https://goodworld.in A website by Madhav Bhope
कुठला रस्ता सांग खरा
वळणाचा की सरळ बरा

आयुष्यात एका टप्प्यावर आल्यानंतर, माणसाच्या मनात एक हुरहूर लागून राहते. आणि जसे जसे वय वाढत जाते, तशी तशी ती हुरहूर अधिकाधिक गडद होत जाते. मन पूर्ण आयुष्याचा हिशेब मांडायला लागते, आणि शेवटी हाती काय उरले हा एक मोठा यक्षप्रश्न उभा राहतो. कित्येकदा तर, “ याचसाठी  केला होता का एवढा सारा खटाटोप?” असा मोठा प्रश्न आ वासून उभा राहतो. “सुख खरे की दु:ख खरे”  हेच समजेनासे होते.

एके दिवशी अचानक, 2008 मध्ये लहानपणीच्या मुग्धा वैशंपायनने Little Champs मध्ये  गायलेले “हुरहूर असते, तीच उरी” हे गाणे ऐकायला (आणि बघायला) मिळाले. त्या गाण्यातील अगदी मोजकेच शब्द, पण मनाला स्पर्शून गेले. मुग्धाने त्या बालवयात ही हे गाणे एवढे छान म्हटले होते, त्यावेळी तिला  वैशाली सामंतने, जेंव्हा विचारले, की, “बाळा, तुला या गाण्याचा अर्थ कळतो का?” तेंव्हा मुग्धा ने गोड हसून उत्तर दिले होते, “बाबा, म्हणाले, तू मोठी झाल्यावर कळेल”

हुरहुर असते तीच उरी
दिवस बरा की रात्र बरी

कुठला रस्ता सांग खरा
वळणाचा की सरळ बरा

शरीर जाते जळून तरी
धूर खरा की राख खरी

जगणे, मरणे, काय बरे

सुख खरे की दु:ख खरे

मुग्धाच्या या गाण्यावर बोलतांना, अतिथि म्हणून उपस्थित असलेला आदेश बांदेकर म्हणाला होता, की मुग्धा, मी आज हे गाणे पहिल्यांदा ऐकले. आणि यापुढे जेंव्हा हे गाणे ऐकेन तेंव्हा मला हे मुग्धाचे गाणे म्हणूनच लक्षात राहील. माझेही तसेच झाले. मला हे गाणे ऐकले की सर्वप्रथम मुग्धा आठवते. असो.

मुग्धाच्या त्या गाण्याची लिंक खाली देत आहे.

 

 

मग या गाण्याचा शोध घेता घेता, “एक उनाड दिवस” हा अशोक सराफची प्रमुख भूमिका असलेला, 2005 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा बघण्यात आला. अत्यंत सरळ आणि छोटीसे  कथानक असलेला हा चित्रपट मुळातूनच पाहण्यासारखा आहे, पण त्यात हे गाणे अशोक सराफ (चित्रपटातील दाभोळकर) जेंव्हा अभिनेत्री फैयाज (चित्रपटातील, विपन्नावस्थेतील गायिका चंद्रिका) हिच्या तोंडून ऐकतो, त्यावेळी, अशोक सराफच्या चेहऱ्यावरील भाव अगदी अप्रतिम आहेत. गायिका गात असलेल्या गीतातील भाव त्याच्या चेहऱ्यावर साक्षात मूर्तिमंत होतात. इतक्या कमी वेळात एक माणूस आपल्या चेहऱ्याने, अगदी काहीही न बोलता, इतके उत्कट भाव कसे व्यक्त करू शकतो, हे खरंच अचंबित करणारे आहे. अभिनेत्री फैयाजनेही त्याच ताकदीने हे गाणे पेश केले आहे.

श्रेय नामावली:

गीत: सौमित्र

संगीत- सलील कुलकर्णी

मूळ गायिका- शुभा जोशी

चित्रपट- एक उनाड दिवस

मूळ चित्रपटातील मला भावलेले हे गाणे, त्याची लिंक खाली देत आहे.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading