लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*लोका सांगे ब्रह्मज्ञान..-2*
क्रमशः.. (२)
उतनुर परिसरातील जंगलात सागाचे घनदाट जंगल होते. जाडजूड बुंध्याची उंच सरळसोट वाढलेली ही झाडे अनेकदा सोसाट्याच्या वादळात उन्मळून पडत. कधी कधी त्यांच्या वर वीज पडून ती अर्धवट जळून तुटून जात. अशी ही उन्मळून पडलेली, वीज पडून अथवा वणव्यात जळून, तुटून पडलेली सागाची झाडे वर्षानुवर्षे तशीच निर्जन, सुदूर अरण्यात पाण्यापावसात भिजत पडून रहात.
जंगलात राहणारे आदिवासी पोटापुरते धान्य पिकविण्यासाठी थोडी फार शेतीही करत. त्यासाठी त्यांना जंगलात मोकळी, सपाट जमीन हवी असे. मग कधी कधी जंगलातील एखादा विरळ झाडी असलेला भूभाग निवडून रातोरात त्यावरील सर्व छोटे मोठे सागवृक्ष हे आदिवासी मुळापासून तोडून टाकत. मग मोकळ्या झालेल्या जमिनीच्या तुकड्यावर ते शेती करत. अशाप्रकारे नवीन जमीन संपादन करण्याला ते “जमीन मारणे” असे म्हणत.
या नवीन जमिनीवर काही वर्षे पिके घेतल्यावर कालांतराने हळूहळू त्या जमिनीचा कस आपोआप कमी होत असे. त्यामुळे या आदिवासींना शेतीसाठी पुन्हा नवीन जमिनीचा शोध घ्यावा लागत असे. मग पुन्हा सरसकट वृक्षतोड करून ते नवीन जमीन मारत असत. या सर्व प्रकारात मोठ्या प्रमाणात सागाची झाडे वारंवार तोडली जात. आदिवासींची मूलभूत गरज जाणून वन विभागही या प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असे.
हे तुटलेले वृक्ष उचलून नेण्याइतपत साधन सामुग्री, वेळ आणि मनुष्यबळ वन विभागाकडे क्वचितच असायचे. मग आदिवासीच हे सागाचे लांबलचक भरभक्कम ओंडके खांद्यावर उचलून त्यांच्या वस्तीत नेऊन टाकायचे. वेळ मिळेल तसे या ओंडक्यांचे तुकडे करून आदिवासी हे लाकूड गावकऱ्यांना मातीमोल भावात विकायचे. चोरटे फर्निचर करणारे कारागीरही या आदिवासीं कडूनच जवळ जवळ फुकटातच सागाचे लाकूड प्राप्त करायचे.
सागवानाच्या लाकडाला बाहेर सोन्याचा भाव होता. उतनुर भागातील सागवान उच्च प्रतीचे असल्याने आसपासच्या गावांतून या लाकडाला भरपूर मागणी असायची. काळ्या शिसव (Indian Rosewood) वृक्षाची काही तुरळक झाडेही उतनुरच्या जंगलात होती. ह्या वृक्षाचे जड, काळे, दर्जेदार शिसवी लाकूड दूरवर खूप प्रसिद्ध होते. सागवाना बरोबरच ह्या शिसवी लाकडाचीही चोरटी वाहतूक आसपासच्या गावांत व्हायची. या तस्करीला आळा घालण्यासाठी डिव्हीजनल फॉरेस्ट ऑफिस आणि फॉरेस्ट रेंज ऑफिस अशी वन विभागाची दोन कार्यालये उतनुर गावांत होती.
पी. सूर्यकुमार नावाचा सहा फूट उंच, सुदृढ, गोरा पान, सरळ धारदार नाक असलेला रुबाबदार, तरुण IFS अधिकारी, फॉरेस्ट रेंज ऑफिसर म्हणून नुकताच उतनुरला जॉईन झाला होता. अतिशय धडाडीचा, कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्याने अल्पावधीतच चांगला लौकिक प्राप्त केला होता.
चोरट्या सॉ मिल मधून सागवानाच्या फळ्या कापून त्यांची ऑटो रिक्षातून जवळच्या गावांत वाहतूक करण्याचा एक नवीनच किफायतशीर धंदा तेंव्हा लाकूड तस्करांनी उतनुर परिसरात सुरू केला होता. तयार फर्निचरही या ऑटो रिक्षातून सहजपणे कुठेही पोहोचते केले जात असे. रेंज फॉरेस्ट ऑफिसर सूर्यकुमार यांचा अधिकांश वेळ व शक्ती या चोरट्या रिक्षा वाहतुकीला पायबंद घालण्यातच खर्च होत असे. अनेक कारागीर सुतारांनी स्वतःच्या रिक्षा खरेदी करून त्या जंगलात नेऊन ठेवल्या होत्या. मागणी नुसार फर्निचर, फळ्या तयार करून रिक्षात भरून रातोरात ते स्वतःच त्या मालाची आसपासच्या गावांत डिलिव्हरी करायचे.
ज्यांची सुतारकामाची उपकरणे, यंत्रे, हत्यारे जप्त करण्यात आली आहेत, अशा कारागीर लाकूड तस्करांचे पुनर्वसन (Rehabilitation) करण्यासाठी अर्थ सहाय्याच्या विविध योजना आमच्या बँकेमार्फत राबविल्या जात.
एकात्मिक आदिवासी विकास महामंडळ (ITDA), वन विभाग (Forest Dept) व जिल्हा उद्योग केंद्र (DIC) यांच्यातर्फे अशा योजनांना पर्याप्त बीज भांडवल (Seed money) व अनुदान (Subsidy) उपलब्ध करून दिले जात असे.
पर्यायी उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य घेण्यास इच्छुक असलेल्या लाकूड तस्करांची मुलाखत घेण्यासाठी फिल्ड ऑफिसर या नात्याने बँकेचा प्रतिनिधी म्हणून मलाच जावे लागत असे. अशाच काही लाकूड तस्करांची कर्ज मंजुरी पूर्वीची मुलाखत घेण्यासाठी एकदा गेलो होतो. या सर्वांनी रिक्षा व्यवसायासाठी कर्ज मागितले होते.
“कोणत्या मार्गावर रिक्षा चालवणार ?”, “भाडे कोणत्या दराने आकारणार ?”, “दिवसाला किंवा महिन्याला किती कमाई होणार ?”, “कर्जाची परतफेड कशी करणार ?”
यापैकी कोणत्याही प्रश्नाचे कुणाजवळ ही उत्तर नव्हते.
“मग रिक्षा कशासाठी खरेदी करणार ?”
या प्रश्नाचे मात्र सर्वांनीच निरागसपणे, खरेखुरे आणि एक सारखे उत्तर दिले..
“फर्निचर-फळ्यांची डिलिव्हरी करण्यासाठी..!”
तस्करांचे हे उत्तर ऐकून इंटरव्ह्यू पॅनल मधील आम्ही सर्वांनी कपाळावर हात मारून घेतला.
मध्यंतरीच्या काळात माझा मेव्हणा उतनुरला येऊन गेला. त्याला आमचा लाकडी सोफा सेट खूपच आवडला. कसंही करून माझ्यासाठी असा एक सेट विकत घेऊन तो बुलढाण्याला पाठवून द्याच.. असे तो परत जाताना वारंवार जतावून, विनवून गेला.
त्याच्या आग्रहास्तव एक सागवानी सोफा सेट खरेदी करून तो थेट सकाळी सातच्या उतनुर ते आदिलाबाद बस मध्ये चढवला. सुदैवाने उतनुर ते आदिलाबाद हा पन्नास किलोमीटरचा दीड तासाचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला. आदिलाबादला बस स्टँड वरच वन विभागाची चौकी होती. परंतु त्यांच्या कडूनही कसलीच चौकशी किंवा आडकाठी झाली नाही.
आदिलाबादहून फक्त वीस किलोमीटर वर महाराष्ट्राची सीमा आहे. “आदिलाबाद ते पांढरकवडा” ह्या महाराष्ट्रात जाणाऱ्या बसमध्ये सोफा चढवला. पंचेचाळीस किलोमीटरचा हा प्रवास तासाभराचा होता. पैनगंगा नदी पार केल्यावर पिंपळखुटा इथे महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस झाली आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला.
पांढरकवडा ते बुलढाणा बसची अगोदरच चौकशी करून ठेवली होती. ती बस दुपारी अकरा वाजता होती. योग्य ते लगेज चार्जेस भरून बसमध्ये सोफा चढवला. ड्रायव्हर कंडक्टरला चहा पाण्यासाठी थोडे पैसे दिले आणि बुलढाण्याला मेव्हणा सोफा उतरवून घेईल असे सांगितले. अशाप्रकारे सोफा संध्याकाळ पर्यंत बुलढाण्याला पोहोचता झाला.
उतनुरला याआधी किरवानी नावाचे एक चाणाक्ष बुद्धीचे मॅनेजर होते. त्यांचे घर हैद्राबादला होते. सागवानाच्या अशा भरपूर फळ्या त्यांनी जमा करून ठेवल्या होत्या. त्या फळ्यांची बाजारभावाने किंमत कित्येक लाखात होती. या फळ्या हैद्राबादला पोहोचविण्यासाठी त्यांनी एक अनोखी शक्कल लढविली.
आंध्र प्रदेशातील आदिवासी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा त्या सुमारास हैद्राबाद येथे होता. किरवानी साहेबांनी एका ट्रक मध्ये सर्व फळ्या व्यवस्थित रचल्या. मग त्यावर गाद्या टाकून त्या फळ्या झाकून टाकल्या. जंगली पारंपरिक वेशभूषेतील वीस पंचवीस आदिवासी स्त्रीपुरुषांना वाद्यांसहित ट्रकमधील गाद्यांवर बसविले. मेळाव्याची बॅनर्स तयार करून ती ट्रकच्या चारी बाजूंना बांधली.
“मेळाव्यासाठी हैद्राबादला जात आहोत..” असे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगत वाद्ये वाजवित, गाणी गात, नृत्य करीत हे आदिवासी उतनुर जंगल क्षेत्रातील सर्व चेक पोस्ट्स पार करीत हैद्राबादच्या रस्त्याला लागले. कडक तपासणीचा एरिया पार झाल्यावर ट्रकच्या मागोमाग कार मधून येणाऱ्या किरवानी साहेबांनी मग रस्त्याच्या कडेच्या एका ढाब्यावर ट्रक थांबवून सर्व आदिवासींना ट्रक मधून खाली उतरविले. ट्रक वरील बॅनर्स काढून टाकली. आदिवासींना ढाब्यावर पोटभर जेऊ खाऊ घालून खर्चासाठी थोडे फार पैसे देऊन बसने उतनुरला परत पाठवून दिले. वन विभागाला जराही संशय येऊ न देता अशा प्रकारे किरवानी साहेबांनी लाखोंचे सागवानी लाकूड हैद्राबादला पोहोचते केले.
ज्यावेळी एखाद्या कर्मचाऱ्याची बदली उतनुर बाहेर अन्यत्र होत असे तेंव्हा त्याला ऑफिसचे ट्रान्स्फर लेटर दाखविल्यावर हे घरगुती वापराचे तयार फर्निचर कायदेशीरपणे उतनुर बाहेर नेता येत असे. बदलीची ऑर्डर व रिलिव्हिंग लेटर पाहिल्यावर चेक पोस्ट वर जास्त चौकशी होत नसे. अर्थात सागवानी फळ्यांची वाहतूक करण्यास मात्र सर्वांनाच सर्व काळ सक्त मनाई होती.
आसपासचे गांवकरी सागवानी लाकडाचे चौरंग, स्टूल, खेळणी, मेकप-बँगल बॉक्स, शिसवी देव्हारे अशा विविध वस्तू उतनुरच्या तस्कर सुतारांकडून विकत घेत. मात्र त्या लाकडी वस्तू घेऊन आपल्या गावी जाताना वन विभागाकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत असे. (काय करतील बिचारे..! ट्रान्स्फर लेटर कुठून आणणार ते ?) वन कर्मचाऱ्यांच्या मूड नुसार कधी कधी किरकोळ दंडाची पावती फाडून काम भागत असे तर कधी मुद्देमाल जप्त होऊन वर दंडही भरावा लागत असे. सराईत व धंदेवाईक लोकांवर खटलाही भरला जायचा.
माझा उतनुर मधील कार्यकाळ संपत आला आणि बदलीचे वेध लागले तेंव्हा जाता जाता इतर सर्वांप्रमाणेच आपणही थोड्याशा सागवानी फळ्या येथून घेऊन जाव्या असा मोह मनात जागू लागला. आमच्या मॅनेजर साहेबांचीही लवकरच बदली होणार होती. घरातील नित्य वापराच्या फर्निचर व्यतिरिक्त एक खोलीभर अतिरिक्त सागवानी फर्निचर त्यांनीं आधीच गोळा करून ठेवले होते. हेड कॅशियर व अन्य एक दोन कर्मचाऱ्यांची ट्रान्स्फरही due होती. ते देखील जाण्यापूर्वी जमेल तितके फर्निचर, फळ्या विकत घेऊन ठेवण्याचा विचार करीत होते.
…अशातच एक दिवस बँकसमोरील चहाच्या टपरीवर काम करणारा रघु नावाचा नोकर हेड कॅशियर साहेबांकडे एक आकर्षक ऑफर घेऊन आला.
“स्वच्छ, गुळगुळीत, दर्जेदार आणि जाडजूड सागवानी फळ्यांनी भरलेली एक रिक्षा अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असून रोख पैसे दिल्यास एक दोन दिवसात माल घरपोच केला जाईल..” अशी ती ऑफर होती.
खरं म्हणजे हेड कॅशियर साहेबांनीच समोरच्या हॉटेल वाल्याला कुठे सागाच्या फळ्या मिळतील का ? याबद्दल विचारले होते. ते ऐकूनच त्याचा नोकर रघु ही ऑफर घेऊन आला होता. अनायासे चालून आलेली ही संधी हेड कॅशियर दवडणार नव्हते. त्यांनी ताबडतोब रघुची ऑफर स्वीकारली. त्यानंतर मॅनेजर साहेब, मी व अन्य दोन under transfer स्टाफला त्यांनी या ऑफर बद्दल सांगितले. “जर आपण पाच जणांनी मिळून या फळ्या वाटून घेतल्या तर सर्वांना दर्जेदार लाकूड स्वस्तात आणि घरपोच मिळेल..”, असेही ते म्हणाले.
विनासायास घरपोच मिळणारं असं दर्जेदार सागवान प्रत्येकालाच हवं होतं. ताबडतोब सर्वांनी पैसे गोळा करून ते रघुच्या स्वाधीन केले. पैसे खिशात ठेवून घेत रघु म्हणाला..
“उद्या गावातील लाईट गेल्यानंतर रात्री आठच्या सुमारास रिक्षा आळीपाळीने प्रत्येकाच्या घरासमोर उभी राहील. रिक्षात सारख्या मापाच्या पन्नास फळ्या असतील. प्रत्येकाने दहा दहा फळ्या आपापल्या घरात सुरक्षित जागी ठेवून घ्याव्यात. घर दाखविण्यासाठी व फळ्या ठेवायला मदत करण्यासाठी रिक्षासोबत मी ही असेन..”
रघुने सांगितल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजल्या नंतर साग फळ्यांनी भरलेली रिक्षा आमच्या घरासमोर उभी राहिली. प्रत्येकाने आपापल्या दहा फळ्या रिक्षावाल्याकडून उतरवून घेऊन घरातील आधीच मोकळ्या केलेल्या जागी रघुकरवी व्यवस्थित ठेवून घेतल्या.
त्यानंतर आठ दहा दिवस शांततेत गेले. आम्ही सारे दुपारी चहा पिण्यासाठी समोरच्या टपरीवर जायचो तेंव्हा चांगले लाकूड मिळवून दिल्याबद्दल आवर्जून रघुचे आभार मानायचो.
दोन आठवड्यानंतर रविवारच्या दिवशी सकाळी घरी गरमा गरम मसाला दोशाचा नाश्ता करीत असताना दारासमोर जीप थांबल्याचा आवाज आला. बाहेर हलका झिमझिम पाऊस पडत होता.
“सुटीच्या दिवशी भर पावसात एवढ्या सकाळी घरी कोण आलं असावं बुवा ?” असा विचार करीतच दार उघडलं. जीप मधून साध्या वेशातील फॉरेस्ट रेंजर IFS पी. सूर्यकुमार उतरत होते.
“वेलकम् सर..! आईये..!”
म्हणत मी त्यांचं स्वागत केलं. सूर्यकुमार माझ्या चांगल्याच परिचयाचे होते. लाकूड तस्करांच्या कर्ज मंजुरीच्या अनेक मुलाखती आम्ही दोघांनी मिळूनच घेतल्या होता.
“आज छुट्टी के दिन.. इतने सवेरे.. इधर किस कामसे आए थे..?”
सूर्यकुमार आणि त्यांचा सहाय्यक हवालदार सोफ्यावर स्थानापन्न झाल्यावर मी हसत विचारलं.
काही कामानिमित्त सूर्यकुमार या भागात आले असावेत आणि परत जाताना ते सहज माझ्या घरी आले असावेत असाच माझा समज होता.
“आप ही के घर आया था..! सॉरी सर, बट धिस इज फॉरेस्ट डिपार्टमेंट रेड.. !! वुई हॅव काँक्रिट इन्फर्मेशन दॅट यू हॅव स्टोअर्ड इल्लीगल स्टॉक ऑफ टीकवुड प्लॅन्कस्.
वुई हॅव ऑलरेडी रेडेड दि हाऊसेस ऑफ युवर आदर फोर बँकमेट्स इन्क्लुडिंग ब्रँच मॅनेजर.. अँड कॉन्फिस्केटेड ए ह्यूज क्वांटिटी ऑफ सच स्टॉक.”
सूर्यकुमार यांच्या तोंडचे हे शब्द ऐकताच मी हादरून गेलो. क्षणभर मतीच गुंग झाली. सारं घर स्वतःभोवती गरगर फिरतंय असं वाटू लागलं…
(क्रमशः)
*लोकां सांगे ब्रह्मज्ञान.(मागील लेखाची लिंक).*
लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.
निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले. आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.