https://goodworld.in A website by Madhav Bhope

Renuka Ashtak-6 तुझे सुंदर रूप रेणुके विराजे – रेणुका अष्टक-6

renuka-7

 वृत्त : दिंडी )
तुझें सुंदर रुप रेणुके विराजे
वर्णिताती मुनि देव देवि राजे
कोण स्वगुणाचा करिल गुणाकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१॥


सदानंद मुख चंद्रमा सबंध
रत्नहार, मणी, वांकि बाजुबंद
मुक्तजडित सुवर्ण अलंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥२॥


विलोकुन नथ नासिकीं, काप कानीं
मार्ग विसरावा मोक्ष साधकांनीं
हांक द्यावी लक्षुनी लक्षवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥३॥


साडि पिवळी खडिदार भरजरीची
तंग चोळी अंगांत अंजिरीची
टिळा कुंकुम, निट वेणि पिळेदार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥४॥


सप्तशतिचे पुढें पाठ घणघणाट
टाळ, घंटा, कंकणें, खणखणाट
पायिं पैंजण घन देति झणत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥५॥


मूळ धाडी दर्शना यावयासी
लावि भजनीं या उर्वरित वयासी
तोडि सारा हा दृष्ट अहंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥६॥


पर्वतीं या बसलीस अम्हांसाठीं
परी अमुची खरचली जमा साठी
भरत आला स्थळ – भरतिचा अकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥७॥


माय वंची दुरदेशिं मुलांनाही
अशी वार्ता ठाऊक मला नाहीं
अगे आई ! हा काय चमत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥८॥


ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीर
मला केलें सरदार ना फकीर
काय म्हणतिल व्यासादि ग्रंथकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥९॥


तरी आतां ये, धांव, पाव, तार
त्वरित आतां तरि धांव, पाव, तार
करी माझा अविलंबें अंगिकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१०॥


काय रागें झालीस पाठमोरी
तेरि अम्मा फिर एकि वाट मोरी
केशराचा हरपेल कीं शकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥११॥


पहा जातो नरजन्म – रंग वायां
नये सहसा परतून रंगवाया
म्हणुनि करितों विशेष हाहाःकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१२॥


कृपासूत्रें वोढोनि पाय दावी
जशी बांधी कृष्णासि माय दावीं
अहो मीही अन्यायि अनीवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१३॥


मीच अथवा तुज ह्रदय – मंदिरांत
प्रेमसूत्रें बांधीन दिवस – रात
यथातथ्य परि नसे अधीकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१४॥


कसा एका पुष्पाचिया आवडीनें
मुक्त केला गजराज तांतडीनें
तसा मीही अर्पितों सुमनहार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१५॥


केली दुल्लड ही पदर पंधराची
तुझ्यासाठींची, आण शंकराची
विष्णुदास म्हणे रेणुके स्विकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१६॥

 

विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-5 तू विचित्र गारुडीण- रेणुका अष्टक-5

renuka-3

( वृत्त : चामर )
तूं विचित्र गारुडीण काय खेळ मांडसी
रक्तमांसअस्थिच्या गृहांत जीव कोंडसी
प्राण कंठिं पातल्याहि सोडसी न कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१॥

तारिलेस, तारतीस, तारशील, पातकी
अपरोक्ष साक्ष देति हे तुझेचि हात कीं
हेचि पाय हांसतील कौतुकें तुला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥२॥

एकदांहि दाविसी न आत्मरुप रेखडें
घालसी, सुलोचनांत राख खूपरे खडे
तारसी न मारसी न बारसीनं कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥३॥

मुख्य कार्यकारणांत तूंचि होसि वांकडे
दोष हा जिवाकडे न दोष हा शिवाकडे
आवघें तुझेंचि कृत्य हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके तुला ॥४॥

तूं दिनाचि माय साचि, होसि, कां ग मावशी
विद्यमान हें सुशील नाम कां गमावशी
नित्य मार शत्रुहातिं मारवीसि कां मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके ! तुला ॥५॥

जो गुन्हा करी अधीक तो प्रितीस आगळा
मीं तसा कधीं न कांहिं बाइ ! कापिला गळा
हाचि न्याय अनुभवासि दाखला अला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥६॥

रासभीण नारदादि आहिराजी वासना
जी अटोपली प्रत्यक्ष नाहिं राजिवासना
ती उनाड सांगतीस आटपावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥७॥

ओढती न पेरुं देति हात चालु चाडिचे
दुष्ट काम – क्रोध मांग जातिचे लुचाडिचे
त्यांचि पाठ रखितेस हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥८॥

काय जन्म घातलासि, लाविलीस काळजी
काळजांत इंगळीच खोंचलीस काळ जी
ही जराचि धाड धाडलीस खावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥९॥

काय स्वस्थ बैसलीस मूळपीठपर्वतीं
काय घातलासि हा अनाथ देह कर्वतीं
काय लोटलेंसि घोर दुःखसागरीं मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१०॥

काय लीहिलेंसि दैविं गर्भवास सोसणें
काय दीधलेंसि जन्म – मृत्युलागिं पोसणें
काय लाविलेंस नित्य तोंड वासणें मला
हें विहीत काय, सांग माय रेणुके ! तुला ॥११॥

आदि मध्य – आवसानिं सर्व विश्व चाळसी
होसि तूं तरुण, वृद्ध, बाळ खेळ खेळसी
विष्णुदास व्यक्त नाम रुप गुण कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके तुला ॥१२॥

विष्णूदासाची कविता 

 

Renuka Ashtak-4 लक्ष कोटी चंद्रकिरण-रेणुका अष्टक-4

renuka-7

( वृत्त : चामर )
लक्ष – कोटि चंडकिरण  सुप्रचंड विलपती
अंबचंद्रवदनबिंब दीप्तिमाजि लोपती
सिंहशिखर अचलवासि मूळपीठनायका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥१॥

आकर्ण अरुणवर्ण नेत्र, श्रवणिं दिव्य कुंडलें
डोलताति, पुष्पहार भार फार दाटले
अष्टदंडिं, बाजुबंदि, कंकणादि, मुद्रिका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥२॥

इंद्रनीळ, पद्मराग, पाच, हीर वेगळा
पायघोळ बोरमाळ, चंद्रहार वेगळा
पैंजणादि भूषणेंच लोपल्याति पादुका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥३॥

इंद्र, चंद्र, विष्णु, ब्रह्म, नारदादि, वंदिती
आदि अंत ठावहीन आदि शक्ति भगवती
प्रचंड चंड मुंड खंडविखंडकारि अंबिका
धर्म – अर्थ – काम – मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥४॥

पर्वताग्रवासि पक्षि ‘ अंब अंब ’ बोलती
विशाल शालवृक्ष रानिं भवानि ध्यानिं डोलती
अवतार – कृत्यसार जड – मुढादि तारका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥५॥

अनंत ब्रह्मांड पोटिं, पूर्वमुखा बैसली
अनंत गुण, अनंत शक्ति, विश्वजननि भासली
सव्यभागिं दत्त, अत्रि, वामभागिं कालिका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥६॥

पवित्र मातृ – क्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमीं
अंब – दर्शनासि भक्त – अभक्त येति आश्रमीं
म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका
धर्म – अर्थ – काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥७॥

 

विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-3 तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-रेणुका अष्टक-3

renuka-7

विष्णूदासाची कविता 

तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी

( वृत्त : वसंततिलका )
श्रीमूळपीठ – शिखर स्थळि कोटि लक्ष
चिंतामणी सुरभि शोभति कल्पवृक्ष
मी तेथ मंदमति कां श्रमतों बसूनी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥१॥
यावी दया तुज बया ! शतशः अशांची
जो फार दीन बसला धरुनी अशाची
गेली निघून म्हणतां म्हणतां जवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥२॥
केलें तुझें भजन कीं निष्काम नाहीं
आतां असो दुर परी दुष्कामना ही
आहे विनंति इतुकी जननी ! निदानीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥३॥
वाटे पला परम घातकि मी मनुष्य
म्यां नासिलें परम दुर्लभ हें अयुष्य
काळासि केलि तुज वंचुनि मेजवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥४॥
झाली शरीरिं विषयानलिं यातनाची
गंजी जशी समुळची जळते तणाची
यासाठी आइ ! तुज प्रार्थित दीनवाणी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥५॥
गेली बहीण, जननी, दिविं तेंवि तात
गेली वधू प्रमुख मानिली जी हितांत
ही जाहली अशि, असो, जरि सर्व हानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥६॥
जी केलि म्यां जपतपादिक साधनाही
ती व्यर्थ गेलि सहसा तरि बाध नाहीं
आलों तुला शरण मी निज – सौख्यदानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥७॥
आलीस तूं सकलही स्वरुपीं अकारा
हें नेणुनी उगिच मी करितों पुकारा
येती जशी नउ नऊ, गणितां नवांनीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥८॥
शक्ती असो जग – हितास्तव अंगिं बाकी
यावीण कांहिं नलगे मजलागिं बाकी
हें विष्णुदास विनवी श्रीमृगराज – यानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥९॥

Renuka Ashtak-2 लाज याची रेणुके, तुला सारी- रेणुका अष्टक-2

renuka-3

विष्णूदासाची कविता 

लाज याची रेणुके, तुला सारी

( वृत्त : दिंडी )
अखिल पतितांची, दुरित कृती केली
पतितपावन ही, कीर्ति आयकेली
म्हणुनि पडलों येउनी तुझ्या दारीं
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१॥
मूळपीठ स्वस्थानिं वास केला
सतत जपलों मी नाममालिकेला
बहुत दिन गे, घातली तुझी वारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥२॥
जरी आहे मी स्वार्थ – काम – साधू
तरी लोकांनीं मानियलें साधू
तुझ्या नांवाची दाखवितों थोरी
लाज याची रेणुके तुला सारी ॥३॥
नसे ब्रह्मांडीं तुझ्यावीण कोणी
अतां वेगें उडि घालि सुनिर्वाणीं
त्रिविध तापें तापलों असे भारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥४॥
गृहीं व्यालेली कामधेनु माय
ग्रामलोकांसी ताक मागुं काय
कृपण म्हणतिल निर्दैवि हा भिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥५॥
जन्मतां गाजे सिंहिणिचें तोक
ग्रामसिंहाचे संगे करी शोक
जंबुकाचें भय कंप घे शिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥६॥
होय सर्पाची दासि गरुड – माता
गलंडानें वैद्याचि रडे कांता
समर्थाचा आश्रीत करी चोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥७॥
तुझ्या नामीं विश्वास अल्प नाहीं
म्हणुनि धांवे दुष्कीर्ति कल्पना ही
पतित पापी मी परम दुराचारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥८॥
तुझ्या चरणाची भेट घ्यावि वाटे
परी नेते प्रारब्ध आडवाटें
गळां पडली दृढ संचिताचि दोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥९॥
अहा ! दारिद्र्यें पीडित गृह – दारा
कर्जदारहि धावोनि येति दारा
त्यात रोगाची दाटली उभारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१०॥
चलित दिवसाची साथि काकि मामी
परी निर्वाणीं कुणि न ये कामीं
निर्धनाची मानिती ते शिसारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥११॥
पहा बुडतों मी दुःखसागरांत
कशी बसलिस तूं स्वस्थची घरांत
कृपावंते ही विनती अवधारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१२॥
सर्व माझे अजि हारले उपाय
म्हणुनि अंबे धरियले तुझे पाय
विष्णुदासाची दीनजननी, तारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१३॥

Renuka Ashtak-1 अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये- रेणुका अष्टक-1

renukadevi-1

विष्णूदासाची कविता 

अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये

वृत्त : ( शिखरिणी )
न द्यावी कां वाटे, पतित म्हणुनी भेट मजला ।
न घ्यावी कां वाटे, खबरहि अनाथाचि तुजला ॥
नतोद्धारायाची, सय अझुनि कां येउंच नये ।
अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये ॥१॥
म्हणेना बाई ये, जवळ पिपिलीके शर्करा ।
म्हणेना अंगासी, मर्दन मला केशर करा ॥
तसें बुद्ध्या येणें, मज तुजकडे भाग पडतें ।
अगाई रेणुके ! मजविण तुझें काय अडतें ॥२॥
अनंदे तूं भेटी, खचित मज देशील म्हणुनी ।
अनंदें मीं होतों, अजवर अयुष्यासि गणुनी ॥
निदानीं राहीला, मरणलग हा वाद शिलकीं ।
अगाई रेणुके ! कशि तुं निगमा वादशिल कीं ॥३॥
उपेक्षा दीनाची, करतिस तुझी बाइ मरजी ।
नसे जागा द्याया, तुजवर अपीलाचि अरजी ॥
दया माया कांहीं, मजविषयिं चित्तांत नसुं दे ।
अगाई रेणुके ! अठवण तुला माझि असुं दे ॥४॥
अनावृष्टीनें या, मरतिल किती जीव न कळे ।
तुझीं हीं जीं बाळें, जगतिल किती जीवनकळे ॥
कसें झालें ? आलें, प्रलयसम हें वर्ष बिघन ।
अगाई रेणुके ! सदय ह्रदयें वर्षवि घन ॥५॥
जिलाही दीनाची, निगम म्हणती कल्पलतिका ।
दिनाचा वेलीनें कवळुनी गळा कापिल ति कां ॥
कशी झाली रक्षा – कर हयग्रिवा सायक रसी ।
अगाई रेणुके ! विपरित असें काय करसी ॥६॥
असोनी तूं माझ्या, ह्रदयिं फिरवीसी दशदिशा ।
कुटस्था लावीली, जनन मरणाची अवदशा ॥
सवेंची म्हातारा, करुनि करिसी बाळ तरणा ।
अगाई रेणुके ! तुजजवळ ही कां प्रतरणा ॥७॥
करावें तें केलें, तिळभर उणें नाहिं पडलें ।
तुझ्या एक्या नामीं, सकलहि मला धर्म घडले ॥
कृपेचें राहीलें, उचित प्रिय देणें तुजकडे ।
अगाई रेणुके ! लवकर अतां घे मजकडे ॥८॥
अहो मी अन्यायी, म्हणवुन उपेक्षा करुं नये ।
क्षमावंते, माते ! निजपथ क्षमेचा त्यजुं नये ॥
पतीतोद्धारायास्तव मिरविसी कंकण करीं ।
अगाई रेणुके ! पतित मी अहों पावन करी ॥९॥
दिनाची तूं आई, अलिस दृढ आह्मां समजुनी ।
कृपादृष्टी ठेवी, निज परशुरामा समजुनी ॥
तरी दीनाला घे, जवळ स्तन देवोनि अननीं ।
अगाई रेणूके ! जरि तुं अससी दीन – जननी ॥१०॥
स्वयें विष्णूदासा – वदनिं वदवीसी शिखरिणीं ।
जशी अंबा रंभा, मधुफळ रसाची शिकरिणी ।
तशी ही सद्विद्याक्षर शिकविशी बोधक मला ।
अगाई रेणुके ! नमन तुझिया पादकमला ॥११॥