आला पाऊस !
पहिला पाऊस आला की मन अगदी आनंदून जाते. अशा वेळी, आपल्या भावना व्यक्त करायला कवि, कवियत्री यांच्या शब्दांचा सहारा घेतल्या वाचून आपल्या भावना व्यक्त करणे अवघड होते.
खानदेशच्या महान कवियत्री, बहिणाबाई चौधरी यांनी केलेले खेड्यातल्या पहिल्या पावसाचे वर्णन हे त्यांच्या कवीमनाची साक्ष देते. (यातील आज आपल्याला कठीण वाटणाऱ्या शब्दांचा अर्थ शेवटी दिलेला आहे)
आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
आला पाऊस पाऊस
आता सरीवर सरी
शेतं शिवार भिजले
आला पाऊस पाऊस’
आता धूमधडाक्यानं
घर लागले गयाले
खारी गेली वाहीसन
आला पाऊस पाऊस
ललकारी ते ठोकत
पोरं निघाले भिजत
आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडले घरात
आता उगू दे रे शेतं
आला पाऊस पाऊस
वऱ्हे येऊ दे रे रोपं
येता पाऊस पाऊस
पावसाची लागे झडी
आता खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी
देवा पाऊस पाऊस
तुझ्या डोयातले आंस
दैवा तुझा रे हारास
जीवा तुझी रे मिरास !
बहिणाबाई चौधरी
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
कठिण शब्दांचा अर्थ:
पह्यला= पहिला
धरत्रीचा परमय= धरित्रीचा परिमळ, म्हणजेच सुगंध
गयाले= गळायला
खारी= पिवळी चिक्कन माती
वाहीसन= वाहून
चिल्लाया= आरोळ्या
वऱ्हे= वर
हाऊस= हौस
घरांमधी बसा दडी= घरात दडी मारून बसा
तुझ्या डोयातले आंस= तुझ्या डोळ्यातले अश्रू
हारास= लिलाव
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.



