An article in Health and Wellness category.
उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला, की आंबे हळू हळू कमी व्हायला लागतात, आणि जांभळांचा मोसम सुरू होतो. बाजारात हळू हळू टपोरी, चमकदार जांभळे दिसायला लागतात. आंब्यांच्या मोसमात पोटभर आंबे खाऊन जर अजीर्ण झाले असेल, तर त्यावर जांभळे खाणे हा एक उतारा समजला जातो.
जांभूळ हे एक विशुद्ध भारतीय फळ आहे. जांभळाला संस्कृत मध्ये जंबू हे नांव आहे. तसेच भारताचे एक नांव जंबूद्वीप असेही आहे. त्यावरून असे दिसते की, पूर्वीच्या काळी भारतात जांभळाच्या झाडांची इतकी रेलचेल होती की या फळांवरून देशाचे नांव जम्बू द्वीप असे पडले! आजही भारतात जांभळाची झाडे विपुल प्रमाणात आहेत, आणि देशातील जवळ जवळ सर्वच भागांत, अगदी प्रत्येकाला या फळाचा स्वाद परिचित आहे.
भगवान श्रीकृष्णाचा रंग ही जांभळासारखा होता असे पुराणात वर्णन आहे. भगवान श्रीरामांनी चौदा वर्षांच्या वनवासात फळें आणि कंदमुळें खाऊन जीवन व्यतीत केले हे आपण जाणतो. त्यात जांभळांच्या फळांचाही मोठा सहभाग आहे असा रामायणात उल्लेख सापडतो असे म्हणतात.
जांभूळ हे विशिष्ट ऋतूत येणारे मोसमी फळ आहे. खाण्याला रुचकर असण्यासोबत, याचे अनेक औषधी गुणधर्मही प्रसिद्ध आहेत. जांभूळ हे मुख्यतः आम्लधर्मीय गुणाचे फळ असून, याची चव मात्र गोड आणि तुरट अशी आहे. जांभळामध्ये ग्लुकोज आणि फ्रुकटोज विपुल प्रमाणात असते. सोबतच शरीराला आवश्यक असणारे जवळ जवळ सगळे लवण(क्षार) यात असतात.
जांभूळ खाण्याचे फायदे:
- पाचन क्रियेसाठी जांभूळ अत्यंत उपयोगी मानले जाते. जांभूळ खाल्ल्याने पोटाशी, पचनाशी संबंधित अनेक तक्रारी दूर होतात.
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ हे एक रामबाण उपाय समजले जाते. जांभळाच्या बिया वाळवून, त्याची पावडर करून तिचे सेवन केल्यास मधुमेहाच्या रोग्यांना रक्तशर्करा आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते. जांभळाचे फळ हे इतर फळांप्रमाणेच रक्त शर्करा वाढवणारे आहे हे कृपया लक्षात ठेवावे. त्यामुळे मधुमेहा च्या रोग्यांनी जांभळे खातेवेळी ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. रक्त शर्करा कमी करण्यासाठी जांभळाचे फळ नाही तर त्याच्या बिया उपयोगी आहेत. तसेच सगळ्याच मधुमेहा च्या तक्रारींवर सरसकट जांभळाच्या बियांचा उपयोग आपल्या मनाने करणे योग्य नाही. त्यासाठी वैद्यांचा सल्ला घेणे हे आवश्यक आहे.
- त्याशिवाय याच्यात कॅन्सरप्रतिरोधक तत्व सुद्धा असतात.याशिवाय kidney stone (मुतखडा) रोकण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यासाठी याच्या बिया वाळवून, बारीक दळून, पाणी किंवा दहयासोबत घेण्याचे सांगितले जाते.
- अतिसारावर जांभूळ सेंधव मिठासोबत खाल्ल्याने फायदा होतो. रक्तयुक्त अतिसारामध्येही याच्या बियांचा उपयोग करतात.
- दात आणि हिरड्यांशी संबंधित अनेक समस्यांवर जांभळाचा उपयोग होतो. जांभळाच्या बियांच्या पावडर ने दात घासून, हिरड्यांची मालिश केल्यास दोन्हीही निरोगी राहतात.
अर्थात, वरील सर्व माहिती ही सर्वसाधारण असून, वैद्यकीय सल्ला नाही हे नक्की लक्षात ठेवावे.
जांभळाच्या लाकडाचा खूप उपयोग होतो. इमारतीसाठी वापरायला याचे लाकूड उत्कृष्ट समजले जाते. याच्यात पाण्यात टिकून राहण्याची शक्ति असते. जांभळाच्या लाकडाचा मोठा जाडसर तुकडा पाण्याच्या टाकीत ठेवल्यास त्या टाकीत (पाण्यात) शेवाळ किंवा हिरवे साचत नाही आणि टाकीला दीर्घकाळ साफ करण्याची गरज पडत नाही. पूर्वीच्या काळी जलस्रोत जसे की नदी, नाले, विहिरी, यांच्या काठावर जांभळाचे झाड नेहमी लावले जायचे. कारण याच्या पानांमध्येही जंतु प्रतिरोधक (anti bacterial) शक्ति आहे.
जांभळाच्या लाकडाची अजून एक विशेषता म्हणजे याचे लाकूड दीर्घकाळपर्यन्त पाण्यात सडत नाही. या वैशिष्ट्यामुळे याच्या लाकडांचा उपयोग नाव बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
जांभूळ हे औषधी गुणांचे भांडार असून, शेतकर्यासाठीही अधिक उत्पन्न देणारे फळ आहे.
नद्या आणि इतर जलप्रवाहांच्या किनार्यावर मातीची होणारी धूप (क्षरण) टाळण्यासाठी जांभळाची झाडे अत्यंत उपयुक्त आहेत.
अजूनपर्यंत जांभळाची योजनाबद्ध अशी शेती फार कमी बघायला मिळते. देशातील बहुतेक भागात अनियोजित प्रकारेच जांभळाचे उत्पन्न घेतले जाते. खरे तर जांभळांच्या मोसमात फळांना खूप मागणी असते आणि शहरात तर भाव ही चांगला मिळतो. सध्या पुण्यात, जांभळे 80 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत पावकिलोचा भाव आहे. म्हणजे जवळ जवळ 320 ते 480 रुपये किलोचा भाव. हा भाव सफरचंद किंवा इतर अनेक फळांपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे जांभळाच्या नियोजनबद्ध उत्पादनाला भारतात खूप वाव आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्याचबरोबर जांभळांपासूनजेली, मुरब्बाही बनवता हेऊ शकतो.
खरं तर जांभूळ हे भारतीयांचे मुख्य फळ आहे आणि त्याचे संरक्षण आणि संवर्धन सगळ्यांनी करायला पाहिजे.
This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.