In search of happiness- The story of the princess of Kashi
आपल्या सर्वांनाच गोष्टी ऐकायला खूप आवडते. आपल्या पूर्वजांना हे माहिती होते, आणि वेदांतातील क्लिष्ट प्रमेये सोपी करून सांगण्यासाठी त्यांनी रंजक गोष्टींचा खुबीने वापर केला आहे.
आपण जो आनंद शोधतो, तो बाहेर कुठे नसून आपल्या आतच आहे हे सांगण्यासाठी खालील कथा खूप उद्बोधक आहे.
खूप वर्षांपूर्वी, एका राजाच्या दरबारात, मनोरंजनासाठी, दरवर्षी जी नाटके होत, त्यात एके वर्षी, “काशीची राजकन्या” या नावाचे एक नाटक बसवायचे ठरले.
त्यात काशीच्या राजकन्येची लहानपणाची भूमिका एका लहान मुलीला द्यायची होती. त्यावेळी त्या भूमिकेला योग्य कोणी मुलगी सापडत नसल्याने, राजाच्या राणीने, आपल्या छोट्याशा पाच वर्षांच्या मुलालाच, मुलीचे रूप देऊन ती भूमिका करू देत असे सुचविले. भूमिकेत विशेष काही करायचे नव्हते, फक्त, छान नटून सजून, उभे राहायचे होते, त्याप्रमाणे ती भूमिका देण्यात आली आणि नाटक छान पार पडले. राजकुमार त्या भूमिकेत इतका गोड दिसत होता, की राणीने, राजदरबारातील चित्रकाराला सांगून त्याचे त्या मुलीच्या वेषात एक छान चित्र बनवून घेतले. चित्रकाराने चित्र बनवून, त्याला नाव दिले, “काशीची राजकुमारी”. त्याखाली सवयीप्रमाणे छोट्या अक्षरात आपले नाव आणि तारीख नोंद केली.
काही वर्षांनंतर ते चित्र राजवाड्याच्या तळघरात, कुठेतरी ठेवून देण्यात आले.
आता राजाचा मुलगा, तो राजकुमार, 20 वर्षांचा झाला होता. त्याचे रूपांतर एका देखण्या, उमद्या तरण्याबांड युवकात झाले होते.
एके दिवशी तो राजवाड्यात फिरता फिरता, तळघराच्या पायऱ्या उतरून, तळघरात आला. तिथे काय काय आहे ते तो उत्सुकतेने पाहू लागला.
तिथे त्याला एक छोट्या सुंदर गोंडस मुलीचे चित्र दिसले, ज्यावर लिहिले होते, “काशीची राजकुमारी”.
त्या चित्राखालील तारीख पाहून त्याने अंदाज केला की ही मुलगी आता जवळ जवळ आपल्याच वयाची असेल. तिचे एवढे सुंदर चित्र पाहून तो त्या मुलीच्या प्रेमात पडला! तरूण वय!. त्याने तत्क्षणी निश्चय केला की लग्न करीन तर याच मुलीशी!
तो दिवसरात्र त्या मुलीची स्वप्ने पाहू लागला. इतका, की त्याचे रोजच्या त्याच्या शिक्षणावरील, खाण्यापिण्यावरील, सर्व गोष्टींवरील लक्ष उडाले, आणि तो तिच्यासाठी इतका झुरू लागला, की त्याची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली. कोणाला सांगण्याची त्याची हिम्मत होत नव्हती.
त्याची ढासळती तब्येत बघून राजाला चिंता वाटू लागली, त्याने राजवैद्याला बोलावले. त्याच्याकडून ही काही निदान होईना. तेवढ्यात राजाचा विश्वासू प्रधान तेथे आला. त्याने राजाला सांगून राजकुमाराशी बोलायला एक दिवस मुदत मागितली. दुसऱ्या दिवशी प्रधान त्याला एकांतात घेऊन गेला, आणि हळुवारपणे त्याला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. प्रधानाच्या हळुवारपणे विचारण्यावर, राजकुमाराने सांगितले, “मी प्रेमात पडलो आहे”.
“वा, ही तर चांगली बातमी आहे! कोण आहे ती भाग्यवान?” प्रधानाने विचारले.
“ती काशीची राजकन्या आहे. मला तिचे लहानपणीचे चित्र खाली तळघरात दिसले, तेंव्हापासून मला दुसरे काहीही सुचत नाहीये. मला तिच्याशी लग्न करायचे आहे!” राजकुमार म्हणाला.
हे ऐकल्यानंतर सुरुवातीला प्रधानाला काही अर्थबोध झाला नाही. पण “काशीची राजकन्या” हे नाव त्याला कुठे तरी ऐकल्यासारखे वाटू लागले.
“राजकुमार, तुम्ही ते चित्र मला दाखवा बघू.” प्रधान म्हणाला.
राजकुमार प्रधानाला तळघरात घेऊन गेला, आणि त्याने ते चित्र प्रधानाला दाखवले.
ते चित्र पाहिल्याबरोबर, प्रधानाला सगळा प्रकार लक्षात आला.
“राजकुमार, मला तुम्हाला काही सांगायचे आहे,” प्रधान गंभीरपणे म्हणाला .
“काय?” राजकुमार आता व्याकुळ झाला होता.
“तुम्हाला या मुलीशी लग्न करता येणार नाही”.
“का पण?” राजकुमाराने व्यथित होत विचारले. “तिचे लग्न आधीच झाले आहे की काय?, की.. की.. ती जिवंत तर आहे ना?” राजकुमाराने व्याकुळ होत विचारले.
मग प्रधानाने त्याला पंधरा वर्षांपूर्वी राजदरबारात झालेल्या नाटकाची कहाणी सांगितली. कशा प्रकारे राजकुमाराला मुलीचा वेष देऊन ती भूमिका करायला सांगितली होती, आणि मग कसे राजदरबारातील चित्रकाराने त्याचे त्या वेषातील चित्र काढले होते, ही सर्व कहाणी प्रधानाने राजकुमाराला सांगितली.
“राजकुमार! तुम्ही त्या राजकुमारीशी विवाह करू शकत नाही, कारण की तुम्हीच आहात ती काशीची राजकुमारी!”
प्रधानाचे ते शब्द ऐकून राजकुमार अवाक आणि निःशब्द होऊन थोडा वेळ स्तब्ध राहिला.
पण पुढल्याच क्षणी, इतके दिवस त्याच्या मनात चाललेली घालमेल एकदम थांबली.,आणि त्याला पिसासारखे हलके हलके वाटू लागले. “ओह!. काशीची राजकन्या अशी कोणी नाहीच. मीच तो!.. आणि मी इतके दिवस उगीच झुरत होतो!”
वेदांतामधील एक अत्यंत अवघड आणि महत्वाचा सिद्धांत किती सोप्या पद्धतीने इथे समजून सांगितला आहे!
वेदान्त सांगतो, की जग हे आपल्यापासून काही वेगळे नाहीये. आपण “मी” आणि “इतर जग” असे त्याचे दोन काल्पनिक विभाग केले आहेत, त्यामुळेच सर्व दुःख निर्माण होते आहे.
आपणा सर्वांना, आनंदी असण्याची, आणि कायम आनंदी राहण्याची एक अनावर ओढ असते. पण तो आनंद आपल्या आत सापडत नसल्यामुळे, आपण तो वेड्यासारखा, बाहेर शोधायला लागतो. पण सत्य हे आहे, की आनंद बाहेर नाहीच. हे म्हणणे कदाचित आपल्याला लगेच पटणार नाही. तुम्ही म्हणाल, बाहेर अनेक गोष्टींमध्ये आम्हाला आनंद मिळतोच मिळतो. आपली आवडती वस्तू मिळाली, आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळाला, किंवा मनाला आनंद देणारी एखादी घटना घडली, की आनंद होतो!
या गोष्टींमध्ये आनंद मिळतो हे जरी खरे असले, तरी, हा “तो” आनंद नाही, ज्याची आपल्याला आस आहे. आपल्याला “कधी कधी” , किंवा “काही प्रमाणात” आनंदी होण्याची आस नसते. तर परिपूर्ण, नेहमी टिकणारे आनंदीपण ही खरी आपली आस असते.
बाह्य वस्तू, व्यक्ति आणि परिस्थितीमुळे मिळणारा आनंद हा थोड्या काळासाठी, अनिश्चित, आणि भीतियुक्त असतो. (तो आनंद आपल्यापासून दुरावण्याची भीती). हे सर्व असेच कायम राहू शकत नाही, हे आपल्याला आत कुठेतरी माहिती असते.
खरा आनंद हा कुठल्याही बाह्य वस्तू, व्यक्ति, परिस्थितीवर अवलंबून नसतो, आणि चिरकाल टिकणारा असतो. आपल्याला खरे तर बाह्य वस्तूंचे क्षणभंगुरत्व माहिती असते, तरी, आपण आपला आनंद तिथेच शोधत राहतो.
या गोष्टीतील काशीची राजकुमारी जशी अस्तित्वात नाही, राजकुमाराने आपला आनंद फक्त तिच्या कल्पनेत पाहिला, तसेच आपण बाह्य जगात आनंद शोधतो. पण जेंव्हा त्याला कळाले, की तोच ती “राजकुमारी” आहे, तेंव्हा त्याचे सगळे दुःख, तळमळ नष्ट झाली. त्याचप्रमाणे, जेंव्हा आपले खरे रूप आपल्याला कळते, तेंव्हा, सर्व तळमळ, तत्क्षणी थांबते.
वेदांतातील अशा अनेक कथा आपण यापुढे पाहणार आहोत.
काहीतरी सकस वाचूयात.
उन्नतीच्या मार्गावर चालूयात!
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.