Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
चोराच्या उलट्या बोंबा
——————-
मित्रांनो
मी इंजिनिअरिंगला शिकत असतांना उस्मानपुऱ्यातल्या एका वाड्यात रहात होतो.तो बराच मोठा वाडा होता. सात आठ खोल्यात मिळून सुमारे पंधरा वीस विद्यार्थी तिथे रहात होते . त्यातले बहुसंख्य आमच्याच काॅलेज मध्ये शिकत होते.
उन्हाळा सुरू झाला की रूममध्ये खूप उकडायचे.फॅन विकत घेण्याची त्यावेळी आमच्या पैकी कुणाची ऐपत नव्हती . त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कांही जण अंगणात झोपायचे , तर बरेच जण रूमचे दार रात्रभर चक्क सताड उघडे टाकून झोपायचे . रात्रीचा अभ्यास साधारणपणे बारा वाजेपर्यंत चालायचा व त्यानंतर बहुधा सगळे जण झोपायचे ..
त्यावेळी उस्मानपुऱ्यात रात्री उचलेगिरी करणाऱ्या भुरट्या चोरांची एक टोळी सक्रिय होती.
एकदा मध्यरात्रीनंतर केंव्हातरी आमच्या वाड्यात चोर आले .रूमचे दार रुममधे
उकडते म्हणून सताड उघडे टाकून कांही विद्यार्थी झोपले होते. अगदी गाढ झोपले होते. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर ज्या खोल्या उघड्या दिसल्या तिथून कपडे म्हणजे शर्ट पॅंट्स चोरून अवघ्या कांही मिनिटांमध्ये चोर पसार झाले ..
ज्यांचे कपडे चोरीला गेले त्यांना सकाळी उठल्यानंतरच कळाले की आपले कपडे चोरी गेले आहेत.
पोलिस कम्प्लेन्ट करण्यात कांहीच अर्थ नव्हता . कारण वेळ तर नक्कीच वाया गेला असता आणि चोर पकडले जाण्याची आणि चोरी गेलेले कपडे परत मिळण्याची सुतराम शक्यता नाही असे मानून कुणीही कंप्लेन्ट करण्याच्या फंदात पडले नाही.
असाच साधारण महिना गेला. चोरीचा विषय मागे पडला होता . पण एक दिवशी एक हवालदार आमच्या वाड्यात आला आणि म्हणाला आम्ही दोन चोरांना दुसऱ्या गुन्ह्यात अरेस्ट केले आहे . त्यांनी तुमच्या वाड्यात कपड्यांची चोरी केल्याची कबुली पण दिली आहे.तेंव्हा तुम्ही चोरांच्या आयडेंटीफिकेशन साठी व चोरी गेलेल्या कपड्यांच्या आयडेंटीफिकेशन साठी पोलिस स्टेशन मध्ये या..”..
आम्ही सांगितले की आम्ही सगळे जण गाढ झोपेत असतांना चोर येऊन चोरी करून गेले.त्यामुळे आम्ही चोरांना नाही ओळखू शकणार . पण आमचे कपडे जरूर ओळखू . आणि दिवसा आम्हाला काॅलेज असतं म्हणून आम्ही संध्याकाळी येऊ .. चालेल ना.. यावर हवालदार हो म्हणाला .
माझी स्वत:ची एक पॅंट गेली होती . चेन खराब झालेली, हुक तुटलेली, तुरपाई उसवलेली अशी पॅंट होती.
संध्याकाळी आम्ही चारपाच जण पोलिस ठाण्यात गेलो.
तिथे पोलिसांनी आम्हाला लाॅकअप मधला तो चोर दाखवला आणि त्यानी चोरलेले आमचे कपडे म्हणजे शर्ट्स व पॅंट्स दाखवले.ज्यानी त्यानी आपापले कपडे ओळखले व तसे आम्ही तिथल्या हवालदाराला सांगितले .
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या चोरट्याच्या चेहेऱ्यावर आपण कांही चुकीचं केलंय अशा भावनेचा लवलेशही नव्हता .
त्याचं नाव करीम खान असं होतं असं हवालदाराकडून कळालं .
कांही तरी बोलावं म्हणून मी म्हणालो…कायको चोरी किये मियाॅं हमारे वाडेमे. हम सब तो स्टुडन्टस है. पढाई करने के वास्ते आये है.ऐसा नही करना था तुमने..”
ऐसे कैसे इष्टुडन्ट लोगां है जी तुम….कितने खराब कपडे मिले मेरेकु.किसकी चेन नही तो किसकी हुक नही, किसके बटना टुटे हुए तो किसके कपलिंग गायब तो किसका जेब फटा हुवा.
ऐसे भंगार कपडे पहनते क्या ? रिपेरिंग मे मेरेकु कित्ता खर्चा करना पडा..
और हाॅं . दूसरी बात … किसीकेभी जेब मे मेरेकु एक धेला भी नही मिला … तुम सब के सब कडके निकले.
तुम लोगोंको घरसे मनिआरडर नही आती क्या ? मेरेकु कुछ पडतल नही गिरा….”
म्हणजे पहा…हा xxxx स्वत: चोर !!! पण आमच्या कडे चोरी करून परत वर आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करीत होता..
आता पर्यंत मी फक्त ‘ चोराच्या उलट्या बोंबा ‘ हा वाक्प्रचारच ऐकला होता . पण या प्रसंगाच्या तो प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला….
😄😜🤑
This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.