https://goodworld.in A website by Madhav Bhope

ही पोस्ट वाचण्यासाठी कमीत कमी १० मिनिटांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे आपणांस विनंती की तेवढा वेळ काढून ही पोस्ट नक्की वाचावी. 

राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी म्हणजे नुसतेच उपजीविकेचे साधन नाही, तर निरनिराळ्या प्रसंगांमधून अनुभवाची मिळणारी मोठीच शिदोरी आहे.  बँकेतील नोकरीमुळे करतांना  आपल्या स्वभावाचे अनेक टोचणारे कंगोरे घासून घासून गुळगुळीत केले जातात आणि आपल्याला अनेक स्किल्स (कौशल्ये) शिकण्यास भाग पडून आपले व्यक्तिमत्व अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होते .  अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढावा लागतो.  पण या कठीण प्रसंगांतून यशस्वीरित्या मार्ग काढल्यानंतर मिळणारे समाधान काही वेगळेच असते..

अशाच प्रकारचा एक अनुभव आज इथे कथन करायचा आहे.

ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर, माझा प्रवास अनेक शाखांमधून झाला. त्यात अगदी खेड्याच्या शाखेपासून ते इतर राज्यातील मोठ्या शहरातील मोठ्या शाखांपर्यंत हा प्रवास चालू होता. अशात सन 2002 च्या सुरुवातीला  माझी पोस्टिंग एका मोठ्या कृषि विकास शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून झाली. त्या शाखेचा पसारा खूप मोठा होता. ७२ गांवें आणि १०००० च्या वर कर्ज खाती तिथे होती . मी तिथे मध्ये रुजू झाल्यानंतर मार्चचा वार्षिक ताळेबंद तोंडावर होता , शिवाय नुकतेच ऑडिट (अंतर्गत लेखापरिक्षण) झाले होते आणि त्यात १००० खात्यांचे रीफेसमेंट (पुनर्गठन ) करून ऑडिट चे उत्तर द्यायचे होते, आणि तेंव्हाच बँकेत संगणकीकरण सुरू करण्याचे ठरले होते त्यासाठी बँक-मास्टर ही प्रणाली लागू करायची होती. शिवाय त्या गावात वातावरण अतिशय स्फोटक असल्यामुळे रोज एक नवीन प्रकरण उपस्थित व्हायचे आणि त्याचा निपटारा करावा लागायचा. तेथे आलेला सर्वात मोठा अनुभव म्हणजे शेतकरी संघटनेचे आंदोलन हाताळण्याचा.

परभणी, सेलू, मानवत, पाथरी, माजलगाव हा भाग म्हणजे संघटनेचा बालेकिल्ला समजला जायचा. मी तिथे रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात, बँकेच्या सेलू येथील क्षेत्र अधिकाऱ्याला  लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. आम्ही सर्व तिथे जाऊन त्या आमच्या सहकाऱ्याला आमच्या पाठिंब्याची ग्वाही दिली होती आणि धीर दिला होता. उपरोक्त प्रसंगामुळे, आपल्याकडे असा काही प्रकार होऊ नये म्हणून मी अधिकच सावध झालो होतो. संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते एका विशिष्ट विचारसरणीने भरलेले होते, आणि त्या विचारसरणीच्या समर्थनार्थ काहीही करण्याची मानसिकता तयार झाली होती.

मी तिथे  आल्यानंतर दोन महिन्यात, पूर्ण ब्रांच च्या सर्व खात्यांचे गावनिहाय वर्गीकरण करून घेतले होते, त्यामुळे प्रत्येक गावातील परतफेडीच्या रेकॉर्डची कल्पना आली होती. मानवत तालुक्यातील एक  गांव  हे संघटनेचा बालेकिल्ला समजला जात होते. संघटनेचे ब्रीदवाक्य होते, “ सरकारी कर भरणार नाही, बँकेचे कर्ज परतफेड करणार नाही…. आम्ही तुमचे देणे लागत नाही. उलट शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे तुम्हीच आमचे देणे लागतात.” बऱ्याच वेळेला, त्यांचे कार्यकर्ते, बसमधून तिकीट न काढता प्रवास करीत आणि कंडक्टर ने तिकीट काढावयास सांगितल्यास त्याच्याशी वरील मुद्द्यावरून वाद घालत आणि प्रसंगी मारहाण ही करत.

वरील हे गांव आमच्या शाखेकडेच होते, आणि साहजिकच, तेथील थकबाकी इतर गावांपेक्षा कितीतरी जास्त होती. त्या गावी  मी आमच्या फील्ड ऑफिसर सोबत एकदा जीप ने गेलो, तेंव्हा गावाच्या वेशी जवळील एका भिंतीवर, मोठ्या अक्षरात , “सरकारी अधिकारी आणि बँकेच्या वसूली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंद” असे लिहून ठेवले होते. मी, सरकारी स्कीम मधील  नवीन कर्ज प्रकरणाच्या चौकशीच्या निमित्ताने गेलो असल्यामुळे, संबंधित अर्जदार माझ्यासोबत होता, त्यामुळे गावात जाण्यास काही त्रास झाला नाही. पण इतर गावांना वापरीत असलेली वसुलीसाठीची कार्यपद्धती इथे लागू पडणार नाही याची मला जाणीव होत होती आणि मी मनोमन काही तरी ठरवत होतो.

मी त्या गावातील  खातेदारांची, विशेषकरून थकबाकीदारांची माहिती पुनः पुन्हा बघत होतो, आणि त्यातल्या मोठ्या मोठ्या थकबाकीदारांची नांवे मला त्यांच्या थकबाकी च्या रकमेसहित मुखोद्गत झाल्यासारखी झाली होती.

अशात एके दिवशी त्या गावातील संघटनेचे सर्वात प्रभावशाली पुढारी, त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत माझ्याकडे आले. धोतर, नेहरू शर्ट, टोपी, भरपूर उंची आणि पिळदार मिशा असलेले प्रभावी व्यक्तिमत्व होते ते. त्यांच्या छातीवर संघटनेचा तो सुप्रसिद्ध बिल्ला डौलाने मिरवत होता. सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांच्याही शर्टावर अर्थातच तो बिल्ला झळकत होता. मी जरी आजवर त्यांना पहिले नव्हते, तरी गावातील प्रत्येक थकबाकीदाराच्या नावासहित फोटो ही माझ्या डोक्यात पक्के ठसले होते, त्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर त्यांचे नाव आणि त्यांचा थकबाकीचा आकडा माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी माझ्या कॉम्पुटर वर बघून खात्री करून घेतली. परंतु मी त्यांचे हसून स्वागत केले आणि “या” म्हणून आदराने त्यांना बसावयास खुर्ची ऑफर केली. त्यांच्याबरोबरचे कार्यकर्तेही आजूबाजूच्या खुर्च्यांवर बसले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी माझे हातातील सर्व काम बाजूला ठेवून “कसे काय येणे केलेत?” असे आस्थेने विचारले. त्याच बरोबर चहाची ऑर्डर दिली. त्यांनी त्यांच्या संघटनेबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करीत आहे, आणि बँका सरकारच्या हस्तक असल्यामुळे कशा त्यांच्या पिळवणुकीत सहभागी आहेत, हे सांगायला सुरुवात केली. शेतीचे अर्थशास्त्र सांगायला सुरुवात केली. मी त्यांचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले, आणि त्यांच्या बहुतेक सर्व मुद्दयांना संमती दर्शविली. जवळ जवळ अर्धा तास ही चर्चा चालू होती.पूर्ण संभाषणाच्या दरम्यान मी एकदाही त्यांच्या थकबाकी बद्दल एक अक्षर ही उच्चारले नाही. तेही बहुतेक माझा अंदाज घ्यायला आले होते. खेड्यात सहसा अशी पद्धत असते, की तेथील पुढारी, नवीन कोणीही सरकारी अधिकारी किंवा बँक मॅनेजर आल्यानंतर त्याची चाचपणी करण्यासाठी एक अशी चक्कर हमखास करतात. मी त्यांचे केलेले स्वागत कदाचित त्यांना अनपेक्षित असावे. आणि ते, आपणास विरोध होईल आणि मग आपण मॅनेजरला आपला इंगा दाखवू, अशा तयारीने आले परंतु, वजनदार बदली उचलायला जावे आणि ती बदली रिकामी निघावी, तसे काहीसे झाल्यासारखे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी निघता निघता, काही तरी आठवल्यासारखे करून त्यांनी, सांगितले, “साहेब, तुमच्या बँकेकडे आय आर डी पी स्कीम खाली अमुक अमुक माणसाची एक फाईल आली आहे. चांगला माणूस आहे. तुमच्या नियमात बसतं का बघा.” मी लगेच ती फाईल काढून पाहिली. आणि ती नियमात बसत असल्यास नक्की विचार करीन असे आश्वासन दिले. वास्तविक त्यांच्या येण्याचा मुख्य उद्देश तोच होता हे मला जाणवले. परंतु मी त्यांना तसे जाणवू न देता त्यांना विचार करीन असे आश्वासन दिले. आमच्या पहिल्या भेटीने अत्यंत समाधानी होऊन त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा निरोप घेतला. ते गेल्यानंतर आमच्या फील्ड ऑफिसरने येऊन त्यांच्या पूर्ण थकबाकीची मला माहिती दिली. अर्थात ती  मला माहिती होतीच.

त्यांनी सांगितलेली फाईल योग्य वाटत होती आणि नियमात बसत होती. केवळ त्यांनी सांगितले म्हणून फाईल नाकारणे ही योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही ३-४ दिवसातच ती फाईल मंजूर केली आणि ८-१० दिवसात त्याचे पहिल्या हप्त्याचे वाटपही केले.

त्यांनी सांगितलेली फाईल मंजूर केल्यामुळे त्यांना चांगले वाटले होते, आणि हा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो आहे अशी खात्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या बँकेत बऱ्याच चकरा झाल्या. प्रत्येक वेळी आल्यानंतर ते बराच वेळ बसत आणि भडा भडा बोलत. मला त्यांच्या बोलण्यातून बरीच नवीन माहिती मिळत होती. या कुठल्याही भेटीत मी त्यांच्या खात्याबद्दल किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या खात्याबद्दल  एक अवाक्षरही काढले नाही. मात्र मी त्यांच्या बोलण्यातून मधून मधून सवड काढून त्यांना बँकेच्या विविध स्कीम्स बद्दल बोलत होतो.

अशाच एके दिवशी ते आणि त्यांचे एक त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेले एक कार्यकर्ते असे दोघेजण आले. ते कार्यकर्ते थोडे परेशान दिसत होते. बोलता बोलता मी त्या दुसऱ्या व्यक्तीची शेती कशी काय चालली आहे, त्याची चौकशी केली. त्यांनी सांगितले, काय करावे साहेब, उसाला पाणी कमी पडते आहे. जवळ असलेले सर्व पैसे बेण्यात आणि खतात घातले आहेत. आता विहीर खोल केली आणि ठिबक केले तरच ऊस वाचेल अशी परिस्थिती आहे. पण आता सावकारही कर्जाऊ देत नाही कारण त्याच्याकडून आधीच कर्ज घेतले आहे. आमच्या संघटनेच्या तत्त्वाप्रमाणे, बँकेचे कर्ज फेडायचे नाही आणि घ्यायचेही नाही. तसेही, आम्हाला कर्ज देणे तर तुमच्या नियमात बसणार नाही कारण पहिले खाते थकबाकीत आहे. त्यांच्या मनातील व्यथा बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, “ खरं आहे तुम्ही म्हणता ते. हे जग पैशावर चालतं. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ते खरच आहे. आणि पाटील हे बघा, मी तुमच्या संघटनेच्या विचारसरणीचा आदर करतो. पण शेवटी प्रत्येकाला आपली वैयक्तिक प्रगती करायची असेल, आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण द्यायचे असेल तर पैशांची गरज आहेच. तुमचे खाते थकबाकीत असल्याने बँकेला किंवा वैयक्तिक मला, विशेष काही फरक पडत नाही. (अर्थात हे विधान मी मोठे धाडसाने केले होते, आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी केले होते), पण तुमच्या जीवनावर मात्र फार मोठा फरक पडतो. मी तुमची खाती काढून बघतो, आणि आपण बघूयात काय करता येते ते.” त्यानंतर मी त्यांचे खाते काढून पाहिले. थकबाकी किती आहे ते पाहिले. योगायोगाने त्यांचे पीक कर्ज थकबाकीत असले तरी बाकी खूप जास्त नव्हती. त्यांची जमीन  बरीच होती. मी त्यांना सुचवले, “ तुम्ही जर ही थोडीशी रक्कम भरू शकला तर बघा, तुम्हाला तुमच्या होल्डिंग प्रमाणे पीक कर्ज लगेच मंजूर होऊ शकेल आणि ते दुसऱ्याच दिवशी मिळेल याची मी खात्री देतो. तसेच तुमचे पीक कर्ज नियमित असल्यानंतर, तुम्हाला विहीर दुरुस्तीसाठी आणि ठिबक साठी ही कर्ज मिळू शकते. ठिबक ही तर आज काळाची गरज आहे.” हे ऐकून त्यांचा चेहरा खुलला पण ते म्हणाले, “ साहेब, मी कसेही करून पैशाची व्यवस्था करतो, पण एक विनंती आहे. कृपया मी माझी थकबाकी भरली याची कुठेही वाच्यता करू नका. कारण आम्ही संघटनेची नेते मंडळी आहोत. आम्हीच संघटनेच्या विचाराविरूद्ध वागलो असे इतरांना कळले तर ते ठीक होणार नाही.” मी त्यांना आश्वासन दिले, “ काही काळजी करू नका, आमच्या कडून कुठल्याच खातेदाराची माहिती इतरांना दिली जात नाही”. अशा प्रकारे संघटनेच्या पहिल्या व्यक्तीचे खाते नियमित झाले. आम्ही, आश्वासन दिल्याप्रमाणे, अत्यंत त्वरेने त्याचे कर्ज मंजूर केले, आणि थोड्याच दिवसात, त्याचे विहिरीचे काम सुरु झाले, आणि ठिबक संच ही शेतात येऊन पडला! आम्ही त्याचे काम पाहायला गेलो तेंव्हा त्याच्या शेतातील ऊस हिरवागार होता, आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. आम्हालाही साहजिकच, एक नेक काम आपल्या हातून झाल्याचा आनंद झाला.

त्यानंतर, काही दिवसांनी, ते पुढारी अजून एका व्यक्तीला आमच्याकडे घेऊन आले आणि, “ साहेब, याचा हिशोब बघा बरं” म्हणून म्हणाले. त्याचा हिशोब बघितल्यानंतर, त्याच्याकडे असलेले  पैसे थकबाकी भरायला कमी पडत होते. मी त्याला घरात कुणाच्या नावाने शेती आहे का ते विचारले. त्याच्या पत्नीच्या नावावर शेती होती आणि कर्ज घेतले नव्हते. तेंव्हा मी त्याच्या पत्नीच्या नावाने कर्ज मंजूर करण्याची तयारी दाखविली, आणि अजून एक खाते बेबाक झाले. त्याने ही तीच विनंती केली, “साहेब, मी थकबाकी भरली म्हणून कोणाला सांगू नका!”

अशा प्रकारे ८-१० खाती बेबाक झाली; लोकांच्या विहिरी होऊ लागल्या, पाईप लाईन लागू लागल्या ठिबक संच बसू लागले, आणि हळू हळू गावात बातमी पसरली. बँक, थकबाकी भरणा ऱ्यांना सढळ हाताने मदत करत आहे. एके दिवशी, ते मुख्य पुढारी जे होते, ते माझ्याकडे आले, आणि मला म्हणाले, “साहेब, आपला किती हिशोब होतो ते पहा बरं!” माझ्या प्रयत्नांना यश येतांना पाहून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना त्यांचा पूर्ण हिशोब सांगितला. त्यांची अजून एक आवश्यकता होती. त्यांना मानवत मध्ये घर बांधायचे होते. प्लॉट घेतलेला होता. पण घर बांधायसाठी पैसे नव्हते. त्यांची थकबाकी भरल्यानंतर, कुठेही नियमांचे उल्लंघन न करता, त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज मंजूर करता आले आणि संघटनेच्या कामात असलेल्या व्यस्तते मुळे त्यांची आर्थिक घडी जी विस्कटली होती, ती नीट बसायला लागली. आता मात्र पूर्ण गावाला माहित झाले होते, की बँकेकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे, आणि त्या पहिल्या घटनेनंतर, सहा महिन्यांच्या कालावधीत, ८० टक्के खाती नियमित झाली! यात जराही अतिशयोक्ति नाही. अशाच एका कार्यकर्त्याचा मुलगा अत्यंत हुशार होता आणि त्याचा आय आय टी चेन्नई येथे नंबर लागला होता. त्याला आम्ही एज्युकेशन लोन दिले आणि तो चेन्नई ला गेला. आता आमचे फील्ड ऑफिसर निर्भयपणे आणि मुक्तपणे त्या गावात ये जा करू लागले होते आणि गावातील लोकांचे बँकेत येणे जाणे नित्याचे झाले होते.

खरा क्लायमॅक्स पुढेच आहे.

पुढील वर्षाची गोष्ट. रिकव्हरी सीझन (कर्ज वसूलीचे दिवस)चालू होता. आमच्या परीने आमचे सर्व लोक वसुलीसाठी मेहनत करत होते. अनौपचारिकरित्या वसुली मेळावे  होत होतेच, पण रिजन ऑफिस कडून निरोप आला, की एक वसुली मेळावा मोठा झाला पाहिजे, आणि त्यासाठी एजीएम  (सहाय्यक महाप्रबंधक) आणि डीजीएम (उपमहाप्रबंधक) येतील. तशात परभणीच्या कृषि विकास शाखेने   वसुली मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात १४ लाख रुपये वसुली झाली (ही घटना २००३ ची आहे, आणि तेंव्हा ही रक्कम बरीच मोठी होती, हे इथे लक्षात घेण्याजोगे आहे). आम्हाला रिजन ऑफिस ला वसुली मेळाव्याची तारीख आणि ठिकाण कळवायचे होते. त्यासाठी मी आणि माझे सर्व फील्ड ऑफिसर सहकारी माझ्या केबिन मध्ये बसून विचार विनिमय करीत होतो. शक्यतो ब्रांच च्या जवळ चे गाव निवडावे, आणि ज्या गावाचे वसुली रेकॉर्ड खूप चांगले आहे, असे गाव निवडावे, असा विचार चालला होता. त्यानुसार अनेक नांवे समोर येत होती. इतक्यात त्या गावचे  ते पुढारी आणि त्यांचे सहकारी आले. बँकेची वेळ संपली होती, पण त्या गावची  मंडळी आता बँकेच्या कुटुंबापैकीच असल्यासारखी झाली होती, त्यामुळे, त्यांनी आवाज दिला, “ काय साहेब, काय चाललंय, याव का आत?” आम्ही त्यांना आत बोलावले. त्यांना काय विषय चालला आहे त्याची कल्पना दिली. त्याबरोबर, अनपेक्षितरित्या त्यांच्याकडून ताड्कन प्रस्ताव आला, “त्यात काय विचार करायचा साहेब, आमच्या गावालाच ठेऊ यात की वसुली मेळावा!” आश्चर्यचकित होण्याची पाळी आमची होती. आम्ही या प्रस्तावाला लगेच होकार दिला नाही. मी त्यांना म्हटले, “ आपल्या गावातील वसुली आता नक्कीच चांगली आहे आणि वसुली मेळाव्याला प्रतिसाद ही चांगला मिळेल, पण मला असे वाटते की संघटनेचे विचार आहेत त्याच्या विरुद्ध असा मेळावा घेणे योग्य राहील का, याविषयी आपण अजून विचार करावा.” त्यावर लगेच ते म्हणाले, “तसेच असेल तर आत्ताच चला साहेब, आपण आमच्या सेलूच्या मोठ्या साहेबांकडे जाऊत”. त्याप्रमाणे आम्ही लगेच जीप काढली आणि सेलूच्या त्यांच्या शीर्ष नेतृत्वाकडे गेलो (नाव मुद्दामहून देत नाही). त्यांच्याकडे गेल्यानंतर असे समजले, की त्यांच्या कानावर आमच्या बँकेबद्दल पूर्ण माहिती आली होती आणि बँकेमुळे झालेल्या गावच्या प्रगतीबद्दल ते अत्यंत समाधानी होते. त्यांनी पूर्ण खात्रीने त्यांच्याकडून हिरवा कंदील दिला. गावात २-४ उनाड तरुण पोरे होती. सेलूच्या नेत्याने लोकल नेत्यांना बजावून सांगितले, त्यांना त्या दिवशी येऊ देऊ नका, आणि कार्यक्रम एकदम जोरदार झाला पाहिजे.

अशा प्रकारे वसुली मेळावा मानोलीला घेण्याचे सर्वानुमते नक्की झाले, आणि आम्ही रिजन ऑफिस ला ठिकाण आणि विसेक दिवसा नंतरची  तारीख कळवून टाकली. परभणीच्या वसुली मेळाव्यात १४ लाखांची वसुली झाली होती. तेंव्हा आम्ही आमच्या अंतर्गत मीटिंग मध्ये एक उद्देश ठेवला, “ आपली वसुली कमीत कमी १५ लाख झाली पाहिजे!” त्या दिशेने सर्व सहकारी पूर्णपणे कामाला लागले. अर्थात अशा वसुली मेळाव्यासाठी लोकांकडून आधी वसुलीबद्दल खात्री करून घेऊन त्यांना त्या ठराविक तारखेला त्या गावी येण्याचे सांगावे लागते. आजूबाजूच्या सर्व गावांना ही त्यात सामील करावे लागते. त्याप्रमाणे आमचे फील्ड ऑफिसर रोज सगळीकडे हिंडून वसुलीचे आकडे घेऊन येऊ लागले. ब्रांच च्या स्टाफ सेक्रेटरीनेही पूर्ण स्टाफ च्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हळू हळू, आमची वसुली १५ लाखाच्या आसपास पोंचेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मानोलीचे लोक मधून मधून येऊन आम्हाला सांगत होते, “तुम्ही काही काळजी करू नका साहेब, आपला मेळावा जोरदार होणार.!” होता होता तो दिवस उगवला.

रिजन ऑफिस हून एजीएम आणि डीजीएम, आले. ब्रँचमध्ये त्यांचे स्वागत केल्यानंतर, सकाळी १० च्या सुमारास आम्ही मानोलीला निघालो. ब्रँचमध्ये कमीत कमी स्टाफ ठेवून बाकी सर्वजण (कॅश मोजायसाठी कॅशियर, तसेच क्लार्कस) साडेदहाच्या सुमारास मानोलीला पोंचलो. गाव जवळ आल्यानंतर जे दृश्य दिसले ते खूपच उत्साहवर्धक होते. गावाच्या वेशीवरच, “स्टेट बँक ऑफ हैदराबाद वसुली मेळावा” असा फलक लावला होता. आणि आम्ही वेशीपाशी पोंचलो तेंव्हा गावातील मंडळी हातात हार घेऊन उभी होती. समोर बँड पथक होते, आणि आम्ही पोंचल्यानंतर, बँडच्या तालात, गावातील पुढारी मंडळींनी, पुढे होऊन सर्वांचे हार घालून स्वागत केले, आणि सभेच्या पंडाल (मंडप) पर्यंत सर्वांना वाजत घेऊन गेले. पंडाल खचाखच भरलेला होता. मानोलीचेच नाही तर आजूबाजूच्या ७-८ गावांचे लोक आले होते. स्टेज वगैरे सुशोभित केले होते. एजीएम आणि डीजीएम सहित सर्व स्थानापन्न झाले. प्रास्ताविक झाले. त्यानंतर एजीएम श्री कोटगिरे साहेबांनी अर्धा तास अत्यंत उत्कृष्ट असे भाषण केले. त्यांना मराठवाड्याची पूर्ण परिस्थिती माहिती असल्यामुळे त्यांनी उपस्थित मंडळीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना उत्कृष्ट पणे हात घातला आणि सर्वांची मने जिंकून घेतली. त्यानंतर, डीजीएम श्री केशवन साहेब यांनी गावकऱ्यांचे कौतुक करीत त्यांना आपल्या बँकेकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भाषणालाही कडाडून टाळ्या पडल्या. त्यानंतर औपचारिक कार्यक्रम संपला आणि वसुली मेळावा सुरु झाला. पैसे भरायला आलेल्या लोकांची गर्दी आमचे सर्व लोक त्वरेने हाताळू लागले. २ तास पर्यंत कॅश मोजणे चालू होते. शेवटच्या व्यक्तीची  कॅश घेऊन झाली, आणि जेंव्हा हिशोब लावण्यात आला, तेंव्हा, सर्व मिळून रक्कम झाली २६ लाख! हा आकडा जेंव्हा केशवन साहेबांना सांगण्यात आला, तेंव्हा ते इतके खुश झाले, की सांगता सोय नाही! त्यांनी तिथूनच सगळीकडे फोन करून सांगितले, रिकव्हरी डिपार्टमेंटला कळवले. परत येतांना पूर्ण रस्त्यात ते सर्वांना शाबासकी देत होते. ब्रँचमध्ये सर्वजण परतलो, तेंव्हा एजीएम आणि डीजीएम दोघांनीही टीम लीडर म्हणून अभिनंदन केले.

वरील प्रसंगाची आठवण ही आजही सुखावून जाते. या प्रसंगातून मला संयमाचा, धैर्याचा जो धडा मिळाला, तसेच टीम वर्क करण्याची जी संधी मिळाली, लोकांच्या प्रगतीत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आपल्या प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर  जे समाधान मिळाले, त्याची किंमत कशानेही करता येणार नाही.

 

 

माधव भोपे

Retired Chief Manager

 

 

 

 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading