A glimpse of Vedic knowledge-2
The story of Satyakam-Jabala
सत्यकाम जाबालाची गोष्ट
मागील लेखात आपण श्रुति, स्मृति याबद्दल थोडी माहिती घेतली. आणि प्रस्थानत्रयी म्हणजे काय हे पाहिले. आपल्याला चार वेदांबद्दल थोडी प्राथमिक माहिती घ्यायची आहे. पण त्याआधी आपण छान्दोग्योपनिषदा मधील एक रोचक कथा पाहणार आहोत. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धति होती. मुलगा ७-८ वर्षाचा झाला की, उपनयन संस्कार करून त्याला गुरूंच्या घरी विद्या शिकायला पाठवले जात असे. विद्या शिकवणारे आचार्य, किंवा गुरू, अरण्यात आश्रम करून रहात. असे आचार्य हे विद्वान, निःस्पृह आणि ब्रहमविद्या पारंगत असत. विद्यार्थ्यांचे हित, कल्याण हाच त्यांचा एकमेव उद्देश असे. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार त्यांचे असत. योग्य वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची पूर्ण जबाबदारी गुरूंची असे. म्हणूनच येणाऱ्या विद्यार्थ्याची निवड करण्याचा अधिकारही गुरूंचा असे. गुरुकुलात नित्य यज्ञ याग चालत असे. यज्ञाला समिधा लागतात. येणाऱे विद्यार्थी येतांना, हातामध्ये प्रतिकात्मक म्हणून थोड्या समिधा (वाळलेली लाकडे) घेऊन येत आणि गुरूंना अर्पण करीत.
सत्यकाम हा जाबाला नांवाच्या स्त्रीचा मुलगा होता. ती अनेक घरांत काम करीत असे. सत्यकाम जेंव्हा ७ वर्षांचा झाला, तेंव्हा त्याने, त्यावेळच्या प्रथेनुसार, इतर मुलांप्रमाणे, गुरूच्या घरी जाऊन विद्या शिकण्याची इच्छा आपल्या आईजवळ व्यक्त केली. गुरूंना आपल्या वडिलांचे नांव आणि गोत्र सांगणे आवश्यक असे, तसे सत्यकामने आपल्या आईला विचारले. त्याची आई विवाहित नव्हती, आणि अनेक घरांमध्ये काम करीत असतांना तिला सत्यकाम झाला होता. तिने तिच्या मुलाला सांगितले, “ बाळा, तुझ्या जन्माच्या आधी मी अनेक घरांमध्ये काम करत होते, अनेक स्वामींची सेवा करत होते. त्यामुळे, तुझे वडील कोण आहेत, हे मी नक्की सांगू शकत नाही. तू फक्त सत्यकाम आहेस- सत्यकाम- जाबाला. तुझ्या गुरुजींनी तुझे गोत्र किंवा वडिलांचे नांव विचारले तर जे खरे आहे ते सांग.
आईचा निरोप घेऊन सत्यकाम निघाला आणि गुरू गौतम यांच्या आश्रमात आला. आपल्याला त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळावा अशी त्याने विनंती केली. गुरूंनी त्याला त्याचे कुळ आणि गोत्र विचारले. सत्यकाम म्हणाला, “मी माझ्या आईला हा प्रश्न विचारला, तेंव्हा तिने सांगितले की माझे वडील कोण हे तिला नक्की माहिती नाही. माझे नांव सत्यकाम- जाबाला.” त्याचे हे उत्तर ऐकून आश्रमात बसलेले विद्यार्थी हसू लागले आणि त्याची टिंगल करू लागले. पण गुरू गौतम त्याला म्हणाले, “ बाळा, तू खरा ब्राह्मण आहेस- कारण की जो खरे बोलतो तो ब्राह्मण. मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. आजपासून तू आश्रमात रहा.” सत्यकाम ने सोबत आणलेल्या समिधा गुरूंना अर्पण केल्या आणि आश्रमात राहू लागला.
सत्यकामचे शिक्षण सुरू झाले. त्याला गुरूंनी आश्रमातील दैनंदिन कामें करायला सांगितले. नंतर एके दिवशी गौतमांनी त्याला बोलावले. आणि सांगितले, “आज मी तुझ्याजवळ ४०० गायी देत आहे. तू यांना जंगलात चरायला घेऊन जा, तिकडेच राहा, आणि जेंव्हा या ४०० गायींच्या १००० गायी होतील, तेंव्हा परत ये.” असे म्हणून त्यांनी आश्रमातील अगदी दुबळ्या झालेल्या ४०० गायी त्याच्या हवाली केल्या.
गुरूंच्या आज्ञेनुसार, सत्यकामने त्या ४०० गायी घेतल्या आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला. रोज तो त्या गायींना चरायला सोडत असे, त्यांच्यावर लक्ष ठेवत असे, आणि त्याचबरोबर जंगलाचे, निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे निरीक्षण करीत असे. त्याचबरोबर, तो नदीच्या काठी बसून, चिरंतन सत्य काय आहे याचा विचार करीत असे, चिंतन करीत असे. अशी वर्षांमागून वर्षें लोटली.
एके दिवशी एक पुष्ट दिसणारा बैल त्याच्याजवळ आला, आणि मनुष्यवाणीत म्हणाला, “मुला, आता आमची संख्या १००० झाली आहे. तू आता आम्हाला तुझ्या गुरूंकडे, आश्रमाकडे घेऊन चल.” तो बैल दुसरे तिसरे कोणी नसून वायूदेव होता. तो पुढे सत्यकामला म्हणाला, “ तू जी आमची सेवा केली आहेस, त्याने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू परब्रह्माचे- चिरंतन सत्याचे चिंतन करीत आहेस. मी तुला त्या ज्ञानाचा चौथा हिस्सा सांगतो- पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण- या सगळ्या दिशा या त्या ब्रह्माचा भाग आहेत. आता यापुढील ज्ञान तुला अग्नि देईल.”
सत्यकामने गुरूंच्या आश्रमाकडील आपला परतीचा प्रवास चालू ठेवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, जेंव्हा सगळ्या गायी चरून परत आल्या, तेंव्हा, सत्यकाम शेकोटी पेटवत होता आणि तीत इंधन टाकीत होता, त्यावेळी अग्निदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, “वायूने तुला चिरंतन सत्याचे काही ज्ञान दिले. मी आता त्याच्या पुढील चौथा हिस्सा तुला सांगतो. पृथ्वी, आकाश, वायू आणि समुद्र, हे सुद्धा त्या परब्रह्माचाच हिस्सा आहेत. आता यापुढील ज्ञान तुला हंस देईल.”
पुढील दिवशी संध्याकाळी, जेंव्हा सगळ्या गायी चरून परत आल्या, आणि जेंव्हा सत्यकाम शेकोटी पेटवत होता, तेंव्हा एक दिव्य हंस उडत त्याच्यापाशी आला. तो हंस म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेव होता. तो सत्यकामला म्हणाला, “सत्यकाम, मी तुला आता परब्रह्माच्या ज्ञानाचा पुढील चतुर्थ भाग सांगतो- अग्नि, सूर्य, चंद्र, आणि विद्द्युल्लता या सर्वांना ‘ज्योतिष्मान’ असे नांव आहे. हे ही सगळे, त्या परब्रह्माचे भाग आहेत. यापुढील भाग तुला पाणपक्षी म्हणजेच बदक सांगेल.”
त्यापुढील दिवशी, पुन्हा संध्याकाळी गायी चरवून आल्यावर जेंव्हा सत्यकाम शेकोटी पेटवत होता, तेंव्हा पाणपक्षी त्याच्या जवळ आला आणि म्हणू लागला, “ सत्यकाम, मी आता तुला परब्रह्माच्या ज्ञानाचा चौथा आणि शेवटचा भाग सांगतो, ऐक. प्राण, डोळे (दृष्टी), कान (श्रवणेंद्रिय) आणि मानस (मन) ही त्याच पूर्ण परब्रह्माचा हिस्सा आहेत. हे चराचर त्याच परब्रह्माचे प्रकटीकरण आहे.”
जेंव्हा सत्यकाम आपल्या गुरूच्या आश्रमात १००० गायींसह पोंचला, तेंव्हा त्याचा चेहरा ब्रह्मज्ञानाच्या तेजाने उजळला होता. त्याला पाहून त्याचे गुरू, गौतम अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, “माझ्या प्रिय शिष्या, तुझा चेहरा ब्रह्मज्ञानाच्या तेजाने उजळलेला दिसतो आहे.! तुला हे ज्ञान कोणी दिले?”
तेंव्हा सत्यकामने त्याच्या चार गुरूंबद्दल सांगितले आणि नम्रतेने म्हणाला, “गुरुजी, पण हे ज्ञान मला आपल्या मुखातून ऐकायचे आहे. त्याशिवाय त्याला पूर्णता येणार नाही.”
तेंव्हा गुरू गौतमांनी प्रसन्न होऊन त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ते म्हणाले, “ ब्रह्म सर्वत्र आणि सर्वव्यापी आहे. ब्रह्मच सर्व आहे. ते अनादि आहे आणि अनंत आहे. स्वतःला जाणल्यानेच ब्रह्म जाणले जाते. यालाच ब्रह्मविद्या म्हणतात.”
गुरूंकडून ज्ञान मिळून सत्यकाम धन्य झाला. पुढे चालून सत्यकामही एक उत्तम शिक्षक झाला.
आपण या लेखमालेची सुरुवात करतांना, पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतिकडे आकर्षित होतात, आणि नुसते तात्पुरते आकर्षित होत नाहीत, तर आपल्या संस्कृतिचा, वेदांचा, सखोल अभ्यास करतात, पण एक भारतीय म्हणून आपल्याला आपल्या गोष्टींबद्दल तितकी किंवा अगदी प्राथमिक माहितीही नसते अशी खंत व्यक्त करून झाली होती. वेदांचे ज्ञान हे फक्त काही उच्च वर्णीय लोकांपुरतेच मर्यादित ठेवले गेले होते, असे आपल्याला सांगितले गेले. पण छान्दोग्योपनिषदात आलेल्या या गोष्टीवरून असे दिसून येते, की जात किंवा कुळ याचा विचार न करता विद्यार्थ्याची योग्यता पाहून ज्ञान दिले जात असे. आणि योग्यता ठरविण्याचा अधिकार हा तितक्याच ज्ञानी, अधिकारी आणि निःस्वार्थ गुरूंकडे असे.
दुसरे असे, की शिक्षण देण्याची कोणती पद्धत अवलंबायची हे सुद्धा, कोणती पद्धत कोणाला सूट होईल हे ठरवून त्याप्रमाणे आचार्य highly individualized पद्धत वापरत.
आश्रमात वेदांचा अभ्यास करतांना घोकंपट्टी तर असेच, आणि ती आवश्यकही असे. पण त्याचबरोबर ‘प्रात्यक्षिक’ शिक्षणावर अधिक भर असे.
वरील गोष्टीमध्ये, अनेक वर्षे निसर्गाच्या सान्निध्यात राहून सत्यकामला जे ज्ञान मिळाले, ते कदाचित आश्रमात राहून मिळाले नसते. वरील गोष्टीतील- वायूदेव, अग्निदेव, सूर्यदेव यांनी येऊन सत्यकामला ज्ञान देण्याचे प्रसंग आपण जरी बाजूला ठेवले, तरी इतक्या दिवसांच्या निसर्गाच्या सान्निध्यानंतर आणि चिंतनानंतर सत्यकामला आतून ज्ञान ‘स्फुरले’ असे तर आपण मानूच शकतो. कारण ‘ज्ञान’ हे बाहेरून मिळवायचे नसते, तर ते आपल्या आतच असते हीच तर वेदांची शिकवण आहे. आजकाल आपण बाहेरून, पुस्तकांतून आणि गूगल मधून जे ‘ज्ञान’ मिळवितो, ते ‘ज्ञान’ नव्हे, तर ‘माहिती’ म्हणजेच information असते.
यापुढील लेखात आपण वेदातील काही संज्ञांची प्राथमिक ओळख करून घेणार आहोत.
आपल्याला हा विषय आवडला असेल, त्यात रस येत असेल, तर अवश्य कळवा, म्हणजे अजून पुढे लिहायला उत्साह येईल.
माधव भोपे
यापूर्वीचे लेख इथे वाचा





