महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील ब्रह्मलीन सत्पुरुष आणि सुप्रसिद्ध संत ब्रह्मीभूत श्री गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व नाम भक्तांना सुपरिचित आहेत. त्यांच्या रोजच्या छोट्या आणि सुटसुटीत प्रवचनांचे पुस्तकही सगळ्यांच्या परिचयाचे आहे. या पुस्तकात वर्षातील ३६५ दिवसांची प्रवचने- रोजचे एक प्रवचन या स्वरूपात दिले आहे. ही प्रवचनें बऱ्याच भक्तांनी आपल्या आवाजात प्रस्तुत केलेली, उपलब्ध आहेत. अशाच एका “भक्ति सुधा” या चॅनल वरील प्रवचनें रोज या ब्लॉग च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आशा आहे की परमार्थाची आवड असणाऱ्या भाविकांना ही प्रवचने. उपयुक्त ठरतील
२५ मार्च
प्रपंच केवळ कर्तव्यकर्म म्हणून करा.
एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले, ‘मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही.’ त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन, विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हांला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे; त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमतो. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यांमध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ? नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे.
आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही, तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे; तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे ? ‘तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग’, असे जर आपण एखाद्याला विचारले, तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की, तत्त्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरुरी नाही; पण ही गोष्ट कुणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही, आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला ‘मी सुखी आहे’ असे वाटणे कधी शक्य आहे का ? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर, प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते; परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे, जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हांला कसे मिळविता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल, आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.
८५. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.