काय कारण पुसा रेणुकेला
काय कारण पुसा रेणुकेला
माझा त्याग कशास्तव केला ? ।।धृ।।
झाला वर्षाच्या वर एक महिना । तरी अजूनि सय का हो येइ ना
अशी अगदीच नको करू दैना । तुझ्याविण मला बाप-आई ना
दूर काननी पडलो एकला ।।माझा।।१।।
भला भार्गव राम प्रतापी । गळा आपुल्या जननीचा कापी
परी तैशासि केलीस माफी । माझे अन्याय लविसी मापी
कां रुसलीस या घटकेला ।।माझा।।२।।
जन्मा घातले हा अविचार । आता जन्मदे काय विचार
प्रेमे चालवी प्रेम प्रचार । तुझे वर्णीती गुण वेद चार
तुझ्या वंदीतो मी पादुकेला ।।माझा।।३।।
माझ्या पाहशील जरि अवगुणला । उणे येईल जननीपणाला
दृढ बांधिले ब्रिद कंकणाला । याची तरि मग लाज कुणाला
कां लविसी मजसि भिकेला ।।माझा।।४।।
निज चर्माचा सदाचरणांत । जोडा घालीन तुझ्या चरणांत
तुझ्या राहीन माय ऋणांत । सडा टाकीन मी अंगणात
नित्य गुंफीन पद-मालिकेला ।।माझा।।५।।
रत कामना काममदासी । जशी गुंतली माशी मधासी
काढी यातून, आली उदासी । छाया कृपेची करि विष्णुदासी
नमो नारायणी अम्बिकेला ।।माझा।।६।।
—–00000—–
रेणुके ! मजला मुळ धाडी
रेणुके ! मजला मुळ धाडी
आता या दुःखातुन काढी
तुझ्याविण तिळ-तिळ मी तुटते । कठिण दिन काट्यांवर कंठिते
भेटिच्यासाठि उरी फुटते । पडेना चैन मला कुठ ते
निरोधुनि मन, डोळे मिटते । घडोघडी दचकुन परि उठते
पडिले भय चिंतेच्या पहाडी । आता या दुःखातुन काढी ।।१।।
पती येऊ देइना शेजारी । फजिती करितो बाजारी
सवतिने गांजियले भारी । ऐकले अससिल परभारी
मंडळी सासरची सारी । मला सुख देति न संसारी
अटकले मेल्यांचे दाढी । आता या दुःखातुन काढी ।।२।।
भेटता भार्गवरामासी । पावतिल प्राण आरामासी
जोगवा मागिन सुखवासी । अथवा राहिन उपवासी
परि मी येइन तुजपाशी । वांचवी अथवा दे फासी
वल्कले अथवा दे साडी । आता या दुःखातुन काढी ।।३।।
वाटते लटकी कां घाई । नव्हे ही लटकी कांगाई
धाडिते सांगुनि सुचना ही । उपेक्षा करणे बरे नाही !
खचित मी बाई, तुझ्यापायी । टाकिते उडि गंगा-डोही
पडो या जगण्यावर धाडी । आता या दुःखातुन काढी ।।४।।
शुभासनि अश्विन मासाची । स्थापना घटि नव दिवसांची
विलोकिन यात्रा वर्षाची । तोरणे येतिल नवसाची
परम दिनदयाळ तू साची । माउली विष्णुदासाची
वसशी मृगराज-पहाडी । आता या दुःखातुन काढी ।।५।।
—–00000—–
लक्ष कोटी चंडकिरण
लक्ष कोटी चंडकिरण सुप्रचंड विलपती
अंबचंद्रवदनबिंब दीप्तिमाजि लोपती
सिंहशिखर अचलवासि मूळपीठनायिका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।१।।
आकर्ण अरुणवर्ण नेत्र, श्रवणि दिव्य कुंडले
डोलताति पुष्पहार भार फार दाटले
अष्टदंडि, बाजुबंदि, कंकणादि, मुद्रिका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।२।।
इन्द्रनीळ, पद्मराग, पाच, हीर वेगळा
पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा
पैंजणादि भूषणेचि लोपल्याति पादुका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।३।।
इंद्र चंद्र विष्णु ब्रम्ह नारदादि वंदिती
आदि अंत ठावहीन आदि शक्ति भगवती
प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।४।।
पर्वताग्रवासि पक्षि अंब अंब बोलती
विशाल शाल वृक्षरानी भवानिध्यानि डोलती
अवतारकृत्यसार जडमुडादि तारका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।५।।
अनंत ब्रम्हांड पोटी पूर्वमुखा बैसली
अनंत गूण, अनंत शक्ती विश्वजननि भासली
सव्यभागि दत्त अत्रि वामभागि कालिका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।६।।
पवित्र मातृक्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी
अंब दर्शनासि भक्त-अभक्त येति आश्रमी
म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।७।।
—–00000—–
श्री रेणुके मजकडे कधि पाहशील
साधु तुला म्हणति सर्वजगाचि आई । आलो म्हणोनि तुजपाशि करोनि घाई
ही एक आस मनि की मज पावशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।१।।
तू तारिशी भरवसा धरुनी मनांत । मी ठाकलो बघ उभा तव अंगणात
तू काय आइ दुसरे घर दाविशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।२।।
माता पिता त्यजुनिया गणगोत सारे । ध्यावे तुला हृदयी हे भरलेचि वारे
याहून काय दुसरे मज मागशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।३।।
आई मुलास करि दूर असे न कोठे । झाले जगात कवि सांगति काय खोटे
तू ती प्रचीति मजला कधि दाविशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।४।।
ज्ञाते विचारतिल खाण तशीच माती । हा दुष्ट नष्ट तरि लाज नसे तुला ती ?
तू त्यासि काय मग उत्तर सांगशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।५।।
हातास सर्व नसतात समान बोटे । श्री नारदादि बहु पुत्र तुझेचि मोठे
मी पातकी म्हणुनि का मज टाकशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।६।।
वेद स्मृती वदति की “जगदंबिका” हे । येताचि नाम मुखि पाप मुळी न राहे
निष्पाप मी तरि न का मज तारशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।७।।
संसार सागर जणू बुडवी सदैव । हाका तुला म्हणुन मारित वासुदेव
देवोनि हात वरती झणि काढशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।८।।
—–00000—–
तुला माझा जगदंबे ! नमस्कार
तुझे सुंदर रुप रेणुके विराजे
वर्णीताती मुनि देव देवि राजे
कोण स्वगुणाचा करिल गुणाकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१।।
सदानंद मुख चंद्रमा सबंध
रत्नहार, मणी, वाकि, बाजुबन्द
रत्नजडित सुवर्ण अलंकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।२।।
विलोकुन नथ नासिकी, काप कानी
मार्ग विसरावा मोक्ष साधकांनी
हाक द्यावी लक्षूनि लक्षवार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।३।।
साडि पिवळी खडिदर भरजरीची
तंग चोळी अंगात अंजिरीची
टिळा कुंकुम, निट वेणी पिळेदार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।४।।
सप्तशतिचे पुढे पाठ घणघणाट
टाळ घंटा, कंकणे, खणखणाट
पायि पैंजण घन देति झणत्काऱ । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।५।।
मूळ धाडी दर्शना यावयासी
लावि भजनी या उर्वरित वयासी
तोडी सारा हा दुष्ट अहंकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।६।।
पर्वती या बसलीस आम्हासाठी
परी अमुची खरचली जमा साठी
भरत आला स्थळ-भरतिचा आकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।७।।
माय वंची दुरदेशि मुलांनाही
अशी वार्ता ठाऊक माला नाही
अगे आई ! हा काय चमत्कार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।८।।
ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीर
मला केले सरदार ना फकीर
काय म्हणतिल व्यासादि ग्रंथकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।९।।
तरी आता ये, धाव, पाव, तार
त्वरित आता तरि धाव, पाव, तार
करी माझा अविलंबे अंगिकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१0।।
काय रागे झालीस पाठमोरी
तेरि अम्मा फिर एकि वाट मोरी
केशराचा हरपेल की शकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।११।।
पहा जातो नरजन्म-रंग वाया
नये सहसा परतून रंगवाया
म्हणुनि करितो विशेष हाहा:कार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१२।।
कृपासुत्रे वोढोनि पाय दावी
जशी बांधी कृष्णासि माय दावी
अहो मीही अन्यायि अनिवार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१३।।
मीच अथवा तुज हृदय-मंदिरात
प्रेमसूत्रे बांधीन दिवस-रात
यथातथ्य परि नसे अधिकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१४।।
कसा एका पुष्पाचिया आवडीने
मुक्त केला गजराज तातडीने
तसा मीही अर्पितो सुमनहार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१५।।
केली दुल्लड ही पदर पंधराची
तुझ्यासाठीची, आण शंकराची
विष्णुदास म्हणे रेणुके स्विकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।६।।
—–00000—–
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला
तू विचित्र गारुडीण काय खेळ मांडसी
रक्तमांसअस्थिच्या गृहात जीव कोंडसी
प्राण कंठि पातल्याहि सोडसी न का मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।१।।
तरिलेस, तारतीस, तारशील, पातकी
अपरोक्ष साक्ष देति हे तुझेचि हात की
हेचि पाय हासतील कौतुके तुला मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।२।।
एकदाहि दाविसी न आत्मरूप रेखडे
घालसी सुलोचनात राख खूपरे खडे
तारसी न मारसी न बारसीन का मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।३।।
मुख्य कार्यकारणात तूचि होसि वाकडे
दोष हा जिवाकडे न दोष हा शिवाकडे
आवघे तुझेचि कृत्य हे कळोनि ये मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।४।।
तू दीनाचि माय साचि, होसि का ग मावशी
विद्यमान हे सुशील नाम का गमावशी
नित्य मार शत्रुहाति मारवीसि का मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।५।।
जो गुन्हा करी अधीक तो प्रितीस आगळा
मी तसा कधी न काहि बाई ! कापला गळा
हाचि न्याय अनुभवासि दाखला अला मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।६।।
रासभीण नारदादि आहिराजी वासना
जी अटोपली प्रत्यक्ष नाहि राजिवासना
ती उनाड संगतीस आटपावया मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।७।।
ओढती न पेरु देति हात चालु चाडिचे
दुष्ट काम-क्रोध मांग जातिचे लुचाडिचे
त्यांचि पाठ राखितेस हे कळोनि ये मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।८।।
काय जन्म घातलासि, लविलीस काळजी,
काळजात इंगळीच खोचलीस काळ जी
ही जराचि धाड धाडलीस खावया मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।९।।
काय स्वस्थ बैसलीस मूळपीठपर्वती
काय घातलासि हा अनाथ देह कर्वती
काय लोटलेसि घोर दुःखसागरी मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।१0।।
काय लीहीलेसि दैवि गर्भवास सोसणे
काय दीधलेसि जन्म-मृत्युलागि पोसणे
काय लाविलेस नित्य तोंड वासणे मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।११।।
आदि मध्य-आवसानि सर्व विश्व चाळसी
होसि तू तरुण, वृद्ध, बाळ खेळ खेळसी
विष्णुदास व्यक्त नाम रूप गूण का मला
हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।१२।।
—–00000—–
सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती
शिवे चित्कल्लोळे परम विमले मंगलमये
मुखे वर्णू काये सकल गुणानंद निलये
दयाळे श्रीबाळे विधि-हरि हरादीक जपती
सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।१।।
अहो अंबाबाई परात्पर रूपे प्रगटसी
किती ही ब्रम्हांडे त्याजुनि स्थिति संहार करिती
पुराणे षट्शास्त्रे स्तुति बहू तुझी ख्याति वादती
सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।२।।
तुवा भक्तासाठी सगुण सदये रूप धरिले
श्रिये वेणी कानी लखलखित तटांग युगुले
बरे नाकी मुक्ताफळ बहू अलंकार वसती
सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।३।।
बरे नेत्रांबूजे अरुण तनु अष्टादशभुजा
महोत्साही तुझी करुनि सुरसंपादन पुजा
उदो शब्दे हाती धरुनि दिवट्या नृत्य करिती
सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।४।।
श्रिये पुष्पे गंधे घवघवित ताम्बूल वदनी
अनेकांच्या सिद्धि वसति तुजपाशी निशिदिनी
तुझ्या तेजे दुर्गे अघतम विदारूनि पुढती
सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।५।।
नमो विश्वाधारे अभिनव तुझा खेळ जननी
प्रतापे दुष्टाला वधुनि विजयी तू त्रिभुवनी
उभे द्वारी इंद्रादिक निकट सेवेत असती
सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।६।।
मला पावे वेगी हृदय न करी निष्ठुर कदा
कृपेने तू पाही चुकविसि जगी घोर समुद्रा
तुझ्या भक्ती वींना विषय मज काही न लगती
सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।७।।
चिदानन्दे देवी निज भजनतेने श्रम हरे
प्रपंचाचा धंदा सधन बघ येथोनि विसरे
स्वभावे गोसावी सुत करितसे हीच विनती
सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।८।।
—–00000—–
अशाला कशाला गया आणि काशी
मनी ध्याय जो रेणुकेच्या पदासी
मुखी गाय जो रेणुकेच्या पदासी
पदी जाय जो रेणुका मंदिरासी । अशाला कशाला गया आणि काशी ।।१।।
करी प्रत्यही मातृतीर्थात स्नान
मनी रेणुकेचे सदोदीत ध्यान
असे नित्य मातापुरक्षेत्रवासी । अशाला कशाला गया आणि काशी ।।२।।
सदा देई तातास मातेस मान
परस्त्रीस जो मानि माते समान
न जो हात लावी पराया धनासी । अशाला कशाला गया आणि काशी ।।३।।
न उच्चारि जो दोष वाचे पराचे
गुणा वर्णितो नित्य जो ईश्वरीचे
परद्रोह ज्याच्या शिवेना मनासी । अशाला कशाला गया आणि काशी ।।४।।
मिळे नीतिने तेवढ्यानेच तुष्ट
न कोणासवे ही जयाचे वितुष्ट
न जो दूखवी वाणिने आणिकांसि । अशाला कशाला गया आणि काशी ।।५।।
सदा ज्याचिया वास चिती दयेचा
सदा लागला ध्यास ज्या रेणुकेचा
गिळीना कधी जो अधर्माचि माशी । अशाला कशाला गया आणि काशी ।।६।।
झिजे देह ज्याचा सदा देवकाजी
वसेना कधी दुर्जनांच्या समाजी
न निंदि न वंदी निखंदी परासि । अशाला कशाला गया आणि काशी ।।७।।
सदा रेणुका भक्तिने धन्य झाला
मनस्ताप निःशेष ज्याचा निवाला
वदे त्या विशी वासुदेव प्रकाशी । अशाला कशाला गया आणि काशी ।।८।।
—–00000—–
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ
माझी पतिताची पापकृती खोटी
तुझी पावन करण्याची शक्ति मोठी
समजवंता मी काय समजाऊ
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।१।।
जरी गेलिस तू मायबाई झोपी
तरी बुडतिल भवसागरत पापी
ब्रम्हज्ञानी ही लागतील वाहू
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।२।।
कामक्रोधादिक चोरटे गृहात
शिरूनि पडले ते दुष्ट आग्रहात
लुटू म्हणती हाणु, मारू जीव घेऊ
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।३।।
काळसर्प मुख, वासुनी उषाला
टपत बसला तो भिइना कशाला
कितीतरि या निर्वाणी तुला वाहू
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।४।।
कृपा सोडुनि निजलीस यथासांग
उपेक्षीसी मज, काय आता सांग
कृपावंते ! निष्ठूर नको होऊ
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।५।।
तुझ्याविण मी कोणासि हात जोडू
आई म्हणुनी कोणाचा पदर ओढू
तुझे पाय सोडूनि कुठे जाऊ
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।६।।
जगी त्राता तुजवीण कोणी नाही
माझि कोणी कळवळ जाणिनाही
तूच जननी तू जनक बहिण भाऊ
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।७।।
नको सांड करू माझिया जिवाची
तुला एकविरे आण भार्गवाची
नको सहसा जगदंबे अंत पाहू
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।८।।
जरी माझी ना करिशी तू उपेक्षा
तरी वाढेल तुझे नाव याहिपेक्षा
विष्णुदास म्हणे गुण तुझे गाऊ
उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।९।।
—–00000—–
दयाळे ! तुझ्या कोटि ब्रम्हाण्ड पोटी
दयाळे ! तुझ्या कोटि ब्रम्हाण्ड पोटी
स्वये पाळिशी जीव कोट्यानकोटी
नुपेक्षी मला आदिमाये! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।१।।
कधी आपुले दाविसी मूळपीठ
मिळो ना मिळो खावया गूळ-पीठ
नुपेक्षी मला आदिमाये! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।२।।
तुझ्यापाशि राहीन खाईन भाजी
जगामाजि सांगेन ही माय माझी
नुपेक्षी मला आदिमाये! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।३।।
बरा नाहि का मी धुया लुगडे हो
अशा पूरवावी दयाळू गडे, हो
नुपेक्षी मला आदिमाये! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।४।।
तुझी भक्ति अंगामधे संचरावी
तुझी माउली वेणि म्या विंचरावी
नुपेक्षी मला आदिमाये! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।५।।
तुला प्रार्थना हीच जोडूनि पाणी
तुझ्या द्वारि राहीन, वाहीन पाणी
नुपेक्षी मला आदिमाये! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।६।।
नसे द्यावया वस्त्र यद्वा दशीला
तुझ्या पंक्तिला येउ दे द्वादशीला
नुपेक्षी मला आदिमाये! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।७।।
जिवाहूनि आता करू काय दान
आईने रुसावे असा कायदा न
नुपेक्षी मला आदिमाये! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।८।।
सदा विष्णुदसाचिया हे अगाई
दया येउ दे जाहलो गाइ-गाई
नुपेक्षी मला आदिमाये! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।९।।
—–00000—–
सदा सर्वदा मोरया, शारदाही
सदा सर्वदा मोरया, शारदाही
सदा सर्वदा सद्गुरूंच्या पदाही
नमावे, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।१।।
सदा सर्वदा नित्यनेमे प्रभाते
विधी-श्रीहरी-पार्वतीवल्लभाते
स्मरावे, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।२।।
सदोदीत माता, पिता, ज्येष्ठबंधू
सदोदीत धेनू, यती, विप्र, साधू
भजावे, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।३।।
षडन्यास, मुद्रा, योगसूत्रे पदेची
अनुष्ठान, संध्या, मालिका त्रीपदेची
जपावी, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।४।।
सदा सर्वदाही तपोयज्ञदान
यथासांगची देवपूजाविधान
करावे, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।५।।
बहू देव, देवी, रवी, चंद्र, तारा
बहू रंग लीला, बहू अवतारा
गणावे, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।६।।
सदा वेद शास्त्रे, पुराणे, कवीता
सदाsभंग, ज्ञानेश्वरी, मूळगीता
पढावी, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।७।।
अयोध्यापुरी, द्वारका-पुण्यक्षेत्री
प्रयगी, त्रिवेणी, महातीर्थ यात्री
भ्रमावे, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।८।।
प्रकशीत नानाsकृती-रंग-रूपे
शिळा, हेम, ताम्र, लोह, वंग, रूपे
आकारे, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।९।।
सदा विष्णुदासाचिया सन्निधानी
रहावे अता निर्वाणी निधानी
नुपेक्षी, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।१0।।
—–00000—–
साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके
जय जय विश्वपते, हिमाचल सुते, सत्यव्रते भगवते
वांछा कल्पलते, कृपर्णव धृते, भक्तांकिते, सन्मते
साधू वत्सलते, अधर्मरहिते, सद्धर्म श्रीपालके
साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।१।।
अष्टादंडभुजा प्रचंड सरळा, विक्राळ दाढा शुळा
रक्त श्रीबुबुळा प्रताप अगळा, ब्रम्हांड माळा गळा
जिंव्हा ऊरस्थळा, रुळे लळलळा, कल्पांत कालांतके
साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।२।।
कोटीच्या शतकोटी बाण सुटती, संग्राम प्राणार्पणे
तेवी रूप प्रचंड देख भ्रमती, मार्तंड तारांगणे
सोडीले तव सुप्रताप पाहता, गर्वास श्रीत्र्यंबके
साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।३।।
युद्धी चाप करी फिरे गरगरा, चक्रापरी उद्भीटा
आरोळी फुटता धरा थरथरा, कापे उरी तटतटा
साक्षात काळ पळे बहू झरझरा, धाके तुझ्या अम्बिके
साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।४।।
अंगी संचरता सकोप उठती, ज्वाळा मुखी भडभडा
भूमी आदळता द्वीपाद उठती, शैले-मुळे तडतडा
चामुंडे उररक्त तू घटघटा महिषासुर प्राशके
साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।५।।
आशापाश नको, जगी भिक नको, परद्रव्य दारा नको
कायाक्लेश नको, दया त्यजु नको, निर्वाण पाहू नको
कामक्रोध नको, महारिपु नको, निंदा नको या मुखे
साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।६।।
त्वद्भक्ती मज दे, भवानि वर दे, पायी तुझ्या राहु दे
सद्धर्मी मति दे, प्रपंचि सुख दे, विघ्ने दुरी जाऊ दे
धैर्य श्री बल दे, सुकीर्ति यश दे, बाधो न दे पातके
साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।७।।
स्वापत्या छ्ळणे कृपा विसरणे, अश्लाघ्य की हे अहा
तूझा तूचि पहा विचार करुनी, अन्याय की न्याय हा
विष्णुदास म्हणे कृपाचि करणे, आता जगन्नायके
साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।८।।
—–00000—–
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू
तुझी आसति कोटी ब्रम्हांड बाळे
तसे घेइ पोटी मलाही दयाळे
नको दूसर्या गर्भवासासि धाडू
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।१।।
तुझ्या वाचुनि होतसे जीव कष्टी
तुला एकदा पाहूदे माय दृष्टी
नको प्रीतिचा लाविला कोंभ मोडू
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।२।।
समर्थागृही इष्ट शिष्टाधिकारी
तया पंगती बैसलीया भिकारी
नको अन्नपात्रामधे भिन्न वाढू
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।३।।
जपोनि तुझे नाव मोठे प्रतापी
बुडाला जगी कोणता सांग पापी
नको येकट्याला मला खालि धाडू
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।४।।
तुझ्या भेटीचि लागली आस मोठी
परी दुष्ट येती आडवे शत्रु कोटी
नको भीड त्यांची धरू माझि तोडू
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।५।।
तुझा पुत्र हा वाटल्या तारणे हो
तुझा शत्रु हा वाटल्या मारणे हो
नको तीसरा याविणे खेळ मांडू
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।६।।
पुरे झालि ही नावनीशी कवीता
रसाभास होतो , बहू शीकवीता
मना माउलीला नको व्यर्थ भांडू
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।७।।
आम्ही लेकरांनी रडावे रुसावे
अमा देउनी त्वांचि डोळे पुसावे
नको कायदा हा तुझा तूचि मोडू
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।८।।
गडे ! येउनी तू कडे घे मुक्याने
करी शांत आलिंगुनीया मुक्याने
नको विष्णुदासाप्रती तू विभांडू
नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।९।।
—–00000—–
आळस नको करू ये गुरुराया
आळस नको करू ये गुरूराया
तुजवीण नरतनू जाईल वाया ।।धृ।।
या भवकाननी भव भय वाटे
डोंगर अजगर कंटक वाटे
षड्रिपु वृकव्याघ्र टपलेत खाया
तुजवीण नरतनू जाईल वाया ।।१।।
संसार शिरि भार थोर पसारा
पळता नये आशा चिखलचि सारा
सर्पदशेंद्रिये वेष्टिले पाया
तुजवीण नरतनू जाईल वाया ।।२।।
पडला गळ्यामध्ये पहा काळफासा
अपपर जन सारे पहाति तमाशा
स्त्रीसूत प्रियमित्र नये सोडवाया
तुजवीण नरतनू जाईल वाया ।।३।।
अज्ञान तमदरी जो घसरावे
सुचले भले तुझे पाय स्मरावे
प्रगटविसी ज्ञान भास्करोदया
तुजवीण नरतनू जाईल वाया ।।४।।
करशील सत्य दया विष्णुदासा
आहे तुझा मनी दृढ भरोसा
अशिच सदा मती दे गुण गाया
तुजवीण नरतनू जाईल वाया ।।५।।
—–00000—–
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी
अंबे महात्रिपुरसुंदरि आदिमाये
दारिद्र्य दुःख भवहारिणि दावि पाये
तुझा अगाध महिमा वदती पुराणी
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।१।।
लज्जा समस्त तुजला निज बालकाची
तू माऊली अति स्वये कनवाळू साची
व्हावे प्रसन्न करुणा परिसोनि कानी
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।२।।
हे चालले वय वृथा भुललो प्रपंची
तेणे करोनि स्थिरता न घडे मनाची
दुःखार्णवात बुडतो धरि शीघ्र पाणी
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।३।।
निष्ठूरता जरि मनि धरिशील आई
रक्षील कोण तुजवाचुनि ओ तुकाई
तूझाचि आश्रय असे जरि सत्य मानी
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।४।।
तू वंद्य या त्रिभुवनात समर्थ कैसी
धाके तुझ्या पळ सुटे अरि दानवासी
येती पुजेसि सुर बैसुनिया विमानी
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।५।।
जाळीतसे मजसि हा भवताप अंगी
त्याचे निवारण करी मज भेट वेगी
आनंद सिंधु लहरी गुण कोण वाणी
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।६।।
नेणे पदार्थ तुजवाचुनि आणि काही
तू माय बाप अवघे गणगोत पाही
आणिक देव दुसरा हृदयात नाही
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।७।।
आता क्षमा करिशि गे अपराध माझा
मी मूढ केवळ असे परि दास तूझा
तू सोडिशील मजला झणी हो निदानी
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।८।।
जैसे कळेल जननी जन पाळि तैसे
मी प्रार्थितो सकळ साक्षचि जाण ऐसे
गोसावि नंदन म्हणे मजलागि ध्यानी
श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।९।।
—–00000—–
अभंग
माझी रेणुका माऊली । कल्पवृक्षाची साउली ।।१।।
जैसी वत्सालागी गाय । तैसी अनाथासी माय ।।२।।
हाके सरशी घाईघाई । वेगे धावतची पायी ।।३।।
आली तापल्या उन्हात । नाही आळस मनात ।।४।।
खाली बैस घे आराम । मुखावरती आला घाम ।।५।।
विष्णुदास आदराने । वारा घाली पदराने ।।६।।
—–00000—–
जोगवा
अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी
मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागुनि
त्रिविध तापाची तापाची करावया झाडणी
भक्ता लागी तू , भक्ता लागी तू । पावसी निर्वाणी ।।१।।
आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन ।।धृ।।
आता साजणी साजणी झाले मी निःसंग
विकल्प नवर्याचा नवर्याचा सोडियला मी संग
काम क्रोध हे क्रोध हे झाडियले मातंग
झाला मोक्षाचा झाला मोक्षाचा सुरंग ।।२।।
आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
विवेक रसाची रसाची भरीन परडी
आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडीन दरडी
मनो विकार मनो विकार करीन कुर्वंडी ।।३।।
आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालिन
हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन
भेद रहीत भेद रहीत वारिसी जाईन ।।४।।
आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
नवविध भक्तीचे भक्तीचे करुनी नवरात्र
नवस करोंनी करोंनी मागेन ज्ञानपुत्र
दंभ सासरा दंभ सासरा सांडीन कुपात्र ।।५।।
आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागून ठेविला
जाउनि महाद्वारी महाद्वारी नवस म्यां फेडीला
एका पणे हो पणे हो जनार्दन देखिला
जन्ममरणाचा जन्ममरणाचा फेरा चुकवीला ।।६।।
आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन
—–00000—–