लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*गल्लीतील यमदूत*
मी बँकेत नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. जालना येथील स्टेट बँकेत कॅशियर-कम्-क्लर्क म्हणून 1981 साली मी जॉईन झालो. लवकरच माझ्यावर बँकेचा रोजचा ताळेबंद म्हणजेच कॅश बुक (क्लीन कॅश) लिहिण्याचं अतिशय क्लिष्ट परंतु त्याचबरोबर प्रतिष्ठेचं काम सोपविण्यात आलं.
हे कॅश बुक टॅली करणं फारच जिकिरीचं काम होतं. बँकेत भरपूर काम असल्याने स्टाफही भरपूर होता. रोज एक हजारापेक्षाही जास्त व्हाऊचर्स असायची. ही व्हाऊचर्स योग्यरित्या सॉर्ट करून संबंधित दैनिक पुस्तकात (डे बुक) ठेवण्याचे काम प्यून मंडळी दुपारपासूनच सुरू करत. संध्याकाळी सर्वांची डे बुकं लिहून झाल्यावर मगच कॅश बुक लिहिण्याचे माझे काम सुरू होत असे. त्यामुळे संध्याकाळी चार तास व सकाळी दोन तास अशा दोन भागात माझे कामाचे तास विभागले होते.
शक्यतो त्याच दिवशी हे कॅश बुक टॅली करण्याचा माझा प्रयत्न असे. मात्र कधी व्हाऊचर्स गहाळ झाल्याने तर कधी डे बुक लिहिण्यातील विविध चुकांमुळे क्लीन कॅश टॅली होण्यास नेहमीच खूप उशीर व्हायचा. साहजिकच सर्व काम आटोपून घरी जाण्यास मला रात्रीचे दहा अकरा वाजत. बँकेपासून जराशा दूर अंतरावर असलेल्या एका विडी कामगारांच्या वस्तीत तेंव्हा मी रहात असे. स्टाफला मिळणारं सायकल लोन उचलून मी नुकतीच नवीन सायकल घेतली होती. त्यावरूनच मी बँकेत जाणे येणे करीत असे.
एक दिवस असाच रात्री साडे दहा वाजता काम आटोपून घरी जात असताना वाटेतील एका गल्लीच्या तोंडाशीच एक भला मोठा, हिंस्त्र चेहऱ्याचा कुत्रा, आपले अणकुचीदार दात विचकवीत, माझी वाट अडवून उभा राहिला. कुत्र्याला पाहून मी थोडा घाबरलो आणि त्याला टाळून बाजूने सायकल काढून वेगाने पुढे जाऊ लागलो. त्या धिप्पाड कुत्र्यानेही सायकलमागे वेगाने पळत माझा गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर बहुदा त्याची हद्द संपल्यामुळे तो तिथेच थांबला. मी मात्र तोपर्यंत भीतीने अर्धमेला झालो होतो. जोरजोरात पायडल मारल्याने मला मोठी धाप लागली होती आणि भीतीने सर्वांगाला चांगलाच घाम फुटला होता.
त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही. सारखा तो भयंकर चेहऱ्याचा खुनशी, खूंखार कुत्रा नजरेसमोर येत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही गोष्ट पार विसरून गेलो. त्या दिवशीही काम आटोपण्यास नेहमीसारखाच उशोर झाला. सायकलवर टांग मारत मी घराकडे निघालो. त्या गल्लीच्या तोंडाशी येताच अचानक कालच्या प्रसंगाची आठवण झाली आणि छातीचे ठोके वाढले. घशाला कोरड पडली. मी घाबरून आसपास पाहिलं. रस्ता सुनसान होता हे पाहून मी सुटकेचा निःश्वास सोडला आणि निर्धास्तपणे हलकेच शीळ घालीत आरामात हळू हळू पायडल मारण्यास सुरवात केली. इतक्यात अचानक कुणीतरी बाजूच्या झुडुपमागून निघून माझ्या सायकलवर झेप घेतली. मी ब्रेक मारून नीट बघितलं तर तो कालचाच भयंकर कुत्रा होता. बहुदा माझीच वाट पहात झुडुपामागे दबा धरून बसला असावा. मी कालच्यासारखीच वेगात सायकल दामटली. गल्लीच्या टोकापर्यंत माझा पाठलाग करून कालसारखाच तो दुष्ट कुत्रा आपली सीमा येताच थांबला.
त्यानंतर हे रोजचंच झालं. मला रात्री घराकडे जायचं म्हंटलं की त्या कुत्र्याच्या दहशतीमुळे अंगावर काटा येत असे. घराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गही नव्हता. मी मॅनेजरसाहेबांकडे कॅश बुक सोडून दुसरं कोणतंही काम देण्याची विनंती केली. मॅनेजर साहेबांनी कारण विचारलं तेंव्हा मी त्यांना त्या कुत्र्याच्या मागे लागण्याबद्दल सांगितलं. ते ऐकून मॅनेजर साहेब खो खो करून हसत म्हणाले की “तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच म्हणून समज !”
जालना नगर परिषदेची सर्व बँक खाती आमच्याकडेच होती. त्यामुळे तेथील कर्मचारी वर्ग विविध प्रकारच्या कामांसाठी बँकेत नियमित येत असे. मॅनेजर साहेबांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणाऱ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांची माझ्याशी गाठ घालून दिली. मी त्यांना कुत्र्याचे वर्णन करून तो कुठल्या गल्लीत असतो हे सांगितले. त्यावर “आपण अजिबात काळजी करू नका. उद्याच त्या कुत्र्याचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल,” असे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.
त्याही दिवशी रात्री कुत्र्याने माझा नेहमीसारखाच पाठलाग केला. एकदोनदा आपल्या दातांनी माझी पॅन्टही पकडली. पण ह्या क्रूर, पापी कुत्र्याला नगर पालिकेचे कर्मचारी उद्या पकडून नेणार आहेत, हे माहीत असल्याने मी तो त्रास फारसा मनावर घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मॅनेजर साहेबांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. नगर पालिकेचे ते कर्मचारी त्यांच्यासमोरच बसले होते. “सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गल्लीत व आसपास भरपूर शोधाशोध करूनही असा कोणताही भटका कुत्रा आढळला नाही” असं ते म्हणत होते. “बहुदा मला त्या कुत्र्याचा भास होत असावा” असं ते ठासून सांगत होते. माझ्याकडे विचित्र नजरेने पहात ते निघून गेले. मॅनेजर साहेबांनी मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता “आजपासून रात्री तुम्हाला घरी सोडण्यासाठी बँकेचा वॉचमन तुमच्यासोबत घरापर्यंत येईल” असे सांगून मला धीर दिला.
पुढचे सलग दोन दिवस बँकेचा वॉचमन मला सोडण्यासाठी घरापर्यंत आला. आश्चर्य म्हणजे तो भयंकर कुत्रा त्या दोन दिवसात गल्लीत फिरकलाच नाही. साहजिकच “नगर पालिकेचे लोक खरंच बोलत होते…असा कुणी कुत्रा त्या भागात नाहीच आहे…सारे या साहेबांच्या मनाचे खेळ आहेत….मी आजपासून त्यांना सोडायला जाणार नाही.” असं वॉचमनने मॅनेजर साहेबांना माझ्यासमोरच ठणकावून सांगितले. शिवाय वरतून ” साहेब, दर शनिवारी मारुतीला नारळ फोडत जा…सारं काही ठीक होईल.” असा मला आगाऊपणाचा सल्लाही दिला
त्या दिवशी रात्री काम आटोपल्यावर मी हताशपणे घराकडे निघालो. मी “त्या” गल्लीत प्रवेश करताच तो भयंकर कुत्रा माझ्यावर त्वेषाने चाल करून आला. मी अजिबात न डगमगता… “घाबरू नकोस, हा केवळ भास आहे”..असं मनाला बजावीत होतो. मात्र जेंव्हा त्याने माझी पॅन्ट दातात धरून टरकावली तेंव्हा मात्र माझे अवसान गळाले आणि मी जीव मुठीत धरून, कुत्र्यापासून पाय वाचवीत, कशीबशी ती गल्ली पार केली.
आता हा आतंक, हा उपद्रव म्हणजे माझं जागेपणीचं रोजचं दु:स्वप्नच होऊन बसलं. तो भयंकर कुत्रा मी त्या गल्लीत शिरताच माझ्या मागे लागायचा. कधी पॅन्ट धरायचा तर कधी सायकलच्या हँडलवर झेप घ्यायचा. मी या रोजच्या त्रासाने अगदी कंटाळून गेलो होतो. आता तर बँकेतही याबद्दल कुणाला काही सांगायची सोय राहीली नव्हती.
एकदा माझ्या मित्राला त्याच्या घरातील उंदीर मारण्यासाठी औषध घ्यायचे होते, म्हणून त्याच्यासोबत औषधाच्या दुकानात गेलो होतो. “या उंदरांच्या औषधाने कुत्री मरतात का हो ?” असं जेंव्हा मी दुकानदाराला विचारलं, तेंव्हा त्याने “कुत्री मारण्याचे वेगळे विष असते व ते आमच्याकडे उपलब्ध आहे” अशी माहिती पुरवली. त्याचवेळी त्या भयंकर कुत्र्यापासून सुटका करून घेण्यासाठी हा जालीम उपाय करण्याचा मी मनाशी निश्चय केला.
त्या दिवशी रात्री घरी जाताना न विसरता दुकानातून कुत्र्याचे विष विकत घेतले. गल्लीतून जाताना रोजच्याप्रमाणेच त्या कुत्र्याने अंगावर धावून येत घाबरवून टाकले, तेंव्हा “ह्या कुत्र्याचा त्रास सहन करण्याचा हा शेवटचाच दिवस !” असं मनात येऊन गेलं. घरी पोहोचताच एका वाटीत पाणी घेऊन त्यात ते कुत्र्याचे विष मिसळून ठेवले. उद्या दुपारी बिस्किटे आणून ती या विषाच्या पाण्यात भिजवून सोबत न्यायची आणि रात्री घरी येताना त्या भयंकर कुत्र्यास खाऊ घालायची असं ठरवून झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी दुपारी बँकेत जाण्यापूर्वी, पहिल्यांदा जवळच्या रस्त्यावरील दुकानातून बिस्किटे आणावीत म्हणून बाहेर पडलो. वाटेतच कानावर मृदुंग, वीणा, चिपळ्यांचा आवाज पडला म्हणून तिकडे पाहिलं तर पंढरपूरला जाणारी शेगावच्या गजानन महाराजांची पालखी चालली होती. आज पालखीचा मुक्काम जालन्यातच होता. मी मनोभावे पालखीला नमस्कार केला. परमप्रिय दैवताच्या पालखीचं दर्शन झाल्याने माझं मन भक्तिभावानं भरून गेलं. निदान आजच्या दिवशी तरी कुत्र्याला विष घालण्याचं दुष्ट कृत्य करू नये असा विचार करून विकत घेतलेला बिस्किटाच्या पुडा घरी न नेता तसाच बँकेत नेला.
रात्री काम आटोपल्यावर बिस्किटाच्या पुड्याची थैली सायकलच्या हॅंडलला लावली आणि घराकडे निघालो. आज गल्लीत तो खतरनाक कुत्रा दिसला नाही. तरी सावधगिरी म्हणून शोधक नजरेने आजूबाजूला पहात मी हळूहळू सायकल चालवीत होतो. गल्ली संपत आली तरी कुत्रा दिसला नाही पाहून मी सुटकेचा निःश्वास टाकतो न टाकतो.. तोंच अचानक त्या गल्लीतील यमदूताने समोरून येत माझ्या सायकलवर झेप घेतली. या अनपेक्षित हल्ल्याने मी पुरता गांगरलो. माझा तोल गेला आणि मी सायकलवरून धाडकन खाली आदळलो. कसाबसा उठून कपड्यांवरील धूळही न झटकता, तशीच सायकल हातात धरली आणि धूम पळत सुटलो. गल्ली पार झाल्यानंतर, तो भयंकर यमदूत मागे फिरल्यावर मगच पुन्हा सायकलवर बसून घरी पोहोचलो.
आता मात्र मी सूडानं पुरता पेटलो होतो. सायकलवरून पडल्यामुळे थोडं खरचटून मुका मारही लागला होता. आत्ताच बिस्किटं विषात भिजवून ठेवावीत म्हणून मी हँडलची थैली काढली तर आत बिस्किटाचा पुडाच नव्हता. कदाचित मघाशी सायकल पडली तेंव्हा थैलीतून पुडा कुठेतरी खाली पडला असावा.
आता उद्या दुपारी बँकेत जाताना हे कुत्र्याचे विष बाटलीत भरून बँकेत न्यावे व रात्री येताना बिस्किटाचा पुडा सोबत आणून, त्या गल्लीत थांबून बिस्किटावर विष शिंपडून कुत्र्याला खाऊ घालावे असा पक्का निर्धार केला.
ठरल्याप्रमाणे त्या दिवशी रात्री घरी परतताना बिस्किटाचा पुडा विकत घेतला. विषाची बाटली तर दुपारी येतानाच खिशात ठेवली होती. एखाद्या योध्याप्रमाणे सर्व तयारीनिशी मी कामगिरीवर निघालो होतो. आज तो माझा जानी दुश्मन भयंकर कुत्रा गल्लीच्या सुरवातीलाच स्वागतासाठी हजर होता. जणू काही तो माझीच आतुरतेनं वाट पहात होता. मी देखील एकदाची ही ब्याद टळावी म्हणून आसुसलो होतो.
शांतपणे सायकल उभी करून मी खाली उतरलो. कुत्राही आता माझ्या अगदी जवळ आला होता. माझा हात खिशातील विषाच्या बाटलीकडे गेला. अचानक माझी नजर कुत्र्याच्या डोळ्यांकडे गेली. त्या डोळ्यात केवळ प्रेम आणि आपुलकीच भरलेली दिसत होती. तो आनंदाने जोरजोरात शेपटी हलवीत होता. मला पाहून त्याला खूप आनंद झालेला दिसत होता. तो जवळ येऊन प्रेमाने चक्क माझे पाय चाटु लागला. इतक्या दिवसांचा माझा वैरी आज माझा दोस्त झाला होता. ही किमया कशी घडली याचा मला तर काहीच उलगडा होत नव्हता. त्याचं ते प्रेम बघून माझ्या मनातही त्याच्याबद्दल दया उत्पन्न झाली. त्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं. थैलीतून बिस्किटाचा पुडा काढून मी त्याला सर्व बिस्किटं प्रेमाने खाऊ घातली. थोडावेळ त्याच्याशी खेळून, त्याला जवळ घेत कुरवाळून, त्याच्या पाठीवर तोंडावर हात फिरवून मी घरी निघालो. शेपूट हलवीत तो कुत्राही माझ्या मागोमाग गल्लीच्या टोकापर्यंत आला.
……घरी जाण्यापूर्वी खिशातून विषाची बाटली काढून मी दूर भिरकावून दिली. क्रोधाने आंधळा होऊन मी एक मुक्या प्राण्याच्या जीवावर उठलो होतो हे आठवून मला माझीच लाज वाटत होती.
त्या दिवसापासून तो कुत्रा माझा जिवलग मित्र झाला. माझी वाट पहात गल्लीच्या तोंडाशी बसून राहायचा. मी दुरून दिसताच शेपटी हलवत माझ्या जवळ यायचा, मला चाटायचा, माझ्या कडून लाड करून घ्यायचा. मीही त्याच्यासाठी आठवणीने काहीतरी खाऊ घेऊन जायचो. आता संध्याकाळ झाली की मलाही त्याच्या भेटीची ओढ आणि उत्सुकता लागून रहायची.
हा भयंकर कुत्रा अचानक माझा मित्र कसा बनला यावर विचार केल्यावर मला आठवलं की… त्या दिवशी सायकल खाली पडली तेंव्हा हँडलला लावलेल्या थैलीतील बिस्किटाचा पुडा तिथे पडला असावा आणि त्या कुत्र्याला असं वाटलं की मी तो त्याच्यासाठी आणला होता. साहजिकच त्याचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. मी त्याला दयाळू, सहृदय वाटू लागलो. त्याने प्रेमाच्या आशेने माझ्याशी मैत्रीपूर्ण सलगी केली आणि माझ्या सकारात्मक प्रतिसादाने आमची दोस्ती पक्की झाली.
खरंच… किती सोप्पं होतं त्याच्याशी दोस्ती करणं ! मी विनाकारण त्याला घाबरून इतके दिवस व्यर्थ तणावात घालवले. सुरवातीलाच त्याला चुचकारून, काहीतरी खायला देऊन, त्याच्यावर प्रेम करून, त्याला आपलंसं करून घेतलं असतं तर त्याचा जीव घेण्याइतका टोकाचा विचार करण्याची काहीच गरज नव्हती.
आपल्या आयुष्यात ही आपण खोट्या मान सन्मान, प्रतिष्ठा व अहंकारापायी कधी कधी अतिशय क्षुल्लक कारणावरून एकमेकांविषयी वैरभाव मनात बाळगून आपसातील संबंध बिघडवितो. गैरसमज न बाळगता, मोकळ्या मनाने जर आपण आपल्या तथाकथित शत्रु पुढे मैत्रीचा हात पुढे केला तर कोणताही वाद, मतभेद कधीच विकोपास जाणार नाहीत व एक सुदृढ समाज निर्माण होईल.
….”काय साहेब, औषध जालीम होतं ना ? कुत्र्याचा बंदोबस्त झाला की नाही ?”
जिथून कुत्र्याचे विष आणले होते तो औषध विक्रेता मला पाहून विचारत होता..
*”अगदी सहज ! आणि अतिशय उत्तमरीत्या….”*
……हात उंचावून अंगठा दाखवून मी हसत म्हणालो…
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.
ते फेसबुकवर नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.
असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने प्रकाशित करीत आहोत.