माझे बँकेतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरू
जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे. Life is a learning journey. जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपल्याला काही शिकवून जातो, आणि तो अनुभव गाठीस बांधून आपला प्रवास अव्याहत पुढे चालू ठेवायचा असतो, अशी माझी श्रद्धा आहे. वेगवेगळे अनुभव, परिस्थिती, आणि प्रसंग जसे आपल्याला काही शिकवण देऊन जातात, तसेच काही व्यक्ति, आपल्याला बरेच काही शिकवून जातात. काही व्यक्तींमधील काही गुण आपल्याला खूप प्रभावित करीत असले, तरी, आपल्याला ते आत्मसात करता येण्याची अजिबात शक्यता नसते. आपण नुसते कौतुकाने बघत राहण्यापलीकडे काही करू शकत नाही.
अशाच व्यक्तीपैकी एक अवलिया माणूस म्हणजे, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये औरंगाबाद झोनल ऑफिसला साधारण 2 वर्ष उप महा प्रबंधक (DGM- Deputy General Manager) म्हणून आलेले मूळचे काश्मीरचे असलेले, काश्मिरी पंडित, श्री अजॉय नकीब हे व्यक्तिमत्व. अत्यंत साधी राहणी, गोरीपान आणि ठेंगणा ठुसकी पण मजबूत शरीरयष्टी, धारदार नाक, आणि किंचित घारे डोळे, डोक्याला टक्कल पडत आलेले, पण गालाला पडणाऱ्या खळ्या, आणि कायम प्रसन्न मुद्रा आणि फ्रेंडली वागणूक, यामुळे ते पूर्ण झोनल ऑफिसच्या गळ्यातील ताईत झाले होते.
स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही स्टेट बँक ऑफ इंडिया ची सर्वात मोठी सहयोगी बँक होती, जी आता, स्टेट बँक ऑफ इंडियामध्येच विलीन झालेली आहे. त्याकाळी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 7 सहयोगी बँका होत्या, आणि त्या बँकामधील उच्चपदस्थ व्यक्तींच्या एका सहयोगी बँकेतून दुसऱ्या सहयोगी बँकेतही बदल्या होत होत्या. श्री नकीब हे स्टेट बँक ऑफ पटियाला मधून बदलून या काळात स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या औरंगाबाद येथील झोनल ऑफिसला साधारण वर्ष 2011 ते 2013 या कालावधीत झोनल ऑफिसचे मुख्य म्हणून आले होते
एखादी व्यक्ति किती इतक्या उच्च पदावर असतांनाही किती साधी राहू शकते, याचे अजॉय नकीब म्हणजे एक चालते बोलते उदाहरण होते. बँकेतील नोकरी म्हणजे व्यक्ति जितक्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असेल, तितकी ती जास्त बिझी, व्यस्त राहणार आणि सतत तणावाखाली राहणार, हे समीकरण या माणसाला अजिबात लागू पडत नव्हते.
मी त्या वेळी औरंगाबाद येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या ट्रेनिंग सेंटर येथे होतो. ट्रेनिंग सेंटरची जबाबदारी सांभाळतांना बऱ्याचदा चांगलीच दमछाक व्हायची. बऱ्याच वेळा, नकीब साहेबांना, ट्रेनिंगच्या नवीन बॅच च्या सुरुवातीला, उद्घाटन करण्यासाठी बोलवायला, मी जात असे. झोनल ऑफिस च्या मुख्याचा वेळ किती किमती आहे, हे माहीत असल्यामुळे, मी त्यांची वेळ घेऊन जात असे, आणि त्यांना आमंत्रण देतांना, त्यांना वेळ उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करीत असे. त्यावेळी, ते अगदी दिलखुलासपणे म्हणत, “अरे, भोपेजी, मेरे पास तो समय ही समय है. आप हुकूम करो, कब हाजिर होना है!” वास्तविक पाहता, ते माझ्यापेक्षा हुद्दयाने खूप मोठे होते, पण त्यांनी कधीच असे जाणवू दिले नाही. आणि माझ्याशीच नाही, तर सगळ्यांशी त्यांचा हाच व्यवहार होता. केंव्हाही त्यांच्याकडे गेले, तरी ते कधीच आपण खूप कामात आहोत, आपल्याजवळ अजिबात वेळ नाही, असे दाखवीत नसत. आणि केंव्हाही गेले, तरी ते कधीच तणावात दिसत नसत.
आम्ही कधी कधी त्यांना अधिकाऱ्यांच्या एखाद्या बॅचला, एखादा महत्वाचा विषय शिकविण्यासाठी पाहुणा वक्ता म्हणून बोलवत असूत. त्यावेळी बँकेतील अगदी कठीण विषय ते रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन अगदी सोपे करून सांगत.
त्यांचे एकेक किस्से ऐकल्यावर, अवलिया, हे एकाच विशेषण त्यांना द्यावेसे वाटत असे. खरे तर त्यांच्या पदाला, बँकेची ड्रायवरसहित चांगली मोठी गाडी त्यांच्या दिमतीला असे. पण त्यांनी स्वतःच्या घरी, किंवा बाजारात इत्यादि जाण्यासाठी चक्क एक छोटीशी नॅनो कार विकत घेतली होती, आणि आपल्या खाजगी कामासाठी त्या गाडीतून फिरत.
त्यांना पूर्ण मराठवाड्यात दौऱ्यासाठी जावे लागे. अर्थातच बँकेची गाडी त्यांच्या दिमतीला असे. पण एखाद्या वेळी ते चक्क बसने जात, अगदी साधा वेष, पॅन्ट, हाफ बाह्यांचा बुशशर्ट, आणि पायात साधी चप्पल, या वेशात ते एखाद्या बँकेच्या एखाद्या खेड्यातलया शाखेत जाऊन धडकत. आणि तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधत. त्यांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेत. आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शाखा व्यवस्थापकाला सूचना देत.
झोनल ऑफिस मध्ये अगदी प्यून पासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांशी एकदम इनफॉर्मल वागत.
पण एवढेच नाही, हा मनुष्य हरहुन्नरी, रसिक आणि त्याचवेळी कलाकार सुद्धा होता.
औरंगाबादचे झोनल ऑफिस हे तेथील स्टाफ च्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या कला गुणांमुळेही प्रसिद्ध होते. आणि त्यासाठी हैदराबादच्या हेड ऑफिस मध्ये औरंगाबाद चे खूप नांव होते.
दर वर्षी हैदराबादला बँक डे ला खूप मोठा कार्यक्रम होत असे. त्यावेळी वेगवेगळ्या झोन्स मधील सांस्कृतिक कलादर्शन कार्यक्रम होत आणि त्यांच्या स्पर्धाही होत. एके वर्षी, गाण्याच्या स्पर्धा होत्या, आणि त्यात, झोन मधील स्टाफची स्पर्धा घेऊन, त्यातील विजेत्याला हैदराबाद येथे, झोन चे प्रतिनिधित्व करायला मिळणार होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बाहेरील नामवंत कलाकार बोलावले होते. त्यात चक्क नकीब साहेबांनी, स्पर्धक म्हणून भाग घेतला, आणि काश्मीर की कली या चित्रपटातील, “इशारो इशारो में दिल लेने वाले, बता ये हुनर तूने सीखा कहाँसे” हे गाणे इतके अप्रतिम गायले, की परीक्षकांनी त्यांच्या गाण्याला प्रथम क्रमांक दिला. आणि तो नक्कीच ते DGM होते म्हणून नाहीत, तर गाण्याच्या गुणवत्तेवर दिला. पण नकीब साहेबांनी, त्याचा जरी नम्रपणे स्वीकार केला, पण DGM म्हणून त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या कलाकाराचीच निवड, हैदराबाद ला जाण्यासाठी केली.
झोनल ऑफिस च्या लोकांची दरवर्षी कुठे तरी सहल जात असे. तो पर्यन्त सहसा उच्च पदस्थ असलेले अधिकारी त्या सहलीत कधी प्रत्यक्ष सहभागी होत नसत. पण नकीब साहेब अत्यंत उत्साहाने कोकणला रायगड ला निघलेल्या सहलीत सामील झाले. त्या सहलीत एकूण 40-50 जण होते, त्यात मीही होतो. आणि त्यांनी पूर्ण सहलीत सगळ्यांसोबत त्यांच्यातीलच एक होऊन मनमुरादपणे सहलीचा आनंद लुटला. पूर्ण बसच्या प्रवासात, मी त्यांच्या मागच्या सीट वर असतांना, श्री सुधीर ओंकार (दुसरे तितकेच कलाकार आणि हर हुन्नरी व्यक्तिमत्व) यांच्या शेर शायरी वर कितीतरी वेळ चाललेल्या गप्पा मी ऐकत होतो, आणि दोन रसिक माणसांच्या गप्पांचा मनमुराद आनंद लुटत होतो.
एका गावी, आम्ही पायी चालत असतांना एक म्हातारी बाई काही तरी (फळ) विकायला रस्त्यात उभी होती. तिच्याकडून खूप मोठी फळे विकत घेऊन सगळ्यांना दिली, आणि त्यांच्या पाकिटातून हाताला येतील तितक्या नोटा, फळांच्या किमतीच्या कितीतरी अधिक, न मोजता, त्या बाईला दिल्या!
आम्ही रायगडला गेलो. आमच्यात बरेच चांगले गायक, वादक होते. त्यातील हौशी असलेले, विश्वास काळे इत्यादींनी ढोलकी वगैरेही सोबत आणली होती. गड बघून आल्यावर सर्वजण भारावलेल्या अवस्थेत होते. अशा वेळी काळे आणि इतर मंडळींनी, “ गर्जा महाराष्ट्र माझा” हे वीरश्री पूर्ण गाणे, ढोलकीच्या तालावर म्हणायला सुरुवात केली, आणि सर्वजण त्या ठेकयात सामील झाले. त्यावेळी नकीब साहेबही त्या ठेकयात उत्साहाने सामील झाले. त्यावेळचे एक दोन व्हिडिओ अजून माझ्याकडे आहेत, ते या ब्लॉग सोबत देत आहे.
मित्रांनो, असा हा अवलिया माणूस, काश्मिरी पंडित, अशातच, चक्क महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात येऊन स्थायिक झाला आहे, आणि तिथे महाराष्ट्रातील आदिवासी लोकांसोबत समरस होऊन कार्य करीत आहे, हे मला आज गूगलवर सर्च केल्यावर समजले. आणि त्यांनी एक यू ट्यूब चॅनल पण सुरू केले आहे.
त्यात आणखी एका चॅनल वर त्यांनी आपल्याविषयी थोडक्यात सांगणारा एक व्हिडिओ टाकला आहे.
मन मौजी , मस्त कलंदर, आणि जीवन आपल्याच धुंदीत जगणारा असा एक अवलिया, म्हणूनच
अशी काही व्यक्तिमत्व आपल्याला बरेच काही शिकवून जातात.
यापुढील लेखात, बँकेतील इतर काही सहकारी, ज्यांच्या कडून मी खूप काही शिकलो, अशा व्यक्तींबद्दल लिहायचा विचार आहे.





























