https://goodworld.in A website by Madhav Bhope

श्री हनुमान जन्माचे अभंग

hanuman

.

देवांगना हातीं आणविला शृंगी । यज्ञ तो प्रसंगी आंरभिला ॥१॥
विभांडका क्रोध आला असे भारी । अयोध्या भीतरीं वेगीं आला ॥२॥
राजा दशरथ सामोरा जाऊनी । अति प्रिती करुनी सभे नेला ॥३॥
पुत्र स्नुषा दोन्हीं देखतां नयनीं । आनंदला मनी म्हणॆ नामा ॥४॥

आनंदोनी म्हणे राया धन्य केलें । इच्छिलें सोहळे पुरवीन ॥१॥
यज्ञाचा आरंभ करी लवलाह्मा । पुसोनी आचार्या वसिष्ठांसी ॥२॥
सर्व ऋषीजन मिळाले सकळ । मंत्रांचा कल्लोळ करिताती ॥३॥
नामा म्हणे शृंगी मुख्यत्वें शोभला । यज्ञ आरंभिला तेणें जेव्हां ॥४॥

आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र । आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥
यज्ञनारायण सन्तोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनीं ॥२॥
पायस तें पात्र घेऊनियां करीं । शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥
विलंब करितां विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ॥४॥
नामा म्हणे देव येईल पोटासीं । ऎंसे गूज त्यासी अग्नी सांगे ॥५॥

विभाग सत्वर वसिष्ठानें केले । राया बोलाविलें सान्निधचि ॥१॥
प्रथम तो भाग कौसल्यसी दिला । तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ॥२॥
येतांचि तो क्रोध विघ्न ओढवलें । मुखीं झडपिला पिंड घारीं ॥३॥
आसडोनी पिंड घारीनें पै नेला । नामा म्हणे घातिला अंजनी करीं ॥४॥

सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाणा घारी झाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करविला ॥२॥
शृंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं । त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चितीं । दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥
कैकई रुसली तेथें विघ्न झालें । घारीनें तें नेलें निजभागा ॥५॥
एका जनार्दनी घारीं पिंड नेतां । पुढें झाली कथा श्रवण करा ॥६॥

ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥
तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥
येरी म्हणे तुज ऐसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥
म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी । बैस माझे ध्यानीं सावधान ॥४॥
वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला । भक्षीं कां वहिला अविलंबें ॥५॥
एका जनार्दनीं घारीं नेतां पिंड । वायूनें प्रचंड आसुडिला ॥६॥

 

 

पिंड घारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥१॥
अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥२॥
चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सुर्योदय समयासी ॥३॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥४॥

महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला हे चरण म्हणून गुलाल फुले टाकावीत.

घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥
नवमास होतां झाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥
जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें । इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥
अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें ॥६॥
सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होतीं । वरदान देती मारुतीसी ॥७॥
सर्व देव मिळोनी अंजनीशीं बाळ । देतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥

 

 

 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading