आम्ही चुकलो जरी तरी कांही । तू नको चुकू अंबाबाई ! ।।धृ।।
तुझे नाव ‘आनंदी’ साजे
तुझा महिमा त्रिभुवनी गाजे
तुझे सगुणरूप विराजे
तुला वंदिति सन्मुनि, राजे
गुण गाति वेदशास्त्रेही ।।तू नको।।१।।
आम्ही अनाथ, दीन, भिकारी
तू समर्थ, प्रभु, अधिकारी
आम्ही पतित पातकी भारी
तू पावन भवसंभारी
तू पर्वत, आम्ही रज-राई ।।तू नको।।२।।
आम्ही कुपुत्र म्हणउन घेऊ
तू नको कुमाता होऊ
आम्ही विषय-ढेकळे खाऊ
तू प्रेमामृत दे खाऊ
आम्ही रांगू, तू उभि राही ।।तू नको।।३।।
आम्ही केवळ जडमूढप्राणी
चैतन्यस्वरूप तू शाहाणी
फट् बोबडी आमुची वाणी
तू वंदु नको आमुच्या वाणी
आम्ही रडू, तू गाणे गाई ।।तू नको।।४।।
आम्ही चातक तुजविण कष्टी
तू करी कृपामृतवृष्टी
म्हणे विष्णुदास धरी पोटी
अपराध आमुचे कोटी
अशी आठवण असु दे हृदयी ।।तू नको।।५।।
—–00000—–
Subscribe to get the latest posts sent to your email.
Type your email…
Subscribe