आठवणीतील गोकुळाष्टमी- विस्मृतीत गेलेले मातीचे गोकुळ Gokulashtami 2024
आज गोकुळअष्टमी, आणि उद्या दहीहंडी. दहीहंडीच्या दिवशी मुंबईसारख्या महानगरांत आणि इतर शहरात जो ‘राजकीय’ उत्सव होतो, तो आपल्या सर्वांना चांगलाच माहिती आहे.
पण या निमित्ताने मन सहज भूतकाळात गेले, आणि साधारण 50-55 वर्षांपूर्वी गोकुळाष्टमी Gokulashtami कशी साजरी व्हायची याचा मन धांडोळा घेऊ लागले.
श्रावण लागल्यापासून एक प्रकारचे धार्मिक वातावरण आपोआपच तयार होत असे. श्रावणतील पाहिला सण- राखी पोर्णिमा होऊन गेल्यानंतर, वेध लागत ते गोकुळाष्टमीचे. Gokulashtami che. श्रावण महिन्यातील भर पावसात, रात्रीच्या अंधारात, कारागृहाच्या बंदिस्त दरवाज्यांच्या आड झालेला कृष्णजन्म- कंसाच्या भीतीने पिता वसुदेवाने त्याला रात्रीच्या अंधारात, उफाण आलेल्या यमुनेला पार करून गोकुळात घेऊन जाणे, गोकुळात यशोदेच्या पोटी जन्मलेली साक्षात आदिमाया हिला घेऊन परत मथुरेला येणे, आणि कंसाचे, प्राण भयाने त्या नवजात कोमल बालिकेला पायाला धरून दगडावर आपटणे. त्या आदिमायेचे आकाशात जाऊन कंस वधाची भविष्यवाणी वर्तवणे. या सगळ्या गोष्टी कितीही वेळेस ऐकल्या तरी प्रत्येक वेळी अंगावर काटा उभ्या केल्याशिवाय राहत नाहीत.
पण इतक्या अडचणींवर मात करून झालेला कृष्ण जन्म म्हणजे आनंदाची पर्वणीच. अशा या कृष्ण जन्मोत्सवाची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या दिवशी (On the day of gokulashtami) कृष्ण जन्मे पर्यंत घरोघरी लहान थोर, उपवास करून त्या कृष्णाच्या आगमनाची वाट पाहत.

त्या दिवसाची आठवण म्हणून घरोघरी, लाकडाच्या पाटावर, शेतात जाऊन आणलेल्या काळ्याशार आणि मऊसूत अशा चिकण मातीने गोकुळाची प्रतिकृति साकारली जात असे.
लहान मुले उत्साहाने आजूबाजूच्या शेतात जाऊन काळी माती गोळा करून आणत. त्या निमित्ताने काळ्या आईशी यथेच्छ खेळायला मिळत असे. अंग, कपडे, हात पाय सर्व काळ्या मातीने माखले जात. घरी आणल्यावर घरातील आई, आज्जी, इत्यादि मंडळी त्या मातीतील काडी कचरा खडे गोटे काढून ती स्वच्छ करून पाणी टाकून छान मळून देत.
घरात लाकडाचे अनेक पाट असत. त्यातील मोठयाशा पाटावर मग गोकुळ साकारायला सुरुवात होत असे. त्याला सगळ्यांचेच हात लागत. आधी चहू बाजूंनी गावाची तटबंदी आखली जात असे. मग गोकुळातील विविध गोष्टी साकारल्या जात. आणि विविध पात्रे- त्यात गोप, गोपी, पेंदया, गाई, आणि एक गाढवही असायचे आणि कुत्राही असायचा! निसर्गातील झाडे, प्राणी या सर्वाविषयी आपुलकीची भावना यात दिसून येते. त्या गोकुळात काही ठिकाणी पूतना मावशीही असायची! पिंपळाचा पार,(त्याच्यावर पिंपळाच्या झाडाची एक फांदी), तुळशी वृंदावन, जाते, उखळ, चूल, तवा. नंद बाबाचे घर, त्या घरातील एक पाळणा, आणि त्या पाळण्यात, एक पिंपळाचे पान आणि/ किंवा एक छान मऊसूत रंगीत कपडा अंथरूण त्यावर बाळ कृष्णाची स्वारी!

या सगळ्या गोष्टी बनवतांना घरातील सगळ्यांच्या कलात्मकतेला, सृजनात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला किती वाव मिळत असेल कल्पना करा. आणि घरातील लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांची त्यात involvement असे. सगळ्या घरात उत्साहाचे वातावरण असे. बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून सुंठ साखरेचे मिश्रण तयार केले जाई. काही ठिकाणी डिंकाचा लाडूही नैवेद्याला केला जाई. या पावसाळ्याच्या दिवसात थंडीमुळे होणारे उपद्रव टाळण्यासाठी सुंठ आणि साखरेची योजना किती योग्य वाटते! वरील गोकुळातील पात्रांना सजविण्यासाठी ज्वारीचे दाणे वापरले जात. तसेच तुळशी वृंदावनावर छोटीशी तुळस ठेवली जाई. नंद बाबाच्या घरी भाकऱ्यांची चळत, लोण्याचे भांडेही साकारले जाई. ठिकठिकाणी गोकर्णाची निळी फुले आणि इतर त्या ऋतुतील फुले ठेवून गोकुळ सजवले जाई. आणि मग संध्याकाळी, सर्वजण जमून कृष्णजन्म साजरा करीत, कृष्णाचा पाळणा म्हटला जाई
गोकुळाष्टमी-(Gokulashtami)- कीर्तन
गावातील मंदिरात कीर्तनकार कृष्णजन्माची कथा रंगवून रंगवून सांगत. मंदिरातही कृष्णाला पाळण्यात ठेवून, कृष्ण जन्म साजरा केला जाई. आणि त्यावेळी मिळणारा प्रसाद- सुंठ, खोबरे, खसखस, खडीसाखर इत्यादिचे मिश्रण (याला उत्तरेकडे पंजिरी म्हणतात) अगदी अप्रतिम लागत असे.
मग दुसऱ्या दिवशी दुपारपासून दहीहंडीची धूम सुरू होत असे. पण दहीहंडीला आजच्या सारखे अक्राळ विक्राळ स्वरूप प्राप्त झाले नव्हते. तो एक मर्यादित कार्यक्रम असे. मंदिरातही दहीहंडी होत असे. तिथे घराघरातून लोक गोपाळकाल्यासाठी पदार्थ घेऊन येत. त्यात भिजवलेले पोहे, ज्वारीच्या लाहया,कैरीचे आणि लिंबाचे लोणचे, काकडी, डाळिंब, पेरूच्या फोडी, भिजवलेली चण्याची डाळ, दही, इत्यादि साहित्य सगळ्यांच्या घरातून आलेले, निरनिराळ्या चवीचे साहित्य एका मोठ्या भांड्यात एकत्र केल्यानंतर जी अप्रतिम चव तयार होते, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. (आजच्या न्यूट्रिशन च्या दृष्टीने पाहिले तर यात पौष्टिक आणि पाचक पदार्थ एकत्र केल्याचे दिसून येते.)मंदिरातील दहीहंडी छोट्या प्रमाणावर असे, आणि हा एकत्र केलेला गोपालकाला त्या हंडीत ठेवला जाई, आणि हंडी फोडल्यावर त्यातील काही कण आपल्याला मिळावे म्हणून सगळ्यांची झुंबड उडत असे. अर्थात नंतर सगळ्यांना तो मोठ्या पातेल्यातील एकत्र केलेला काला द्रोणात भरून दिला जाई. आणि तो लोक घरी घेऊन जात आणि घरातील इतर सदस्यांना देत.
चौकाचौकात जो दहीहंडी चा कार्यक्रम होई, त्याची मजा लोक आजूबाजूच्या घरांच्या गॅलऱ्यांमधून घेत. त्या परिसरातील सधन लोक काही बक्षिस ठेवत. पण हा सर्व कार्यक्रम एका मर्यादेत होता. त्याला बाजारू स्वरूप आले नव्हते.
विदर्भातील गोकुळाष्टमी
विदर्भात गोकुळाष्टमीला कानोबा म्हणतात. गणपतीला करतात तशी आरास करून कृष्णाची मूर्ती बनवतात. फुलोरा ही करतात. सकाळी मूर्तीची स्थापना करतात. त्या दिवशी कुटुंबातील मोठ्या माणसांना उपवास यसतो. दुपारपर्यंत मूर्तीची स्थापना होते. त्या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण करतात. पूर्वी कृष्णलीलेवर छोटेखानी नाटक सुद्धा बसवत. भरगच्च कार्यक्रम असत. रात्री बरोबर बारा वाजता फुलोरा हलतांना कोणाला तरी दिसायचा. त्यानंतर जन्मोत्सव, आरत्या वगैरे रात्री 2 पर्यन्त चालायचे. दुसऱ्या दिवशी सर्वांना घरी जेवायला बोलावत. संध्याकाळी मूर्तीचे वाजत गाजत विसर्जन करीत. (विदर्भातील माहिती ग्रुप मधील बान्ते कुटुंबीयांनी पुरविली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद)

आजकाल कित्येक दिवस आधी वर्गणी करून केले जाणारे कार्यक्रम, अशा कार्यक्रमांत समाजातील तथाकथित ‘दादा’ आणि ‘भाईंचा’ सहभाग, विविध राजकीय पक्षांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, डीजेचा कर्कश दणडणाट या सर्व पार्श्वभूमीवर, आठवणीतील साधेसुधे पण निसर्गाशी जवळीक सांगणारे, माणसामाणसांतील नाती जपणारे त्या काळातील सण उत्सव आठवले की असे वाटते, की ते दिवस आता पुन्हा कधी येणार नाही!
माधव भोपे
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.