मुलें म्हणजे मशीन नव्हेत!
Child psychology
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि बालमानसतज्ज्ञ श्री राजीव तांबे यांचा एक लेख सकाळ मध्ये वाचण्यात आला. लेख आवडल्यामुळे आपल्या ब्लॉग च्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
प्रवासात वाचायला पुस्तक किंवा गप्पा मारायला लहान मूल असेल तर मजाच मजा. परवा असंच झालं. प्रवासात लहान मूल असणारे माझ्या समोरच बसले होते. त्यामुळे पुस्तक वाचूनसुद्धा जे समजणार नाही ते तेव्हा समजलं. माझ्या समोरच बसले होते आपल्या टिपटॉप कपड्यांची सतत काळजी घेणारे बाबा, आणि चार वर्षांच्या सचिनला मांडीवर खेळवणारी त्याची आई.
हे बाबा बहुधा कुठल्याशा संगणक कंपनीत प्रोग्रॅमर असावेत. कारण ते आपल्या मुलाशी प्रत्यक्ष न बोलता, त्याला शिकविण्याचा ‘प्रोग्रॅम’ करत असायचे. आई बिचारी आज्ञाधारक ‘माऊस’प्रमाणे त्यांचे प्रोग्रॅम ऐकत असे. कपडे खराब होतील, वेळ फुकट जाईल या भीतीपोटी आणि ‘इतक्या लहान मुलाशी, माझ्यासारखा हुशार माणूस काय बोलणार?’ बहुधा या विचाराने ते सचिनशी एकदाही बोलले नाहीत, की त्याला एकदाही जवळ घेतलं नाही.
आता आईने सचिनसाठी दाणे घेतले. आता सचिन दाणे खाणार इतक्यात बाबांनी त्याचा प्रोग्रॅम तयार केला. ते आईला म्हणाले, ‘‘त्याला म्हणावं वर तोंड करून खाऊ नकोस. उगाच दाणे तोंडात कोंबू नकोस. एकावेळी एकच दाणा खा. चांगला चावून चावून खा. न चावता दाणा गिळायचा नाही, नाहीतर तो घशात अडकेल.
खाऊन झाल्यावर चूळ भरायची नाहीतर दात किडतात. कळलंय?’’
आईने शांतपणे मान हलवली. आईने बाबांचा प्रोग्रॅम सचिनकडे ‘पास ऑन’ केला. आता बाबा बाजूला सरकून एका डोळ्यानं ‘आपला प्रोग्रॅम ॲप्लाय होतोय का?’ हे पाहत होते.
आता माझी उत्सुकता वाढली. सचिनच्या हातात दाण्याची पुडी होती. त्यामुळे या प्रसंगात अनेक शक्यता होत्या. ‘बाबा आज्ञावलीचा’ अर्थ सचिन कशाप्रकारे लावू शकतो याचे मी अनेक तर्क करू लागलो. पण सचिननं गुगलीच टाकला. सचिननं भरपूर दाणे आपल्या डाव्या हातात घेतले. पुडी आईच्या मांडीवर ठेवली.
या सुमारास ‘आपल्या प्रोग्रॅमचे बारा वाजले’ हे कळल्यानं बाबांचं ब्लडप्रेशर वाढू लागलं होतं. ‘आता हा काय करणार?’ या कल्पनेनं आईही अस्वस्थ. उजव्या हातात एक दाणा घेत सचिन म्हणाला, ‘‘आई गं हा एक दाणा तुला आणि मग दोन दाणे मला. चल. आऽऽ कर. मी तुझ्या तोंडात हळूच एक दाणा टाकतो. मग तू मला दोन दाणे भरव. मग पुन्हा एक तुला आणि दोन मला. ओके?’’ बाबांचा ‘आदर्श प्रोग्रॅम’ टोटल फेल.
तुमच्या लक्षात येतंय का, मुलांना समजतं प्रेम, माया आणि आपलेपणाचा स्पर्श! विशेष म्हणजे या गोष्टींना ‘प्रोग्रॅम’ करता येत नाही. ठरवून प्रेम करता येत नाही व मोजूनमापून मायाही करता येत नाही. ते आतूनच यावं लागतं आणि मूल समजून घेण्याची तळमळ असेल तरच ते शक्य होतं. उसनं प्रेम लहान मुलांनाही कळतं.
बाबांचं म्हणणं काही चुकीचं नव्हतं; पण ज्या बोलण्यात प्रेमाचा ओलावा नाही, की मायेची ऊब नाही अशा कोरड्या बोलण्यानं मुलं नकळत दुखावली जातात. असे उसन्या प्रेमाचे फवारे मारणाऱ्यांकडे मुलं पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतात. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलांना त्यांच्याशी थेट बोललेलं आवडतं.
त्यामुळे ती आपली प्रतिक्रिया अधिक स्पष्टपणे व्यक्त करू शकतात. कोणाच्यातरी माध्यमातून बोललेलं त्यांना अजिबात आवडत नाही. अशावेळी मुलं काही प्रतिक्रियाच व्यक्त करत नाहीत; पण अशा माणसांबद्दल त्यांच्या मनात कायम राग धुमसत राहातो.
‘जे पालक मुलांचं बोलणं ऐकायला उत्सुक असतात अशाच भाग्यवान पालकांच्या मांडीवर मुलं हक्काने बसतात’ ही चिनी तुम्ही ऐकलीच असेल.
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.

