लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*लोका सांगे ब्रह्मज्ञान..*
ऑफिसर पदावर पदोन्नती झाल्यावर तत्कालीन आंध्र प्रदेशच्या आदिलाबाद जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या “उतनुर” नामक शाखेत रुजू झालो, तेंव्हाचा हा प्रसंग..!
आदिलाबाद हा महाराष्ट्राच्या सीमेलगतचा घनदाट जंगलाने वेढलेला जिल्हा. नक्षल पीडित, आदिवासी बहुल असल्याने अत्यंत मागासलेला आणि अविकसित.. रेल्वे, रस्ते, वीज, दळण वळणाची साधने, पिण्यायोग्य पाणी अशा मूलभूत सोयी सुविधांचाही या भागात अभावच होता.
उतनुरला बिऱ्हाड शिफ्ट करण्यासाठी सात दिवसांचा “जॉइनिंग टाईम” घेऊन निघालो तेंव्हा शाखेतील प्रत्येकाने एकच सल्ला दिला की.. “साब, आते वक्त पलंग, सोफा, अलमारी, डायनिंग टेबल, दिवान, स्टूल ऐसा कोई भी फर्निचर साथ मत लाना.. सिर्फ स्कूटर, टीव्ही, फ्रिज, चादर गद्दे, गॅस, कपडे और घरेलु बर्तन इतनाही सामान लेके आना..”
सर्व जण वारंवार तेच ते बजावून सांगत असल्यामुळे सुरवातीला त्याचं नवल वाटलं. पण नंतर जेंव्हा समजलं की इथे अस्सल सागवानी लाकडाचं सर्व प्रकारचं फर्निचर अक्षरशः नाममात्र किंमतीत अगदी घरपोच आणून मिळतं, तेंव्हा मात्र त्यांचं म्हणणं पटलं. स्टाफचा सल्ला मानून, बायकोचा आग्रह न जुमानता, परत येताना केवळ फ्रिज, स्कूटर, कपडे व थोडी भांडीकुंडी एवढंच सामान सोबत घेऊन आलो.
येताना आंध्र प्रदेशच्या निजामाबाद व आदिलाबाद जिल्ह्यात प्रवेश करताच जागोजागी विविध प्रकारचे चेक पोस्ट्स लागले. परिवहन विभाग (RTO), मार्केटिंग कमिटी, टॅक्स (Goods) चेक पोस्ट असे तुरळक नाके वगळता अन्य सर्व तपासणी नाके हे वन विभागाचे (Forest Deptt.) होते. आम्ही जंगल क्षेत्राच्या आत प्रवेश करत असल्याने आम्हाला कुणीही कुठेच अडवलं नाही. तेथून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची मात्र कसून तपासणी होताना दिसत होती.
मी बायको मुलांसहित सर्व सामान घेऊन आल्याचं समजताच मॅनेजर साहेबांनी सामान लावण्यात मदत करण्यासाठी सकाळीच बँकेतील दोन चपराशी घरी पाठवून दिले. त्यांच्या मदतीने अवघ्या दोन तासांतच सर्व सामान लावून झालं. त्या दिवशी रविवार होता. दुपारी मॅनेजर साहेबांकडे सहकुटुंब जेवायला बोलावलं होतं.
जेवण झाल्यानंतर मॅनेजर साहेब म्हणाले.. “आपको सिर्फ आज का एक दिन नीचे फर्शपर गद्दा बिछाकर सोना पड़ेगा.. अभी मेरे घर का फर्नीचर देखो और किस टाईप का पलंग और सोफा चाहिए वो बता दो.. कल सुबह तक फर्नीचर घर में पहुंच जाएंगा..!”
मॅनेजर साहेबांच्या घरातील तीन चार प्रकारच्या पलंग व सोफासेट पैकी एक डिझाईन बायकोच्या सल्ल्याने पसंत करून घरी परतलो. दीर्घ प्रवासामुळे आधीच शरीर खूप थकलं होतं. त्यामुळे रात्री बिछान्यावर पडल्या पडल्याच गाढ झोप लागली.
सुमारे बारा वाजता दारावर टक टक झाली.
“साब, मै रमेश.. ! दरवाजा खोलो.. आपका फर्नीचर आ रहा है..”
बाहेरून बँकेचा चपराशी रमेश दबक्या आवाजात बोलत होता.
डोळे चोळतच मी दार उघडलं. हातात टॉर्च आणि रुमालाने संपूर्ण चेहरा झाकलेला रमेश पायऱ्यांवर उभा होता. नेहमी प्रमाणे गावातली वीज केंव्हाच गुल झाली होती. बाहेर सर्वत्र मिट्ट काळोख होता. घरामागे विस्तीर्ण, काटेरी, उजाड माळरान होतं. त्यामागे काही शेतं आणि लहान डोंगर होते. हातातील टॉर्च उंचावत रमेशने त्या दिशेने एक दोन वेळा प्रकाशझोत सोडला.
थोड्याच वेळात तिकडून घुबडा सारख्या निशाचर पक्ष्यांचे खुणेचे घूत्कार ऐकू आले. रमेशचे डोळे आनंदाने चमकले.
“वो आ रहे है..! कल दोपहरको ही आपका घर दिखाया था उनको..”
रमेशचं बोलणं संपतं न संपतं तोच अंधारातून कमरेला फक्त छोटंसं फडकं बांधलेले चार पाच उघडेबंब आदिवासी तरुण सावध नजरेने इकडे तिकडे पाहत घराजवळ येताना दिसले. मांजरीच्या पावलांनी, दबकत दबकत येणाऱ्या त्या तरुणांच्या डोक्यावर लाकडांच्या मोळ्या होत्या. रमेशने त्यांच्याकडून त्या मोळ्या घरात ठेवून घेतल्या.
“साब, इनको कुछ बक्षीसी, इनाम दे दो..”
रमेश म्हणाला..
मी शंभराची नोट काढली. ते पाहताच..
“अरे साब, ऐसे इनकी आदत मत बिगाड़ो.. रहने दो.. मै ही देता हूं..!”
असं म्हणत रमेशने आपल्या खिशातून दहा दहा रुपयांच्या तीन चार नोटा काढल्या आणि “ये लो लच्छु..!” म्हणत त्यांच्या म्होरक्याच्या हातात ठेवल्या.
त्या म्होरक्याने खुश होत मला व रमेशला सलाम ठोकला, कमरेला खोचलेली एक छोटीशी कापडी थैली रमेशच्या हातात ठेवली आणि मागे वळून आल्या वाटेने जात पाहता पाहता आपल्या साथीदारांसह अंधारात दिसेनासा झाला.
ती कापडी थैली माझ्या कडे देत रमेश म्हणाला..
“साब, इसमे पलंग सोफा के नट बोल्ट है.. कल सुबह घर आके सारा फर्निचर फिट कर दूंगा..”
दुसऱ्या दिवशी घरी येऊन रमेशने त्या लाकडाच्या मोळ्या सोडल्या. ते सोफा व पलंगाचे फोल्डिंग पार्टस् होते. नट बोल्ट फिट केल्यावर आकर्षक आकाराचा सोफा व पलंग तयार झाला. सोफा सेटचे बाराशे रुपये आणि पलंगाचे सातशे रुपये असे फक्त एकोणीसशे रुपये रमेशने मागितले तेंव्हा..
“एवढं स्वस्त ? कसं काय परवडतं बुवा त्यांना..?”
असे आश्चर्योदगार अभावितपणेच माझ्या तोंडून बाहेर पडले.
त्यावर रमेश म्हणाला..
“ये सिर्फ कारागीर की मजदूरी के पैसे है.. सागवान की लकडी तो यहां मुफ्त ही मिलती है.. अगर घरमे जलाने के लिये चाहिए तो बता देना.. दो चार रुपये देने पर कोई भी ढेर सारी सागवानी लकडी घर लाके देगा..”
अशाप्रकारे उतनुरला आल्या आल्या एका दिवसातच आम्ही “साग फर्निचर संपन्न” बनलो. हळू हळू डायनिंग टेबल, रॉकिंग चेअर (झुलती खुर्ची), दिवाण, स्टडी टेबल, वेगवेगळ्या आकाराची स्टूलं.. असं विविध प्रकारचं सागवानी फर्निचर “मध्यरात्रीच्या साहसी, थरारक, चोरट्या वाहतुकी मार्गे” आमच्या घरात दाखल झालं.
तसं पाहिलं तर, सागवानी लाकडाचा बोटभर तुकडाही जर कुणी जंगला बाहेर नेला, तर तो मोठा अपराध मानून फॉरेस्ट डिपार्टमेंट अशा व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करीत असे. जबर आर्थिक दंड अथवा फौजदारी गुन्हा किंवा दोन्ही.. अशी ती कारवाई असे. परंतु त्याच लाकडाचं फर्निचर बनवून जर कुणी आपल्या घरात वापरलं तर मात्र अशा व्यक्तीविरुद्ध वन विभाग कोणतीच कारवाई करीत नसे. वन विभागाच्या कायद्यातील या पळवाटेचा फायदा घेऊन त्या भागातील रहिवासी घरोघरी सागवान लाकडाचा उदंड वापर करीत.
त्या भागातील गरीब, निर्धन आदिवासी झोपड्या बांधताना सहज व मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सागवानी लाकडांचाच वापर करीत. बहुदा त्यामुळेच वन विभागाने सागवानाच्या घरगुती वापरासाठी सर्व नागरिकांना अशी सवलत दिली असावी.
उतनुर गावातील सर्वच सिमेंट काँक्रिटच्या घरांची खिडक्या दारे अस्सल सागवानी लाकडांचीच होती. याशिवाय लहान मुलांचे लाकडी पाळणे, झोपाळा (बंगई), दुकाने, हॉटेल यातील टेबल खुर्च्या, काऊंटर, शो केसेस हे सारं सागवानीच असे. काही श्रीमंतांनी तर सागवान वापरून दोन तीन मजली लाकडी महाल बांधले होते, ज्यात संपूर्ण लाकडी छत, लाकडी जिने व प्रचंड विशाल लाकडी दिंडी दरवाजे होते.
आश्चर्य आणि विनोदाचा भाग म्हणजे सागवानी लाकडाचे फर्निचर बनविण्यावर वन विभागाचे कडक निर्बंध होते. त्यामुळे ही सुतार मंडळी खोल जंगलात लपून छपून फर्निचर तयार करीत असत. वन विभाग अधून मधून त्यांच्यावर धाडी टाकून त्यांची हत्यारे जप्त करीत असे. त्यांना तडीपारही (हद्दपार) करीत असे.
मात्र एकदा का असे वन विभागाची नजर चुकवून तयार केलेले फर्निचर चोरट्या मार्गाने गावात दाखल होऊन एखाद्या रहिवाश्याच्या घरात विराजमान झाले, की मग वन विभाग त्याच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करू शकत नसे. त्यामुळे असे फर्निचर घरात दाखल होण्यापूर्वीच धाड टाकून ते विकणारा व खरेदी करणारा अशा दोघांवरही कारवाई करण्याचा वन विभाग आटापिटा करीत असे.
जो कोणी वन विभागाला अशा अवैध फर्निचर खरेदी विक्रीची आगाऊ खबर देईल त्याला वन विभागातर्फे रोख इनाम दिले जाई. या बक्षिसाला चटावलेले वन विभागाचे अनेक गुप्त खबरे गावातील सामान्य नागरिकांमध्ये बेमालूमपणे वावरत होते.
… असाच एक धूर्त, साळसूद गुप्त खबऱ्या स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांवर बारीक नजर ठेवून होता, ज्याची आम्हा कुणालाच अजिबात खबर नव्हती..
🙏🌹🙏
(क्रमशः)

लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.
निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले. आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.