९६३ सालची गोष्ट आहे.
मी त्यावेळी अंबाजोगाईला होतो आणि योगेश्वरी शाळेत ९ वीत शिकत होतो. आमच्या शाळेच्या सभागृहात कथाकथनाचा कार्यक्रम चालू होता. त्यात एक खूप बिलंदर वक्ता होता. तो नेहमी मास्तर लोकांची चेष्टा करीत असे.
त्याने गाढवाची गोष्ट सांगायला सुरुवात केली.
“एका धोब्याकडे एक गाढव असते. ते मानेने फक्त ‘हो-हो’ असेच म्हणत असते. त्या धोब्याने शर्यत लावली की जो कोणी माझ्या गाढवाकडून ‘नाही- नाही’ म्हणवून दाखवेल, त्याला दहा रुपये बक्षीस म्हणून देण्यात येतील. तेंव्हा बरेच जण आले आणि त्यांनी विविध प्रकारे त्या गाढवाची मान ‘नाही-नाही’ अशी, म्हणजे आडवी हालेल यासाठी प्रयत्न केले. पण कितीही जंग जंग पछाडले तरी ते गाढव काही ‘नाही-नाही’ म्हणत नव्हते. दर वेळी ते गाढव ‘हो-हो’ अशीच मान हालवित होते.
शेवटी एकजण आला. तो त्या गाढवाच्या कानात काही तरी बोलला. लगेच ते गाढव मानेने ‘नाही-नाही’ असे म्हणू लागले.
धोब्याने आपली हार कबूल केली, आणि ठरल्याप्रमाणे त्या माणसाला १० रुपये दिले. पण मग न राहवून धोब्याने त्या माणसाला विचारले, “मी इतके दिवसांपासून हा खेळ करतो आहे, पण आतापर्यंत कुणीही गाढवाकडून नाही नाही म्हणवून घेऊ शकले नाही, मग तुम्ही असे काय त्या गाढवाच्या कानात सांगितले, की माझे गाढव एवढे जोरजोरात नाही म्हणून मान हलवू लागले?”
त्यावर तो माणूस म्हणाला, “अगदी सोपे आहे. मी त्या गाढवाच्या कानात विचारले, क्या तू मास्टर बनेगा?” त्यावर त्याने जोरात मान हलवली.!!”
त्या वक्त्याच्या या शेवटच्या वाक्याने, पूर्ण हॉल प्रचंड हास्यात बुडून गेला. तिथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक, गोरेमोरे झाले.
संयोजकांनी पुढच्या वक्त्याचे नाव पुकारले. पुढचे वक्ते होते संभूस सर. संभूस सर हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध होते. ते योगेश्वरी महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक तर होतेच पण एक चांगले साहित्यिक पण होते. ते त्या आगाऊ वक्त्याला असे सोडतील असे शक्यच नव्हते.
संभूस सर व्यासपीठावर आले. त्यांनी सर्व श्रोत्यांकडे नजर फिरविली. त्यानंतर एक कटाक्ष त्यांनी आधीच्या वक्त्याकडे टाकला आणि त्यांनी पहिलेच वाक्य म्हटले,
“ आत्ताच तुम्ही एका गाढवाची गोष्ट ऐकली आहे…..
आता माझी गोष्ट ऐका…”
एक क्षणभर शांतता, आणि पुढल्याच क्षणी, आधी झाला होता, त्यापेक्षा, दुप्पट हशा पूर्ण सभागृहात झाला, आणि त्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट पण झाला.
तो आधीचा वक्ता, जो इतका वेळ विजयी नजरेने सगळीकडे पाहत होता, त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले, आणि त्याने खाली मान घातली, ती नंतर वर केलीच नाही.
“मास्टर से पंगा लेना इतना आसान नही होता!” हे त्यादिवशी संभूस सरांनी सिद्ध करून दाखवले.
लेखक:- श्री व्ही. डी. भोपे
निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, महाराष्ट्र सरकार
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
गावपातळीवरील —————
राजकारणाची एका छोटीसी ———————
झलक ——-
साधारणपणे १९७४ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी पाणीपुरवठा खात्यात ज्युनियर इंजिनीअर म्हणून काम करीत होतो .ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना तयार करण्यासाठी वेगवेगळ्या खेड्यांत मला सर्व्हे करण्यासाठी जावे लागायचे. तिथे चार पाच दिवस मुक्काम करावा लागायचा .नदी काठी प्रस्तावित विहीरीच्या जागेचा सर्व्हे , रायजिंग मेन म्हणजे नदीकाठच्या प्रस्तावित विहीरीपासून गावातील प्रस्तावित टाकीपर्यंत टाकायच्या पाईपच्या अलाईनमेंटचा सर्व्हे , प्रस्तावित टाकीच्या जागेचा सर्व्हे आणि Distribution system म्हणजे गावातल्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पाणी वितरण व्यवस्थे साठी करावयाचा सर्व्हे असे साधारणपणे कामाचे तांत्रिक स्वरूप होते.त्या काळात खेड्यापाड्यांमध्ये चुकुन माकुन एखादी दुसरी चहाची टपरी असायची.मुक्काम करण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी शहरातल्या सारखी लाॅजिंग बोर्डींगची सोय असणारे हाॅटेल्स खेड्यात नसतं .त्यामुळे आमचा मुक्काम ग्रामपंचायतीमध्येच असायचा. आम्ही दौऱ्यावर येतांना आपले अंथरूण पांघरूण बरोबर घेऊन यायचो. जेवणासाठी आम्ही आमचे किचन किट बरोबरच ठेवायचो. त्यामध्ये स्टोव्ह, पुरेसे राॅकेल, पीठ, मीठ, दाळ, तांदूळ, तेल, तिखट , चहा साखर इत्यादी सर्व आवश्यक वस्तू असंत .भांड्यांचा सेट आम्हाला आॅफिसतर्फे मिळायचा. व आमचे जेवण खाण नाश्तापाणी हे तयार करण्यासाठी एक अटेन्डट सोबत मिळायचा.सर्व्हे करण्यासाठी लागणारे चारपाच मजूर आम्ही डेली वेजेसवर गावातूनच घ्यायचो.त्यावेळी नियमित बससेवा फार कमी खेड्यांमध्ये होती म्हणून आमचे डेप्युटी इंजिनीअर आम्हाला जीपने खेड्यात आणून सोडायचे व ठरल्याप्रमाणे परत चार पाच दिवसांनी आम्हाला वापस घेऊन जाण्यासाठी जीप घेऊन यायचे. आम्ही गावात आलो की कांही मिनिटांतच पाणी पुरवठ्याचे इंजिनियर लोक आलेत ही बातमी वाऱ्या सारखी गावभर पसरायची. खेड्यात रिकामटेकडे लोक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात . त्यांच्यापैकी कांहीजण नुसतेच आम्हाला पहाण्यासाठी यायचे.आपण झू मध्ये जातो ना वन्य प्राणी पहायला , अगदी सेम तसेच आम्हाला पहायला कांही लोक यायचे. थोडंसं दूर अंतरावर उभे राहून आपसात हळू आवाजात बोलायचे . अर्थात आमच्याबद्दलच ते बोलणे असे. हा प्रकार मोठा आॅकवर्ड वाटायचा. पण काय करणार ना !!!
एका खेड्याच्या सर्व्हेसाठी दोन junior engineers पुरे असतात.आम्ही आल्या आल्या कोतवालाला सूचना द्यायचो की , जा सरपंचांना सांग की पाणी पुरवठा योजनेचा सर्व्हे करणारे इंजिनियर लोक आलेयत आणि तुम्हाला बोलावलयं. सरपंच नसले तर उप सरपंचाला सांग आणि ते ही नसले तर चार दोन मेंबरांना बोलाऊन घेऊन ये. आम्ही योजनेची माहिती देणार आहोत म्हणा.’ मग जे कोणी येतील त्यांना आम्ही पाणी पुरवठा योजनेचे स्वरूप त्यांना समजेल अशा स्टाईल मध्ये समजावून सांगायचो व मग यथावकाश survey instruments घेऊन सर्व्हेचे काम सुरू करायचो. सर्व्हेचे काम साधारणपणे चारपाच दिवसात पूर्ण व्हायचं . मग ठरल्याप्रमाणे आमचे डेप्युटी इंजिनियर जीप घेऊन यायचे व आम्हाला औरंगाबादला परत आणायचे. पाणी पुरवठा ही एक अत्यावश्यक बाब असल्यामुळे आम्ही ज्या खेड्यात जाऊ तिथल्या लोकांत उत्साह आणि आनंद पसरायचा की चला आता आपल्याला पिण्याचं पाणी आपल्या घरोघरी नळातून मिळणार . रोज दूर अंतरावरून पिण्याचे पाणी आणण्याचा आपला आणि विशेषत: आपल्या बायकांचा कित्येक वर्षांपासून होणारा त्रास लवकरच संपणार आणि तो ही सरकारी खर्चाने ! म्हणून तमाम मंडळी खूष असंत .संध्याकाळी गावची तालेवार मंडळी आम्हाला येऊन भेटत .योजनेची माहिती विचारीत . मीही त्यांच समाधान होईल अशी माहिती देत असे. मग कुणीतरी आपल्या गड्याला सांगत असे , जा रे आपल्या घरला जाऊन सायेब लोकान्साठी च्या पोहे घेऊन ये. मग थोड्या वेळानी आमच्या साठी चहा पोह्याचा नाश्ता यायचा. सरपंच आणि इतर लोक सुद्धा अदबीने बोलायचे.कुणीतरी विचारायचं, सायेब सर्वेला किती दिवस लागतील.. मी म्हणायचो .’ चार पाच दिवसात सहज सर्व्हे पूर्ण होईल.’ पुढचा प्रश्न ‘.,अन् मंग तेच्यानंतर काय हुईल ? ‘ माझं उत्तर , ‘ त्याच्यानंतर आम्ही औरंगाबादच्या आॅफिस मध्ये बसून या पाणी पुरवठा योजनेचे प्लॅन्स ड्राॅईंग्ज डिझाईन्स आणि एस्टिमेट्स तयार करू. याच्यासाठी आम्हाला औरंगाबादला पंधरा दिवस लागतील.नंतर या योजनेला मंजूरी मिळेल.नंतर निधी उपलब्ध होईल. नंतर टेंडर्स बोलावले जातील . त्यानंतर योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू होईल व त्यानंतर साधारणपणे नऊ महिन्यात काम पूर्ण होऊन तुम्हाला घरामध्ये कनेक्शन घेऊन पिण्याचं पाणी मिळू शकेल..’ मी थोडक्यात अशी माहिती देत असे. मग सगळे लोक आम्हाला काम लवकरात लवकर केलंत तर लई चांगल होईल बघा , त्याच्यासाठी तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आनंदाने द्यायला आम्ही तयार आहोत असं सांगायचे..
हा झाला सर्व साधारणपणे आमचा जनरल अनुभव .
पण एका खेड्यात मात्र वेगळाच अनुभव आला.आमचा सर्व्हे संपायच्या शेवटच्या दिवशी रात्री ८ च्या सुमारास दोन तीन जण आले. मला म्हणाले . ‘ इंजनेर सायेब यावं का, थोडं महत्वाचं बोलायचं व्हतं .’ मला वाटलं नेहमीप्रमाणे लवकर योजना तयार करा अशी विनंती करायला मंडळी आली असावी. मी म्हटलं ,’ या की, बसा अन् सांगा काय सांगायचं ते.’ त्यावर त्यांचा म्होरक्या म्हणाला, ‘ तुमी म्हनला व्हता की तुमाला सर्वे कराया पाच दिवस अन् यवजनेचे एष्टीमेट कराया पंधरा दिवस लागतील म्हनून शान..’ मी म्हटलं, ‘ होय की तेवढ्या वेळात मी नक्कीच करू शकतो..’ त्यावर त्यांचा म्होरक्या म्हणाला., ‘इंजनेर सायेब इतक्या फाष्ट यवजनेचे एष्टीमेट करायची काय पन गरज नाही. आम्ही तर म्हन्तो तुमी चांगले पाचसहा महिने एष्टीमेट लांबवा . तेच्यात काई बी आब्जेक्शन काढा अन् मधी खोडा घाला..’
मी अवाक् झालो आपल्याच गावच्या विरोधात हे लोक अशी मागणी का करताहेत हे मला समजेना. मी त्यांना म्हटलं अहो प्रत्येक गावातले लोक आम्हाला लवकरात लवकर काम करण्यासाठी सांगतात आणि तुम्ही अशी विपरित मागणी कशी करू शकता. त्याचं काय कारण आहे.’.. त्यावर म्होरक्या म्हणाला, ‘ सायेब हे गावचं पाल्टिक्स असतं. तुमच्या सारख्यांना न्हाई समजायचं . तरी बी सांगतो. अावो सायेब जर यवजना लवकर पूर्न झाली तर त्याचं समदं क्रेडिट सरपंचास्नी जाईल. पुडच्या इलेक्शनमधे आमाला त्याला पाडायचंय अन् मला सरपंच व्हायाचंय . त्याच्या काळात पानीपुरवठा यवजना वेळेवर करून घेन्यात हा सरपंच फेल गेला आसं मला प्रचारात त्याच्या आपोजिटमधे बोंबाबोंब करून सांगता आलं फायजे. म्हनून तुमाला मी रिक्वेष्ट करतो की काहीतरी टेक्निकल पाईंट काढून तुम्ही ही यवजना लांबवा. अन् सायेब अाम्ही काही नुस्तीच कोरडी रिक्वेष्ट करत न्हाई . तुमची काय राजी खुशी आसंल, च्या पानी आसंल ते खुल्लं सांगा . तुमी आमचं यवढं मोठं काम करनार म्हनल्यावर आम्ही बी तुम्हाला खुश करूच की .’
अर्थात असे स्वार्थी आणि
गलिच्छ राजकारण
करणाऱ्या
पुढाऱ्याला मी भीक घातली
नाही हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.
पण हा अनुभव मात्र मला बरंच कांही शिकवून गेला !!!
लेखक:- श्री व्ही. डी. भोपे
निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, महाराष्ट्र सरकार
This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
चोराच्या उलट्या बोंबा
——————-
मित्रांनो
मी इंजिनिअरिंगला शिकत असतांना उस्मानपुऱ्यातल्या एका वाड्यात रहात होतो.तो बराच मोठा वाडा होता. सात आठ खोल्यात मिळून सुमारे पंधरा वीस विद्यार्थी तिथे रहात होते . त्यातले बहुसंख्य आमच्याच काॅलेज मध्ये शिकत होते.
उन्हाळा सुरू झाला की रूममध्ये खूप उकडायचे.फॅन विकत घेण्याची त्यावेळी आमच्या पैकी कुणाची ऐपत नव्हती . त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कांही जण अंगणात झोपायचे , तर बरेच जण रूमचे दार रात्रभर चक्क सताड उघडे टाकून झोपायचे . रात्रीचा अभ्यास साधारणपणे बारा वाजेपर्यंत चालायचा व त्यानंतर बहुधा सगळे जण झोपायचे ..
त्यावेळी उस्मानपुऱ्यात रात्री उचलेगिरी करणाऱ्या भुरट्या चोरांची एक टोळी सक्रिय होती.
एकदा मध्यरात्रीनंतर केंव्हातरी आमच्या वाड्यात चोर आले .रूमचे दार रुममधे
उकडते म्हणून सताड उघडे टाकून कांही विद्यार्थी झोपले होते. अगदी गाढ झोपले होते. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर ज्या खोल्या उघड्या दिसल्या तिथून कपडे म्हणजे शर्ट पॅंट्स चोरून अवघ्या कांही मिनिटांमध्ये चोर पसार झाले ..
ज्यांचे कपडे चोरीला गेले त्यांना सकाळी उठल्यानंतरच कळाले की आपले कपडे चोरी गेले आहेत.
पोलिस कम्प्लेन्ट करण्यात कांहीच अर्थ नव्हता . कारण वेळ तर नक्कीच वाया गेला असता आणि चोर पकडले जाण्याची आणि चोरी गेलेले कपडे परत मिळण्याची सुतराम शक्यता नाही असे मानून कुणीही कंप्लेन्ट करण्याच्या फंदात पडले नाही.
असाच साधारण महिना गेला. चोरीचा विषय मागे पडला होता . पण एक दिवशी एक हवालदार आमच्या वाड्यात आला आणि म्हणाला आम्ही दोन चोरांना दुसऱ्या गुन्ह्यात अरेस्ट केले आहे . त्यांनी तुमच्या वाड्यात कपड्यांची चोरी केल्याची कबुली पण दिली आहे.तेंव्हा तुम्ही चोरांच्या आयडेंटीफिकेशन साठी व चोरी गेलेल्या कपड्यांच्या आयडेंटीफिकेशन साठी पोलिस स्टेशन मध्ये या..”..
आम्ही सांगितले की आम्ही सगळे जण गाढ झोपेत असतांना चोर येऊन चोरी करून गेले.त्यामुळे आम्ही चोरांना नाही ओळखू शकणार . पण आमचे कपडे जरूर ओळखू . आणि दिवसा आम्हाला काॅलेज असतं म्हणून आम्ही संध्याकाळी येऊ .. चालेल ना.. यावर हवालदार हो म्हणाला .
माझी स्वत:ची एक पॅंट गेली होती . चेन खराब झालेली, हुक तुटलेली, तुरपाई उसवलेली अशी पॅंट होती.
संध्याकाळी आम्ही चारपाच जण पोलिस ठाण्यात गेलो.
तिथे पोलिसांनी आम्हाला लाॅकअप मधला तो चोर दाखवला आणि त्यानी चोरलेले आमचे कपडे म्हणजे शर्ट्स व पॅंट्स दाखवले.ज्यानी त्यानी आपापले कपडे ओळखले व तसे आम्ही तिथल्या हवालदाराला सांगितले .
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या चोरट्याच्या चेहेऱ्यावर आपण कांही चुकीचं केलंय अशा भावनेचा लवलेशही नव्हता .
त्याचं नाव करीम खान असं होतं असं हवालदाराकडून कळालं .
कांही तरी बोलावं म्हणून मी म्हणालो…कायको चोरी किये मियाॅं हमारे वाडेमे. हम सब तो स्टुडन्टस है. पढाई करने के वास्ते आये है.ऐसा नही करना था तुमने..”
यावर तो मला म्हणाला…
ऐसे कैसे इष्टुडन्ट लोगां है जी तुम….कितने खराब कपडे मिले मेरेकु.किसकी चेन नही तो किसकी हुक नही, किसके बटना टुटे हुए तो किसके कपलिंग गायब तो किसका जेब फटा हुवा.
ऐसे भंगार कपडे पहनते क्या ? रिपेरिंग मे मेरेकु कित्ता खर्चा करना पडा..
और हाॅं . दूसरी बात … किसीकेभी जेब मे मेरेकु एक धेला भी नही मिला … तुम सब के सब कडके निकले.
This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.