https://goodworld.in A website by Madhav Bhope

Hartalika vrat- Connection with nature

हरितालिकेचे व्रत- निसर्गाशी नाते

आपल्या देशातील सण, वार, व्रतें ही किती खुबीने निसर्गाशी आणि निसर्गचक्राशी जोडली गेलेली आहेत हे पाहून राहून राहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. मागे आपण चातुर्मासातील  एकूणच दिनचर्या कशी या ऋतूतील बदलांशी आपल्या शरीराला जुळवून घेण्याच्या दृष्टीने बनविण्यात आली आहे, याबद्दल लिहिले होते. तसेच चातुर्मासातील विविध व्रतांच्या निमित्ताने घरातील स्त्रियांना, लहान थोरांना सगळ्यांनाच या काळात निसर्गात मुबलकपणे उपलब्ध होणाऱ्या विविध वनस्पती, पानें, फुले, फळे इत्यादि यांची ओळख अनायासे होत असते. बाहेर जाऊन या वनस्पती गोळा करून आणणे, त्या निवडून व्यवस्थित करणे, इत्यादि कामांत एक तर त्या निमित्ताने ज्यांना कधी, शेतात इत्यादि जाण्याचे काम पडत नाही अशांना सुद्धा, बाहेरच्या मोकळ्या वातावरणात जाण्याचे काम पडते, आणि त्या वनस्पतींना हाताळण्याने, त्यांची पक्की ओळख होते, अनायासेच त्यांच्या गुणधर्मांची माहिती होऊ शकते. अर्थात आजकाल शहरांत या सर्व गोष्टी बाजारात आयत्या विकत मिळतात, त्यामुळे घरच्या सदस्यांचा बाहेर मोकळ्या हवेत जाण्याचा भाग जरी कमी झाला असला, तयारी त्या निमित्ताने त्या वनस्पतींची ओळख होते हेही काही कमी नाही.

आज स्त्रिया साजरे करीत असणारे हरतालिका व्रत हे एक असेच व्रत आहे. मला अजून एक गोष्ट आपल्या सगळ्या चाली रीतीं मध्ये अगदी ठळकपणे दिसते, जिचा आजकाल अत्यंत अभाव झाला आहे- ती म्हणजे या सण व्रतांच्या निमित्ताने एकत्र येण्याने लोकांना, घरातील स्त्रियांना आपल्या भावनांना वाट करून देण्याची मिळणारी संधी. हरतालिका व्रताची, पार्वती आणि शंकराची कहाणी सर्वांना माहिती आहे- ती आपण पुढे थोडक्यात बघूच.   

पण या व्रताची, पारंपरिक पद्धत ही खूप रंजक आहे. हरतालिकेला महादेवाच्या वाळूच्या पिंडीचे पूजन करतात. तर पूर्वी ही जी वाळू आणायची, त्यासाठी अशी पद्धत होती की गावातील स्त्रिया दोघी दोघी, चौघी चौघी, किंवा त्याहूनही जास्त अशा घोळक्याने, गावातील नदीच्या काठी जात. पावसाळा आता अर्ध्यापेक्षा जास्त होऊन गेलेला असे, त्यामुळे नदीचे पाणीही नितळ झालेले असे. मग दोघी दोघी स्त्रिया, नदीच्या पात्रात जाऊन, एकमेकींच्या हातात हात गुंफून, नदीच्या पात्रातून वाळू काढीत. त्यावेळी त्या एक गाणे म्हणत-

“खडक फोडू-मोती काढू- चला चला गौळणी, गौळणी!”

हे सर्व करतांना हास्य विनोद करीत करीत, निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचे टेंशन कुणाला राहणे शक्यच नसे.

असे पाच वेळा करून मग आपल्या हातांच्या ओंजळीत नदीतील वाळू काढीत. पाच वेळा केल्याने वाळूतील सर्व मोठे मोठे गोटे, काडी, कचरा वगैरे निघून जात असे आणि हातात राहिलेली स्वच्छ वाळू मग त्या सोबत आणलेल्या ताटलीत घेऊन घरी येत. नंतर त्या आणलेल्या वाळूची, छान सुबक पिंड तयार करीत. त्या पिंडीवर मग शंकर, पार्वती व पार्वतीच्या मांडीवर गणपती, एका बाजूला  पार्वतीच्या ५ सख्या आणि पिंडीच्या समोर नंदी दर्शविणारे छोटे छोटे वाळूचे गोळे ठेवायचे.

आणि मग त्या सर्वांची विधिवत पूजा करायची. ही पूजा बऱ्याच वेळा घरातील स्त्रिया आणि आजूबाजूच्या त्यांच्या शेजारणी, मैत्रिणी, या सर्वजणी सामूहिक रीतीने अत्यंत उत्साहाने करीत.  स्त्रियांसाठी हे  एकप्रकारे emotional tonic असे आणि वर्षभराची ऊर्जा या एकत्र येण्यातल्या आनंदातून त्या साठवून घेत.  

निसर्गाच्या सान्निध्याचा- हरतालिकेच्या महादेवासाठी वाळू आणणे हा एक भाग झाला, तर या पूजेसाठी लागणाऱ्या सोळा प्रकारच्या पत्र्या (पानें) आणणे आणि फुलें आणणे हा दुसरा भाग झाला. पूजेसाठी लागणाऱ्या सर्व पत्र्या घरातील व्यक्ति स्वतः जाऊन आणीत असल्याने वर लिहिल्याप्रमाणे अनायासेच ह्या सर्व वनस्पती हाताळल्या जात असत. महादेव पार्वतीच्या पूजेसाठी १६ प्रकारच्या पत्र्या वाहतात. या सोळा वनस्पती कोणत्या याबद्दल आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते. साधारणपणे खालील वनस्पतींच्या पानांचा उपयोग केला जातो- एक लक्षात घेण्यासारखे आहे, की या सर्व वनस्पतींचे कुठले ना कुठले औषधी गुणधर्म आहेत. साध्या साध्या दुखण्यांवर कुठल्या वनस्पतीच्या पानाचा रस, तर कुठल्याच्या मुळांचा उपयोग, कुठल्या फुलांचा उपयोग, हा अनायासेच माहिती होत असे- अशा प्रकारे समाज, आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी होत असे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज अजिबात नसे. तर हरतालिकेसाठी लागणाऱ्या १६ पत्र्या खालीलप्रमाणे-

हरतालिका पूजेसाठी लागणाऱ्या १६ पत्रींची नावे: 

  1. बेलपत्र (Bilva Patra)
  2. आघाडा (Aghada)
  3. मालती (Malati)
  4. दुर्वा (Durva/Durva Grass)
  5. चंपक (Champak)
  6. करवीर (Karvir/Oleander) म्हणजेच कण्हेर
  7. बद्री (Badri) म्हणजे बोर
  8. रुई (Rui/Calotropis) (रुईची फळे ही वाहतात)
  9. तुळस (Tulsi)
  10. मुनीपत्र (Munipatra) (म्हणजे ब्राह्मी- किंवा मंडूकपर्णी
  11. डाळिंब (Dalimb/Pomegranate)
  12. धोतरा (Dhatura)
  13. जाई (Jai/Jasmine)
  14. माका म्हणजेच भृंगराज (जे केसांसाठी वापरतात). (Maka)
  15. बकुळ (Bakul)
  16. अशोक (Ashok)

काही काही ठिकाणी यातील काही वनस्पतींच्या ऐवजी दुसऱ्या वनस्पतींची नांवे आढळतात. त्यामुळे असे सांगितले जाते की यातील मिळतील तितक्या वनस्पती घ्यायच्या, आणि महादेव पार्वतीची पूजा करतांना पार्वतीचे एक एक नांव घेऊन त्या वाहायच्या. तसेच फुलें ही वेगवेगळ्या प्रकारची, वाहायची, महादेव पार्वतीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा. आरती करायची. हरतालिकेला स्त्रिया पूर्ण दिवस उपवास ठेवतात- हाही या ऋतूला अनुकूल असा एक detoxification चाच प्रकार आहे असे दिसून येते. आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे गणेश चतुर्थीला, सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवून, हरतालिकेचे विसर्जन केल्यावर तो खाऊन हा उपवास सोडायचा. त्यासोबत गुळाचा कानोला, खीर, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, काकडीच्या फोडी, किसलेले खोबरे आणि साखर यांची खिरापत यांचाही नैवेद्य दाखवतात. हे सर्व पदार्थ किती आरोग्यदायी, शक्तिदायी आणि पावसाळ्याच्या ऋतूला योग्य असणारे आहेत!

त्यानंतर येणारा गणपती उत्सव पण असाच निसर्गाशी नाळ असलेला होता. रोज गणपतीला लागणाऱ्या दूर्वा तोडून आणणे, त्या निवडणे या सर्व गोष्टी किती आनंददायी होत्या! आणि हो, आजकालसारखे प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणपती नव्हते आणि वीस वीस पन्नास पन्नास फुटांचे अजस्त्र गणपती तर नव्हतेच नव्हते. गणपतीची मृण्मयी मूर्ती करण्याची पद्धत घरोघरी प्रचलित होती, आणि आपल्या गावातच मिळणारी माती आणून घरोघरी आपल्या कला कुसरीने गणपती बनवले जात. ती मूर्ती बनवत असतांनाच बनवणारा त्यात आपला जीव ओतत असे! ती खरोखर चैतन्यमयी मूर्ती होत असे.

हरतालिकेची प्रचलित असलेली कहाणी याप्रमाणे-

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.

हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथं आले, त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले . मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

हरतालिकेच्या व्रताच्या समस्त महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा!

माधव भोपे 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.