मागील लेखावरून-पुढे
यापूर्वीच्या लेखात आपण 10 व्या श्लोकापर्यंत पाहिले होते. त्यात श्लोक क्र. 4 पासून 10 पर्यन्त, श्री राम कवच बघितले. आता पुढे:-
आता यापुढील श्लोकांत या कवचाचे माहात्म्य श्रीरामाच्या नामाचे महत्त्व, श्रीरामाच्या रूपाचे वर्णन इत्यादि आहे.
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥
— पाताल+ भूतल+व्योम+ चारिणः+ छद्मचारिणः+न+ द्रष्टुं+ अपि+शक्ताः+ते+ रक्षितं+ राम+नामभिः
विष्णू पुराणात ३ लोक आणि चौदा भुवने सांगितली आहेत. तीन लोक म्हणजे पाताळ लोक, भूलोक आणि स्वर्गलोक. पाताळ लोकात दैत्य, दानव, यक्ष, नाग इत्यादिंचा वास असतो असे मानले गेले आहे. भूलोकात मनुष्य आणि इतर जीवजंतूंचा वास असतो, आणि स्वर्गलोकात इंद्र, वरूण, पवन, बृहस्पति, चंद्र, निरनिराळे ग्रह इत्यादि देवतांचा वास असतो. या तीन्ही लोकांमधील कुठलीही शक्ति, राम नामाने रक्षित माणसाचे वाकडे करू शकत नाही. याशिवाय, छद्म रूपाने वावरणाऱ्या शक्ति असतात, ज्या की सामान्य दृष्टीला दिसत नाहीत(छद्मचारिणः).
अशा शक्ति, रामनामाने रक्षित झालेल्या व्यक्तिचे वाकडे करण्याचे तर सोडाच (अपि) पण त्याच्या कडे वाकडया नजरेने पाहूही शकत नाहीत.( न+ द्रष्टुं). अर्थात, ज्या व्यक्तिने राम नाम रूपी कवच धारण केले आहे, त्याला तीन्ही लोकांतील वाईट शक्तींची बाधा होऊ शकत नाही.(ग्रह नक्षत्र, भूत पिशाच, किंवा, या लोकातील वाईट प्रवृत्तीचे लोक)
म्हणूनच आपल्या इथे, कुठल्याही वाईट शक्तींची बाधा झालेली आहे, दृष्ट इत्यादि लागली आहे, अशी शंका असल्यास, रामरक्षा स्तोत्राचा अचूक उपाय आहे असे मानले जाते.
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥
“राम”, “रामभद्र” किंवा “रामचंद्र” अशा कुठल्याही नावाने श्रीरामाचे जो स्मरण करतो, त्या पुरुषाला पापाचा स्पर्शही होत नाही. आणि “भुक्ति” आणि “मुक्ती” प्राप्त होते. (विन्दति = प्राप्त होणे )
भुक्ति म्हणजे ऐहिक भोग. मुक्ति अर्थात मोक्ष. श्रीरामाच्या नामस्मरणाने दोन्हीही प्राप्त होतात.
आपल्या आवडत्या व्यक्तिला, आपल्या लाडक्या मुलाला, जसे आपण बबड्या, छबड्या, सोन्या, राजा, छकुल्या, अशा अनेक नावाने हाक मारतो आणि कितीही नावांनी हाक मारली तरी आपले मन भरत नाही, तशीच अवस्था या ठिकाणी कवीची झाली आहे, असे मला वाटते, म्हणूनच, श्रीराम या आपल्या प्रेमास्पदाला, आपल्या देवतेला, “राम”, “रामभद्र”, “रामचंद्र” अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधित केले आहे!
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥
जगज्जैत्र+ एक+ मंत्रेण+रामनाम्ना+ अभिरक्षितम्+यः +कण्ठे +धारयेत्+तस्य+ करस्थाः+ सर्व+ सिद्धयः
ज्याने जग जिंकता येते अशा एकमेव रामनाम रूपी मंत्राने जो अभिरक्षित आहे, संरक्षित आहे, रामरूपी मंत्र ज्याने कंठात धारण केलेला आहे, त्याला, सर्व सिद्धी हातातच असल्यासारख्या आहेत.
वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम् ॥14॥
वज्र+ पंजर+नाम+इदं+यो+ राम कवचम्+ स्मरेत+अव्याहत+ आज्ञः + सर्वत्र+ लभते+जय+ मंगलम्
इंद्राचे वज्र हे आपणास माहित आहे. देव आणि दानवांच्या लढाईत, जेंव्हा दानव देवांवर प्रबळ होऊ लागले, त्यावेळी दधिची ऋषींच्या हाडांपासून वज्र बनविण्यात आले होते आणि त्याचा वापर करून इंद्राने वृत्रासुरावर आणि इतर दानवांवर विजय मिळविला होता. हे वज्र अजेय समजले जाते. पंजर म्हणजे पिंजरा. रामकवच हे वज्राच्या पिंजऱ्यासारखे अभेद्य आहे. असे हे रामकवच जो स्मरण करतो, त्याची आज्ञा कधीच मोडली जात नाही. आणि त्याला नेहमी सर्वत्र, जय आणि मंगलाचीच प्राप्ति होते.(अव्याहताज्ञः या शब्दाचा अर्थ आपण मराठीच्या अव्याहत म्हणजे सतत असा घेतो आणि अशा व्यक्तिला नेहमी सर्वत्र जय मंगल प्राप्त होते असा करतो. पण सदरील शब्दाचा समास विग्रह अव्याहत+ आज्ञः असा होत असून त्याचा अर्थ ‘ज्याची आज्ञा मोडली जात नाही’ असा होतो)
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥
बुधकौशिक ऋषींना ‘हर’ म्हणजे भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन आदेश दिल्याप्रमाणे (‘आदिष्ट”) त्यांनी सकाळी उठून (प्रबुद्धो) हे रामरक्षा स्तोत्र लिहिले.
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥
“आराम” म्हणजे बगीचा, “विराम” म्हणजे “पूर्णविराम”, “अभिराम” म्हणजे आनंदकर, हर्षपूर्ण. अभिरामस्त्रिलोकानां म्हणजे तीन्ही लोकांना आनंद देणारा. राम:+ श्रीमान+स+ न: +प्रभु:
कल्पवृक्षाचा बगीचा , समस्त आपदा म्हणजे संकटांचा विराम (the end) असणारा , तीन्ही लोकांना आनंद देणारा(अभिरामस्त्रिलोकानां) असा “राम” हा आमचा “प्रभु” आहे.
इथपर्यंत रामरक्षा स्तोत्र, आणि त्याची उत्पत्ति कशी झाली, इत्यादि सांगून झाले. इथून पुढील श्लोक हे भक्तिरसात ओथंबलेले आहेत.
तरुणौ रूप सम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥
वरील श्लोकात श्रीराम आणि लक्ष्मण दोघांचे वर्णन आहे. दोघेही तरुण, रूपसंपन्न, सुकुमार आणि त्याच बरोबर महान शक्तिमान आहेत. दिसायला जरी सुकुमार असले तरी ते महाबलौ आहेत हे लगेच स्पष्ट केले आहे. “पुण्डरीक” म्हणजे कमळ. कमळाप्रमाणे विशाल ज्यांचे नेत्र आहेत, आणि ज्यांनी “कृष्णाजिन” म्हणजे काळ्या मृगाचे “चीर” म्हणजे वल्कल नेसले आहे.
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥
फल आणि कंदमूल खाणारे, दान्तौ म्हणजे ज्यांच्याकडे संयम आहे; तपस्वी, ब्रह्मचारी, असे दशरथाचे पुत्र, राम लक्ष्मण हे दोन भाऊ,
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥
सर्व जीवांचे शरणस्थान , सर्व धनुर्धार्यांमध्ये श्रेष्ठ, ज्यांनी राक्षस कुलांचा संहार केला आहे, (रक्षःकुल म्हणजे राक्षसांचे कूळ, निहन्तारौ म्हणजे नष्ट करणारे), असे ते रघुकुलातील दोन उत्तम पुरुष, हे आमचे ‘त्रायेतां नौ’ म्हणजे रक्षण करोत.
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥20॥
हा रामरक्षेमधील सगळ्यात अवघड श्लोक. हा बऱ्याचदा चुकीचा म्हणला जातो. याचा संधिविग्रह जर समजून घेतला तर तो सोपा वाटेल.
आत्त = ताणलेले
सज्ज = सज्ज
धनुषौ = धनुष्य
‘आत्तसज्जधनुषौ’ = ताणलेल्या धनुष्याने सज्ज असलेले (ते दोघे)
इषुस्पृशौ =(इषु: म्हणजे बाण, इषुस्पृशौ =बाणांना स्पर्श करणारे )
अक्षय = कधीही न संपणारा
आशुग = गतिमान;
निषंग = बाण ;
संगिनौ = बाणांचा भाता घेऊन जात असलेले
रक्षणाय = रक्षणासाठी ;
मम = माझ्या ;
रामलक्ष्मणावग्रतः राम लक्ष्मण माझ्या पुढे
पथि = रस्त्याने ;
सदैव = नेहमी ;
गच्छताम् = चालोत. ;
भावार्थ:
हातात धनुष्य घेतलेले, पाठीवर अक्षय बाणांचा भाता असलेले, आणि ज्यांचे हात त्या बाणांवर, कुठल्याही क्षणी वापर करण्याच्या तयारीत आहेत, असे राम आणि लक्ष्मण हे माझ्या रक्षणार्थ माझ्या पुढे चालोत.
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥
सन्नद्ध म्हणजे शस्त्रास्त्रांनी पूर्ण सुसज्जित, तत्पर, उद्यत.
गच्छन् म्हणजे चालत असलेले, अस्माकं म्हणजे आमचे, पातु म्हणजे रक्षण करणारा,
कवच, खड्ग, धनुष्य, बाण यांनी सज्ज असलेले युवा राम आणि लक्ष्मण, आमच्या मनोरथानुसार आमचे रक्षण करण्यासाठी आमच्या पुढे चालोत.
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥22॥
लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे असा दाशरथी राम, शूर, बलवान, काकुत्स्थ वंशी, पूर्ण पुरुष, कौसल्येचा पुत्र आणि रघुकुलातील उत्तम पुरुष
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥
वेदान्तानी जाणण्यायोग्य (वेद्यो), यज्ञांचा स्वामी किंवा ईश , पुराण पुरुषोत्तम, जानकीचा पति, श्रीमान म्हणजे वैभवाने युक्त, अप्रमेय पराक्रम म्हणजे ज्याच्या पराक्रमाचे मोजमाप करता येऊ शकत नाही.
वरील श्लोकातील श्रीमानप्रमेयपराक्रम हा शब्द, श्रीमान आणि अप्रमेयपराक्रम हे दोन शब्द मिळून झाला आहे. त्यामुळे याचा उच्चार करतांना “श्रीमान प्रमेयपराक्रम” असा न करता
“न” वर जोर देऊन, श्रीमानप्रमेयपराक्रम असा करायला पाहिजे जेणे करून की श्रीमान आणि अप्रमेयपराक्रम हे दोन शब्द असल्याची जाणीव होईल.
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥
वरील संबोधन हे भगवान शिव करताहेत की वरीलप्रमाणे श्रीरामाची नांवे, जो माझा भक्त नित्य जपतो, त्याला अश्वमेध यज्ञ करून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही अधिक पुण्य मिळते यात काहीही संशय नाही.
माधव भोपे
क्रमशः
या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा