नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही
श्रीमुळपीठनायके, माय रेणुके, अंबाबाई
नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही ।।धृ।।
जय दुर्गे, नारायणी, विश्वस्वामिनी सगुणरुपखाणी
जय मंगल वरदायिनी, सर्वकल्याणी
जय महिषासुरमर्दिनी, राजनांदिंनी, पंकजपाणी
हे भार्गवजननी मला पाव निर्वाणी
जय प्रसन्नमुख त्रिंबके, जगदंबिके, प्रसन्न तू होई ।।१।।नको।।
कल्पना फिरवि गरगर, समूळची घर, बुडवायाची
ही दुर्लभ नरतनु आता जाति वायाचि
शिर झाले पांढरे फटक, लागली चटक, अधिक विषयाचि
कशि होइल मजला भेट तुझ्या पायाची
ये धावत तरी तातडी, घालि तू उडी, पाहसी काई ।।२।।नको।।
तुजवाचुन मज दूसरा, नसे आसरा, जगी जगदंबे
तू भवानी, मजवर कृपा करी अविलंबे
सोन्याचा ऊगवी दिवस, करितो नवस, सकळारंभे
मी भरिन ओटी नारळी, केळि, डाळिंबे
मी अनाथ दीन केवळ, माझी कळकळ, येउ दे काही ।।३।।नको।।
मी थोर पतित पातकी, माझी इतुकि, अर्जी ऐकावी
एकदा कसेही करून भेट मज द्यावी
तू देणार नाहीस हाणुन, आलो मी म्हणुन, तुझ्या या गावी
म्हणे विष्णुदास ही किर्ति जगामध्ये गावी
धिर नाही आता पळघडी, म्हणुन येवढी, सुटली घाई
नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही ।।४।।
—–00000—–
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.