https://goodworld.in A website by Madhav Bhope

सामाजिक बेजबाबदारी

लेखक-सुनील माने

बिहारमधील सुलतानपूर जिल्ह्यातील कावड यात्रेत डॉल्बी चालू असताना विजेचा धक्का लागून आठ भाविकांचा मृत्यू…

कोल्हापूरमध्ये गणेश आगमन मिरवणुकीत लेसरच्या धोकादायक किरणांच्या प्रखर झोतामुळे तरुणाच्या डोळ्याला इजा, बंदोबस्तात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्यांनाही त्रास…


याच मिरवणुकीत हौजेचा १२० डेसिबल आवाज नोंदवल्यामुळे तब्बल ५१ मंडळांवर गुन्हे दाखल…
पुण्यातील दहीहंडी उत्सवात डीजेच्या दणदणाटामुळे खिडक्यांच्या काचा फुटतात की काय अशी परिस्थिती…
पंढरपूरमध्ये मुलाच्या हळदीच्या वरातीत लावलेल्या डीजे मुळे वरपित्याचा मृत्यू…


या अलीकडील काही घटना डीजे आणि लेसर किरणांचे दुष्परिणाम सांगण्यासाठी पुरेशा आहेत.

मानव तसेच प्राण्यांच्या आरोग्यास घातक असणाऱ्या या गोष्टी आपल्याला हव्याच असतात. सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती तसेच वैयक्तिक आणि धार्मिक कार्यक्रमात डीजे आणि लेसर लावण्याचा आपला हट्ट कायम आहे. मात्र यामुळे समाजाची अपरिमित हानी होत आहे. भारत सक्षम राष्ट्र म्हणून विकसित होत असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये डीजेच्या वापरामुळे यांसारख्या गोष्टी घडणे हा अगदी विरोधाभास आहे. धर्माच्या नावावर, महापुरुषांच्या जयंतीच्या नावावर डीजे आणि लेसर सारख्या गोष्टी वापरू नयेत यासाठी मी स्वतः माझ्या कॅटलिस्ट फाउंडेशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात गेल्या वर्षीच जनहित याचिका दाखल केली. ही जनहित याचिका आहे. उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिकांची जी क्रमवारी आहे, प्राधान्यक्रम आहेत त्यात वर्ष होत आलं तरी यावर अजून सुनावणी झाली नाही.

माझी अपेक्षा अशी होती, की गणपती उत्सव, दहीहंडी, शिवजयंती, पैगंबर जयंती, आंबेडकर जयंती या सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि तांत्रिक गोष्टी वापरून जो अवडंबर माजवला जातो, त्यावर कोठेतरी लगाम बसावा. या गोष्टी महापुरुषांना, देवी-देवतांना कधी मान्य होणार नाहीत. ज्या भविकांची मनापासून श्रद्धा आहे त्यांनाही हे मान्य होणार नाही. अशा स्वरूपाच्या हिडीस, ओंगळवाण्या आणि घाणेरड्या गोष्टी सर्रास भारतात केल्या जात आहेत.

पुणे सुशिक्षित, सुज्ञान विचार करणाऱ्या लोकांचे शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या मात्र त्याच्या विरोधात शहरातले लोक काम करायला लागले आहेत. याला राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही अतिउत्साही लोक, याचे दुष्परिणाम माहीत नसलेले मंडळाचे काही कार्यकर्ते कारणीभूत आहेत. लोक महापुरुषांच्या जयंतीसाठी हजारो, लाखो रुपयांची वर्गणी देतात. काही जण भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती वर्गणीत वाटून हीरो बनतात. अशा पद्धतीने मुलांना भडकावून, प्रसंगी दारू प्यायला लावत या जयंतीत नाचा, त्या उत्सवात नाचा असे सांगून डीजेचा सर्रास वापर करण्यासाठी पाठिंबा देतात. आपली परंपरा, संस्कृती काय आहे आणि आपण कठल्या दिशेला चाललोय याचेच भान सर्व समाजाला सरत चाललंय हे गांभीर्याने घ्यावे लागेल.

माझ्यासारखे खूप कमी, बोटावर मोजण्याइतपत लोक या विषयावर पूर्ण ताकदीने उतरायचा प्रयत्न करतात. मात्र व्यवस्था आवश्यक ती मदत करत नाही, तसेच योग्य तो धडा घेऊन ठोस कार्यवाही करत नाही. प्रशासन, सरकार, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, नेत्यांनी या घटनांमधून धडा घेऊन एकदाच काहीतरी निकाल लावला पाहिजे. वारंवार अशा घटना घडल्या तरच मग आपण त्याची तात्पूर्ती चर्चा करणार आणि मग डीजे किती वाईट आहे अशा स्वरूपाच्या गोष्टीचा आपण विचार करणार.

गणपती उत्सवात २००४ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्या अनुषंगाने मी ‘सकाळ’ मध्ये लेख लिहिला होता…
डीजे हे प्रकरण खूप भयंकर होणार आहे, खूप वाढणार आहे हा त्यात उल्लेख केला होता. २००४ ते २०२४ असा २० वर्षांचा कालावधी गेला. लोक शहाणेही होत नाहीत आणि समजूनही घेत नाहीत. पत्रकार म्हणून आम्ही आधीच लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करतो पण लोकांना आणि प्रशासनालाही ते समजत नाही. निष्क्रिय प्रशासन अशा पद्धतीने काम करते. किती डेसिबलमध्ये किती वाजेपर्यंत वाजवावं यासबंधी नियम असताना, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा पोलीस त्यांच्यावरील विविध दबावांमुळे या गोष्टींना परवानगी देतात. स्वतः पोलिस सुद्धा अशा डीजेवर नाचतानाचे व्हायरल झालेले व्हिडिओ आपण पहिले आहेत. ज्यांनी कायदा सुव्यवस्था पाळायची त्यांनीच असे केले तर ते कोठेतरी मनाला सलते.

ससून हॉस्पिटल हे पुणे विभागातील प्रमुख रुग्णालय आहे. त्याच्या दारात डीजेचा धांगडधिंगा आपण घालत असतो. आपल्या घरी रुग्ण असतील तर घरात साधी म्युझिक सिस्टीम तरी मोठ्या आवाजात वाजवू का? ते आपण करत नसू तर रुग्णालयांच्या दारात असे डीजे कसे काय वाजवू शकतो? पुणे विमानतळावर एका विमानाचे लैंडिंग होत असताना लोहगाव परिसरात एका जयंती कार्यक्रमात लेसर लाइटचा प्रचंड वापर सुरू होता. त्या लेसर लाइट वैमानिकाला त्रासदायक ठरत असल्याने त्याने ते विमानतळाला कळवले. विमानतळाने तातडीने पोलिस आयुक्तांना कळवून ही मिरवणूक थांबवली.

समजा विमानाच्या लैंडिंगवेळी काही अपघात झाला असता, तर किमान दीडेकशे प्रवाशांचे काही बरेवाईट झाले असते. जगात अशा गोष्टी कोणीही वापरत नाही. आपण त्या वापरतो आणि स्वतःला प्रगत समाज (?) म्हणवतो. आपल्या समाजाला सकारात्मक दिशा हवी की नको हे ठरवण्याची आता खरोखर वेळ आली आहे. वर्षानुवर्षे अशा गोष्टी वाढत जात आहेत आणि आपण मागे मागे जात आहोत. त्यामुळे अशा बाबींवर वाया जाणारी शक्ती आणि ऊर्जा आपल्याला अन्य चांगल्या गोष्टींसाठी वापरता येत नाही ही खेदाची बाब आहे.

पत्रकारिता आपापल्या आवाका आणि स्वातंत्र्याच्या बळावर शक्य ते करण्याचा प्रयत्न करत राहील. पण ज्या शासन, प्रशासन आणि न्यायालयाच्या अधिकार कक्षेत पत्रकारिता अधिक्षेप करू शकत नाही. पत्रकारितेच्या मर्यादा लक्षात घेऊन जनमताच्या रेट्यासह या सर्व यंत्रणांनी लोकांच्या अशा प्रश्नांना हात घातला पाहिजे. मुळात सर्व प्रकारच्या प्रक्षणविरहित जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे आणि सर्वांनी त्याचा आदर राखला पाहिजे, हो मान्यता संपत चालली आहे. कारण आपण संवैधानिक चर्चा करतो. अंमल करत नाही. असा बलशाली आणि जागतिक महासत्ता (?) बनणारे भारत हे राष्ट्र आपण कुठे घेऊन जाणार आहोत? आणि ते काय कामाचे?
(लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांशी संबंधित आहेत.)


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading