https://goodworld.in A website by Madhav Bhope

Bringing up children- the 7-7-7 rule.

मुलांना वाढवतांना- हा ७-७-७ चा नियम पाळा!

एक गोष्ट आपण सगळेच मान्य करू- आजकाल मुलांना वाढवणे इतके सोपे राहिले नाही, जितके की २५-३०-४० वर्षांपूर्वी होते. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती खूप बदलली आहे- वाढत्या वयातील मुलांच्या पालकांचा ताण खूप वाढला आहे- आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे असतील, आणि घरात कोणी वडीलधारे नसतील तर ही परिस्थिती आणखीच बिकट होते.

आजकाल लग्नें खूप थाटामाटाने लावून देतात. लग्न झाल्यानंतर लवकरच दोघेही आई वडील होतात. पण मुलें जशी जशी मोठी व्हायला लागतात, त्यांचे सुरुवातीचे गोड बालपण संपून हळू हळू ती ४-५-६- वर्षांची होतात, के. जी. किंवा शाळेत जाऊ लागतात, तसे तसे त्यांना कसे handle करावे, असा प्रश्न पडू लागतो. खरे तर मूल झाल्यानंतर आईवडिलांचे खरे शिक्षण सुरू होते, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या पेशन्सचा, त्यांच्या संवाद कौशल्याचा, कस लागतो- मुलें आई वडिलांच्या संयमाची परिक्षा पाहतात- आणि बरेच आई वडील या परिक्षेत सपशेल फेल होतात आणि मुलांवर चिडणे, रागावणे, ओरडणे, मारणे, इत्यादि प्रकार सुरू होतात. कधी कधी त्यामुळे एकमेकांवर चिडणे ही सुरू होते.angry-mother

याचे कारण म्हणजे पालकत्व parenting- शिकण्यासाठी वेगळे काही करावे लागेल- शिकावे लागेल, आपल्या स्वभावात काही बदल घडवावे लागतील असे या ‘नवजात’ (!) आई वडिलांच्या गावीही नसते. त्याउलट मूल थोडेसे समजायच्या वयाचे झाले की त्याच्यावर तथाकथित  ‘संस्कार’ करणे ही आपली जबाबदारी, जन्मसिद्ध अधिकार आहे असा पक्का ग्रह प्रत्येक आई वडिलांचा असतो.

खरं तर मूल हे तुम्ही काय ‘सांगता’ यापेक्षा प्रत्येक प्रसंगात तुम्ही कसे ‘वागता’, तुमची काय प्रतिक्रिया असते, देहबोली, आवाजाचा ‘टोन’ डोळे, चेहऱ्यावरचा भाव, इत्यादि कसे आहेत, यावरून शिकत असते, आणि आईवडिलांच्या ‘सांगण्या’ पेक्षा त्यांचे ‘वागणे’ हे अनुकरण करीत असते, आत्मसात करीत असते. एखाद्या आईला छोट्या छोट्या गोष्टींवर कपाळावर हात मारून घ्यायची सवय असेल तर मूल लगेच ती उचलते. मुलाचे वडील जर मोबाईल बघत बघत जेवत असतील तर मूलही तसेच करते.

मुलांना मोठे करण्यात आई वडील दोघांचाही सहभाग असला, तरी त्यात आईचा वाटा खूप जास्त असतो, कारण मुलाजवळ २४ तास राहणारी आईच असते. आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना आईचा सहभाग आणि सहवास हवा असतो. अर्थात मुलांकडून योग्य त्या गोष्टी करून घेण्यासाठी, त्यांना अयोग्य गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी किंवा दूर ठेवण्यासाठी, दिवसातून अनेक वेळा रागवावे लागू शकते, खरे तर मुलांना रागावत नाही ओरडत नाही असे पालक कुणीच नसतील. पण असे करतांना जर एक ७-७-७ चा गोल्डन रूल लक्षात ठेवला, तर मुलांवर त्या रागावण्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही.

काय आहे तो गोल्डन रूल? प्रत्येक आईने(आणि वडिलांनीही) लक्षात ठेवावा असा हा नियम म्हणजे- दिवसातील ३ मुख्य वेळा पाळण्याचा. कोणत्या आहेत या तीन वेळा?

या तीन वेळा म्हणजे मूल जेंव्हा सकाळी झोपेतून उठते, त्यावेळचे ७ मिनिट, दुसरी वेळ म्हणजे मूल जेंव्हा शाळेतून घरी येते, त्यावेळचे ७ मिनिट, आणि तिसरी वेळ म्हणजे मूल जेंव्हा झोपी जाते, त्यापूर्वीचे ७ मिनिट- या अत्यंत महत्त्वाच्या वेळा असतात.

४ ते ७-८ वर्षांचे मूल जेंव्हा सकाळी झोपेतून उठते, तेंव्हा त्याला आई समोर पाहिजे असते. मूल जेंव्हा के. जी. किंवा शाळेत जायच्या वयाचे होते, आणि सकाळी शाळा असेल, तेंव्हा सकाळी त्याला उठवणे भाग असते. बऱ्याच आया, त्यांच्या कामाच्या ताणामुळे, सकाळी बरीच कामे लवकर आटपायची असल्यामुळे, मुलांना उठवतांनाच खूप वैतागून, आरडा ओरडा करून, मुलांना उठवतात. मुलें उठत असतांनाच बऱ्याच गोष्टी त्यांना ‘सुनावून’’ देतात. वास्तविक पाहता, झोपेतून उठण्याची ही वेळ मुलांसाठी अत्यंत ‘सेंसिटीव्ह’ असते. झोपेतून उठून, बाहेरच्या जगाच्या धावपळीशी जुळवून घेण्यात त्यांनाही बरेच प्रयत्न करावे लागतात. अर्धवट झोपेतून उठून लगेच तोंड धुणे, आंघोळ करणे, शाळेची तयारी करणे, या सर्व गोष्टी लागोपाठ कराव्या लागतात. त्यांच्यासाठी सुद्धा ही रोजची लढाई असते. अशा वेळी मुले उठतात त्यावेळची ७ मिनिटे. जर आईने त्याला थोडे मायेने, प्रेमाने, डोक्यावर हात फिरवून, दोन गोड शब्द बोलून जर झोपेतून जागे केले, फक्त ७ मिनिटे जर पेशन्स दाखविला, तर ते मूल आनंदाने उठते- आजकालची मुलेही बरीच समजूतदार झालीत. त्यांना नीट समजून सांगितले तर ती समजून घेतात- पण नेमक्या या महत्वाच्या वेळेस जर आपले फ्रस्ट्रेशन थोडे बाजूला ठेवून, त्यांच्याशी मायेने वागले नाही, तर दिवसाची सुरुवातच चिडचिड आणि राग  याने होते, आणि संबंध दिवसावर याचा परिणाम होतो.happy-child-1

दुसरी महत्त्वाची वेळ म्हणजे मूल शाळेतून घरी येते, तेंव्हा! मूल शाळेतून घरी येते, तेंव्हा त्याला आई समोर हवीच असते! आणि दिवसभर शाळेत काय काय झाले हे अगदी बारीक सारीक तपशीलांसह आईला सांगायचे असते. त्यावेळी आईने हातात कितीही महत्त्वाचे काम असले, तरी ते बाजूला ठेवून, मुलाचे म्हणणे, अगदी इंटरेस्ट दाखवून ऐकले, फक्त ७ मिनिटे! तरी मुलाचे समाधान होते. अशा वेळी बऱ्याच आया मुलाकडे दुर्लक्ष करतात, किंवा, आल्या आल्या, त्याने डबा पूर्ण संपवला नाही, दफ्तर कुठे तरी फेकून दिले, बूट नीट जागेवर ठेवले नाही, अशा काही कारणांमुळे लगेच रागवायला सुरुवात करतात. अशा वेळी खरे तर आई काही कामात असली, तरी तिने आपले लक्ष मुलाकडे आहे असे दाखवणे आवश्यक आहे- तुझ्यापेक्षा मला कोणतेही काम मोठे नाही- अशी जाणीव करून देणे आवश्यक आहे. कमीतकमी सुरुवातीचे काही सेकंद- एखादे मिनिट तरी- मुलाला, आपल्या आगमनामुळे आईला आनंद झाला आहे हे जाणवले पाहिजे-  आणि तुम्ही कोणत्या अत्यंत महत्वाच्या कामात असलात तरी- “थांब हं! मी एवढे करून आलेच!” अशी एक प्रकारे त्याची ‘परमिशन’ घेऊन हातातील काम उरकून लगेच त्याच्याकडे लक्ष दिले तर आपण आईसाठी महत्वाचे आहोत ही खात्री मुलांच्या मनात येते.happy-child-2

तिसरी महत्वाची वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीची! झोपेतून उठणे आणि झोपी जाणे या दोन क्रिया एक प्रकारे transition phase असतात! त्यावेळी मुलांना आई जवळ हवी असते. आणि मुले झोपण्याच्या वेळेस कुठल्याही प्रकारे वाद विवाद करून, रागावून (तू लवकर झोपत नाहीस म्हणून) चिडून रडत रडत जर मूल झोपी गेले, तर त्याची तीच मानसिक अवस्था झोपेतही सुरू राहते, आणि सकाळीही मूल तीच मानसिक अवस्था घेऊन उठण्याची शक्यता असते. त्यामुळे आई वडिलांना मूल झोपतांना (किंवा त्याला झोपी घालतांना)ही आपल्या संयमाचा कस लावावा लागतो. दिवसभरात काहीही वाद विवाद झाले असतील, तरी झोपतांना मुलाला जवळ घेऊन, डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवून, आनंदी अवस्थेत झोपी घातले, तर मुलाची झोप उत्तम प्रकारची होते आणि सकाळी उठतांना ही मूल फ्रेश मूड मध्ये उठते.mother-child

अशा प्रकारे हा ७-७-७ चा नियम जर पाळला तर बऱ्याच पालकांचे आणि त्यांच्या मुलांचे आयुष्य सुकर होईल!

वरील प्रकारे वागतांना आईला आपल्या आवडीनिवडींना, मुरड घालावी लागते- हीच स्वभाव बदलण्याची शाळा-जिच्यात आईवडिलांना नकळत प्रवेश मिळाला असतो. त्यामुळे मुलें मोठी होत असतांना- नुसती मुलें च मोठी (शहाणी) होत नाहीत, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या इतकेच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या आई वडिलांचे- आई वडील म्हणून, आणि माणूस म्हणून- शिक्षण चालू असते!

या विषयावर आपले अनुभव आणि आपली मते जरूर कळवा.

माधव भोपे 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.