Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
गावपातळीवरील
—————
राजकारणाची एका छोटीसी
———————
झलक
——-
साधारणपणे १९७४ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी पाणीपुरवठा खात्यात ज्युनियर इंजिनीअर म्हणून काम करीत होतो .ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना तयार करण्यासाठी वेगवेगळ्या खेड्यांत मला सर्व्हे करण्यासाठी जावे लागायचे. तिथे चार पाच दिवस मुक्काम करावा लागायचा .नदी काठी प्रस्तावित विहीरीच्या जागेचा सर्व्हे , रायजिंग मेन म्हणजे नदीकाठच्या प्रस्तावित विहीरीपासून गावातील प्रस्तावित टाकीपर्यंत टाकायच्या पाईपच्या अलाईनमेंटचा सर्व्हे , प्रस्तावित टाकीच्या जागेचा सर्व्हे आणि Distribution system म्हणजे गावातल्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पाणी वितरण व्यवस्थे साठी करावयाचा सर्व्हे असे साधारणपणे कामाचे तांत्रिक स्वरूप होते.त्या काळात खेड्यापाड्यांमध्ये चुकुन माकुन एखादी दुसरी चहाची टपरी असायची.मुक्काम करण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी शहरातल्या सारखी लाॅजिंग बोर्डींगची सोय असणारे हाॅटेल्स खेड्यात नसतं .त्यामुळे
आमचा मुक्काम ग्रामपंचायतीमध्येच असायचा. आम्ही दौऱ्यावर येतांना आपले अंथरूण पांघरूण बरोबर घेऊन यायचो. जेवणासाठी आम्ही आमचे किचन किट बरोबरच ठेवायचो. त्यामध्ये स्टोव्ह, पुरेसे राॅकेल, पीठ, मीठ, दाळ, तांदूळ, तेल, तिखट , चहा साखर इत्यादी सर्व आवश्यक वस्तू असंत .भांड्यांचा सेट आम्हाला आॅफिसतर्फे मिळायचा. व आमचे जेवण खाण नाश्तापाणी हे तयार करण्यासाठी एक अटेन्डट सोबत मिळायचा.सर्व्हे करण्यासाठी लागणारे चारपाच मजूर आम्ही डेली वेजेसवर गावातूनच घ्यायचो.त्यावेळी नियमित बससेवा फार कमी खेड्यांमध्ये होती म्हणून आमचे डेप्युटी इंजिनीअर आम्हाला जीपने खेड्यात आणून सोडायचे व ठरल्याप्रमाणे परत चार पाच दिवसांनी आम्हाला वापस घेऊन जाण्यासाठी जीप घेऊन यायचे.
आम्ही गावात आलो की कांही मिनिटांतच पाणी पुरवठ्याचे इंजिनियर लोक आलेत ही बातमी वाऱ्या सारखी गावभर पसरायची. खेड्यात रिकामटेकडे लोक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात . त्यांच्यापैकी कांहीजण नुसतेच आम्हाला पहाण्यासाठी यायचे.आपण झू मध्ये जातो ना वन्य प्राणी पहायला , अगदी सेम तसेच आम्हाला पहायला कांही लोक यायचे. थोडंसं दूर अंतरावर उभे राहून आपसात हळू आवाजात बोलायचे . अर्थात आमच्याबद्दलच ते बोलणे असे. हा प्रकार मोठा आॅकवर्ड वाटायचा. पण काय करणार ना !!!
एका खेड्याच्या सर्व्हेसाठी दोन junior engineers पुरे असतात.आम्ही आल्या आल्या कोतवालाला सूचना द्यायचो की , जा सरपंचांना सांग की पाणी पुरवठा योजनेचा सर्व्हे करणारे इंजिनियर लोक आलेयत आणि तुम्हाला बोलावलयं. सरपंच नसले तर उप सरपंचाला सांग आणि ते ही नसले तर चार दोन मेंबरांना बोलाऊन घेऊन ये. आम्ही योजनेची माहिती देणार आहोत म्हणा.’
मग जे कोणी येतील त्यांना आम्ही पाणी पुरवठा योजनेचे स्वरूप त्यांना समजेल अशा स्टाईल मध्ये समजावून सांगायचो व मग यथावकाश survey instruments घेऊन सर्व्हेचे काम सुरू करायचो.
सर्व्हेचे काम साधारणपणे चारपाच दिवसात पूर्ण व्हायचं . मग ठरल्याप्रमाणे आमचे डेप्युटी इंजिनियर जीप घेऊन यायचे व आम्हाला औरंगाबादला परत आणायचे.
पाणी पुरवठा ही एक अत्यावश्यक बाब असल्यामुळे आम्ही ज्या खेड्यात जाऊ तिथल्या लोकांत उत्साह आणि आनंद पसरायचा की चला आता आपल्याला पिण्याचं पाणी आपल्या घरोघरी नळातून मिळणार . रोज दूर अंतरावरून पिण्याचे पाणी आणण्याचा आपला आणि विशेषत: आपल्या बायकांचा कित्येक वर्षांपासून होणारा त्रास लवकरच संपणार आणि तो ही सरकारी खर्चाने ! म्हणून तमाम मंडळी खूष असंत .संध्याकाळी गावची तालेवार मंडळी आम्हाला येऊन भेटत .योजनेची माहिती विचारीत . मीही त्यांच समाधान होईल अशी माहिती देत असे. मग कुणीतरी आपल्या गड्याला सांगत असे , जा रे आपल्या घरला जाऊन सायेब लोकान्साठी च्या पोहे घेऊन ये. मग थोड्या वेळानी आमच्या साठी चहा पोह्याचा नाश्ता यायचा. सरपंच आणि इतर लोक सुद्धा अदबीने बोलायचे.कुणीतरी विचारायचं, सायेब सर्वेला किती दिवस लागतील.. मी म्हणायचो .’ चार पाच दिवसात सहज सर्व्हे पूर्ण होईल.’
पुढचा प्रश्न ‘.,अन् मंग तेच्यानंतर काय हुईल ? ‘
माझं उत्तर , ‘ त्याच्यानंतर आम्ही औरंगाबादच्या आॅफिस मध्ये बसून या पाणी पुरवठा योजनेचे प्लॅन्स ड्राॅईंग्ज डिझाईन्स आणि एस्टिमेट्स तयार करू. याच्यासाठी आम्हाला औरंगाबादला पंधरा दिवस लागतील.नंतर या योजनेला मंजूरी मिळेल.नंतर निधी उपलब्ध होईल. नंतर टेंडर्स बोलावले जातील . त्यानंतर योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू होईल व त्यानंतर साधारणपणे नऊ महिन्यात काम पूर्ण होऊन तुम्हाला घरामध्ये कनेक्शन घेऊन पिण्याचं पाणी मिळू शकेल..’ मी थोडक्यात अशी माहिती देत असे.
मग सगळे लोक आम्हाला काम लवकरात लवकर केलंत तर लई चांगल होईल बघा , त्याच्यासाठी तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आनंदाने द्यायला आम्ही तयार आहोत असं सांगायचे..
हा झाला सर्व साधारणपणे आमचा जनरल अनुभव .
पण एका खेड्यात मात्र वेगळाच अनुभव आला.आमचा सर्व्हे संपायच्या शेवटच्या दिवशी रात्री ८ च्या सुमारास दोन तीन जण आले. मला म्हणाले . ‘ इंजनेर सायेब यावं का, थोडं महत्वाचं बोलायचं व्हतं .’
मला वाटलं नेहमीप्रमाणे लवकर योजना तयार करा अशी विनंती करायला मंडळी आली असावी. मी म्हटलं ,’ या की, बसा अन् सांगा काय सांगायचं ते.’
त्यावर त्यांचा म्होरक्या म्हणाला, ‘ तुमी म्हनला व्हता की तुमाला सर्वे कराया पाच दिवस अन् यवजनेचे एष्टीमेट कराया पंधरा दिवस लागतील म्हनून शान..’
मी म्हटलं, ‘ होय की तेवढ्या वेळात मी नक्कीच करू शकतो..’
त्यावर त्यांचा म्होरक्या म्हणाला., ‘इंजनेर सायेब इतक्या फाष्ट यवजनेचे एष्टीमेट करायची काय पन गरज नाही. आम्ही तर म्हन्तो तुमी चांगले पाचसहा महिने एष्टीमेट लांबवा . तेच्यात काई बी आब्जेक्शन काढा अन् मधी खोडा घाला..’
मी अवाक् झालो आपल्याच गावच्या विरोधात हे लोक अशी मागणी का करताहेत हे मला समजेना.
मी त्यांना म्हटलं अहो प्रत्येक गावातले लोक आम्हाला लवकरात लवकर काम करण्यासाठी सांगतात आणि तुम्ही अशी विपरित मागणी कशी करू शकता. त्याचं काय कारण आहे.’..
त्यावर म्होरक्या म्हणाला, ‘ सायेब हे गावचं पाल्टिक्स असतं. तुमच्या सारख्यांना न्हाई समजायचं . तरी बी सांगतो. अावो सायेब जर यवजना लवकर पूर्न झाली तर त्याचं समदं क्रेडिट सरपंचास्नी जाईल. पुडच्या इलेक्शनमधे आमाला त्याला पाडायचंय अन् मला सरपंच व्हायाचंय . त्याच्या काळात पानीपुरवठा यवजना वेळेवर करून घेन्यात हा सरपंच फेल गेला आसं मला प्रचारात त्याच्या आपोजिटमधे बोंबाबोंब करून सांगता आलं फायजे. म्हनून तुमाला मी रिक्वेष्ट करतो की काहीतरी टेक्निकल पाईंट काढून तुम्ही ही यवजना लांबवा.
अन् सायेब अाम्ही काही नुस्तीच कोरडी रिक्वेष्ट करत न्हाई . तुमची काय राजी खुशी आसंल, च्या पानी आसंल ते खुल्लं सांगा . तुमी आमचं यवढं मोठं काम करनार म्हनल्यावर आम्ही बी तुम्हाला खुश करूच की .’
अर्थात असे स्वार्थी आणि
गलिच्छ राजकारण
करणाऱ्या
पुढाऱ्याला मी भीक घातली
नाही हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.
पण हा अनुभव मात्र मला बरंच कांही शिकवून गेला !!!
लेखक:- श्री व्ही. डी. भोपे
निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, महाराष्ट्र सरकार
This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.