Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
आमची अंगणवाडी कॅन्सल करू नका
———————
( वादळामुळे झाली उपरती )
मित्रांनो
लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ३० सप्टेंबर १९९३ साली प्रलयंकारी भूकंप झाला होता याची तुम्हा सर्वांनाच माहिती असेल.
दोन्ही जिल्ह्यांमध्ये या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. तसेच प्राणहानी सुध्दा झाली होती.दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण ५२ गावे जवळपास बेचिराख झाली होती . ६.२ रिश्टरचा भूकंप झाला होता.
शासनाने युद्ध पातळीवर पुनर्वसनाचे काम हाती घेतले. त्यासाठी एकूण १० डिव्हिजन ऑफिसेस तातडीने सुरु केले होते. या दहा ऑफिसेस पैकी उमरग्याच्या एका ऑफिसला Executive Engineer म्हणून माझी पोस्टिंग शासनाने केली . तिथे मी पाच वर्षे काम केले.
या पाच वर्षांमध्ये बेचिराख झालेल्या एकूण ५ गावांचे संपूर्ण पुनर्वसन केले. १८ हजार घरांचे Retrofitting म्हणजे क्षतिग्रस्त झालेल्या घरांची तंत्रशुध्द पध्दतीने दुरुस्ती आणि १५० नविन अंगणवाड्या आणि १०० शाळेच्या इमारतींची दुरूस्ती
एवढी सगळी कामे माझ्या ऑफिसने केली.पाच वर्षात शंभर टक्के टार्गेट पूर्ण केले.
यासर्व कामांपैकी एका छोट्या कामाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.
शासनातर्फे प्रत्येक खेड्यामध्ये नवीन अंगणवाडी बांधण्याचा कार्यक्रम होता. तुळजापूर तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या बांधण्याचे काम माझ्या ऑफिसकडे होते.
योजना अशी होती की ज्या गावाला नवीन अंगणवाडी मंजूर झाली आहे त्या गावच्या ग्रामपंचायतीने बाराशे चौरस फूट जमिनीचे संमतिपत्र आम्हाला ठराव पास करून करून द्यावे व मग आमच्या ऑफिसतर्फे तिथे अंगणवाडी बांधली जाईल.जे गाव संमतिपत्र देणार नाही त्या गावात अर्थातच अंगणवाडी बांधली जाणार नाही.
आम्हाला बहुतेक कोणत्याही गावी असे संमतिपत्र मिळण्यास कांहीही अडचण आली.
पण एका गावी मात्र मला वेगळाच अनुभव आला. ग्रामपंचायत मेंबर्स मधील अंतर्गत कलह, हेवेदावे, दुफळी या कारणांमुळे माझ्या स्टाफला त्या गावाकडून संमतिपत्र मिळेच ना.माझ्या डेप्युटी इंजिनिअरने तसा रिपोर्टही मला सादर केला .मी म्हटले एकदा मी स्वत: त्या गावाला व्हिजिट देऊन प्रयत्न करून पहातो.
मी त्या गावी ग्रामपंचायत बोलावली. पण तिथली मंडळी आपल्या आडमुठे पणावर कायमच होती.ते लोक त्यांच्या अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे मला संमतिपत्र द्यायला तयारच नव्हते.
मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो,” मंडळी शासनाकडे बहुतेक पैशांची चणचण असते म्हणून विकासाची कामे वर्षोनवर्षे रखडतात पण भूकंपग्रस्त गावांसाठी शासनाने भरपूर निधी दिला आहे . त्याचा तुमच्या गावासाठी फायदा करून घ्या. आम्हाला संमतिचा ठराव करून द्या. आम्ही तंत्रशुद्ध पध्दतीने अंगणवाडीचे बांधकाम करून देऊ . तुमच्यामधील मतभेदामुळे लहान मुलांचे नुकसान करू नका…”
माझ्या या शिष्टाईचा कांहीही उपयोग झाला नाही.
मंडळी मला म्हणाली ,” साहेब , आम्ही कांही जमिनीचा ठराव देणार नाही. आम्हाला आहे एक जुनी अंगणवाडी ! तुम्ही जावा आपलं परत. आमचं आम्ही बघून घेऊ. “
स्वत:च नाक कापलं तरी हरकत नाही पण समोरच्याला अपशकुन झाला पाहिजे.या म्हणीचा प्रत्यय मला तिथे आला.
मी म्हटले, ठीक आहे मंडळी. तुम्ही जमिनीचा ठराव करून द्यायचाच नाही असं म्हणताहात तर मी परत जातो. तुमची अंगणवाडी मात्र मला आता कॅन्सल करावी लागेल. ती मी आता दुसऱ्या होतकरू गावाला बांधीन…पण मला तुमची सध्याची अंगणवाडी कशी आहे ते तरी बघू द्या…”
गावच्या लोकांनी मला जुनी अंगणवाडी दाखवली. ती एक मोडकळीस आलेली दोन खोल्यांची जागा होती.छताच्या पत्र्यांचे fixtures निघून गेले होते .इमारत धोकादायक झाली होती.
मला रहावले नाही . मी म्हटले, ” मंडळी ही इमारत धोकादायक आहे . कांहीही होऊ शकते “
तरी सुध्दा लोक मला म्हणाले, ” आमचं आम्ही बघून घेऊ..”
मी परत जायला निघणार….
एवढ्यात सोसाट्याचे वादळ आले आणि पाच मिनिटांमध्ये त्या अंगणवाडीवरील दोन पत्रे आकाशात उंच उडाले व मग खाली पडले . या पत्र्यांमुळे बालवाडीतली दोन छोटी मुले जखमी झाली होती. मी त्या मुलांच्या पालकांना कारमध्ये बसायला सांगितले व ते मुलांना घेऊन निमुटपणे गाडीत बसले. ड्रायव्हरला सांगितले, कार अणदूरच्या दवाखान्यात घेऊन चला. एकदम फास्ट .कांही वेळातच आम्ही दवाखान्यात पोहोंचले . तेथील डाॅक्टर्सनी तातडीने मुलांवर उपचार केले. सुदैवानी एकाही मुलाला गंभीर इजा झाली नव्हती .
मुलांना घेऊन मी परत त्या गावात आलो. लोक माझी वाट पहात थांबले होते .मी गावकऱ्यांच्या स्वाधीन मुलं केली .आणि त्या लोकांना म्हणालो, ” मंडळी सुदैवांने मुलांना गंभीर झाली नाही. डाॅक्टरांनी औषधोपचार केला आहे. आता काळजीचं कांही विशेष कारण नाही..लेकरांना सांभाळा येतो मी…”
मी निघालो. पण लोकांनी माझी कार अडवली.
मी खाली उतरलो.
त्यांचा म्होरक्या मला म्हणाला..” साहेब आम्हाला माफ करा. आम्ही माती खाल्ली.आमच्या हेव्यादाव्यात लेकरांचं नुकसान करायला निघालो होतो.पण आता असं होणार नाही. तुम्हाला आम्ही आत्ताच्या आत्ता संमतिपत्र अन् ग्रामपंचायतीचा ठराव करून देतो. तो घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका अन् मेहेरबानी करून आमची अंगणवाडी कॅन्सल करू नका..”
मला काय ? मला तर हेच हवे होते…
एका तासामध्ये त्या गावकऱ्यांकडून जमिनीचे संमतिपत्र, काॅफीचा पाहुणचार व भरपूर सदिच्छा व आदर एवढा सगळा ऐवज घेऊन मी आनंदाने उमरग्याला परत आलो .
माझ्या साडेछत्तीस वर्षांच्या सर्व्हीस मध्ये माझे प्रकल्प यशस्वी करण्यात मला खूप लोकांचे सहकार्य मिळाले.
पण या प्रकरणी मात्र चक्क निसर्गच माझ्या मदतीला धावून आला…..
कदाचित त्याला वाटले असावे..” चला.. हा बिचारा एवढ्या तळमळीने. प्रयत्न करतोय तर आपण त्याला मदत करू या ..”
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.