लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
आठव्या वर्गात खूप नवीन मुलं वर्गात आली. विशेषतः ज्या लहान गावात सातवी पर्यंतच शाळा असते तिथल्या मुलांना पुढील शिक्षणाकरता नाईलाजानं शहरात यावंच लागायचं. विलास लोहोटे हा असाच अकोल्याजवळच्या म्हैसांग गावातून आलेला एक विद्यार्थी. डोळ्यांना जाड भिंगाचा जुनाट पद्धतीचा चष्मा, अंगात खेड्यातील शिंप्याकडून शिवून घेतलेला चुरगळलेला ढगळ शर्ट, प्रथमच शहरात आल्यानं चेहऱ्यावर नवखेपणाचे, बावरल्याचे भाव आणि वर्गात इकडे तिकडे नवलाईने पाहणारे भिरभिरते डोळे. वर्गातील जुन्या, खोडकर मुलांच्या सराईत, कावेबाज नजरा साहजिकच या खेडवळ मुलाचं बारकाईने धूर्त निरीक्षण करू लागल्या. लवकरच हा भोळा भाबडा जीव वर्गातील मुलांच्या चेष्टेचा विषय झाला. आपल्या अगदी लहान सहान… प्रसंगी पोरकट वाटणाऱ्या सर्व शंका कुशंका तो निःसंकोचपणे, मुलांच्या कुत्सित हसण्याकडे लक्ष न देता आपल्या खणखणीत आवाजात शिक्षकांना विचारायचा. त्याचा निरागस बावळटपणा पाहून शिक्षकांनाही हसू आवरत नसे. आणि त्याची चेष्टा करण्याचा मोह कधी कधी त्यांनाही होत असे.
पीजी जोशी सर त्यावेळी आम्हाला विज्ञान विषय शिकवीत. आपल्या विनोदी वृत्तीला अनुसरून वर्गातील प्रत्येकच विद्यार्थ्याला ते विविध मजेशीर टोपण नावाने हाक मारायचे. लोहोटेला चष्मा असल्याने त्याला कधी “ढापण”, कधी “कंदील”, तर कधी “बुलबुल” या नावाने बोलवायचे.
एके दिवशी पीजी सरांचा पिरियड असताना सरांचं शिकवून संपल्यावर थोडा मोकळा वेळ होता. डोळ्यांवर ताण आल्याने चष्मा काढून बाकावर ठेवून लोहोटे डोळ्यांची उघडझाप करीत शांत बसला होता. त्याला पाहून पीजी सरांना त्याची फिरकी घेण्याची लहर आली. त्यांनी त्याच्याकडे पहात मोठ्या आवाजात हाक मारली..”अहो, चष्मे बुलबुल “…. सरांनी आपल्यालाच हाक मारली आहे हे लक्षात येताच लोहोटे गडबडीनेच जागेवर उभा राहिला. उभं राहता राहता घाईघाईने टेबलावरचा चष्मा हातात घेतला आणि घालण्यापूर्वी तो नीट पुसून घ्यावा म्हणून शर्टाच्या टोकाने चष्मा स्वच्छ करू लागला. त्याचवेळी पीजी सरांनी पुन्हा हाक मारली “कंदील राव…काय करताय ? ” …… हातातला चष्मा उंच करून सरांना दाखवित लोहोटे म्हणाला “कंदिलाची काच साफ करतोय, सर ! “…. हे ऐकताच वर्गातील सर्व मुलांनी मनमुराद हसत लोहोटेच्या निर्भय विनोदबुद्धीला प्रचंड प्रतिसाद दिला. पीजी सर ही क्षणभर चपापले. मनातल्या मनात त्यांनीही लोहोटेच्या हजरजबाबीपणाला निश्चितच दाद दिली असेल.
…..त्या प्रसंगानंतर पीजी सरांनी लोहोटेची चष्म्यावरून कधीच चेष्टा केली नाही….
😃😃😃😃😃
लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.
ते फेसबुकवर नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.
असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने प्रकाशित करीत आहोत.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.