importance of chaturmas
चातुर्मासाचे महत्त्व: पावसाळ्यातील आरोग्य, आध्यात्मिकता आणि संस्कृतीचा संगम
अतिशय पुरातन आणि समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या भारतामध्ये आपला जन्म झालेला आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे आपल्या येथील सर्व चाली रीती, सण, उत्सव, हे निसर्गचक्राशी घट्टपणे जोडले गेलेले आहेत. भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे चार महिने नियमितपणे (जरी गेल्या काही वर्षात अनियमित झाला असला तरी) पाऊस- ज्याला आपण मान्सून म्हणतो, तो पडणारा आपला देश आहे.
महाराष्ट्राला तर गेल्या ७०० वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीची समृद्ध परंपरा लाभली आहे.
आणि आषाढी एकादशीपासूनच सुरू होतो-‘चातुर्मास’.
४ महिने उन्हाने तापलेल्या जमिनीला थंड करण्यासाठी नैऋत्य मोसमी वारे घेऊन येतात, ‘पावसाळा’. पावसाळा हा जमिनीला उपजाऊ बनवून, आपले भरण पोषण करणारे धान्य, फळे, भाजीपाला उगवून तसेच वर्षभराची पाण्याची, भू-जलाची बेगमी आणि पुनर्भरण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा काळ. धरित्रीचे ओसाड, शुष्क रूप बदलून, तिला सुखद शीतल हिरवे रूप प्रदान करणारा काळ.
पण असे असले, तरी, या काळाचे काही तोटे ही असतात. मनुष्याचे आरोग्य, त्याच्या शरीरातील पाचक अग्नी हा खूप मोठ्या प्रमाणावर सूर्याशी जोडलेला असतो. पावसाळ्यात सूर्यदर्शन अभावानेच होते. अर्थात ज्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असते, किंवा मराठवाडा, विदर्भातील काही भाग, इत्यादि त्यांचा अपवाद सोडून द्या. तर सूर्याच्या अभावामुळे मनुष्यप्राण्याच्या पोटातील अग्नि सुद्धा मंद होतो आणि पाचनक्रिया मंदावते.
नद्यांना पूर आल्याने, रस्ते चिखलमय झाल्यामुळे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे दुस्तर होते.
जलाशय अशुद्ध होतात. पालेभाज्या, ज्या अगदी जमिनीलगत उगवतात, त्यां चिखलामुळे आणि मातीतील जंतूंमुळे खाण्या योग्य राहत नाहीत आणि त्या खाल्ल्या तर रोगांचा प्रादुर्भाव होणे अटळ असते. शरीरात वाताचा प्रभाव बळावतो.
या सर्व बाहेरील बदलांचा दुष्परिणाम होऊ नये, आणि या चार महिन्यांचा सदुपयोग व्हावा, या दृष्टीने चातुर्मासात संयमित आणि व्रतस्थ राहणे, ही संकल्पना आपल्या पूर्वजांनी रूढ केली. आणि कुठल्याही गोष्टीला धर्माशी जोडल्यानंतर सर्व सामान्यांकडून तिचे पालन होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून या गोष्टी धर्माशी, विविध व्रतांशी जोडल्या गेल्या.
या दृष्टीने मग खालील नियम अस्तित्वात आले-
- चातुर्मासात वर्ज्य गोष्टी-
चातुर्मासात कांदे, लसूण, वांगे, इत्यादि पदार्थ जे की वातुळ, म्हणजे शरीरात वात वाढविणारे आहेत, ते खाणे निषिद्ध मानले गेले. बऱ्याच लोकांचे म्हणणे असते, की कांदे, लसूण आरोग्याला खूप चांगले असतात, आणि म्हणून त्यांचे सेवन नेहमी केले पाहिजे. वांगेही शरीराला चांगले असतात, म्हणून तेही खाल्ले पाहिजेत. पण आयुर्वेदाचा दृष्टिकोण असा आहे, की प्रत्येक पदार्थ हा ऋतू, काळ बघूनच सेवन केला पाहिजे. आणि कांदे, लसूण इत्यादि केवळ औषधी स्वरूपात आणि तितक्याच प्रमाणात सेवन केले पाहिजेत. त्या पदार्थांचे जसे गुण आहेत तसेच दोष ही आहेत. कांदा आणि लसूण खाल्ल्यावर माणसाचे मन स्थिर राहू शकत नाही, विचलित होते, त्यात कामवासना वाढीस लागते, हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि काम वासना वाढू देण्यास हा काळ अनुकूल मानलेला नाही. तसेच याच्या सेवनाने शरीरातील वात वाढीस लागतो आणि विकृत होतो. तीच गोष्ट वांगे इत्यादि गोष्टींची आहे. त्यामुळे या काळात वरील पदार्थ वर्ज्य सांगितले आहेत. तसेच फुलकोबी, पत्ताकोबी, इत्यादि सुद्धा टाळायला सांगितले आहेत. कारण या भाज्यांमध्येही आळ्या, सूक्ष्म किडे इत्यादि या दिवसांत होण्याची खूप जास्त शक्यता असते. तसेच या काळात हिरव्या पालेभाज्या, मुळा, गाजर इत्यादींचे सेवन ही वर्जित सांगितले आहे. कारण हिरव्या पालेभाज्या किंवा मुळा, गाजर इत्यादि जमिनीच्या अगदी जवळ असतात( मुळा गाजर तर जमिनीतच असतात). शेतात पावसाळ्यामुळे चिखल झालेला असतो, आणि त्यामुळे पालेभाज्यांवर चिखल, माती, आणि सूक्ष्म किडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात या भाज्यांचे सेवन वर्ज्य सांगितले आहे.
- वर्ज्य समारंभ -या काळात शुभ कार्यांचे मुहूर्तही नसतात. भारतातील जनता मुख्यतः कृषिप्रधान असल्याने या काळात शेतकरी एकतर शेतीच्या कामात व्यस्त असतो. आणि लग्न, मुंज, यज्ञ याग इत्यादि कार्यात समाजातील लोकांचे एकत्र येणे अपेक्षित असते, जे की पावसाळ्यामुळे अवघड असते. या कारणामुळे या काळात वरील कार्यांचे मुहूर्त नसावेत. अर्थात बदलत्या काळानुसार परिस्थिती बदललेली आहे, आणि आजकाल काही पंचांगकर्त्यांनी सुद्धा बदलत्या काळानुसार वरील काळांसाठी आपत्कालीन मुहूर्त द्यायला सुरूवात केली आहे.
- उपवास- या काळात पाचक अग्नि कमी झाल्यामुळे, आहार हलका आणि बेताचाच घेणे योग्य असते आणि त्यातही मधून मधून पोटाला विश्रांती देणेही आवश्यक असते. याच दृष्टीने या चार महिन्यांत अनेक उपवास आणि व्रतें आपल्या संस्कृतीत योजली आहेत. त्यांचा योग्य तो अर्थ घेऊन खऱ्या अर्थाने उपवास केले, तर त्याचा फायदा नक्कीच शरीराला होतो आणि पावसाळ्याच्या मंद आणि कुंद् वातावरणात जठराग्निचे रक्षण होते. अन्यथा उपवासाच्या दिवशी विविध जड पदार्थ, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खाल्ले गेले, तर उपवासाचे फायदे तर दूर राहिले, पण तोटे मात्र निश्चित संभवतात. मग त्यापेक्षा उपवास न केलेला बरा, असे म्हणायची वेळ येते.
असो.
प्रतीकरूप समजावून घेणे आवश्यक
आता या चातुर्मासाविषयी आपल्या परंपरेत, विविध पुराणांत इत्यादि, काय सांगितले आहे, ते थोडक्यात बघू. या सर्व गोष्टींचे प्रतीकरूप समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, काय, पुराणातल्या गप्पा, असे म्हणून त्यांना झिडकारणे सोपे आहे, पण समजदारीचे नाही.
चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ होय. जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या काळात एरवी एका गावाहून दुसऱ्या गावाला विहार (प्रवास) करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात. हिंदू धर्मात ही या काळात संन्याशी एकाच गावात थांबतात. अन्यथा संन्याशांनी ३ दिवसांच्या वर एका जागी थांबू नये असा नियम असतो.
चातुर्मास कालावधी
चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मास सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीत आल्यावर त्याच्या आसपास, कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस ‘प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे.. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला शेषशायी विष्णू जलाशयात -क्षीरसागरात निद्रा घेतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे. या काळात जगाचा कारभार हा भगवान शिव बघतात अशी धारणा आहे. हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.
पौराणिक कथा
या संदर्भात ब्रह्मांडपुराणात सूर्यवंशातील मांधाता नावाच्या चक्रवर्ती सम्राटाची कथा सांगितली जाते. त्या राजाच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या.
त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले. व भुकेने आर्त झाले. तेंव्हा राजा आपल्या सैन्यासह वनात गेला, आणि अनेक ऋषींच्या आश्रमांना भेटी दिल्या. तिथे त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेले अंगिर ऋषी दिसले.
राजाने त्यांना प्रणाम करून आपले आणि आपल्या प्रजेचे दुःख सांगितले. त्यावर मुनीने त्यांना पद्मा एकादशीचे (म्हणजेच देवशयनी एकादशी) व्रत सांगितले, आणि आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत करायला सांगितले. राजाने आणि प्रजेने त्याप्रमाणे त्या सर्वांनी असे व्रत सुरू करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. अशी कथा ब्रह्मांडपुराणात सांगितली आहे.
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत, असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णूप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’
देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –
वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।
व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।
अर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.
या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.
पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.
मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.[६]
परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.
चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात.
चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.
चातुर्मासातील व्रते
सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.
वर्ज्य
१. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़[१०]
२. मंचकावर शयन
३. ऋतुकालावाचून स्त्रीगमन
४. परान्न
५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य
६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे. अजूनही बरेच लोक चातुर्मासात किंवा कमीतकमी श्रावण महिन्यात, दाढी करीत नाहीत.
अवर्ज्य
चातुर्मास्यात हविष्यान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ यांना हविष्यान्न म्हणतात. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)
आठवणी
मला आठवते, आमच्या लहानपणी- साधारण ५५ वर्षांपूर्वी, छोट्या गावांमध्ये, चातुर्मासामध्ये निरनिराळ्या पोथ्यांचे वाचन होत असे. संध्याकाळी, गावातील लहान थोर लोक, बाया बापड्या, सर्व श्रद्धेने पोथी ऐकायला जमत. या चार महिन्यांत विशेष करून निरनिराळ्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असे, गावांत कुणाचे न कुणाचे कीर्तन इत्यादि असे आणि लोक अत्यंत श्रद्धेने कीर्तन ऐकायला जमत. दर गुरुवारी आणि एकादशीला, बहुतेक कुठल्या मंदिरात किंवा कुणाच्या घरी, स्थानिक भजनी मंडळाचे भजन असे. संध्याकाळी ९ च्या नंतर,, सगळ्यांची कामे वगैरे आटोपल्यावर लोक एकत्र जमून भजन, संकीर्तन करीत. मी बऱ्याच वेळेला, माझ्या वडिलांसोबत अशा भजनाला जात असे. एखादे दिवशी भजनाला गेलो नाही, तरी घरी अंथरुणावर पडल्या पडल्या, टाळ मृदुंगांचा आवाज आणि कुणीतरी आळवून आळवून म्हटलेले भजन आणि इतरांनी त्याला दिलेली सामूहिक साथ, ऐकू येत असे आणि मी अगदी वेगळ्याच दुनियेत पोंचून जात असे.
समारोप
असो. रविवारी दि. ६ जुलै पासून यावर्षीचा चातुर्मास सुरू झाला आहे. आपल्या सर्व चांगल्या रूढी, परंपरा नेहमीसाठी सुरू राहोत आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे बळ देत राहोत, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
माधव भोपे
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.