आई तुझ्या मी दर्शनास योग्य नाही का?
आई, तुझ्या मी दर्शनासि योग्य नाही का ? । रेणुके, तू दींनांची नससी माय का ? ।।धृ।।
जवळ आलियासि म्हणसि हो पलीकडे
लागलि ही सवय तुला का अलीकडे
कोणाची आस धरून मी जाउ कुणीकडे
श्रुतिपदास लवितीस व्यर्थ शाई कां ? ।।१।।
हा भवानी म्यां तुलाचि देह अर्पिला
त्यजुनि अन्नपाणि रानि निंब वर्पिला
अपमान, मान, राग, लोभ सर्व निर्पिला
अजुनि कां न भेट देसी लपसि बाई कां? ।।२।।
कां अजून सुप्रसन्न चित्त होई ना
कां अजून या दीनचि कीव येई ना
कां अजून ऊर उलूनि जीव जाई ना
शिर फुटोनि होईनाचि राइ राइ कां? ।।३।।
काय म्हणावे अवतार कृत्य संपले
काय म्हणावे शितळ चंद्रबिंब तापले
काय म्हणावे दुष्ट नष्ट दैव आपुले
काय म्हणावे जगविताचि वांझ गाई कां? ।।४।।
पापिष्ट दुष्ट मरतो त्यासि काय मारणे
पुण्यश्लोक तरतो त्यासि काय तारणे
त्रिदोष दोषीयांसि जहर काय चारणे
यांत आहे तरी सुजाण, भलि भलाई का ? ।।५।।
माझे अपराध काही आठवू नको
आपुले तु सदय ह्रदय बाटवू नको
व्याघ्रमंदिरासि वत्स पाठवू नको
विष्णुदास म्हणे न येच ऐकु काही कां ? ।।६।।
—–00000—–
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.