https://goodworld.in A website by Madhav Bhope

google-pay-story

Google Pay पेमेंट झाले… पण पैसे गेले कुठे? – QR कोडमुळे घडलेला खरा अनुभव

गेल्या काही वर्षांत, विशेषतः करोना नंतर, डिजिटल पेमेंट हे आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. गूगल पे, फोन पे, पेटीएम यासारखी अनेक ऍप्स आपण अगदी सहजपणे वापरीत आहोत. मोठ्या दुकानांपासून, मॉल पासून ते छोट्या दुकानदारांपर्यंत आणि वडा पाव वाल्यापासून, छोट्याशा भाजीवाली पर्यंत, भारताच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येकजणासाठी डिजीटल पेमेंट अत्यंत सोयीचे झाले आहे.

मात्र आपण मधून मधून या माध्यमातून होणारे तुरळक फसवणुकीचे प्रकारही ऐकतो आणि वाचतो. असे प्रकार वाचल्यामुळे, “ते गूगल पे फोन पे आपण वापरतच नाही बाबा!” असे म्हणणारेही बरेच आहेत, आणि माझ्या पाहण्यात यांत वयस्करच नाही तर काही तरूण मंडळीही आहेत. असो. आज तो विषय नाही.

पण हे वापरत असतांना, अभावितपणेच कधी कधी कशी चूक होऊ शकते, त्याबद्दल एक किस्सा आज सांगायचा आहे!

मी, जेंव्हा पासून हे डिजिटल पेमेंट सुरू झाले, तेंव्हापासून वापरतो आहे. त्यामुळे एटीएमच्या चकरा कमी झाल्या आहेत. वर्षातून जास्तीतजास्त 2-4 वेळेला एटीएम ला जायचे काम पडते. त्यामुळे पूर्वी, एटीएमला कॅश नसणे, एटीएम बंद असणे, विशेषतः आपल्या बँकेच्या एटीएम्स ची दुरवस्था, तसेंच पाहिजे त्या नोटा न मिळणे, इत्यादि असंख्य गैरसोयीं पासून सुटका मिळाली आहे. आता खिशात पाकीट, एटीएम कार्ड असण्याची आवश्यकता भासत नाही, फक्त मोबाईल असला की पुरे!

असो. तरीही आपल्या यू पी आय ऍप ( गूगल पे, इत्यादि) चा वापर करतांना कधी कधी अभावितपणे कशी चूक होऊ शकते याचा हा किस्सा!

साधारण दोन महिन्यांपूर्वी, मी आणि सौ, आम्ही दोघे बाहेर खरेदी करायला निघालो होतो. काही किरकोळ वस्तू आणायच्या होत्या आणि मुख्य म्हणजे रोज वापरायच्या काही साड्या खरेदी करायच्या होत्या.

आम्ही दोघे, गाडीने  बाहेर पडलो. त्रिमूर्ती चौकातल्या एका दुकानात, काही स्टेशनरी, दोऱ्या वगैरे असे काही सामान घ्यायचे होते. वेळ संध्याकाळची होती. आम्ही त्या दुकानातून 110 रुपयांचे सामान घेतले, आणि सवयीप्रमाणे, समोर दिसणारा क्यू आर कोड स्कॅन केला आणि त्यात रक्कम टाकणार, इतक्यात,  दुकानाचा राजस्थानी वाटणारा मालक, , जो वयस्कर होता, म्हणाला, की तो क्यू आर कोड खराब आहे, तुम्ही कॅशच पेमेंट करा. रक्कम थोडी होती, आणि आमच्याजवळ तेवढी कॅश होती, त्यामुळे मी 110 रुपये त्याला नगदी दिले.

तिथून आम्ही साड्यांची दुकाने शोधत शोधत, गजानन मंदिरापासून, रिलायन्स कडे निघालो. या रस्त्यावर काही साड्यांची दुकाने रोज रस्त्याने येता जातांना दिसतात. त्यांच्यापैकीच एका चांगल्या दिसणाऱ्या साड्यांच्या दुकानात आम्ही शिरलो.

तिथे बऱ्याच वेळ निरनिराळ्या प्रकारच्या साड्या पाहिल्यानंतर, शेवटी 4 साड्या पसंत झाल्या. मनासारख्या साड्या मिळाल्यामुळे आम्ही खुश होतो. साड्यांचे बिल ₹2850 इतके झाले. सेल्समन ने साड्या पॅक करून काउंटरवर दिल्या. पण त्या साड्या काही ठिकाणी चुरगळल्या सारख्या असल्यामुळे साधारण अशा दुकानांमधून, त्या आपल्याला फ्री रोल प्रेस करून देतात. त्याप्रमाणे बिल काउंटर वरचा कॅशियर म्हणाला की रोल प्रेस करून तुम्हाला साड्या परवा मिळतील. अर्थात पेमेंट आपल्याला आधी करावे लागते. त्या प्रमाणे तो कॅशियर बिल बनवू लागला. त्याने बिल बनवले, आणि आम्ही काउंटर वर असणाऱ्या क्यू आर कोडवर माझ्या गूगल पे अँप ने स्कॅन केले, त्याच्यात रक्कम टाकली- ₹.2850. मी पिन टाकला, पेमेंट केले, कॅशियर ला स्क्रीनशॉट दाखवला, त्यानेही ओके म्हणून बिल मला सोपवले आणि आम्ही रोल प्रेस साठी साड्या तिथेच ठेवून, निघालो.

आम्ही घराच्या वाटेवर असतांनाच,गाडी चालवत असतांना, मला अनोळखी नंबर वरून फोन आला. आता आजकाल कोणत्या नंबरवरून कंपन्यांचे कॉल येतात, कोणत्या नंबरवरून फ्रॉड कॉल येतात, ते साधारण माहिती झाले आहे. हा नंबर त्यापैकी वाटत नव्हता. म्हणून मी गाडी बाजूला घेऊन, थांबवून, फोन घेतला. तर तो दुकानदाराचा फोन होता. “ साब, मैं … साडी सेंटर से बोल रहा हूँ. आपका पेमेंट अभी जमा नही हुवा है!”

मला थोड़े आश्चर्य वाटले. मी म्हटले, “ ऐसा कैसे हो सकता है? पेमेंट तो मैंने आपको किया, और आपको बताया भी था. एक मिनिट रुको. में चेक करता हूँ।” असे म्हणून मी गूगल पे वर transaction history वर जाऊन पाहिले. पेमेंट सक्सेस दाखवीत होते. मी त्याला सांगितले, “आप फिरसे चेक करो, मेरे पास तो पेमेंट सक्सेस बता रहा है। चाहे तो मैं आपको स्क्रीन शॉट भेजता हूँ” असे म्हणून मी त्याला माझ्या पेमेंट चा स्क्रीन शॉट पाठविला. तो स्क्रीनशॉट पाठवताना मी त्यावरील नांव पुन्हा एकदा पाहिले. MADANLALPOPATLALCHUTTAR असे सलग नाव त्याच्यात दिसत होते.

बऱ्याच वेळा दुकानदार हे त्यांच्या वैयक्तिक नांवाचा पण क्यू आर कोड तिथे ठेवतात. ते फोनपे चे बिझनेस अकाउंट दिसत होतं. नांव मारवाडी होते, नक्कीच त्या दुकानदाराचे असणार, यामुळे मी आश्वस्त होतो.

मी त्याला नीट बघायला सांगितले. पण तो म्हणू लागला पेमेंट आमच्या खात्यात जमा झाले नाही.

शेवटी मी ठरवले आत्ताच जाऊन काय मामला आहे ते पहावे, म्हणून मी गाडी मागे फिरविली आणि थोड्याच वेळात त्या दुकानासमोर गाडी घेतली.

आत गेल्यावर मी त्याला पुन्हा माझा स्क्रीनशॉट दाखविला. तर तो म्हणतो, हे आमच्या दुकानाचे नांव नाहीच!.

 मग मी तिथे उपलब्ध असणाऱ्या क्यू आर कोड वर स्कॅन करून पाहिले, तर त्याच्यावर देविका सारीज असे लिहून येत होते!

त्याला म्हटले तुझ्याकडे अजून कोणता क्यू आर कोड आहे का?

तेंव्हा त्याने खाली ठेवलेला अजून एक क्यू आर कोड काढून दाखविला.

मी तोही स्कॅन करून पाहिला, त्याच्यावर ही, देविका सारीज असेच लिहून येत होते.

आता मला वेगळीच शंका यायला लागली होती. अलीकडे बरेच किस्से असे वाचण्यात आले होते, की काही लोकांनी काही दुकानांत,  हात गाड्यांच्या ठेल्यांवर, काही फ्रॉडंस्टर्स, तिथल्या क्यू आर कोडच्या वर आपला कोड चिकटवून देतात (दुकानदारांच्या नकळत). आणि बरेच पेमेंट सरळ त्यांच्या खात्यात जमा होतात.

मला नक्की हा असाच प्रकार आहे असे वाटू लागले. आम्ही पेमेंट करीत होतो तेंव्हा तिथे काही व्यक्ती बाहेरच्या होत्या. मी कॅशियर ला सांगितले, आजकाल असे प्रकार होत आहेत. त्यावेळी दुकानात कोण कोण होते ते पहा. तेंव्हा तोही म्हणाला, की ठीक आहे, आपण cctv footage काढून पाहू.

पण  cctv footage बघण्यासाठी त्याने लॅपटॉप ऑन केला, आणि त्याच्या लक्षात आले की cctv camera चालू नव्हता. त्याने तसे आम्हाला सांगितले.

आता आम्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला.  मी त्याला सांगितले की पेमेंट तर मी केले आहे. आणि तुमच्या दुकानातील कोड वरून केले आहे. तुम्ही तसे व्हेरिफाय करून मला बिल ही दिले आहे. त्यामुळे मला माझी वस्तू मिळालीच पाहिजे. त्यावर तो म्हणू लागला, मला पेमेंट मिळाले नाही, मी कशी वस्तू देणार? मी म्हणत होतो, तो प्रॉब्लेम माझा नाही, तुमचा आहे. तुम्ही Upi ची कम्प्लेन्ट  लॉज करा, किंवा काहीही करा!goodworld_upi paymenet blog image

आम्ही दोघेही बराच वेळ वाद घालत राहिलो. मी त्याला हेही म्हटले, की मी साड्या इथे ठेवून गेलो नसतो, तर तुम्ही काय केले असते? या प्रश्नाचे त्याच्या कडेही उत्तर नव्हते. शेवटी मी ठरवले की आपण घरी जाऊन नीट शोध घेऊ आणि पुढे काय करायचे ते ठरवू. असे ठरवून मी घरी परतलो.

घरी परतल्यावर मी ती व्यक्ती (जिला पेमेन्ट केले गेले होते) कोण आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण त्या नावावरून काहीच शोध लागेना.

मला याआधीच, गेल्याच महिन्यात jio fiber च्या बाबतीत failed payment चा अनुभव आला होता आणि याबाबतीतील सगळी प्रोसिजर माहिती झाली होती. त्यामुळे मी लगेच गूगल पे च्या प्लॅटफॉर्मवर dispute raise केला,  तसेच फोनपे ला ही मेल टाकला, माझ्या बँकेला म्हणजे sbi ला पण मेल टाकला, आणि NPCI च्या वेबसाईटवर पण complaint lodge केली. असे सर्व केल्यानंतर मग मी, शांतपणे झोपलो.आता उद्याचे उद्या पाहू, जे करायचे ते सर्व केले आहे म्हणून.

मग दुसऱ्या दिवशी, दुपारच्या नंतर आणि संध्याकाळच्या आत, म्हणजे गर्दी होण्याच्या आत पुन्हा त्या दुकानात गेलो. आणि पुन्हा आमच्या दोघांचे तेच मुद्दे एकमेकांना पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मी त्या कॅशियर ला आजकाल असे किस्से कसे होत आहेत ते सांगितले, आणि जर तुमच्या दुकानातील cctv सुरू असता तर एखाद्या गिऱ्हाईकाच्या मिषाने आलेल्या कोणी तो कोड  ऐनवेळी बदलला असेल ते समजले असते. ही तुमची चूक आहे,  मी तुमच्या दुकानातील कोड वर पेमेंट केले आहे, त्यामुळे तुम्हाला माल द्यावाच लागेल असे पुन्हा पुन्हा सांगू लागलो.

त्यावर cashier चे म्हणणे असे होते की मला मालकाला रोज हिशेब द्यावा लागतो. मी बिना पेमेंट चा, तुम्हाला माल दिला तर माझ्या पगारातून कपात होईल. तुम्ही सुध्दा, devika sarees बघून पेमेंट करायला हवे होते. तुम्ही माझे पेमेंट द्या, मी माल देतो.

दुकानातील इतर कर्मचारीही अर्थात, त्याची बाजू घेत होते. तेथील एक कर्मचारी मला काही समजावून सांगत होता. आधी मी बराच वेळ त्याच्याकडे लक्ष दिले नाही. पण थोड्या वेळाने मला त्याच्या म्हणण्यात काही तथ्य वाटू लागले. तो म्हणत होता, साहेब, तुम्ही नीट आठवून पहा, याआधी तुम्ही कुठे कुठे गेला होतात, आणि गूगल पे ने कुठे कुठे पेमेंट केले. मी त्याला माझी transaction history काढून दाखवली. त्यादिवशी मी गूगल पे ने एकूण ४ पेमेन्ट केले होते. त्यातील २ पेमेन्ट भाजीवाल्याचे होते, रु. १० आणि २० चे, एक टाटा चे होते २०० रु. चे आणि एक चप्पलच्या दुकानाचे ४४० रुपयांचे.

तो म्हणू लागला, साहेब, तुम्ही अजून नीट आठवून पहा: अजून कोणाला पेमेन्ट केले होते का?

मला एकदम त्याच्या म्हणण्यातून एक धागा मिळाला. अरे हो!. मी या साडीच्या दुकानात यायच्या आधी त्रिमूर्ती चौकातील स्टेशनरी सामानाच्या दुकानात गेलो होतो!

पण तिथे तर मी गूगल पे ने पेमेन्ट केले नव्हते!

आणि एकदम माझ्या डोक्यात ट्यूब पेटली! मला आठवले- मी तिथे पेमेन्ट करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन केला होता. नंतर तो दुकानदार मला कॅश द्या म्हणून म्हणाला होता. मी मोबाईल चा फक्त डिस्प्ले ऑफ केला होता, आणि मोबाईल खिशात टाकला होता. पण गूगल पे मधून बॅक करून, बाहेर पडलो नव्हतो!

आणि साडीच्या दुकानात आल्यावर, मी मोबाईल ऑन केला, स्कॅनर समोर धरला. पण त्यात आधीच्याच स्क्रीन वर असल्यामुळे, तिथे पेयी हा आधीचाच होता. मी त्यात रक्कम टाकली- २८५० रुपये, आणि पेमेन्ट केले! नक्की असेच झाले असणार!

मी त्या साडीच्या दुकानातील नोकराला म्हटले, चल माझ्यासोबत. बहुतेक हे पेमेन्ट दुसऱ्याला गेले असावे- तसे असेल तर, नशिबाने, ते दुकान जवळच आहे.

आम्ही गजानन मंदिराजवळील साडीच्या दुकानातून, त्रिमूर्ती चौकातील त्या स्टेशनरीच्या दुकानात गेलो.

मी दुकानात कोण आहे ते पाहिले. दुकानात कालचा तो वृद्ध मालक नव्हता, पण त्याचा मध्यम वयाचा, मुलगा तिथे होता. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला थोडक्यात परिस्थिति समजावून सांगितली,  आणि माझ्या मोबाईल मधील गूगल पे च्या हिस्टरी मध्ये त्या नावाने झालेले पेमेन्ट दाखवले. ते तुमचेच नाव आहे ना, हे विचारले.

सुदैवाने, त्याच्या लक्षात लगेच सर्व परिस्थिति आली. त्याने लगेच त्याच्या वडिलांना फोन लावून कालच्या transaction बद्दल खातरजमा करून घेतली.

आणि काहीही आढेवेढे न घेता, शांतपणे, त्याने, त्याचा मोबाईल काढला, मला माझा मोबाईल नंबर विचारला, आणि गूगल पे ने माझ्या खात्यावर ताबडतोब २८५० रुपये ट्रान्सफर करून टाकले! मी त्याचे मनापासून आभार मानले! तिथून मी आणि तो कर्मचारी, आनंदाने बाहेर पडलो.

याठिकाणी एका छोट्याशा negligence मुळे, ही सर्व धावपळ मला करावी लागली होती! ते negligence म्हणजे, मी गूगल पे उघडल्यावर,  त्यातून बाहेर न पडता मोबाईल तसाच बंद केला होता. पुन्हा गूगल पे एप उघडल्यावर आधीचाच स्क्रीन माझ्यासमोर आला होता! अजून दुसरे negligence म्हणता येईल ते, पेमेन्ट करतांना, पेयी चे नांव त्या दुकानदाराला दाखवून खात्री करून घेतली नव्हती. यात दुकानदाराचीही चूक होती, की त्याने त्याला पेमेन्ट मिळाले की नाही, हे लगेच confirm केले नव्हते.  

नशिबाने, ही घटना अगदी जवळच घडली होती. ज्या दुकानदाराच्या बाबतीत घडली होती, तो एक प्रतिष्ठित आणि समजदार दुकानदार होता, त्यामुळे त्याने आढेवेढे न घेता मला लगेच पैसे वापस दिले. हेच जर दूरवर कुठे तरी घडले असते, किंवा एखाद्या छोट्याशा अनोळखी किंवा तितकासा समजदार नसलेला कोणी हातगाडीवाला किंवा अन्य कोणी असता, तर त्याला हे समजायलाही वेळ लागला असता, आणि त्याने याबाबतीत आढेवेढे ही घेतले असते.

असो, तर अशा या नाट्याच्या सुखकारक शेवट झाल्यामुळे माझा जीव भांड्यात पडला! आणि मी त्या साडीच्या दुकानातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन वापस त्या दुकानात आलो. तेथील cashier चा ही जीव भांड्यात पडला. कारण त्याला ही कुठले dispute नकोच होते. मी साड्यांचे फ्रेश पेमेन्ट केले. त्याने तोपर्यंत साड्यांना प्रेस साठी पाठवले नव्हते. त्याने २ दिवसांनी यायला सांगितले, आणि दोन दिवसांनी जाऊन मी माझ्या वस्तू आनंदाने घरी घेऊन आलो!

असा हा गूगल पेमेन्ट चा किस्सा, मुद्दाम वाचकांसाठी शेअर एवढ्यासाठी केला, की अशा प्रकारे चूक कोणाची होऊ नये!


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Say what you feel