https://goodworld.in A website by Madhav Bhope

Smooth Roads don’t make good drivers

smooth roads

Smooth roads don’t make good drivers.

Never raise your children in comfort and expect them to grow to be strong. Because smooth roads never make good drivers. A man has to undergo the hardships of life to learn the meaning and value of life.

 The founder of Dubai once said something in an interview that shook the entire room. 

Sheikh Rashid, the man who built Dubai from nothing but sand, was once asked a simple question: What do you see in the future of your country? 

He paused, and then he said something no one in that room ever forgot. 

He said, “My grandfather rode a camel. My father rode a camel. I drive a Mercedes. My son drives a Land Rover, and my grandson will drive a Land Rover too,
But my great-grandson- he will ride a camel again!

Now, the interviewer was confused. He asked why, and Sheikh Rashid looked at him and delivered one of the most powerful truths ever spoken. 

He said, 

“Hard times create strong men. 

Strong men create easy times. 

Easy times create weak men, 

and weak men create hard times! “

That is not a quote, this is a warning. 

Imagine this: 

You work day and night. You sacrifice everything. 

You build something from nothing, so your children never have to struggle the way you did.

And what happens? 

They grow up never knowing what hunger feels like. 

They never know what it means to be told “no”. 

They never know what it feels like to have nothing and still keep going. 

So they become soft, not because they are bad people, but because you removed the very thing that made you strong. 

You handed them comfort, and comfort, is the most dangerous inheritance you can leave behind

A wise father understands this. Perhaps he could give his son everything, but he will have one rule that will be never broken. 

You will earn your place under his roof. No one in this family is given what they did not build.

He would say, I am not raising a son who inherits wealth. I am raising a son who inherits strength, because wealth without strength disappears in one generation

You can see it everywhere. The mightiest empires in history, the Persians, the Egyptians, the Greeks, the Romans, the British, they did not fall because of enemies. They fell because they became comfortable. They weakened from the inside. Comfort killed them. 

So the next time you think the greatest gift you can give your children is an easy life, stop, because you are not protecting them. You are destroying the very thing that will keep them alive when you are gone.



The Festinger’s Lock क्रोधाचा सापळा

goodworld_festingers lock

Whatsapp वर फिरत फिरत अनेक मेसेजेस येतात. तसाच फिरत फिरत हा एक मेसेज आला. अशा मेसेजेसवर हळू हळू लेखकाचे नांव गायब होत असते. तसेच या मेसेजच्या ही लेखकाचे नांव दिलेले नाही..

पण कधी कधी असे मेसेजेस आपल्याला विचार करायला लावणारे असतात. त्यामुळे खालील मेसेज इथे शेअर करत आहे.

यात थोडा स्वतःचा मीठ मसाला म्हणून एक ए. आय. ने तयार केलेला व्हिडिओ ही टाकला आहे!!

Festinger’s lock

क्रोधाचा सापळा

तुमची स्वतःची ताकदच तुमचा काळ कशी ठरू शकते?

जंगलातला शक्तिशाली प्राणी म्हणजे अस्वल. त्याच्या एका पंजाच्या फटक्यात समोरच्याचा जीव घेण्याची ताकद असते.पण तुम्हाला माहितीये का? याच अस्वलाचा जीव एका साध्या, निर्जीव लाकडाच्या ओंडक्याने घेतला. ज्या लाकडात ना जीव होता, ना हालचाल करण्याची शक्ती, त्याने अस्वलाची कवटी फोडली.

कसं शक्य आहे हे? चला, आज एका अशा मानसिक सापळ्याबद्दल बोलूया जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात दररोज ‘अस्वल’ बनून आपल्याला छळत असतो
**

एका शिकाऱ्याने जंगलात एका झाडाखाली एक जड लाकडाचा ओंडा दोरीने टांगून ठेवला होता. तिथून एक काळं अस्वल जात होतं. चालताना ते लाकूड त्याला आडवं आलं. अस्वलाला राग आला. त्याने त्या लाकडाला हलकासा धक्का दिला.
दोरीला टांगलेलं ते लाकूड झोपाळ्यासारखं मागे गेलं आणि परत येताना अस्वलाच्या खांद्यावर आदळलं. आता मात्र अस्वलाचा पारा चढला. त्याने पूर्ण ताकदीने त्या लाकडावर वार केला.अस्वलाने जितक्या जोरात वार केला, तितक्याच उंचीवर ते लाकूड गेलं आणि दुप्पट वेगाने परत येऊन अस्वलाच्या तोंडावर आदळलं. वेदनेने अस्वल वेडं झालं.त्याला वाटलं समोरचा शत्रू खूप शक्तिशाली आहे. त्याने आपली संपूर्ण शक्ती एकवटली आणि त्या लाकडावर शेवटचा, सर्वात भयानक प्रहार केला.

आणि मग काय झालं? ते लाकूड सुसाट वेगाने परत आलं आणि थेट अस्वलाच्या डोक्यावर आदळलं. एका फटक्यात अस्वलाची कवटी फुटली.ते जागीच मेलं. मरतानाही त्या अस्वलाला हे समजलं नाही की, त्याला मारणारा कोणताही शत्रू नव्हता. ते फक्त एक लाकूड होतं, ज्याला अस्वलाने स्वतःच ताकद देऊन आपल्यासाठी जीवघेणं बनवलं होतं
**


मानसशास्त्रात यालाच ‘फिस्टिंजर्स लॉक’ (Festinger’s Lock) असं म्हणतात.नुकत्याच समोर आलेल्या काही अहवालांनुसार, फिस्टिंजर्सचे जुने शोधनिबंध पुन्हा उघडले गेले असून मानवी स्वभाव आणि प्रतिक्रिया यावर नव्याने संशोधन होत आहे.
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या १० टक्के गोष्टी आपल्या हातात नसतात, पण उरलेल्या ९० टक्के गोष्टी आपण त्या १० टक्क्यांना कशी ‘प्रतिक्रिया’ (Reaction) देतो, यावर अवलंबून असतात.
**

रस्त्यावर गाडी चालवताना कुणीतरी कट मारला (१० टक्के घटना), तर आपण त्याला शिवी देतो किंवा त्याच्या मागे गाडी धावतो (९० टक्के प्रतिक्रिया).ऑफिसमध्ये बॉसने काहीतरी बोललं, की आपण दिवसभर चिडून राहतो आणि घरच्यांवर राग काढतो. आपण अस्वलासारखे त्या परिस्थितीला जितक्या जोरात मारतो, तितक्याच जोरात ती परिस्थिती आपल्याला प्रतिप्रहार करते.
**

आपण अनेकदा अशा वादात अडकतो जिथे समोरची व्यक्ती शांत असते, पण आपला अहंकार आणि राग आपल्याला त्या निर्जीव लाकडासारख्या परिस्थितीवर तुटून पडायला लावतो. आपण जितकी ताकद लावतो, तितकाच तो वाद मोठा होत जातो आणि शेवटी आपलंच नुकसान होतं.
मंडळी, विचार करा, तुमच्या आयुष्यात असं कोणतं ‘लाकूड’ आहे ज्याला तुम्ही स्वतःच ताकद देऊन स्वतःसाठी धोकादायक बनवत आहात?
**
एखाद्या गोष्टीवर ताकदीने तुटून पडण्यापेक्षा, कधीकधी फक्त बाजूला होणं जास्त शहाणपणाचं असतं. कारण प्रत्येक वेळी समोरचा शत्रू नसतो, कधीकधी आपली प्रतिक्रियाच आपला सर्वात मोठा शत्रू असते.
तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का, जिथे शांत राहिल्यामुळे मोठा अनर्थ टळला? की तुम्हीही त्या अस्वलासारखा प्रहार करत बसलात?

Windfall gains!-जब भगवान देता है, तो छप्पर फाड़कर देता है

chhappar fadke

एका वेळची गोष्ट आहे.

एकदा अकबर बादशहा जंगलात शिकारीला गेला. बरोबर पुष्कळ लोक होते. पण दैवयोगाने, अकबर जंगलात कुठे तरी भटकला आणि त्याच्या सोबतचे लोक खूप लांब राहिले. akbar

अकबर  बराच पुढे गेल्यावर त्याला एक शेत दिसले. एंव्हाना त्याला खूप भूक आणि तहान लागली होती आणि तो दमला होता. अकबर त्या शेतात पोंचला, आणि त्या शेताचा मालक जो एक अत्यंत गरीब शेतकरी होता, त्याला म्हणाला, “बाबा रे, मी तहानेने आणि भुकेने अगदी व्याकुळ झालो आहे. काही खायला मिळाले, आणि प्यायला थंडगार पाणी मिळाले तर खूप उपकार होतील.” अकबराने त्याला आपण बादशहा आहोत असे काही संगितले नाही. फक्त म्हणाला, “मी राज्याचा माणूस आहे.” garib kisan aur patni

 

शेतकरी जरी अगदी गरीब होता, पण माणुसकी त्याची जिवंत होती. तो म्हणाला, “ ठीक आहे. आमच्यासाठी तर तुम्ही आमचे मालकच आहात. काही काळजी करू नका.” असे म्हणून शेतकर्‍याने राजाला थंड पाणी दिले, शेतात असलेल्या ऊसाचा थंडगार रस दिला, आणि आपल्याजवळच्या गाठोड्यातील भाकरीही दिली. नंतर त्याने झाडाखाली खाटेवर चादर अंथरुन राजाला थोडा आराम करायची विनंती केली. राजा अगदी खुष झाला. त्याला शेतकर्‍याने दिलेल्या वस्तू अमृतासमान वाटल्या.

 

बादशहा जेंव्हा जायला निघाला, तेंव्हा शेतकर्‍याला म्हणाला, “तुला जर काही काम पडले तर दिल्लीला जरूर ये, आणि मला भेट. माझे नांव अकबर आहे. दिल्लीला आल्यावर कोणालाही विचार.”

“नाही तर थांब, तुझ्याजवळ कागद आणि कलम असेल तर आण. मी तुला लिहून देतो.”

आता शेतात कुठला कागद आणि कुठली कलम! तो शेतकरी बिचारा अनपढ होता. त्याच्या शेतात एक फुटलेला मातीचा घडा होता. तो त्याने बादशहासमोर ठेवला, आणि कुठून तरी एक पांढरा चुनखडीचा तुकडा घेऊन आला, आणि बादशहासमोर ठेवला. बादशहाने त्या घड्याच्या तुकड्यावर आपले नाव लिहिले आणि सही केली. “मला भेतायला येशील तेंव्हा हे घेऊन ये” म्हणून संगितले. शेतकरी हो म्हणाला, आणि तो लिहिलेला तुकडा आपल्या झोपडीत ठेवून दिला.

तो तुकडा तिथे बरेच वर्ष पडून राहिला. मग एके वर्षी खूप दुष्काळ पडला, शेती अजिबात पिकली नाही, गुरढोरांना प्यायला पाणीही मिळेना. त्यावेळी त्या शेतकर्‍याच्या बायकोला ही घटना आठवली, आणि ती शेतकर्‍याला म्हणली, “तो दिल्लीचा कोणी माणूस आला होता ना? त्याच्याकडे एकदा जाऊन तरी पहा. काही मदत मिळते का ते?”

पत्नीने वारंवार म्हटल्यावर शेतकरी तो घड्याचा तुकडा घेऊन दिल्लीला पोंचला.

दिल्लीला गेल्यावर रस्त्याने त्याने लोकांना विचारले, “अकबरीये का घर कौन-सा है?” बादशहा अकबराचे नांव ऐकून, काही लोकांनी त्याला राजवाड्याचा रस्ता दाखविला. तिथे गेल्यावर तो शेतकरी म्हणतो,

“अकबरीये का घर यही है कया?”

द्वारपालांनी रागावून म्हटले, “कोण आहेस तू? बोलायची काही अक्कल आहे का नाही?”

तो शेतकरी तर आपल्या गावरान भाषेत बोलला होता. त्याने आपल्या जवळील तो घड्याचा तुकडा दाखविला, आणि संगितले, “जाऊन त्याला सांगा, एक जण तुला भेटायला आला आहे.”

बादशहाची सही बघून द्वारपाल चक्रावून गेला. त्याने बादशहाला जाऊन संगितले, “महाराज, एक ग्रामीण आपणास भेटायला आला आहे. बोलण्याची अजिबात अक्कल नाही. पण त्याने हा घड्याचा तुकडा दिला आहे.”

तो तुकडा पाहिल्यावर अकबराला तो सर्व प्रसंग आठवला,आणि तो म्हणाला, “जा, घेऊन या त्याला.”

खेडूत आत आला. बादशहाला उंच सिंहासनावर बसलेला पाहून तो म्हणाला, “ओ अकबरीये! तू तो बहुत ऊंचा बैठा है!”

बादशहा त्याला म्हणाला, “आओ भाई! बैठो!”

असे म्हणून बादशहाने  त्याला बसवले, आणि म्हणाला, “तू थोडा वेळ बैस. माझ्या नमाजचा समय झाला आहे. मी नमाज पढून घेतो.”

 

आता शेतकरी पाहतो तो बादशहाने एक कापड अंथरले, त्यावर बसतो आहे, उठतो आहे, अजून काय काय करतो आहे. अकबराचे नमाज पढून झाल्यावर शेतकऱ्याने  विचारले, “हे तू काय करीत होतास?”

बादशहा म्हणाला, “परवरदिगार परमेश्वराची बंदगी करत होतो.”

शेतकरी म्हणाला, “मला समजले नाही”

त्यावर बादशहा म्हणाला, “तो ईश्वर आहे ना? सर्वशक्तिमान? त्याची हाजरी भरत होतो.”

“किती वेळा करतो?”

“दिवसातून पाच वेळा”

“पाच वेळा, उठतो, बसतो, हे सर्व करतो?   का?”

“ज्याने हे सर्व वैभव दिले आहे, त्याची हाजरी भरतो.”

शेतकरी म्हणाला, “ मी तर एकदाही हाजरी भरत नाही, तरीही त्याने मला सर्व काही दिले आहे आणि देतो आहे. तुला पाच वेळा हाजरी भरावी लागते?  अच्छा, जय  रामजी की! मी चाललो.”

तेंव्हा बादशहाने विचारले, “का आला होतास?”

“माझ्या पत्नीने सांगितले, की दिल्लीला जाऊन भेटून ये, इथे आल्यावर दिसले, तुला स्वतःला पाच वेळा नमाज पढावा लागतो. जेंव्हा तुलाच तो परमात्मा देतो, तर मी तुझ्याजवळ काय मागू?”

“अरे बाबा, तुला पाहिजे असेल ते माग!”

“नाही, तुला एवढ्या मुश्किलीने जे मिळते, ते मी मोफतमध्ये कसे घेऊ?”

असे म्हणून शेतकरी तिथून तडक निघाला, आणि घरी आला.

 

घरी आल्यावर बायकोने विचारले, “काय झाले? त्या दिल्लीच्या माणसाने काही मदत केली का?”

शेतकरी म्हणाला, “आपल्या देवाची आठवण करूयात, तोच सगळ्यांना सगळे देतो. आता त्या राज्याच्या माणसाला काय  मागायचे, जो की स्वतःच मागून खातो? म्हणून देवावर भरवसा ठेवूयात, त्याचे नांव घेऊयात, बस्स!”

इकडे काही चोर चोरी करायला निघाले होते. ते चोर त्या शेतकऱ्याच्या घराबाहेर लपून हे सर्व संभाषण ऐकत होते.

बायको म्हणत होती, “दिल्लीला गेले आणि काही आणले नाही.” शेतकरी तिला समजावत होता. त्यावर ती वैतागून म्हणत होती, काही कमवून तरी आणायचे. त्यावर शेतकरी म्हणाला, “आता तर तो सर्व शक्तिमान भगवान देईल  तेंव्हाच घेऊ. मी तर सर्व त्याच्यावर सोडले आहे.”

“अहो देवावर सोडले आहे ते ठीक आहे, पण काही कामधंदा तर करा!”

“कामधंदा न करता ही धन मिळते, पण मी ते घेत नाही. आता तर ठाकूरजीची मर्जी असेल तर ते घरबसल्या देतील. काही चिंता करू नकोस, पाऊस येईल, शेती पिकेल, सर्व काही ठीक होईल. मी आता देवावर पूर्ण भरोसा ठेवला आहे. देवाचे देण्याचे खूप मार्ग आहेत. आणि त्याने मनात आणले तर तो छप्पर फाडून ही देतो!”

“ऐक. आजचीच गोष्ट तुला सांगतो. मी नदीवर गेलो होतो. नदीला पूर आला होता. किनारा दिसत नव्हता. मी तिथे हात धुवायला गेलो, तेंव्हा तिथे मला एक भांडे दिसले. ते आधी वाळूत गाडलेले असावे, पण पावसामुळे उघडे पडले असावे. मी जवळ जाऊन पाहिले तर एक झाकण लावलेला एक गडू होता. मी झाकण उघडून पाहिले, तर आत खूप सोने, नाणे भरलेले दिसले. पण मी विचार केला, की हे आपले नाही, आपल्याला नको. परमेश्वर स्वतः देईल तेंव्हा घेऊ!. मी त्याचे झाकण लाऊन ठेवले आणि वापस आलो.

बायकोने त्याला विचारले, “कुठे? कोणत्या जागी?”

तर शेतकऱ्याने तिला सांगितले, अशा अशा एका जागी, एक असे असे झाड आहे, त्याच्या बाजूला.

 

इकडे चोर त्यांचे हे सर्व बोलणे ऐकत होते. चोरांनी विचार केला, “हा शेतकरी तर पागल आहे! असे सहजासहजी मिळालेले धन कोणी सोडते का? आपण तर तिकडेच जाऊ! इतर कुठे चोरी करायला गेलो तर पकडले जाण्याची भीती! त्यापेक्षा हा फुकटचा माल घेऊ!”

 

असा विचार करून चोर त्या ठिकाणी गेले. पत्ता त्यांनी ऐकला होताच. आता त्या शेतकऱ्याकडून त्या गडूचे झाकण लावतांना चूक झाली होती, आणि झाकण काही पक्के लागले नव्हते. थोडेसे उघडे राहिले होते. त्या उघड्या राहिलेल्या जागेतून एक साप त्याच्या आत जाऊन बसला होता. चोरांनी ते झाकण उघडताच, सापाने  जोरात फूत्कार मारला. तेंव्हा घाबरून चोरांनी झाकण जोरात बंद करून टाकले.

चोरांनी आता असा विचार केला, की नक्कीच त्या शेतकऱ्याने आपल्याला पाहिले असेल, आणि आपल्याला मारण्यासाठीच त्याने ही खोटी कहाणी बनवून आपल्या बायकोला सांगितली असेल. या गडूच्या आत न जाणो  कितीतरी विषारी साप आणि विंचू भरलेले असतील.  आता एक काम करू. त्या शेतकऱ्याला अद्दल घडवण्यासाठी हा गडू त्याच्याच घरात जाऊन उपडा करून देऊ, म्हणजे ते सर्व साप विंचू त्यालाच चावतील!

असा विचार करून, त्या गडूच्या तोंडाला एक फडके बांधून, ते शेतकऱ्याच्या घराकडे गेले. शेतकरी आणि त्याची बायको झोपले होते. चोरांनी घराचे छप्पर फाडून, त्यातून तो गडू उपडा केला आणि पळून गेले. इकडे तो गडू पडल्यानंतर पहिल्यांदा तो साप खाली पडला, आणि त्याच्यावर ते सर्व दागिने, मोहरा, वगैरे आणि नंतर तो जड असलेला गडू त्या सापावर जोरात पडला आणि साप त्याखाली दाबून मरून गेला.

त्या सर्व आवाजाने शेतकरी नवरा बायको जागे होऊन पाहतात, तर साप मरून पडलेला, आणि सर्व घरात सोने नाणे आणि दागिने विखुरलेले!

भगवान देता है तो छप्पर फाडके! ही म्हण खऱ्या अर्थाने सार्थ झाली.!

 

वरील गोष्ट अर्थात, काल्पनिक आहे, आणि देवावर श्रद्धा ठेवली तर देव कश्याही प्रकारे पालन पोषण करतोच, हे दाखवण्यासाठी फक्त तेवढे उदाहरण दिले आहे. यात, अकर्मण्यतेची भलावण करण्याचा, गोष्ट सांगणाऱ्याचा अजिबात हेतू नाही. त्यामुळे गोष्टीतील उदाहरण फक्त तेवढ्यापुरतेच आहे हे लक्षात घ्यावे. वरील गोष्ट ही स्वामी रामसुखदासजी यांनी, आपल्या प्रवचनात, एक उदाहरण म्हणून सांगितली आहे.

 

 

 

 

प्रयत्नांती परमेश्वर Unforgettable experiences as a branch manager.

goodworld_recovery camp

ही पोस्ट वाचण्यासाठी कमीत कमी १० मिनिटांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे आपणांस विनंती की तेवढा वेळ काढून ही पोस्ट नक्की वाचावी. 

Unforgettable experiences as a branch manager.

राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी म्हणजे नुसतेच उपजीविकेचे साधन नाही, तर निरनिराळ्या प्रसंगांमधून अनुभवाची मिळणारी मोठीच शिदोरी आहे.  बँकेतील नोकरीमुळे करतांना  आपल्या स्वभावाचे अनेक टोचणारे कंगोरे घासून घासून गुळगुळीत केले जातात आणि आपल्याला अनेक स्किल्स (कौशल्ये) शिकण्यास भाग पडून आपले व्यक्तिमत्व अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होते .  अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढावा लागतो.  पण या कठीण प्रसंगांतून यशस्वीरित्या मार्ग काढल्यानंतर मिळणारे समाधान काही वेगळेच असते..

अशाच प्रकारचा एक अनुभव आज इथे कथन करायचा आहे.

ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर, माझा प्रवास अनेक शाखांमधून झाला. त्यात अगदी खेड्याच्या शाखेपासून ते इतर राज्यातील मोठ्या शहरातील मोठ्या शाखांपर्यंत हा प्रवास चालू होता. अशात सन 2002 च्या सुरुवातीला  माझी पोस्टिंग एका मोठ्या कृषि विकास शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून झाली. त्या शाखेचा पसारा खूप मोठा होता. ७२ गांवें आणि १०००० च्या वर कर्ज खाती तिथे होती . मी तिथे मध्ये रुजू झाल्यानंतर मार्चचा वार्षिक ताळेबंद तोंडावर होता , शिवाय नुकतेच ऑडिट (अंतर्गत लेखापरिक्षण) झाले होते आणि त्यात १००० खात्यांचे रीफेसमेंट (पुनर्गठन ) करून ऑडिट चे उत्तर द्यायचे होते, आणि तेंव्हाच बँकेत संगणकीकरण सुरू करण्याचे ठरले होते त्यासाठी बँक-मास्टर ही प्रणाली लागू करायची होती. शिवाय त्या गावात वातावरण अतिशय स्फोटक असल्यामुळे रोज एक नवीन प्रकरण उपस्थित व्हायचे आणि त्याचा निपटारा करावा लागायचा. तेथे आलेला सर्वात मोठा अनुभव म्हणजे शेतकरी संघटनेचे आंदोलन हाताळण्याचा.

परभणी, सेलू, मानवत, पाथरी, माजलगाव हा भाग म्हणजे संघटनेचा बालेकिल्ला समजला जायचा. मी तिथे रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात, बँकेच्या सेलू येथील क्षेत्र अधिकाऱ्याला  लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. आम्ही सर्व तिथे जाऊन त्या आमच्या सहकाऱ्याला आमच्या पाठिंब्याची ग्वाही दिली होती आणि धीर दिला होता. उपरोक्त प्रसंगामुळे, आपल्याकडे असा काही प्रकार होऊ नये म्हणून मी अधिकच सावध झालो होतो. संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते एका विशिष्ट विचारसरणीने भरलेले होते, आणि त्या विचारसरणीच्या समर्थनार्थ काहीही करण्याची मानसिकता तयार झाली होती.

मी तिथे  आल्यानंतर दोन महिन्यात, पूर्ण ब्रांच च्या सर्व खात्यांचे गावनिहाय वर्गीकरण करून घेतले होते, त्यामुळे प्रत्येक गावातील परतफेडीच्या रेकॉर्डची कल्पना आली होती. मानवत तालुक्यातील एक  गांव  हे संघटनेचा बालेकिल्ला समजला जात होते. संघटनेचे ब्रीदवाक्य होते, “ सरकारी कर भरणार नाही, बँकेचे कर्ज परतफेड करणार नाही…. आम्ही तुमचे देणे लागत नाही. उलट शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे तुम्हीच आमचे देणे लागतात.” बऱ्याच वेळेला, त्यांचे कार्यकर्ते, बसमधून तिकीट न काढता प्रवास करीत आणि कंडक्टर ने तिकीट काढावयास सांगितल्यास त्याच्याशी वरील मुद्द्यावरून वाद घालत आणि प्रसंगी मारहाण ही करत.

वरील हे गांव आमच्या शाखेकडेच होते, आणि साहजिकच, तेथील थकबाकी इतर गावांपेक्षा कितीतरी जास्त होती. त्या गावी  मी आमच्या फील्ड ऑफिसर सोबत एकदा जीप ने गेलो, तेंव्हा गावाच्या वेशी जवळील एका भिंतीवर, मोठ्या अक्षरात , “सरकारी अधिकारी आणि बँकेच्या वसूली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंद” असे लिहून ठेवले होते. मी, सरकारी स्कीम मधील  नवीन कर्ज प्रकरणाच्या चौकशीच्या निमित्ताने गेलो असल्यामुळे, संबंधित अर्जदार माझ्यासोबत होता, त्यामुळे गावात जाण्यास काही त्रास झाला नाही. पण इतर गावांना वापरीत असलेली वसुलीसाठीची कार्यपद्धती इथे लागू पडणार नाही याची मला जाणीव होत होती आणि मी मनोमन काही तरी ठरवत होतो.

मी त्या गावातील  खातेदारांची, विशेषकरून थकबाकीदारांची माहिती पुनः पुन्हा बघत होतो, आणि त्यातल्या मोठ्या मोठ्या थकबाकीदारांची नांवे मला त्यांच्या थकबाकी च्या रकमेसहित मुखोद्गत झाल्यासारखी झाली होती.

अशात एके दिवशी त्या गावातील संघटनेचे सर्वात प्रभावशाली पुढारी, त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत माझ्याकडे आले. धोतर, नेहरू शर्ट, टोपी, भरपूर उंची आणि पिळदार मिशा असलेले प्रभावी व्यक्तिमत्व होते ते. त्यांच्या छातीवर संघटनेचा तो सुप्रसिद्ध बिल्ला डौलाने मिरवत होता. सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांच्याही शर्टावर अर्थातच तो बिल्ला झळकत होता. मी जरी आजवर त्यांना पहिले नव्हते, तरी गावातील प्रत्येक थकबाकीदाराच्या नावासहित फोटो ही माझ्या डोक्यात पक्के ठसले होते, त्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर त्यांचे नाव आणि त्यांचा थकबाकीचा आकडा माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी माझ्या कॉम्पुटर वर बघून खात्री करून घेतली. परंतु मी त्यांचे हसून स्वागत केले आणि “या” म्हणून आदराने त्यांना बसावयास खुर्ची ऑफर केली. त्यांच्याबरोबरचे कार्यकर्तेही आजूबाजूच्या खुर्च्यांवर बसले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी माझे हातातील सर्व काम बाजूला ठेवून “कसे काय येणे केलेत?” असे आस्थेने विचारले. त्याच बरोबर चहाची ऑर्डर दिली. त्यांनी त्यांच्या संघटनेबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करीत आहे, आणि बँका सरकारच्या हस्तक असल्यामुळे कशा त्यांच्या पिळवणुकीत सहभागी आहेत, हे सांगायला सुरुवात केली. शेतीचे अर्थशास्त्र सांगायला सुरुवात केली. मी त्यांचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले, आणि त्यांच्या बहुतेक सर्व मुद्दयांना संमती दर्शविली. जवळ जवळ अर्धा तास ही चर्चा चालू होती.पूर्ण संभाषणाच्या दरम्यान मी एकदाही त्यांच्या थकबाकी बद्दल एक अक्षर ही उच्चारले नाही. तेही बहुतेक माझा अंदाज घ्यायला आले होते. खेड्यात सहसा अशी पद्धत असते, की तेथील पुढारी, नवीन कोणीही सरकारी अधिकारी किंवा बँक मॅनेजर आल्यानंतर त्याची चाचपणी करण्यासाठी एक अशी चक्कर हमखास करतात. मी त्यांचे केलेले स्वागत कदाचित त्यांना अनपेक्षित असावे. आणि ते, आपणास विरोध होईल आणि मग आपण मॅनेजरला आपला इंगा दाखवू, अशा तयारीने आले परंतु, वजनदार बदली उचलायला जावे आणि ती बदली रिकामी निघावी, तसे काहीसे झाल्यासारखे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी निघता निघता, काही तरी आठवल्यासारखे करून त्यांनी, सांगितले, “साहेब, तुमच्या बँकेकडे आय आर डी पी स्कीम खाली अमुक अमुक माणसाची एक फाईल आली आहे. चांगला माणूस आहे. तुमच्या नियमात बसतं का बघा.” मी लगेच ती फाईल काढून पाहिली. आणि ती नियमात बसत असल्यास नक्की विचार करीन असे आश्वासन दिले. वास्तविक त्यांच्या येण्याचा मुख्य उद्देश तोच होता हे मला जाणवले. परंतु मी त्यांना तसे जाणवू न देता त्यांना विचार करीन असे आश्वासन दिले. आमच्या पहिल्या भेटीने अत्यंत समाधानी होऊन त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा निरोप घेतला. ते गेल्यानंतर आमच्या फील्ड ऑफिसरने येऊन त्यांच्या पूर्ण थकबाकीची मला माहिती दिली. अर्थात ती  मला माहिती होतीच.

त्यांनी सांगितलेली फाईल योग्य वाटत होती आणि नियमात बसत होती. केवळ त्यांनी सांगितले म्हणून फाईल नाकारणे ही योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही ३-४ दिवसातच ती फाईल मंजूर केली आणि ८-१० दिवसात त्याचे पहिल्या हप्त्याचे वाटपही केले.

त्यांनी सांगितलेली फाईल मंजूर केल्यामुळे त्यांना चांगले वाटले होते, आणि हा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो आहे अशी खात्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या बँकेत बऱ्याच चकरा झाल्या. प्रत्येक वेळी आल्यानंतर ते बराच वेळ बसत आणि भडा भडा बोलत. मला त्यांच्या बोलण्यातून बरीच नवीन माहिती मिळत होती. या कुठल्याही भेटीत मी त्यांच्या खात्याबद्दल किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या खात्याबद्दल  एक अवाक्षरही काढले नाही. मात्र मी त्यांच्या बोलण्यातून मधून मधून सवड काढून त्यांना बँकेच्या विविध स्कीम्स बद्दल बोलत होतो.

अशाच एके दिवशी ते आणि त्यांचे एक त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेले एक कार्यकर्ते असे दोघेजण आले. ते कार्यकर्ते थोडे परेशान दिसत होते. बोलता बोलता मी त्या दुसऱ्या व्यक्तीची शेती कशी काय चालली आहे, त्याची चौकशी केली. त्यांनी सांगितले, काय करावे साहेब, उसाला पाणी कमी पडते आहे. जवळ असलेले सर्व पैसे बेण्यात आणि खतात घातले आहेत. आता विहीर खोल केली आणि ठिबक केले तरच ऊस वाचेल अशी परिस्थिती आहे. पण आता सावकारही कर्जाऊ देत नाही कारण त्याच्याकडून आधीच कर्ज घेतले आहे. आमच्या संघटनेच्या तत्त्वाप्रमाणे, बँकेचे कर्ज फेडायचे नाही आणि घ्यायचेही नाही. तसेही, आम्हाला कर्ज देणे तर तुमच्या नियमात बसणार नाही कारण पहिले खाते थकबाकीत आहे. त्यांच्या मनातील व्यथा बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, “ खरं आहे तुम्ही म्हणता ते. हे जग पैशावर चालतं. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ते खरच आहे. आणि पाटील हे बघा, मी तुमच्या संघटनेच्या विचारसरणीचा आदर करतो. पण शेवटी प्रत्येकाला आपली वैयक्तिक प्रगती करायची असेल, आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण द्यायचे असेल तर पैशांची गरज आहेच. तुमचे खाते थकबाकीत असल्याने बँकेला किंवा वैयक्तिक मला, विशेष काही फरक पडत नाही. (अर्थात हे विधान मी मोठे धाडसाने केले होते, आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी केले होते), पण तुमच्या जीवनावर मात्र फार मोठा फरक पडतो. मी तुमची खाती काढून बघतो, आणि आपण बघूयात काय करता येते ते.” त्यानंतर मी त्यांचे खाते काढून पाहिले. थकबाकी किती आहे ते पाहिले. योगायोगाने त्यांचे पीक कर्ज थकबाकीत असले तरी बाकी खूप जास्त नव्हती. त्यांची जमीन  बरीच होती. मी त्यांना सुचवले, “ तुम्ही जर ही थोडीशी रक्कम भरू शकला तर बघा, तुम्हाला तुमच्या होल्डिंग प्रमाणे पीक कर्ज लगेच मंजूर होऊ शकेल आणि ते दुसऱ्याच दिवशी मिळेल याची मी खात्री देतो. तसेच तुमचे पीक कर्ज नियमित असल्यानंतर, तुम्हाला विहीर दुरुस्तीसाठी आणि ठिबक साठी ही कर्ज मिळू शकते. ठिबक ही तर आज काळाची गरज आहे.” हे ऐकून त्यांचा चेहरा खुलला पण ते म्हणाले, “ साहेब, मी कसेही करून पैशाची व्यवस्था करतो, पण एक विनंती आहे. कृपया मी माझी थकबाकी भरली याची कुठेही वाच्यता करू नका. कारण आम्ही संघटनेची नेते मंडळी आहोत. आम्हीच संघटनेच्या विचाराविरूद्ध वागलो असे इतरांना कळले तर ते ठीक होणार नाही.” मी त्यांना आश्वासन दिले, “ काही काळजी करू नका, आमच्या कडून कुठल्याच खातेदाराची माहिती इतरांना दिली जात नाही”. अशा प्रकारे संघटनेच्या पहिल्या व्यक्तीचे खाते नियमित झाले. आम्ही, आश्वासन दिल्याप्रमाणे, अत्यंत त्वरेने त्याचे कर्ज मंजूर केले, आणि थोड्याच दिवसात, त्याचे विहिरीचे काम सुरु झाले, आणि ठिबक संच ही शेतात येऊन पडला! आम्ही त्याचे काम पाहायला गेलो तेंव्हा त्याच्या शेतातील ऊस हिरवागार होता, आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. आम्हालाही साहजिकच, एक नेक काम आपल्या हातून झाल्याचा आनंद झाला.

त्यानंतर, काही दिवसांनी, ते पुढारी अजून एका व्यक्तीला आमच्याकडे घेऊन आले आणि, “ साहेब, याचा हिशोब बघा बरं” म्हणून म्हणाले. त्याचा हिशोब बघितल्यानंतर, त्याच्याकडे असलेले  पैसे थकबाकी भरायला कमी पडत होते. मी त्याला घरात कुणाच्या नावाने शेती आहे का ते विचारले. त्याच्या पत्नीच्या नावावर शेती होती आणि कर्ज घेतले नव्हते. तेंव्हा मी त्याच्या पत्नीच्या नावाने कर्ज मंजूर करण्याची तयारी दाखविली, आणि अजून एक खाते बेबाक झाले. त्याने ही तीच विनंती केली, “साहेब, मी थकबाकी भरली म्हणून कोणाला सांगू नका!”

अशा प्रकारे ८-१० खाती बेबाक झाली; लोकांच्या विहिरी होऊ लागल्या, पाईप लाईन लागू लागल्या ठिबक संच बसू लागले, आणि हळू हळू गावात बातमी पसरली. बँक, थकबाकी भरणा ऱ्यांना सढळ हाताने मदत करत आहे. एके दिवशी, ते मुख्य पुढारी जे होते, ते माझ्याकडे आले, आणि मला म्हणाले, “साहेब, आपला किती हिशोब होतो ते पहा बरं!” माझ्या प्रयत्नांना यश येतांना पाहून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना त्यांचा पूर्ण हिशोब सांगितला. त्यांची अजून एक आवश्यकता होती. त्यांना मानवत मध्ये घर बांधायचे होते. प्लॉट घेतलेला होता. पण घर बांधायसाठी पैसे नव्हते. त्यांची थकबाकी भरल्यानंतर, कुठेही नियमांचे उल्लंघन न करता, त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज मंजूर करता आले आणि संघटनेच्या कामात असलेल्या व्यस्तते मुळे त्यांची आर्थिक घडी जी विस्कटली होती, ती नीट बसायला लागली. आता मात्र पूर्ण गावाला माहित झाले होते, की बँकेकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे, आणि त्या पहिल्या घटनेनंतर, सहा महिन्यांच्या कालावधीत, ८० टक्के खाती नियमित झाली! यात जराही अतिशयोक्ति नाही. अशाच एका कार्यकर्त्याचा मुलगा अत्यंत हुशार होता आणि त्याचा आय आय टी चेन्नई येथे नंबर लागला होता. त्याला आम्ही एज्युकेशन लोन दिले आणि तो चेन्नई ला गेला. आता आमचे फील्ड ऑफिसर निर्भयपणे आणि मुक्तपणे त्या गावात ये जा करू लागले होते आणि गावातील लोकांचे बँकेत येणे जाणे नित्याचे झाले होते.

खरा क्लायमॅक्स पुढेच आहे.

पुढील वर्षाची गोष्ट. रिकव्हरी सीझन (कर्ज वसूलीचे दिवस)चालू होता. आमच्या परीने आमचे सर्व लोक वसुलीसाठी मेहनत करत होते. अनौपचारिकरित्या वसुली मेळावे  होत होतेच, पण रिजन ऑफिस कडून निरोप आला, की एक वसुली मेळावा मोठा झाला पाहिजे, आणि त्यासाठी एजीएम  (सहाय्यक महाप्रबंधक) आणि डीजीएम (उपमहाप्रबंधक) येतील. तशात परभणीच्या कृषि विकास शाखेने   वसुली मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात १४ लाख रुपये वसुली झाली (ही घटना २००३ ची आहे, आणि तेंव्हा ही रक्कम बरीच मोठी होती, हे इथे लक्षात घेण्याजोगे आहे). आम्हाला रिजन ऑफिस ला वसुली मेळाव्याची तारीख आणि ठिकाण कळवायचे होते. त्यासाठी मी आणि माझे सर्व फील्ड ऑफिसर सहकारी माझ्या केबिन मध्ये बसून विचार विनिमय करीत होतो. शक्यतो ब्रांच च्या जवळ चे गाव निवडावे, आणि ज्या गावाचे वसुली रेकॉर्ड खूप चांगले आहे, असे गाव निवडावे, असा विचार चालला होता. त्यानुसार अनेक नांवे समोर येत होती. इतक्यात त्या गावचे  ते पुढारी आणि त्यांचे सहकारी आले. बँकेची वेळ संपली होती, पण त्या गावची  मंडळी आता बँकेच्या कुटुंबापैकीच असल्यासारखी झाली होती, त्यामुळे, त्यांनी आवाज दिला, “ काय साहेब, काय चाललंय, याव का आत?” आम्ही त्यांना आत बोलावले. त्यांना काय विषय चालला आहे त्याची कल्पना दिली. त्याबरोबर, अनपेक्षितरित्या त्यांच्याकडून ताड्कन प्रस्ताव आला, “त्यात काय विचार करायचा साहेब, आमच्या गावालाच ठेऊ यात की वसुली मेळावा!” आश्चर्यचकित होण्याची पाळी आमची होती. आम्ही या प्रस्तावाला लगेच होकार दिला नाही. मी त्यांना म्हटले, “ आपल्या गावातील वसुली आता नक्कीच चांगली आहे आणि वसुली मेळाव्याला प्रतिसाद ही चांगला मिळेल, पण मला असे वाटते की संघटनेचे विचार आहेत त्याच्या विरुद्ध असा मेळावा घेणे योग्य राहील का, याविषयी आपण अजून विचार करावा.” त्यावर लगेच ते म्हणाले, “तसेच असेल तर आत्ताच चला साहेब, आपण आमच्या सेलूच्या मोठ्या साहेबांकडे जाऊत”. त्याप्रमाणे आम्ही लगेच जीप काढली आणि सेलूच्या त्यांच्या शीर्ष नेतृत्वाकडे गेलो (नाव मुद्दामहून देत नाही). त्यांच्याकडे गेल्यानंतर असे समजले, की त्यांच्या कानावर आमच्या बँकेबद्दल पूर्ण माहिती आली होती आणि बँकेमुळे झालेल्या गावच्या प्रगतीबद्दल ते अत्यंत समाधानी होते. त्यांनी पूर्ण खात्रीने त्यांच्याकडून हिरवा कंदील दिला. गावात २-४ उनाड तरुण पोरे होती. सेलूच्या नेत्याने लोकल नेत्यांना बजावून सांगितले, त्यांना त्या दिवशी येऊ देऊ नका, आणि कार्यक्रम एकदम जोरदार झाला पाहिजे.

अशा प्रकारे वसुली मेळावा मानोलीला घेण्याचे सर्वानुमते नक्की झाले, आणि आम्ही रिजन ऑफिस ला ठिकाण आणि विसेक दिवसा नंतरची  तारीख कळवून टाकली. परभणीच्या वसुली मेळाव्यात १४ लाखांची वसुली झाली होती. तेंव्हा आम्ही आमच्या अंतर्गत मीटिंग मध्ये एक उद्देश ठेवला, “ आपली वसुली कमीत कमी १५ लाख झाली पाहिजे!” त्या दिशेने सर्व सहकारी पूर्णपणे कामाला लागले. अर्थात अशा वसुली मेळाव्यासाठी लोकांकडून आधी वसुलीबद्दल खात्री करून घेऊन त्यांना त्या ठराविक तारखेला त्या गावी येण्याचे सांगावे लागते. आजूबाजूच्या सर्व गावांना ही त्यात सामील करावे लागते. त्याप्रमाणे आमचे फील्ड ऑफिसर रोज सगळीकडे हिंडून वसुलीचे आकडे घेऊन येऊ लागले. ब्रांच च्या स्टाफ सेक्रेटरीनेही पूर्ण स्टाफ च्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हळू हळू, आमची वसुली १५ लाखाच्या आसपास पोंचेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मानोलीचे लोक मधून मधून येऊन आम्हाला सांगत होते, “तुम्ही काही काळजी करू नका साहेब, आपला मेळावा जोरदार होणार.!” होता होता तो दिवस उगवला.

रिजन ऑफिस हून एजीएम आणि डीजीएम, आले. ब्रँचमध्ये त्यांचे स्वागत केल्यानंतर, सकाळी १० च्या सुमारास आम्ही मानोलीला निघालो. ब्रँचमध्ये कमीत कमी स्टाफ ठेवून बाकी सर्वजण (कॅश मोजायसाठी कॅशियर, तसेच क्लार्कस) साडेदहाच्या सुमारास मानोलीला पोंचलो. गाव जवळ आल्यानंतर जे दृश्य दिसले ते खूपच उत्साहवर्धक होते. गावाच्या वेशीवरच, “स्टेट बँक ऑफ हैदराबाद वसुली मेळावा” असा फलक लावला होता. आणि आम्ही वेशीपाशी पोंचलो तेंव्हा गावातील मंडळी हातात हार घेऊन उभी होती. समोर बँड पथक होते, आणि आम्ही पोंचल्यानंतर, बँडच्या तालात, गावातील पुढारी मंडळींनी, पुढे होऊन सर्वांचे हार घालून स्वागत केले, आणि सभेच्या पंडाल (मंडप) पर्यंत सर्वांना वाजत घेऊन गेले. पंडाल खचाखच भरलेला होता. मानोलीचेच नाही तर आजूबाजूच्या ७-८ गावांचे लोक आले होते. स्टेज वगैरे सुशोभित केले होते. एजीएम आणि डीजीएम सहित सर्व स्थानापन्न झाले. प्रास्ताविक झाले. त्यानंतर एजीएम श्री कोटगिरे साहेबांनी अर्धा तास अत्यंत उत्कृष्ट असे भाषण केले. त्यांना मराठवाड्याची पूर्ण परिस्थिती माहिती असल्यामुळे त्यांनी उपस्थित मंडळीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना उत्कृष्ट पणे हात घातला आणि सर्वांची मने जिंकून घेतली. त्यानंतर, डीजीएम श्री केशवन साहेब यांनी गावकऱ्यांचे कौतुक करीत त्यांना आपल्या बँकेकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भाषणालाही कडाडून टाळ्या पडल्या. त्यानंतर औपचारिक कार्यक्रम संपला आणि वसुली मेळावा सुरु झाला. पैसे भरायला आलेल्या लोकांची गर्दी आमचे सर्व लोक त्वरेने हाताळू लागले. २ तास पर्यंत कॅश मोजणे चालू होते. शेवटच्या व्यक्तीची  कॅश घेऊन झाली, आणि जेंव्हा हिशोब लावण्यात आला, तेंव्हा, सर्व मिळून रक्कम झाली २६ लाख! हा आकडा जेंव्हा केशवन साहेबांना सांगण्यात आला, तेंव्हा ते इतके खुश झाले, की सांगता सोय नाही! त्यांनी तिथूनच सगळीकडे फोन करून सांगितले, रिकव्हरी डिपार्टमेंटला कळवले. परत येतांना पूर्ण रस्त्यात ते सर्वांना शाबासकी देत होते. ब्रँचमध्ये सर्वजण परतलो, तेंव्हा एजीएम आणि डीजीएम दोघांनीही टीम लीडर म्हणून अभिनंदन केले.

वरील प्रसंगाची आठवण ही आजही सुखावून जाते. या प्रसंगातून मला संयमाचा, धैर्याचा जो धडा मिळाला, तसेच टीम वर्क करण्याची जी संधी मिळाली, लोकांच्या प्रगतीत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आपल्या प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर  जे समाधान मिळाले, त्याची किंमत कशानेही करता येणार नाही.

माधव भोपे

Retired Chief Manager