Life is a learning journey.
जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे..
आपला कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी संबंध येतो. विशेषतः आपण जिथे नोकरी किंवा व्यवसाय करीत असू, तिथे आपल्या सोबत असणाऱ्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. मी गेल्या लेखात, औरंगाबाद (आताचे संभाजीनगर) येथे काम करत असतांना त्यावेळचे तेथील DGM श्री नकीब यांच्या बद्दल लिहिले होते. आता अजून काही व्यक्तिमत्वांबद्दल लिहायचे आहे.
- श्री बी. डी. भोपे
मी बँकेत लागण्याच्या आधीपासून, माझे वडील बंधू, श्री बी. डी. भोपे, हे बँकेत होते. ते बँकेतील एक अत्यंत प्रसिद्ध, लोकप्रिय, अभ्यासू आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते.
मी बँकेत लागल्यावर मला पहिली पोस्टिंग औरंगाबादपासून 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खुलताबाद या उंचावरील निसर्गरम्य ठिकाणी मिळाली. माझी पोस्टिंग कॅशियर कम क्लर्क अशी होती.
हे जेंव्हा वडील बंधू (ज्यांना आम्ही ‘दादा’ म्हणत असू) यांना कळाले, तेंव्हा त्यांनी मला एक खूप उपयुक्त असा सल्ला दिला. ते म्हणाले, हे बघ, तुझी अपॉईंटमेंट कॅशियर कम क्लर्क म्हणून झाली आहे. तेंव्हा तुला केंव्हाही कॅश वर पण बसावे लागेल. (म्हणजे कॅशियर म्हणून काम करावे लागेल). त्यावेळी, माझ्या गुरुने मला सांगितलेली एक गोष्ट मी तुला सांगतो, जेणे करून तुला कॅश मध्ये कधीही shortage येणार नाही. ती गोष्ट अशी, “लेकर लिख, लिखकर दे – घाटा आया तो मुझसे ले!” म्हणजे असे, की तू काऊंटर वर बसल्यावर जेंव्हा कोणी कॅश जमा करायला येईल, तेंव्हा, त्यांनी दिलेली स्लिप, आणि त्यासोबतची कॅश- घेतल्यावर आधी मोजून घ्यायची- आणि त्याचे डिटेल्स आपण आपल्या हाताने त्या व्हाऊचर वर लिहायचे, टोटल करायची, आणि त्याने व्हाऊचर वर लिहिलेल्या रकमेसोबत ती जुळल्यावर, मग आपल्या Receipts च्या रजिस्टर मध्ये enter करायची. याच्या उलट कृती पेमेंट देतेवेळी करायची- पेमेंट च्या व्हाऊचर वर आधी आपण देणार असलेली कॅश पूर्ण लिहायची, tally करायची, आणि मग समोरच्या व्यक्तिला द्यायची. पेमेन्टचे व्हाऊचर दिवसाच्या शेवटी रजिस्टर मध्ये एंटर करायचे.
मी हा सल्ला चांगला लक्षात ठेवला. मला नेहमी जरी कॅश वर बसायचे काम पडत नसायचे, तरी जेंव्हा केंव्हा कॅश मध्ये काम करायची वेळ येई, त्यावेळी मी या पद्धतीने कॅश घेणे किंवा देणे करीत असे. त्यामुळे, माझी ऑफिसर म्हणून प्रमोशन होईपर्यंतच्या साडेसात वर्षांच्या काळात अनेक वेळा कॅश वर काम करावे लागले, पण कधी शॉर्ट आले नाही की एक्सेस आले नाही. आणि कॅश मध्ये काम करतांना कितीही गर्दी आली तरी त्याचे कधी दडपण आले नाही.
बी. डी. भोपें बद्दल अजूनही कधी विषय निघाला की त्यांच्यासोबत काम केलेले लोक भरभरून बोलतात. त्यांच्या उंचीच्या जवळपासही मला जाता आले नाही. पण प्रत्येक गोष्टीत बारीक सारिक डिटेल्सचा अभ्यास करून विषयाची पूर्ण माहिती करून घेण्याचा त्यांचा गुण थोड्या प्रमाणात मी आत्मसात करू शकलो.
- श्री एम. एस. भाले
खुलताबाद ला काम करतांना श्री एम. एस. भाले उर्फ मधू भाले, हे हेड कॅशियर होते. त्यांचा कॅशच्या कामातील आणि इतरही कामातील नीटनेटकेपणा अतिशय वाखाणण्याजोगा होता. एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, तितकेच स्वाभिमानी, फटकळ पण त्याच वेळी आपले काम आटोपून इतरांना मदत करण्यात अत्यंत तत्पर असे हे व्यक्तिमत्व होते. त्यांचा आत्मविश्वास अत्यंत दांडगा होता. आणि राहणीमान, कपड्यांची आवड निवड ही अत्यंत चोखंदळ होती. कॅश च्या रजिस्टर मध्ये प्रत्येक कॉलम मध्ये सर्व फिगर्स अत्यंत नीटनेटक्या, एकाखाली एक लिहिलेल्या, आणि शेवटी टोटल मारतांना, एका रुळाने टोटलच्या खाली आणि वर सरळ रेष आखणार. जेणे करून टोटल हायलाईट होईल. आमच्या बँकेत करन्सी चेस्ट होती, म्हणजे आर. बी. आय. ची प्रतिनिधि म्हणून आमच्याकडे दर काही महिन्यांनी कोट्यावधीची नवीन करन्सी यायची. तसेच करन्सी चेस्ट चे व्यवहार, त्याचे दिवसाच्या सुरुवातीचे बॅलन्स, दिवसभरातील व्यवहार, आणि दिवसाच्या शेवटचे बॅलन्स, सर्व नोटांच्या तपशीलासह, असा पूर्ण तपशील रोजच्या रोज करन्सी ऑफिसर रिझर्व्ह बँक यांना पाठवावा लागायचा. त्याला चेस्ट स्लिप म्हणायचे. श्री भाले हा तपशील अत्यंत अचूकपणे भरून वर तो लिफाफा स्वतःच्या हाताने तयार करून त्यात ती स्लिप टाकून तयार ठेवत. कामातील अचूकता आणि परिपूर्णता हे गुण मला त्याकाळी त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
- श्री बी. ए. रझवी (बाकर आली रझवी)
माझी खुलताबादहून कन्नड येथे बदली झाली. कन्नड येथे बँकेचे एग्रिकल्चरल बँकिंग डिविजन (A.B.D.)होते. तिथे माझी पोस्टिंग झाली. A.B.D. म्हणजे मुख्य शाखे अंतर्गत, कृषि कर्जां साठीचा खास विभाग होता, आणि त्याचे इन चार्ज श्री बी. ए. रझवी हे होते. त्या विभागात सुरुवातीस आम्ही दोघेच होतो. मी त्यांचा सहाय्यक म्हणून तिथे 3 वर्षे काम केले. (साधारण एक-दोन वर्षांनंतर श्री एस. पी. माथुर हे तांत्रिक अधिकारी त्या विभागात आले.)
त्यांच्या सोबत काम करतांना, मला शेती कर्जाची अगदी बारीक सारिक माहिती झाली. ते मला त्यांच्या सोबत फील्ड वर मोटर सायकल वर इन्सपेक्शन ला घेऊन जात. तिथे शेतीची, पिकांची, विहीर, मोटार, पाइप लाईन, सर्व गोष्टींची माहिती मिळत असे. तोपर्यन्त माझा शेतीशी कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला नव्हता. पण इथे मला सगळ्या शेतीसंबंधात बारीक सारिक गोष्टींची पण पूर्ण माहिती झाली.
मला त्यांच्यातला एक गुण फारच नोंद करण्यासारखा वाटला, आणि मी काही प्रमाणात तो पुढे चालून आत्मसात करण्याचा, मला जमेल तितका प्रयत्न केला. तो म्हणजे, compartmentalization. त्यांच्यासमोर जेंव्हा एखादा खातेदार (शेती कर्जाचा) बसला असे, आणि तो जर थकबाकीदार असेल, किंवा त्याने काही नियमबाह्य काम केले असेल, तर ते त्याला खूप झापत. (ते मुस्लिम असले तरी अगदी अस्खलित मराठी बोलत, आणि दिसायला एखाद्या कोकणस्थासारखे गोरे पान दिसत.)त्यावेळी त्यांची पूर्ण देहबोली, हातवारे, इत्यादि त्यांच्या मुद्द्याला साजेसे, आक्रमक होत आणि बोलता बोलता त्यांचा गोरापान असलेला चेहरा, लालबुंद होऊन जात असे. पण तो विषय संपला, की त्याच कर्जदाराशी इतर कुठला विषय असेल, किंवा त्यानंतर लगेच त्याच्यासोबत आलेल्या दुसऱ्या कुणाशी बोलण्याचे असेल, किंवा माझ्यासोबत काही बोलायचे असेल, तेंव्हा एक क्षणाचाही वेळ न लागता, एखाद्या कसलेल्या नटासारखे ते दुसऱ्या, हलक्या फुलक्या मूड मध्ये येऊ शकत. आधीच्या रागावलेल्या मूडचा मागमूसही त्यांच्यात दिसत नसे.
या ब्लॉग वर काही दिवसांपूर्वी, वैद्य सोहन पाठक यांचा Compartmentalization ⇒
(विभागीकरण, किंवा कप्पे करण्याचे कसब)या विषयावरचा लेख आपण वाचला असेल. मला वाटते हे compartmentalization रोजच्या आयुष्यात खूप आवश्यक आहे. त्यामुळे एका गोष्टीचा किंवा प्रसंगाचा तणाव दुसऱ्या गोष्टीवर पडणार नाही. आणि हे कसब कोणामध्ये उपजत नसेल तरी प्रयत्नाने साध्य करता येऊ शकेल. या बद्दल यापूर्वीच्या एका लेखात Acquire New skills (काही तरी धरावी सोय, आगंतुक गुणांची) मी माझी मते व्यक्त केली होती.
मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वांनी मला वेगवेगळ्या कारणांमुळे प्रभावित केले, त्यांच्याबद्दल लिहिण्याच्या प्रपंचातील हा दुसरा लेख. आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्ति या आपल्यावर आणि आपण त्यांच्यावर परस्पर प्रभाव कमीजास्त प्रमाणात टाकत असतो, आणि त्यातून आपले व्यक्तिमत्व घडत जात असते, ही प्रक्रिया शेवटपर्यंत चालू असते, असे मला वाटते.
येणाऱ्या भागात आणखी काही व्यक्तिमत्वांबद्दल लिहिण्याचा विचार आहे. आपले याबाबतीतील विचार जरूर कळवा.
आवडल्यास ब्लॉगला subscribe करा.
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.