A glimpse of Vedic knowledge-3
A glimpse of Vedas या लेखमालेत आपण वेदांबद्दल काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या या अत्यंत समृद्ध आणि कालातीत ठेव्याविषयी पाश्चात्य लोक किती आस्थापूर्वक अभ्यास करतात हे पाहिल्यावर आपल्याला या गोष्टींची अगदी प्राथमिक माहिती तरी असली पाहिजे असा विचार आला.
पहिल्या लेखात आपण प्रस्थान त्रयी कशाला म्हणतात, श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेतली.
सनातन संस्कृतीचे आधारभूत असलेले वाङमय म्हणजे वेद होत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे ते चार वेद होत. संस्कृत मधील विद् या संज्ञेपासून वेद हा शब्द बनला आहे. विद् म्हणजे ‘जो जाणतो’ आणि वेद म्हणजे ‘जाणणे’.
चार वेदांत सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात मोठा ऋग्वेद आहे. मोठा म्हणजे किती मोठा? तर ऋग्वेदात साधारण १०४६२ मंत्र, किंवा ऋचा आहेत. ज्या रचना पद्यस्वरूपात किंवा छंदोबद्ध आहेत त्यांना ऋचा म्हटले जाते. ऋक् + वेद म्हणजे ऋग्वेद. यातील ऋक् म्हणजे प्रार्थनापर किंवा स्तुतिपर मंत्र. यजुस् म्हणजे यज्ञात वापरले जाणारे गद्य मंत्र. यजुर्वेद मुख्यतः यज्ञात वापरल्या जाणाऱ्या गद्य मंत्रांचा संग्रह आहे असे म्हटले तरी चालेल. यजुर्वेदात १९७५ मंत्र आहेत. सामवेदातही जवळपास तितकेच मंत्र आहेत. पण सामवेदात बहुतेक मंत्र ऋग्वेदातीलच जसेच्या तसे घेतले आहेत. सामवेदात ते मुख्यतः गेय (गायल्या जाणाऱ्या) स्वरूपात आले आहेत. आणि अथर्ववेदात जवळ जवळ ६००० मंत्र आहेत. अथर्ववेदात अनेक तांत्रिक बाबतीतले, तसेच तथाकथित ‘वाम’ मार्गातील मंत्र आहेत. याबद्दल आपण पुढे माहिती घेऊ. याला आपल्या सोयीसाठी पुढील टेबलमध्ये मांडता येईल.
क्र. | वेद | मंत्र संख्या | शैली | विवरण |
1 | ऋग्वेद | 10462 | मन्त्रपरक | सगळ्यात प्राचीन वेद |
2 | यजुर्वेद | 1975 | गद्यात्मक | कर्मकांडपरक, शुक्ल आणि कृष्ण भागात विभाजित |
3 | सामवेद | 1875 | गेयात्मक | संगीतमय, यातील बहुतेक मंत्र ऋग्वेदातीलच आहेत. |
4 | अथर्ववेद | 5987 | प्रौद्योगिकी, आरोग्य आणि तंत्रपरक | सगळ्यात नवीन वेद |
ऋग्वेदात काय आहे?
ऋग्वेदात निसर्गाची, निसर्गातील विविध घटकांची आणि त्यांच्या देवतांची स्तुति आणि अत्यंत काव्यमय वर्णनें आहेत. अग्नि, वायू, इन्द्र, वरुण, विश्वदेव, मरुत, प्रजापति, सूर्य, उषा, पूषा, रुद्र, सविता या देवतांची सूक्तें आहेत. सूक्त म्हणजे स्तुति करणारी, ‘सु’ उक्ति. ऋग्वेदातील पहिलाच मंत्र किंवा ऋचा खालीलप्रमाणे आहे:
ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम् ॥ १.१.१
पदच्छेद- ओ३म् अ॒ग्निम् । ई॒ळे॒ । पु॒रःऽहि॑तम् । य॒ज्ञस्य॑ । दे॒वम् । ऋ॒त्विज॑म् । होता॑रम् । र॒त्न॒ऽधात॑मम् ॥ १.१.१
ई॒ळे॒ म्हणजे स्तुति करणे. अग्नीचे मनुष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेदाच्या पहिल्याच ऋचेमध्ये अशा अग्नीची स्तुति आणि प्रार्थना केली आहे. यात पुरोहित म्हणजे यज्ञाचे नेतृत्व करणारा पुजारी, ऋत्विज यांचे चार प्रकार असतात- होतार , अध्वर्यु, उद्गाता, आणि ब्रह्मा. ऋत्विज म्हणजे योग्य वेळी आहुति देणारा. ‘होतार’ म्हणजे देवतांचे आवाहन करणारा, या सर्व शब्दांचे अर्थ आपण पुढील काही भागांत पाहणार आहोत. जी खूप रंजक माहिती आहे. मी सुरुवातीच्या लेखात उल्लेख केलेल्या रशियन विद्वानाच्या व्हिडिओमध्ये त्यांनीं याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.!
सर्व वेद हे साधारण चार भागांमध्ये विभागलेले असतात- १. संहिता, २. ब्राह्मण, ३. आरण्यक आणि ४. उपनिषद.
पूर्वी मनुष्याच्या जीवनाचे चार आश्रम किंवा अवस्था मानल्या जात- ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.
विद्यार्थी जेंव्हा गुरुकुलात वेद शिकायला जाई, तेंव्हा वेदातील चारही भाग तो शिके, पण त्यातील संहिता भाग जास्त करून त्याला ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई, ब्राह्मण भाग गृहस्थाश्रमात, आरण्यक भाग वानप्रस्थाश्रमात आणि उपनिषद संन्यासाश्रमात.
1) संहिता –
संहिता म्हणजे संग्रह. वेळोवेळी ऋषींनी रचलेले गद्य व पद्य मंत्र विषयवारीने एकत्र केले, त्याच संहिता होत. ऋग्वेद हा पद्यमंत्रांचा संग्रह आहे. हे पद्यमंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या मुख्यत: प्रार्थना किंवा स्तोत्रे होत. हा भाग मुख्यतः ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई
२.)‘ब्राह्मण’ या भागात विविध यज्ञ कसे करावयाचे, ह्याचे तपशीलवार विवरण दिलेले आहे. गृहस्थाश्रमात करणे अपेक्षित असलेल्या यज्ञातील प्रधान कर्म, अंगभूत कर्मे, कर्माची साधने, विविध नामे, यज्ञांचे अधिकारी व यज्ञांची विविध फले ह्यांत सांगितलेली असतात. यज्ञकर्मे रीतसर पार पाडण्याचा महिमा सूचित करणाऱ्या देव, ऋषी, असुर इत्यादिकांच्या कथा, योग्य पद्धतीने पार पाडलेल्या कर्माची व साधनांची वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची वर्णने, ह्यांत आलेली असतात.
3) आरण्यके –
अरण्यातच ज्या भागाचे व्रतस्थ राहून पठन करावयाचे तो भाग म्हणजे ‘आरण्यक’ होय. सर्व आरण्यके म्हणजे ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणे होत. यांत यज्ञधर्माच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञाचे तात्त्विक विवेचन आढळते. मनुष्याने गृहस्थाश्रम संपवून, वानप्रस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या भागांचा अर्थ त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत असावा.
4) उपनिषदे –
सामान्यतः जीव, ब्रह्म आणि जगत् यांचे संबंधात विवेचन करणारे तत्त्वज्ञानात्मक भाग उपनिषदे म्हणून ओळखली जातात. संन्यासाश्रमात हा भाग समजण्याएवढी प्रगल्भता मनुष्याला आलेली असे. पण म्हणून अर्थात उपनिषद इतर कुठल्या आश्रमात वाचू नये असे मुळीच नाही.
उपनिषदें ही साधारणतः वेदाच्या अंतिम भागात येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ म्हटले जाते. किंवा वेदांचा ‘निचोड’ म्हणता येईल, असा हा भाग असतो. गंमत म्हणजे, ज्या यज्ञ, याग यांविषयी आधीच्या भागात सविस्तर माहिती दिलेली असते, त्यांच्याही पलिकडे ‘परब्रह्म’ कसे आहे, याचे या भागांत वर्णन केलेले असते.
अनेक प्राचीन उपनिषदे ही वर्तमान आरण्यकांचे भाग असावेत. तसेच आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही, ‘उपनिषद’ ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली असते. उदा., ‘बृहदारण्यक’ (मोठे आरण्यक) हा शतपथ ब्राह्मण नामक ब्राह्मणग्रंथाचा भाग असून हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते.
ऋग्वेदात साधारणपणे खालील वर्णन आहे.
- देवी-देवता : ऋग्वेदात इंद्र, अग्नि , सूर्य, विष्णू, सोम आदी प्रमुख देवतांसह ३३ देवी-देवतांची स्तुती व वर्णन आहे. या देवता विविध नैसर्गिक शक्ती आणि घटनांशी संबंधित आहेत.
- निसर्ग : सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, वृक्ष, वनस्पति अशा निसर्गाच्या विविध पैलूंचे वर्णन यात केले आहे. या नैसर्गिक घटकांची देवता म्हणून पूजा केली जात असे.
- समाजजीवन : विविध वर्ग, व्यवसाय, चालीरीती व परंपरा यांचे वर्णन करून समकालीन समाजाची झलक यात दिसते.
- तत्त्वज्ञान आणि नीति : जीवन, मृत्यू, आत्मा, देवत्व, सत्य, न्याय आणि कर्म या विषयांवर सखोल विचार.
- स्तुति आणि प्रार्थना : ऋग्वेदात समृद्धि, आरोग्य, विजय आणि मोक्षाच्या इच्छांसह देवी-देवतांची विविध स्तुति आणि प्रार्थना आहेत.
- पौराणिक कथा : यात अनेक पौराणिक कथा आणि दैवी पात्रे देखील आहेत, जी देवी-देवता आणि नैसर्गिक शक्तींचे सामर्थ्य वर्णन करतात.
प्रसिद्ध ‘गायत्री मंत्र’, तसेंच ‘पुरुष सूक्त’ हे ऋग्वेदाचा भाग आहेत. हे आपणाला माहिती असावे.
पुढील भागात आपण काही अत्यंत रंजक माहिती पाहणार आहोत. नक्की वाचा.
माधव भोपे