Life is a learning journey.
या आधीच्या दोन लेखांत एकूण चार व्यक्तिमत्वांबद्दल लिहिले होते. आज आणखी काही सहकाऱ्यांबद्दल सांगावेसे वाटते.
माझे बी ग्रुप मध्ये प्रमोशन झाल्यावर एक वर्ष ट्रेनिंग आणि एक वर्ष प्रोबेशन असे दोन वर्ष झाल्यावर मला पहिली पोस्टिंग बीड A.D.B. येथे फील्ड ऑफिसर म्हणून मिळाली. बीड एडीबी ला आम्ही ४ ते ५ फील्ड ऑफिसर्स होतो. ब्रँचकडे भरपूर गावे दत्तक होती आणि प्रत्येक फील्ड ऑफिसरला १५ ते २० गावे दिलेली असत. बीड A.D.B च्या कार्यकाळात तसे तर सगळ्यांकडून काही ना काही शिकायला मिळाले, पण २ सहकाऱ्यांकडून मी काही खूप उपयुक्त गोष्टी शिकलो. आणि अजून एका स्वच्छंदी व्यक्तीचे व्यक्तिमत्व खूप लक्षात राहिले.
- श्री एन जी. बांटे
माझी तिथे पोस्टिंग झाल्यानंतर, काही कालावधीनंतर तिथे श्री एन जी. बांटे यांची टेक्निकल ऑफिसर म्हणून पोस्टिंग झाली. टेक्निकल ऑफिसरचे काम म्हणजे सगळ्या फील्ड ऑफिसर्सला काही तांत्रिक बाबीत सल्ला देणे. त्यात विहीर, मोटर, पाइप लाईन, ड्रिप इरिगेशन, हॉर्टिकल्चर, इत्यादि साठीची जी कर्ज प्रकरणे असत, ज्यात बर्याच तांत्रिक गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते, त्यात शक्यतो फील्ड ऑफिसर च्या सोबत जाऊन, संयुक्त पाहणी करून, तो प्रोजेक्ट व्हाएबल आहे की नाही, किंवा तसा नसेल तर त्यात काय बदल करावे लागतील, इत्यादि गोष्टींचा रिपोर्ट देणे.
श्री बांटे यांची आणि माझी वेव्हलेंग्थ जुळत होती. भरपूर उंची, भव्य चेहरा, थोडे टक्कल पडत आलेले, नेहमी इन करण्याची सवय, आणि चेहर्यावर सौम्य भाव आणि वागणे आणि बोलणेही तसेच सौम्य. कोणाचे मन दुखवणार नाही, पण स्पष्टवक्तेपणाने समोरच्यासाठी योग्य तो सल्ला देण्याची वृत्ती. आणि त्यांना शेतीबद्दल अगदी खोल तांत्रिक ज्ञान होते आणि या आधीचा इतर शाखांमधला समृद्ध अनुभवही होता. मला याचा खूप उपयोग झाला.
त्यांचे एक वैशिष्ट्य होते. कुठल्याही शेतात गेल्यानंतर (जिथे नवीन विहीर घ्यायची आहे, किंवा जुन्या विहीरीची दुरूस्ती करायची आहे), त्यांना थोड्याच वेळात तिथल्या टोपोग्राफीचे योग्य आकलन होत असे. शेताच्या चारी बाजूला फिरून ते विहीर घेण्याची योग्य जागा अचूक सांगू शकत. साधारण किती फुटावर पाणी लागेल याचाही त्यांना अंदाज येत असे. किती इंची पाइपलाइन लागेल, किती हॉर्सपॉवर ची मोटर लागेल, इत्यादि तपशील ते अचूक सांगत. जमिनीचा पोत कसा आहे, ती कुठल्या पिकासाठी योग्य आहे हेही ते लगेच सांगू शकत. वेगवेगळ्या पिकांसाठीचा (विशेषतः द्राक्ष वगैरे महाग पिकांसाठी) येणार्या खर्चाचा, लागणार्या खतांचा, फवारणीचा, तपशील त्यांना पूर्ण माहिती असे, आणि शेतकर्याशी ते अधिकारवाणीने बोलू शकत आणि त्याला योग्य तो सल्ला ही देऊ शकत. या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. त्यामुळे मी त्यांना अनेक शंका विचारीत असे आणि त्याचे त्यांच्याकडून योग्य ते उत्तर मला मिळत असे.
जसा पाणाड्याला जमिनीत पाणी कुठे लागेल याचा अंदाज असतो, त्याप्रमाणे त्यांचा अंदाज बरोबर ठरत असे. पण ते त्यामागचे शास्त्र समजावून सांगत. आणि या त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल त्यांना जराही अभिमान किंवा गर्व नव्हता. या आधी त्यांनी लोकांना केलेल्या मार्गदर्शनामुळे कसे व्यवस्थित पाणी लागले, इत्यादीचे किस्से ते कधी कधी सांगत. पण त्यात कुठेही बढाईचा लवलेश नसे. त्यांनी बनविलेला टेक्निकल रिपोर्टही सविस्तर आणि परिपूर्ण असे. त्यांच्यासोबत दोन वर्षे राहून मला खूप नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली.
त्यांच्यासोबत जाऊन जाऊन, जी माहिती झाली होती, तिच्या जोरावर नंतर नंतर मी पण शेतावर गेल्यावर एखाद्या एक्स्पर्टचा आव आणून शेतकर्याशी चर्चा करीत असे! त्याचे थोडे फार इंप्रेशन कधी कधी पडत असे. पण माझे ज्ञान हे अनुभवावर आधारित नसल्याने आणि तोकडे असल्याने, कधी कधी पोल उघडी पडण्याची वेळ येत असे! कन्नड येथे मिळालेला 3 वर्षांचा अनुभव, आणि बीड A.D.B. येथील अनुभव, एवढ्या भांडवलावर पुढील कालावधीत जेंव्हा जेंव्हा शेती कर्जाशी संबंध आला तो कालावधी निर्वेधपणे पार पडला!
माझी नंतर दुसर्या शाखेत (अजिंठा शाखा) बदली झाल्यानंतरही मला कुठलीही अडचण आली तर मी बांटेसाहेब यांना फोन करून त्यांचा सल्ला विचारीत असे आणि तेही कुठलेही आढेवेढे न घेता मला योग्य तो सल्ला देत. बँकेतील माझ्या जडण घडणीत ज्या लोकांचा सहभाग आहे, त्यात श्री बांटे यांचे खूप मोलाचे स्थान आहे.
- श्री पी. के. कुलकर्णी
बीड A.D.B येथे असतांनाच, श्री पी. के. कुलकर्णी हे माझ्याबरोबर फील्ड ऑफिसर होते. पण माझी ही पहिलीच पोस्टिंग होती तर श्री पी. के. कुलकर्णी हे मला खूप सीनियर होते आणि अनुभवी होते. त्यात आणखी विशेष म्हणजे ते बीड येथे परवानानगर या बँकर्सच्या कॉलनीमध्ये माझे शेजारी होते. एक घर सोडून त्यांचे घर होते. त्यामुळे आमच्या दोन्ही कुटुंबांचे पण एकमेकांसोबत खूप प्रेमाचे संबंध होते. ते मला सीनियर असल्यामुळे मी नेहमी मला कुठलीही शंका असली तरी त्यांना विचारत असे. आणि त्यांच्याकडून त्याचे अगदी प्रॅक्टिकल उत्तर मिळत असे. त्यांचाही स्वभाव हा अत्यंत सौम्य, हसतमुख आणि मनमिळाऊ असा होता. आणि कर्जदारांशी बोलतांनाही ते अगदी मित्रत्वाच्या टोनमध्ये बोलत. आम्ही बऱ्याच वेळा सोबत inspection ला जात असू. विशेषतः जेंव्हा माझी आणि त्यांची गांवे एकाच रूट वर असत तेंव्हा आम्ही एकाच जीप मधून सोबत जात असूत. त्यावेळी मी त्यांची खातेदारांशी बोलण्याची पद्धत जवळून बघत असे. त्यांची संवाद साधण्याची एक खास पद्धत होती. ते आधी खातेदाराशी सुरुवातीला आपुलकीच्या गोष्टी बोलून त्याचे मन मोकळे करीत आणि त्याच्या मनात विश्वास निर्माण करीत. थकबाकीदार असला तरी सरळ त्याच्या थकबाकीच्या मुद्द्यावर न येता, आधी त्याची आपुलकीने चौकशी करीत. त्याचे सध्या कसे काय चालले आहे, यावर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी, पीकपाणी कसे झाले, घरी काही अडचण आहे का, इत्यादि सर्व चौकशी अगदी आपुलकीने करीत. आणि मग अगदी सौम्यपणे आपल्या मुद्द्यावर येत. कधी कधी नुसत्या revival letter किंवा rephasement letter वर सही घेण्याचे काम असे. पण अशा प्रकारे बोलल्यानंतर कुठलाही खातेदार पाहिजे ती सही करून द्यायला कधीच नकार देत नसे. मला त्यांची ही communication ची पद्धत खूप भावली. या गोष्टींचा मला पाथरी A.D.B. ला काम करतांना खूप उपयोग झाला. नंतर, खूप वर्षांनी औरंगाबाद येथील ट्रेनिंग सेंटरला जॉइन झाल्यावर, मला SBI मध्ये आमच्या Trainers training मध्ये जेंव्हा communication, soft skills, inter personal relations इत्यादि विषयांची ओळख झाली, त्यावेळी असे जाणवले, की या विषयांवरील वस्तुपाठ आपल्याला या व्यक्तिंकडून आधीच मिळाला आहे.
- श्री बी. एन. कुलकर्णी
बीड A.D.B येथे असतांना जे एक मनमौजी व्यक्तिमत्व माझ्या लक्षात राहिले ते म्हणजे, तिथे नंतरच्या काळात आलेले शाखाधिकारी श्री बी. एन. कुलकर्णी हे होत. त्यांची पूर्ण सर्विस मुंबई दिल्ली सारख्या मेट्रो शहरांत गेली होती आणि त्यांनी याआधी कधीच शेतीशी संबंधित शाखेत काम केले नव्हते. पण तसे असतांनाही त्यांना कुठलेच टेंशन नव्हते. ते तेंव्हा अर्थातच बरेच सीनियर होते (जवळजवळ पन्नाशीच्या आसपास). आणि त्यांना अगदी अप-टू-डेट राहायला आवडे. साधारण डार्क रंगाची पॅन्ट, त्यावर पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट, इन केलेली, पायात नेहमी चकचकीत पॉलिश केलेले शूज, कमरेच्या बेल्टला त्यांच्या किल्ल्यांचा जुडगा लटकत असलेला. त्यांना त्यावेळी टक्कल पडत आले होते, पण आहे त्या केसांना ते आवर्जून डाय लावत आणि खिशामध्ये पॉकेट कंगवा असे, त्याने भांग पाडत. सदैव हसतमुख आणि जॉली मूड मध्ये असत. त्या माणसाला मी कधीच दुर्मुखलेले किंवा तणावामध्ये असलेले पाहिले नाही. किंवा कधीही आपल्या हाताखालच्या लोकांवर आपला रुबाब दाखवतांना पाहिले नाही. एवढ्या मोठ्या शाखेचे मुख्य असून आणि एवढा स्टाफ हाताखाली असूनही त्यांना कधी त्या गोष्टीचा गर्व नव्हता. सगळ्या स्टाफशी आणि खातेदारांशी ते अगदी फ्रेंडली वागत. सगळ्या गोष्टी अगदी सहज घेण्याच्या त्यांचा स्वभाव होता. मुंबई दिल्ली येथे पूर्ण सर्विस केल्यामुळे बऱ्याचदा बोलण्यात हिन्दी किंवा इंग्लिश शब्द येत. अशी happy go lucky pesonality मला नंतर कुठे बघायला मिळाली नाही. त्यांचे कुठलेही वैशिष्ट्य आत्मसात करणे तर मला शक्य नव्हते, कारण ते रसायनच वेगळे होते, पण अशीही माणसे असतात हे त्यामुळे समजले, आणि त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या चांगलेच लक्षात राहिले.
माधव भोपे
मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वांनी मला वेगवेगळ्या कारणांमुळे प्रभावित केले, त्यांच्याबद्दल लिहिण्याच्या प्रपंचातील हा तिसरा लेख. आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्ति या आपल्यावर आणि आपण त्यांच्यावर परस्पर प्रभाव कमीजास्त प्रमाणात टाकत असतो, आणि त्यातून आपले व्यक्तिमत्व घडत जात असते.
आपले याबाबतीतील विचार जरूर कळवा.
आवडल्यास ब्लॉगला subscribe करा.
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.