लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*चुन्याची डबी*
1985 साली मी स्टेट बँकेच्या जुना जालना शाखेत काम करत असतानाची गोष्ट. मी कर्ज विभागात काम करीत होतो आणि त्याच बरोबर कर्मचारी संघटनेचा स्थानिक पदाधिकारी सुद्धा होतो. त्यावेळी शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना शेतीला पूरक जोडधंदा करता यावा म्हणून शेळ्या खरेदी करण्यासाठी बँकेतर्फे सरकारी योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिलं जायचं. सर्व सरकारी योजनांप्रमाणेच याही योजनेत स्थानिक नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप असायचा. राज्य सरकारच्या संबंधित खात्यातील अधिकारी भरपूर लाच घेऊनच कर्जाचे अर्ज बँकेकडे पाठवीत असत. विविध संघटना, सेना, मोर्चा यांचे स्वघोषित पदाधिकारी उर्फ दलाल बँकेत येऊन अयोग्य मंजुरीसाठी कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत. परिणामी योजनेचा प्रचंड गैरफायदा अपात्र, कर्जबुडव्या, धूर्त ग्रामीण जनतेकडून घेतला जात होता.
एकदा जालन्यापासून 25-30 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बेरडगाव नावाच्या एका अतिशय दुर्गम खेड्यातील काही शेतमजुरांना शेळ्या खरेदीसाठीचे कर्ज आमच्या शाखेतर्फे मंजूर करण्यात आले होते. दर मंगळवारी जालन्यास गुरांचा बाजार भरत असे. तेथून लाभार्थीच्या पसंतीने शेळ्या खरेदी करून त्यांची व्हेटरनरी डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतर विमा कंपनीचे बिल्ले (इअर टॅग) त्या शेळ्यांच्या कानाला टोचून घ्यावे लागत. त्यानंतर नगरपालिकेची जनावर खरेदीची पावती बनवून झाल्यावर शेळ्या व विक्रेता यांना घेऊन लाभार्थी बँकेत येत असे. बँकेच्या फिल्ड ऑफिसरने शेळ्यांचे इन्सपेक्शन व योग्य शहानिशा केल्यावरच विक्रेत्याला शेळ्यांची किंमत अदा केली जात असे.
त्या दिवशी बेरडगावच्या दहा लाभार्थींना कर्जवाटप करायचे होते. त्यापैकी नऊ जणांना प्रत्येकी वीस हजार रुपये तर राहीलेल्या एकाला दहा हजार रुपये इतकी कर्ज रक्कम प्रदान करायची होती. संध्याकाळी उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर एकदाचे सर्व लाभार्थी शेळी विक्रेत्यांना घेऊन बँकेत आले. फिल्ड ऑफिसरने ताबडतोब शेळ्यांचे इंस्पेक्शन केले. उशीर झाल्याने कॅशियरने घाईघाईतच सर्वांना फिल्ड ऑफिसरने सांगितल्याप्रमाणे रक्कम अदा केली व कॅश क्लोज करण्याच्या मागे लागला. पण कॅशियर व अकाऊंटंटच्या स्क्रोलमध्ये दहा हजारांचा फरक येत होता. लवकरच उलगडा झाला की ज्या एकमेव शेळी विक्रेत्याला दहा हजार रुपये द्यायचे होते त्यालाही घाईगडबडीत वीस हजार रुपये दिले गेले होते.
त्याकाळी दहा हजार रुपये फार मोठी रक्कम होती. रक्कम जमा केल्याशिवाय कॅशियरला तिजोरी बंद करता येणार नव्हती. फिल्ड ऑफिसर, संबंधित क्लर्क, कॅशियर, …सारे या चुकीसाठी एकदुसऱ्याकडे बोट दाखवीत होते. शेवटी मॅनेजर श्री. टी. के. सोमैय्याजी यांना झालेला सर्व प्रकार सांगण्यात आला. ते अतिशय शांत, संयमी, सहृदय आणि दिलदार स्वभावाचे होते. त्यांनी शाखाप्रमुख या नात्याने कर्मचाऱ्यांकडून झालेल्या ह्या चुकीची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. आणि ताबडतोब स्वतःच्या खात्यातून दहा हजार रुपये देऊन कॅश बंद करण्यास सांगितले.
हा सर्व गोंधळ निस्तरेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. जादा गेलेली दहा हजाराची रक्कम वसूल करण्याची नैतिक जबाबदारी कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी या नात्याने माझी देखील होती. मी लगेच ज्या लीडरने ही कर्जप्रकरणे मंजूर करण्यासाठी शाखेवर दबाव आणला होता त्याच्याकडे म्हणजे साहेबराव दांडगे ह्याच्याकडे गेलो. साहेबरावने सर्व प्रकरण नीट समजावून घेतले. ज्याला दहा हजार रुपये जास्त गेले होते तो शेळीविक्रेता, लालसिंग त्याचं नाव, तोही योगायोगाने बेरडगावचाच निघाला.
साहेबराव म्हणाला ” सर, मी ह्या लालसिंगला चांगलाच ओळखतो. अतिशय प्रामाणिक माणूस आहे. जादा आलेले बँकेचे पैसे तो नक्कीच परत करील. मात्र पैसे आणण्यासाठी बेरडगावला जावे लागेल आणि तिकडे आत्ता रात्रीचे जाणे फारच अवघड आणि धोकादायक आहे. एकतर रात्रीचा अंधार आणि त्यातून संपूर्ण रस्ता कच्चा, चिखल-दलदलीचा, खाचखळग्याचा आणि काटाकुट्याचा आहे. गाडी पंक्चर होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय रात्रीची साप, रानडुकरं, लांडगे यांची तसेच वाटमारीचीही भीती आहे. त्यामुळे तुम्ही उद्या सकाळीच बेरडगावला जा. हवं तर मीही तुमच्या सोबत येतो. काळजी करू नका. पैसे नक्की परत मिळतील.” साहेबरावच्या ह्या आश्वासक बोलण्यानं बराच धीर आला आणि खूप हायसंही वाटलं.
चर्चेअंती दुसरे दिवशी पहाटे सहा वाजता साहेबरावला सोबत घेऊन निघायचे ठरले. मी पाच वाजताच उठून तयार होऊन स्कुटर घेऊन साहेबरावच्या घरी गेलो. तो गाढ झोपला होता. मला आलेला पाहून डोळे चोळत उठून तो लगेच तयार झाला आणि स्वतःची मोटारसायकल घेऊन माझ्याबरोबर निघाला. सुमारे तासभराच्या खडतर प्रवासानंतर आम्ही बेरडगावला पोहोचलो. लालसिंग गावाबाहेर बेरडवस्तीत रहात होता. तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे आमच्या गाड्या गावालगत रस्त्यावरच उभ्या करून आम्ही दोघे दोन तीन फर्लांगाचं अंतर चिखल तुडवीत जवळच्या बेरडवस्तीत गेलो.
लालसिंगने आमचे आदराने स्वागत केले. मी त्याला आम्ही इथपर्यंत येण्याचे कारण सांगितले. त्यावर लालसिंग म्हणाला “साहेब, मी बँकेने दिलेले पैसे न मोजता तिथेच रुमालात बांधले आणि लगेच घराकडे आलो. अजूनही ते पैसे तसेच रुमालात ठेवले आहेत. तुम्ही ती रुमालाची पुरचुंडी घ्या आणि त्यातून जास्तीचे आलेले पैसे काढून घ्या.”
मला लालसिंगच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं. मी त्यानं आणून दिलेल्या रुमालाची गाठ उघडली आणि जास्तीचे गेलेले दहा हजार काढून घेण्यासाठी पैसे मोजू लागलो. पण हे काय…? दहा हजार मोजताच सारे पैसे संपले. रुमालात एकूण फक्त दहा हजार रुपयेच होते. म्हणजे..? लालसिंगला दहाच हजार दिले गेले ? मग पैसे गेले कुठे ? कॅशियर खोटं तर बोलत नाही ना ?….असे नानाविध विचार माझ्या मनात येऊन गेले.
मी लालसिंगकडे पाहिलं. “काय झालं साहेब ?” माझा गोंधळलेला चेहरा पाहून त्यानं भाबडेपणानं विचारलं. “काही नाही. बहुदा आमच्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी.” असं म्हणून लालसिंगची माफी मागून आम्ही निघालो.
जाता जाता लालसिंगच्या आग्रहास्तव वस्तीच्या कोपऱ्यावरील चहाच्या खोपटात चहा पिण्यासाठी गेलो. चहा पिताना साहेबराव म्हणाला “पहा साहेब !… मी म्हणत नव्हतो, लालसिंग खूप इमानदार आहे म्हणून ! बिचाऱ्याने अजूनपर्यंत पैसे मोजलेही नव्हते. जर खरोखरच त्याच्याकडे जास्तीचे पैसे आले असते तर ते तुम्हाला नक्की परत मिळाले असते.” मी देखील मान डोलावून त्याच्या बोलण्याला संमती दर्शवली.
माझी वसुली मोहीम पार फसली होती. मोठया आशेनं माझी वाट पाहत बसलेल्या कॅशियर, क्लर्क व फिल्ड ऑफीसरचे चेहरे माझ्या डोळ्यापुढे तरळू लागले. उदास मनानं लालसिंगचा निरोप घेऊन परत जाण्यासाठी आम्ही उठतो न उठतो, तोच….
“अहो काकाsssss थांबाsssss” असा आवाज देत लालसिंगचं आठ दहा वर्षांचं पोरगं धापा टाकत आमच्यापर्यंत आलं.
“अहो काका, काल रात्री बँकेचे जास्तीचे आलेले पैसे घेण्यासाठी तुम्ही चिखलकाट्यात बरबटून आमच्या घरी आला होता ना, त्यावेळी जादा आलेले पैसे तर तुम्ही नेले पण तुमची एक गोष्ट मात्र आमच्या घरीच विसरला होता…ती ही घ्या तुमची विसरलेली चुन्याची डबी.”
असं म्हणत त्या मुलानं चुन्याची डबी साहेबरावच्या हातावर ठेवली.
काल घडलेला सारा घटनाक्रम माझ्या डोळ्यापुढे विजेसारखा झर्रकन चमकून गेला. साहेबरावच्या चेहऱ्याचा तर रंगच उडाला. घाबरून त्यानं मोठ्ठा आवंढा गिळला. शरमेनं अवघडून त्याचा चेहरा कसनुसा होऊन अक्षरशः शतशः विदीर्ण झाला. खजील होऊन खाली गेलेली मान वर न करता, कुणाला काही कळायच्या आत, पायात चप्पलही न घालता, काट्याकुट्याची पर्वा न करता, चिखल तुडवीत त्यानं तडक रस्त्याकडे धाव घेतली.
……बघता बघता रस्त्यावरील कडेला लावलेल्या मोटारसायकलवर तो स्वार झाला आणि धुरळा उडवीत दिसेनासा झाला.
🤣😜🤣
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.
ते फेसबुकवर नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.
असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने प्रकाशित करीत आहोत.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.