लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*लोकां सांगे ब्रह्मज्ञान..*
क्रमशः (३)
सूर्यकुमार यांनी त्यांचा असिस्टंट हवालदार साईनाथला घराची झडती घेण्यास सांगितले. ढेरपोट्या, लालची नजरेचा साईनाथ आपली खाली घसरणारी पँट सावरीत शिकारी कुत्र्याच्या शोधक नजरेने घराचा कानाकोपरा धुंडाळू लागला.
बैठकीच्या खोलीत एक मोठा लाकडी दिवाण ठेवलेला होता. त्या दिवाणाखाली कोपऱ्यात भिंतीला लागून एक खळगा होता. त्या खळग्यातच सागफळ्या लपवून ठेवल्या होत्या. तिथपर्यंत बाहेरील प्रकाश पोहोचत नसल्याने दिवाणाखाली डोकावून पाहिले तरी खाली ठेवलेले सामान अजिबात दिसत नसे.
बेडरूम, स्वयंपाक घर, मागील बाजूचे संडास बाथरूम हे सारं पाहून रिकाम्या हाताने, मान हलवित साईनाथ परतला. स्टूल वर चढून घराच्या तिन्ही खोल्यांचे माळे बघितल्यावर बाहेरील जिन्याने तो गच्चीवर पोहोचला. टेरेस अगदी स्वच्छ आणि मोकळा होता.
“साब, या तो हमारी खबर गलत है, या फिर माल को यहाँ से कहीं दूसरी जगह शिफ्ट कर दिया है..!”
गच्चीवरून खाली येतांच साईनाथने सूर्यकुमार साहेबांना रिपोर्ट दिला.
“खबर तो गलत हो ही नहीं सकती..” असं स्वतःशी पुटपुटत सूर्यकुमार उठून घराबाहेर आले. घराच्या कंपाऊंड मध्ये पिण्याच्या पाण्याची विहीर होती. विहिरीला लागून एक कुलूप लावून बंद केलेली काटक्यांची झोपडी होती. घरमालकाने त्यात निरुपयोगी, अडगळीचे सामान ठेवले होते.
घरमालकाकडून झोपडीची किल्ली मागवून रेंजर साहेबांनी झोपडी उघडली. आत साचलेली प्रचंड धूळ, लटकणारी मोठमोठी कोळीष्टके आणि दार उघडताच घाबरून लगबगीने अडगळीत लपलेले दोन चार सरपटणारे जीव बघतांच आंत पाऊलही न ठेवता त्यांनी झोपडीचा दरवाजा लगेच बंद केला आणि निराश होऊन पुन्हा घरात येऊन बसले.
अपराधी चेहऱ्याने, धडधडत्या छातीने आणि जीव मुठीत धरून बाजूला उभा रहात, निमुटपणे फॉरेस्ट विभागाची ही कारवाई पाहणारा मी, माझे गैरकृत्य अद्याप उघडकीस न आल्याबद्दल मनोमन देवाचे आभार मानीत होतो.
मध्यंतरीच्या काळात माझ्या पत्नीने सूर्यकुमार साहेबांना चहा, नाश्ता घेण्याचा अनेकदा आग्रह केला होता. परंतु “रेड” होत असताना संशयित व्यक्तीचे कोणतेही आदरातिथ्य स्वीकारत नसल्याचे सांगत त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. मात्र आता, माझ्या घरी सागवानाचा कोणताही अवैध साठा नसल्याचे आढळून आल्यावर त्यांच्यावरचेही दडपण नाहीसे झाल्यासारखे वाटत होते. चेहऱ्यावरील पूर्वीचा ताण पूर्णपणे निवळून त्याजागी नेहमीसारखे निर्मळ, आश्वासक, मनमोकळे हास्य उमलले होते.
स्वयंपाकघरात बायको लहान्या मुलासाठी मसाला डोसा तयार करीत होती. त्याच्या खमंग खरपूस वासाने सूर्यकुमार साहेबांची भूक चाळवली गेली असावी. माझ्या पाठीवर थाप मारीत ते म्हणाले..
“चलो भाई..! ड्युटी तो खतम हुई.. अब दोस्ती की बाते करेंगे..!”
नंतर किचनमध्ये डोकावत बायकोला ऐकू जाईल अशा बेताने मोठ्या आवाजात ते म्हणाले..
“भाभीजी शायद कुछ कह रही थी, चाय-नाश्ते के बारे में..! मै तो अपनी फॅमिली से दूर यहां अकेला ही रहता हूं, रोज बाहर का खाना खाता हूं.. आज मौका है, मौसम है, साथ में दोस्त भी है.. भाभीजी से कह दो, हमारा भी मन करता है कभी कभी घर का बना मसाला डोसा खाने को..!
रेंजर साहेबांचे बोलणे पूर्ण होण्याच्या आतच तत्परतेने ताज्या गरम मसाला डोशाची प्लेट भरून बायकोने त्यांच्या हातात ठेवली.
मनसोक्त, भरपेट नाश्ता करून सूर्यकुमार आणि साईनाथ दोघेही तृप्त झाले. मग चहा घेता घेता अचानक गंभीर होत ते म्हणाले..
“आप दोनों से कुछ जरूरी और थोड़ी सीरियस बात करनी है.. जरा मॅडम को बाहर आनेको कहो..”
मी आणि माझी पत्नी, आम्ही दोघेही आज्ञाधारक शिष्यांसारखे रेंजर साहेबां समोर येऊन बसलो. माझ्या डोळ्यात डोळे घालून एकटक रोखून पहात सूर्यकुमार म्हणाले..
“अपरिग्रह के बारेमे कुछ जानकारी है ? कभी कुछ पढ़ा है ?”
मी होकारार्थी मान हलवली.
आपल्या मालकीच्या पण गरजेपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिकरित्या, मानसिकरित्या व भावनिकरित्या त्याग करणे यालाच अपरिग्रह असे म्हणतात, हे मला ठाऊक होते. रेंजर साहेबांना तसे सांगताच खुश होऊन मान डोलावित ते म्हणाले..
“अगदी बरोबर ! अहिंसा व अपरिग्रह ही जैन धर्माची मुख्य तत्वे आहेत.
महर्षी पतंजलींनी साधनपादात अष्टांग योगाची साधना सांगितली आहे. त्यातील दोन अंगे म्हणजे यम आणि नियम. पतंजलींनी अपरिग्रह हा पाचवा यम मानला आहे. अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा: !
महात्मा गांधी यांनी सुद्धा अपरिग्रह व्रताचा पुरस्कार केला. मग सांगा बरं, जीवनात अपरिग्रह अवलंबिल्यामुळे काय फायदा होतो ?”
सूर्यकुमार साहेबांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला.
“यामुळे व्यक्तीला साधे आयुष्य जगण्यात मदत होते.”
फावल्या वेळातील अतिरिक्त वाचनामुळे मला माहिती असलेली उत्तरे मी पटापट देत होतो.
“अगदी अचूक ! पण फक्त साधे जीवन नाही, तर साधे आणि सुखी जीवन ! अर्थात कसलीही काळजी नसलेले, दुःखमुक्त जीवन..!”
सूर्यकुमार म्हणाले..
यानंतर, गुरुकुलातील एखाद्या तपस्वी ऋषी सारखे धीरगंभीर, अखंड, ओघवत्या प्रासादिक वाणीत त्यांनी चक्क अध्यात्मिक प्रवचन द्यायला सुरवात केली.
“मनुष्यास जे सुख-समाधान लाभते, ते विषयांपासून आणि विषय प्राप्त करून देणाऱ्या साधनांपासून मिळते असे त्याला वाटत असते; म्हणून तो नेहेमी या साधनांचा संग्रह आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आर्थिक क्षमतेनुसार करीत असतो. हा संग्रह म्हणजेच ‘परिग्रह’. तर आपल्या देहधारणेस अत्यावश्यक नसणाऱ्या अशा साधनांचा संग्रह किंवा परिग्रह न करणे म्हणजे ‘अपरिग्रह’ होय.
आपल्याला आनंद व सुख देणारी साधने मिळविण्यासाठी, ती प्राप्त झाल्यावर सांभाळून ठेवण्यासाठी व त्यांचा वियोग झाला असता होणारे दु:ख सहन करण्यासाठी मनुष्याला बरेच प्रयास, कष्ट करावे लागतात. शिवाय या साधनांचा उपभोग घेत असताना ती नित्य जवळ असावीत अशी इच्छा चित्तात निर्माण होत राहते. या इच्छेने चित्तात दु:ख निर्माण होते.
हे उपभोग्य विषय नित्य उपलब्ध राहावेत यासाठी मनुष्य प्रयत्नशील राहातो आणि भविष्यात त्यांचा वियोग होण्याच्या कल्पनेने सुद्धा त्याला दु:ख होते. भौतिक, उपभोग्य वस्तूंचा परिग्रह हा मनुष्याच्या जीवन योगसाधनेतील अडथळा ठरू शकतो. यासाठी मनुष्याने, साधकाने केवळ देहधारणेस अत्यावश्यक वस्तूंचा संग्रह करावा.
अपरिग्रह साधल्याने हळूहळू उपभोगाच्या साधनांविषयी वैराग्य निर्माण होते. उपभोगाची साधने व शरीर ह्याविषयी साधकाच्या चित्तात वैराग्य निर्माण होते तेव्हा तो स्वत:कडे साक्षीभावाने पाहू लागतो. ‘मी’ आणि ‘माझा देह’ यातील संबंध नश्वर आहे अशी जाणीव त्याच्या मनात निर्माण होते, त्याचा देहाभिमान क्षीण होतो आणि त्याच्या पूर्वजन्मीच्या स्मृती जागृत होतात व त्याला भविष्याचेही ज्ञान होते.
अपरिग्रह ही एक प्रकारची साधना आहे. विषयांचा वारंवार भोग घेतल्याने इंद्रियाची त्याविषयी आसक्ती वाढते. आसक्तीमुळे पुण्य किवा पापरूपी कर्म घडते.
श्रीमद्भगवद्गीतेतही योग्याचे वर्णन करताना त्याने एकांतात राहून अपरिग्रहाचे पालन करीत मन स्थिर ठेवावे व साधना करावी असे म्हटले आहे. असा योगी मातीचे ढेकूळ, पाषाण किंवा सोने यांना सारखेच लेखतो.”
किंचित थांबून मंद हास्य करीत माझ्या पत्नीकडे पहात ते पुढे म्हणाले..
“भाभीजी, मी पाहतो आहे की तुमच्या घरात फ्रिज पासून टिव्ही पर्यंत सर्व आधुनिक सुखसोयींची साधने आहेत. डबल बेड, दिवाण, सोफा, रॉकिंग चेअर, टीपॉय, स्टडी टेबल, स्टूल असे भरगच्च सागवानी फर्निचर तुम्ही गोळा केले आहे. तुमच्या बेडवर फोमच्या महागड्या गाद्या आहेत. कपाटात किंवा बँकेतील लॉकरमध्ये सोन्याचे भरपूर दागिनेही असतील..
खरं सांगा, या साऱ्या वस्तू तुमच्या जवळ नसताना तुम्ही दुःखी होता का ?
तुम्ही एकदा माझ्या येथील बंगल्यावर येऊन बघा. माझ्या घरी साधी खुर्ची सुद्धा नाही. व्यायाम, लेखन, वाचन व अन्य सर्व कामं मी सतरंजीवर बसूनच करतो. रात्री झोपताना खाली जमिनीवर चटई अंथरून त्यावर झोपतो. कामानिमित्त मला भेटायला बंगल्यावर येणाऱ्याला एक तर उभे राहूनच बोलावे लागते किंवा माझ्यासारखे खाली सतरंजीवर बसावे लागते. माझ्या गरजा मी अत्यंत कमी ठेवल्या आहेत. त्यामुळेच मला कसलाही मोह स्पर्श करू शकत नाही आणि मी सदैव निर्भय, चिंतामुक्त व आनंदी राहतो.”
शेवटी आम्हा दोघांना हात जोडत नम्रपणे ते म्हणाले..
“माफ करा, तुम्हाला उपदेश करण्या इतकी माझी योग्यता नाही. तुम्ही सुज्ञ, सुसंस्कृत, सुजाण आहात. आपण सारे या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. आपल्या निस्पृह, साध्या राहणीतून आपण समाजाला आदर्श घालून दिला पाहिजे असे मला वाटते.
आपण नोकरी निमित्त ज्या भागात आलो आहोत तो भाग नक्षलपीडित आहे. साधन संपत्तीच्या असमान वितरणामुळे ही नक्षलवादाची समस्या निर्माण झाली आहे. आपण सर्वांनी अपरिग्रहाचे पालन केल्यास वर्तमान आणि भविष्य काळातील साधन संपत्ती विषयक असमतोलाच्या समस्येचे निराकरण होण्यास निश्चितच काही अंशी मदत होऊ शकते.”
एवढं बोलून सूर्यकुमार साहेब परत जाण्यास निघाले. मी आणि माझी पत्नी, दोघेही अद्याप भारावलेल्या स्थितीतच होतो. सूर्यकुमार साहेबांचे सच्चे, तळमळीचे शब्द आमच्या काळजाला भिडले होते. सागवानाचा अनावश्यक मोह धरल्या बद्दल आता आम्हाला स्वतःचीच लाज वाटत होती.
योगायोगाने त्यासुमारासच म. गांधींचे “My experiments with truth” हे इंग्रजी पुस्तक मी वाचीत होतो. कोणतीही लाज किंवा संकोच न बाळगता आपल्या चुकांची जी कबुली त्या पुस्तकात म. गांधींनी दिली आहे ती वाचून माझ्या मनातील गांधींबद्दलचा पूर्वग्रह बऱ्याच अंशी दूर होऊन त्यांच्या बद्दलचा आदरही वाढला होता.
विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या अशिलांनी केलेली कर चुकवेगिरी त्यांना सरकार दरबारी कबूल करायला लावून, योग्य तो दंड भरून भीतीतून व अपराधीपणाच्या जाणिवेतून त्यांची मुक्तता गांधीजींनी केली, हे वाचून मला सत्याची महत्ता चांगलीच पटली होती.
आताही सूर्य कुमार साहेबांसमोर आपली चूक कबूल करावी अशी वारंवार उर्मी दाटून येत होती. परंतु तसे करण्याचे धाडस मात्र होत नव्हते.
घराबाहेर पडून रेंजर साहेब जीप मध्ये बसले. आणि मला जवळ बोलावून माझा हात हातात धरून हलक्या आवाजात म्हणाले..
“हमारी खबर पक्की थी, इसपर मुझे पुरा यकिन है ! दोस्त होने के नाते, छुट्टी के दिन, सिव्हिल ड्रेस पहन कर मैंने रेड कंडक्ट की, ताकि किसी को पता न चले, आपकी बदनामी न हो और आपकी नौकरी भी सलामत रहे ! लेकिन आप बहुत चालाक निकले.. पहले ही लकड़ी कहीं और छुपा दी..! ठीक है, लेकिन मैने जो कुछ कहा है उसपर संजीदगीसे विचार करना !”
रेंजर साहेबांनी हात उंचावून दारात उभ्या असलेल्या माझ्या पत्नी व मुलाला बाय बाय केला आणि जीप सुरू झाली.
जीप थोडी पुढे गेली न गेली तोंच..
दाबून ठेवलेला पश्चातापाचा ज्वालामुखी उफाळून एकाएकी माझा आतापर्यंत महत्प्रयासाने रोखून धरलेला संयमाचा बांध अचानक फुटला आणि सारं धैर्य एकवटून मी जोरात ओरडलो..
“ठहरो साब..! वो लकडी इधर, मेरे घर में ही है..!!”
(क्रमशः)
.(मागील लेखांची लिंक).*
लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.
निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले. आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.