https://goodworld.in A website by Madhav Bhope

Marathi Surnames-मराठी आडनावांचा इतिहास

Milind Abhyankar- मिलिंद अभ्यंकर

 
village man 1
मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी 
 
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे प्रख्यात कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
 
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी संस्कृतीत रुजलेल्या “आडनाव” या वैशिष्ट्यपूर्ण शब्दाविषयी मला नेहमीच कुतुहुल वाटत आलेले आहे. कारण अशी पद्धत अन्य भाषेत अभावानेच आढळते.
आद्यनाव या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश म्हणजे आडनाव. त्याचे झाले पद नावं आणि त्याचा अपभ्रंश पड नाव हे पड नाव किंवा पदनाम त्या त्या कुळांना कोणत्या प्रकारची शेती करतो किंवा पशुपालन करतो किंवा कोणत्या फुला फळाच्या बागा लावतो किंवा व्यापार करतो किंवा कोणती प्रशासकीय कामे करतो किंवा संरक्षण सेवेत कोणते पद घेऊन काम करतो यावरून पडली.आडनाव हे जरी शेवटी लिहले जात असले तरी ते आद्य नाव आहे आद्य म्हणजे पूर्वीचे कुळाचे नाव ते आद्य नाम आणि याचा अपभ्रंश होऊन झाले आडनाव.मराठी नामोल्लेखाच्या/ नामलेखनाच्या प्रचलित पद्धतीत
• व्यक्तीचे स्वतःचे नाव/ पहिले नाव
• व्यक्तीच्या वडिलांचे/ (काही वेळा) आईचे/ (व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास) पतीचे नाव आणि
• व्यक्तीच्या वडिलांचे आडनाव/ व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास तिच्या पतीचे आडनाव
अशी नावांची त्रयी सांगण्याची/ लिहिण्याची प्रथा आहे. ह्या तिहेरी नावाला संपूर्ण नाव असेही म्हणतात. मात्र नामोल्लेखाची वा नामलेखनाची ही पद्धत सार्वत्रिक आहे असे नाही. तसेच आडनाव ह्या संज्ञेने व्यक्त होणारा संकेतही सार्वत्रिकरीत्या आढळेल असे नाही.
(आधार विकिपिडिया)
 
देशपांडे, जोशी, कुलकर्णीं, देशमुख, पाटील,पवार, गायकवाड, कांबळे, इनामदार, जहागीरदार, कोतवाल, अशी आडनावे तर सरार्स आढळतात. गावाच्या नावावरुन तर असंख्य आडनावे आहेत. गावाला कर असे संबोधन चिटकवायचे जसे गाव+कर= गावकर. पण आडनाव नाही असा मराठी माणूस औषधाला देखिल सापडणार नाही.आमच्या कोब्रा जातीतली आडनावे खूपच वेगळी आहेत असे माझे निरीक्षण आहे. आता बघा माझेच आडनाव अभ्यंकर आहे. बरेच जण मला विचारतात की तुम्ही अभ्यं गावचे आहात का? मलाही अनेक दिवस या आडनावाचा खुलासा होत नव्हता. एका देऋबाने (देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण)त्याचा अर्थ मला सांगीतला. अभयं करोती अभया, म्हणजे अभय मागणाऱ्याला जो अभय देतो त्याला अभ्यंकर म्हणतात. म्हणजे पाहा आम्ही किती महान आहोत. नाहीतर अनेकजण मला भयंकर म्हणूनच हाक मारत असतात. शाहीर साबळेंच्या भारुडात तुम्ही ऐकलेच असेल …इंगळी म्हणजे मोठा विंचू, मोठा म्हणजे भयंकर मोठा, म्हणजे तो अभ्यंकर नाही का… त्याच्यासारखा” 😅
 
असो. आता अन्य चित्तपावनी आडनावे पाहू
लेले यांच्यावरुन आम्ही वा.क.लेले, थ.क.लेले अशी नावे तयार केली होती. नुकताच ओले आले हा सिनेमा पाहीला त्यात आदित्य लेले, ओंकार लेले अशी बाप लेकाची जोडी आहे.
रानडे, बरेच जण याचा उच्चार रांडे असा करतात.
दातीर, दातार, दाते,दात्ये या लोकांचे दात पुढे आलेले असावेत.😁
पोंक्षे या आडनावाचा उच्चार केला की डोळ्यासमोर पोंगा दृष्यमान होतो.
गोखले आडनावाचा भरपूर खोकणारा असावा.
ढमढेरे ढम व ढेरे मग काय बघायलाच नको.
टकले आडनाव पण डोईवर दाट केस.
आडनाव डोंगरे पण शरीरयष्टी खड्यासारखी.
केळकर आणि चोळकर या आडनावांचे माझे नातेवाईक आहेत. आता यांचा विवाह झाला आहे. सुज्ञास सांगणे नलगे…..🤪
काळे गोरे तर उडदामाजी आहेतच मग चित्तपावन त्याला अपवाद असू शकत नाहीत.
हगवणे आडनावाच्या मुलाला कुणी मुलगी देत असेल का?
नातू आडनाव म्हणजे जन्मभर हे नातवंडच राहणार.
आपटे काय आपटत होते कुणास ठावूक.
ह.ना. आपटे या लेखकाचे नाव माझा एक देशस्थ मित्र हणा आपटे असा करतो.
(बऱ्याच देशस्थ ब्राह्मणांना ‘न’ आणि ‘ण’ याचा उपयोग कसा करावा हे कळत नाही असे माझे निरीक्षण आहे. कान व मान याचा उच्चार काण व माण असे करताना मी पाहात आलो आहे.)
बापट – हे पण काही तरी आपटत असणार. आमच्या बापट नावाच्या मित्राला आम्ही “बापट कुल्ले आपट” असे चिडवत असू. तो देखिल भारी, काॕलेजच्या बेंचवर कुल्ले आपटून दाखवत असे. 🤣
रास्ते हे असेच एक चित्तपावनी नाव. रस्ते बनवत असावेत.
खांबेटे – खांब व बेट काय सबंध असावा?
रिसबुड – मुळात बुड हा शब्दच अनेक अर्थ उत्पन्न करतो. यांचे बुड ठिकाणावर राहात असावे, रीसभरही इकडेतिकडे होत नसावे.😊
गाडगीळ – एकतर गाड किंवा गीळ
दामले – जया दामले (माझ्या परिचित) याचा अर्थ सांगतील कदाचित दाम मागतील !
पेंडसे – (प्राची पेंडसे, माझ्या एक परिचित) याचा अर्थ सांगतील, पेंडखजुराचा काही संबंध असावा !
साने – हे बहुतेक लहानसहान काम करत असावेत.
परांजपे – परांशी जपून वागत असावेत.
गोडसे – गोड असे पण नावापुरता.
मराठे – पण जातीने चित्तपावन. आमच्या एका मामाला मराठे कुटुंबातील मुलगी मिळाली आणि गावात त्याकाळात चर्चा सुरु झाली जोशाच्या पोरान मराठ्याची पोरगी केली म्हणे !
विद्वांस – या आडनावाची माझी मावशी होती. अनेकजण त्याचा उच्चार विध्वंस असा करतात.
उकिडवे – माझे आतेकाका. यांचा असा कोणता व्यवसाय होता कुणास ठावूक?
आठवले – सतत नको त्या गोष्टीं आठवत असावेत.
आठल्ये – कपाळावर कायम आठ्या असणार
पटवर्धन – पटावर धन करणारे
सोमण – मणाचे ओझे सहज वागवत असावेत
फडके – सारखे कपडे गुंडाळत असणार
दांडेकर – अर्थात दांडगई करणारे किंवा थांबवणारे.
तुळपुळे – कायम तुळतुळ करणारे.
हसबनीस किंवा हसमनीस म्हणजे जे मनातल्या मनात हसतात ते
असो. 😊
 
काही आडनावे मराठीतील डुकरे, गाढवे, मुंगळे, मुंगी, वाघ, वाघमारे, बकरे, कोंबडे, बदके, चिमणे, कावळे, ढवळे, पवळे, ढेकणे, पिंगळे, मोरे, ढोरमारे, कोळसे, लाकडे, कुऱ्हाडे, भामटे, गुंड, पुंड, बडवे का पडली असावीत? याचा मी नेहमी विचार करतो.
सखारामपंत खापरखुंटीकर हे आमच्या मराठवाड्यातील एका कलाकाराचे नाव वाचले की नकळत मला हसायला येते. तसेच आमच्या एका मित्राचे आडनाव दिवटे आहे. तो दिसला की माझ्या मनात नकळत आले दिवटे चिरंजीव असे शब्द येतात. पांडव नावाचा माझा एक मित्र आहे. काॕलेजमधे आम्ही नुकतेच गेलो होतो. प्रत्येकजण नाव आडनाव सांगत होता. पांडवने नाव सांगीतले, काहीवेळाने एकाने आपले आडनाव तोरो असे सांगीतले, आम्हाला ते कौरव असे ऐकू आले. वर्गात हशा पिकला, चला पांडव व कौरव वर्गात आहेत म्हणजे महाभारत अर्थात वस्त्रहरण कार्यक्रम होणार असे मुले विनोदाने बोलू लागली.
 
कुंभार, सोनार, चांभार, फुले, काटे, वारीक, माळी, कोळी, कोष्टी, गोसावी, ही बलुतेदारी करणारी आडनावे आहेत.
असा आहे हा मराठी आडनावांचा महिमा. बाहेरच्या राज्यात गेल्यावर अनेक अमराठी लोकांना आपले नेमके नाव काय आहे हे कळत नाही. असा माझा अनुभव आहे. माझे मिलिंद हे नाव अनेकांना कळतच नाही. मिलिंद गणेश अभ्यंकर असे नाव असताना अनेक जण मला गणेश असे पुकारत. तर दिल्लीत माझे मिलिंद हे नाव मिलन असे झाले होते.
शेवटी आडनावात काय आहे, असे म्हणावेसे वाटते, पण नाही, आडनावात बरेच काही आहे ते मराठी माणसाला चांगले कळते.
ही आहे माझ्या प्रिय मायमराठीची आडनावांची गंम्मत, खासीयत.
वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना मराठीभाषा गौरव दिनानिमित्त शब्दांजली.
मिलिंद गणेश अभ्यंकर
छत्रपति संभाजीनगरकर

वरील लेख श्री मिलिंद गणेश अभ्यंकर यांच्या फेसबुक  वरून  साभार- श्री अभ्यंकर यांचा मूळ लेख वाचण्यासाठी  फेसबुक लेखाची खालील  लिंक क्लिक करा.

लेखक हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून मुख्य प्रबंधक म्हणून निवृत्त झाले आहेत आणि फेसबुक आणि अन्य माध्यमांवर वेळोवेळी प्रसंगोचित लिखाण करीत असतात. 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading