https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान..*

क्रमशः (४)

जीपने नुकताच वेग घेतला होता. माझे ओरडणे ऐकू जाताच करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज होऊन जीप थांबली. तशीच तिला घाईघाईत रिव्हर्स घेऊन दारासमोर थांबवून माझ्याकडे आश्चर्याने पाहत सूर्यकुमार खाली उतरले.

मी त्यांना घेऊन घरात गेलो आणि बैठकीतील दिवाणाकडे बोट दाखवून त्या खालच्या खळग्यात सागाच्या फळ्या आहेत असं सांगितलं. सूर्यकुमार साहेबांनी हवालदार साईनाथला दिवाणा खालून फळ्या बाहेर काढायला सांगितलं. तसंच रीतसर नोंद व पंचनामा होईपर्यंत मी आतील दुसऱ्या खोलीत थांबावं अशी त्यांनी मला विनंती केली. त्यानुसार बेडरूममध्ये जाऊन पंचनामा पूर्ण होण्याची मी वाट पाहू लागलो.

थोड्या वेळाने रेंजर साहेबांनी मला बाहेर बोलावलं. आठशे रूपयांच्या दंडाची पावती हातात ठेवून पैसे उद्या दिलेत तरी चालेल, असे ते म्हणाले. परंतु सुदैवाने घरात, बायको जवळ तेवढे पैसे होते, ते आणून ताबडतोब त्यांच्या हातात ठेवले.

त्यानंतर वन विभागाचा खुणेचा शिक्का त्या लाकडी फळ्यांवर मारण्यास त्यांनी साईनाथला सांगितलं. शिक्का मारण्याचे काम चालू असताना दहापैकी केवळ सहा फळ्याच साईनाथने बाहेर काढल्याचे माझ्या लक्षात आले.

“खाली आणखी चार फळ्या आहेत !” असे साईनाथला सांगताच डोळा मारत त्याने “गप्प रहा..!” अशी मला खूण केली.

नुकतेच आम्ही रामेश्वरम्, कन्याकुमारीला जाऊन आली होतो. तेथून आणलेले वेगवेगळ्या आकारांचे व विविध रंगांचे मोठमोठे आकर्षक समुद्री शंख शिंपले प्लास्टिकच्या कव्हर मध्ये घालून ते माळेसारखे बैठकीच्या खोलीत लटकवले होते. साईनाथ महाशयांना हे शंख शिंपले फारच आवडलेले दिसत होते. सकाळी घरात आल्यापासून वारंवार ते शंख शिंपले हातात घेऊन तो त्यांच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत होता.

“खूप मौल्यवान असतील ना हे शंख शिंपले ?” असा प्रश्न ही त्याने दोन तीनदा विचारला होता. तसे ते शंख शिंपले अगदीच स्वस्त किमतीचे होते. परंतु साईनाथच्या चेहऱ्यावरील सौंदर्यचकित भाव पाहून शिंपल्यांची खरी किंमत ऐकून त्याचा अपेक्षाभंग होऊन विरस होऊ नये म्हणून मी त्याच्या प्रश्नावर होकारार्थी मान डोलावली होती.

साईनाथ पाणी पिण्याच्या निमित्ताने घरात आला आणि मला एका बाजूला घेत,

“मी मुद्दामच चार फळ्या खाली ठेवल्या आहेत. त्या बदल्यात तुम्ही मला ते शंख शिंपले द्या..!”

असे म्हणाला.

मी त्याला घेऊन बाहेरच्या खोलीत गेलो आणि ती भिंतीवर टांगलेली शंख शिंपल्यांची माळ काढून त्याच्या हातात ठेवत म्हणालो..

“ही माझ्याकडून तुला सप्रेम भेट ! याच्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीही नको..”

त्यानंतर “आणखी चार फळ्या बाहेर काढायच्या राहिल्या असल्याचे” मी सूर्यकुमार साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. हलगर्जीपणाबद्दल साईनाथला चार शिव्या हासडीत रेंजर साहेबांनी त्या चार फळ्या बाहेर काढून त्याची पंचनाम्यात नोंद घेतली. या चार फळ्यांचा जादा दंड न लावता लगेच फॉरेस्ट विभागाचा शिक्काही त्या फळ्यांवर मारून दिला.

मी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल व केलेल्या सहकार्या बद्दल त्यांनी माझे आभार मानले. त्यावर मी हात जोडून त्यांना म्हणालो की.. “माझ्या घरात जे सागवानी फर्निचर आहे त्या सर्वांवरही मी योग्य तो सरकारी दंड भरू इच्छितो. तसेच एक सोफा सेट मी बेकायदेशीररित्या बस द्वारे महाराष्ट्रात पाठविला आहे. त्या कृत्याबद्दल कायद्यानुसार जी शिक्षा असेल ती भोगण्यास मी तयार आहे तसेच त्याचा दंडही माझ्या कडून वसूल करावा.”

सर्व गुन्हे कबूल करून चटकन पापमुक्त होण्याची जणू मला घाईच झाली होती.

पडत्या फळाची आज्ञा घेऊन रेंजर साहेबांनी घरातील साऱ्या फर्निचर वर दंड आकारला. महाराष्ट्रात पाठविलेल्या सोफा सेटवरही दुप्पट दराने दंड लावून एकूण अडीच हजार रुपये एवढ्या रकमेची पावती दिली. शेजारी राहणाऱ्या घरमालका कडून तात्पुरते पैसे उसने घेऊन मी वन विभागाचा दंड लगेच भरून टाकला.

एका शिक्का मारलेल्या पावतीवर घरातील सर्व फर्निचरचा उल्लेख करून ती माझ्या हातात ठेवीत सूर्यकुमार म्हणाले की.. “ही पावती दाखविलीत तर फॉरेस्ट विभागाच्या कोणत्याही चेक पोस्टवर कुणीही तुम्हाला अडवू शकणार नाही.”

“रेड” यशस्वी करून परत जाताना अत्यानंदाने मला प्रेमभरी मिठी मारून रेंजर साहेब म्हणाले..

“मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून अनेक ठिकाणी मी व्याख्यानं देतो. परंतु माझ्या उपदेशामुळे एखाद्याचे इतक्या अल्प अवधीत हृदयपरिवर्तन झाल्याचा हा पहिलाच अनुभव !

ड्युटीवर नसताना मी नेहमी हा असा पांढऱ्या रंगाचा खादीचा शर्ट व पँट असे साधे कपडे घालतो, हे तुम्हाला माहीतच आहे. जीनची पँट, महागडे शूज, गॉगल्स, रिस्ट वॉच, बेल्टस्, परफ्युम्स, ब्रँडेड कपडे अशा गोष्टी मी कधीच वापरत नाही. गरिबीतून वर आल्यामुळे मी बराचसा साम्यवादी विचारसरणीचा आहे.

सरकारी अधिकारी असूनही सशस्त्र नक्षलवादी अतिरेक्यांचा सुळसुळाट असलेल्या येथील जंगलात मी निर्भयपणे एकटा फिरतो. अनेक खतरनाक नक्षलवाद्यांशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. माझी साधी राहणी आणि स्वच्छ चारित्र्य यांचा सर्वांवरच आपोआपच चांगला प्रभाव पडतो.

तुम्ही देखील साधी राहणी, अपरिग्रह, स्वाध्याय, आत्मसंयम व योग साधना यांचा अवलंब करून चिंतामुक्त सुखी जीवन जगावे, हीच मनोमन सदिच्छा.. !!”

एवढं बोलून रेंजर साहेबांनी माझा निरोप घेतला. त्यांच्या साधेपणाला, उच्च विचारसरणीला, आदर्श, निर्मोही वृत्ती आणि निस्पृह कर्तव्यनिष्ठेला मी मनोमन सॅल्युट केला.

एका मोठ्या संकटातून माझी सहीसलामत सुटका झाली होती. दंड भरून मी कायमचा निश्चिंत झालो होतो. अंतर्मनाला लागलेली सद्सद विवेकबुद्धीची टोचणी देखील कमी झाली होती. मेंदू वरील अपराधाचं, काळजीचं मानसिक ओझं उतरल्यामुळे कसं हलकं हलकं वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी बँकेत गेलो तेंव्हा हेड कॅशियर, मॅनेजर व अन्य दोघा सागफळ्या खरेदी पार्टनर्स कडे विशेष निरखून बघितलं. पण ते नेहमी सारखेच आपल्या रोजच्या कामात मग्न होते. त्यांचे माझ्याकडे लक्षही नव्हते.

म्हणजे ? काल ह्या चौघांवर फॉरेस्ट डिपार्टमेंटची रेड पडलीच नाही की काय ? रेंजर साहेब तर ह्या चौघांच्या घरी धाड टाकून लाकूड जप्त करून आल्याचं म्हणाले होते ? मग हे चौघे, असं काहीच न झाल्याचा खोटा आव तर आणत नाही आहेत ? “झाकली मूठ सव्वा लाखाची” असा विचार करून मी ही मग कालच्या फॉरेस्ट रेड बद्दल कुणाकडेही विषय काढला नाही.

बँकेत रेग्युलर ऑडिट आलं होतं. सर्वजण त्या संबंधीच्या कामात गर्क झाले होते. पंधरा दिवसांनी ऑडिट संपलं. शाखेला ऑडिटमध्ये उत्तम रेटिंग मिळाल्यामुळे सर्वजण खुष होते. त्या आनंदात मॅनेजर साहेबांनी सर्व स्टाफसाठी बँकेतच छोटीशी पार्टी अरेंज केली होती.

पार्टीत गप्पा मारत असताना अचानक काहीतरी आठवल्या सारखं करून मॅनेजर साहेब म्हणाले..

“आपको बताना भूल ही गया इस ऑडिटकी गडबडमे.. वो, फॉरेस्ट रेंजर सूर्यकुमार आपके घर आ सकता है कभी भी.. आपके घर में इल्लीगल लकडी का स्टॉक है ऐसा बोल के, डरा धमका कर आप से फाईन भरने को कहेंगा.. उस को बिलकुल भाव मत देना.. ‘मॅनेजर साब से बात करो’, ऐसा कहना..

जब भी कोई बाहर के स्टेट का नया स्टाफ आता है तो ये लोग ऐसी ही चाल चलते है.. दरअसल उनके डिपार्टमेंट की सॅलरी, टीए बिल और अन्य सभी बिल का पेमेंट हम ही करते है.. उनके सारे स्टाफ को हम ने पर्सनल लोन भी दे रक्खा है.. हमेशा, बँक का समय समाप्त होने के बाद आने पर भी हम उन्हे पेमेंट देकर को-ऑपरेशन करते है इसलीये वो हमारे शुक्रगुजार रहते है और हमसे दब कर, थोडा डर कर भी रहते है..

.. और एक बात ! उस रेंजर सूर्यकुमार की बड़ी बड़ी बातों में मत आना.. वो जैसे दिखता है और दिखाता है, वैसा बिलकुल नहीं है !”

मॅनेजर साहेबांचे बोलणे ऐकून माझा पार्टीचा मूडच गेला. आपली फार मोठी फसवणूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. कसेबसे दोन घास खाऊन मी घरी परतलो.

त्या दिवसानंतर सूर्यकुमार साहेब मला कधीच भेटले नाहीत. फॉरेस्ट विभागाच्या कर्ज योजने संबंधी मीटिंग्ज मध्ये तसेच कर्ज मंजुरीच्या इंटरव्ह्यू पॅनल मध्ये ही ते गैरहजर असायचे.

रेंजर साहेबांच्या भ्रष्ट कारभाराचे, लाचखाऊ वृत्तीचे काही किस्सेही उडत उडत माझ्या कानावर आले. नक्षलवादी लोकांशी त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा लोकांना संशय होता. भरभक्कम मोठी लाच घेऊन ट्रकचे ट्रक सागवान चोरून स्मगल करणाऱ्या गुन्हेगारी रॅकेटचा ते हिस्सा असल्याबद्दल लोकांत कुजबुज होती.

अशातच आमच्या शाखेचा पंचविसावा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरले. रेंजर साहेबांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे काम माझ्याकडे सोपविण्यात आले होते. निमंत्रण पत्रिका घेऊन सकाळी नऊ वाजता रेंजर साहेबांच्या बंगल्यावर गेलो तेंव्हा ते बाहेर कुठेतरी जवळपासच गेले आहेत, असे गेट वरील रखवालदार म्हणाला. साहेब येईपर्यंत बंगल्याच्या दिवाणखान्यात थांबू शकता, असेही तो म्हणाला. मलाही त्यांचे घर पाहण्याची उत्सुकता होतीच, म्हणून मी दिवाणखान्यात प्रवेश केला.

त्या हॉलमध्ये बसण्यासाठी एक सतरंजी अंथरली होती. सतरंजीवर काही पुस्तके, ऑफिस फाईल्स, डायऱ्या व एक पेन होता. कोपऱ्यात पिण्याच्या पाण्याचा माठ ठेवलेला होता. अगदी रेंजर साहेबांनी वर्णन केल्याप्रमाणेच त्यांच्या घरातील दृश्य दिसत होते. माझ्या मनात पुन्हा त्यांच्याबद्दल कौतुकाचा भाव जागायला लागला.

थोड्या वेळाने त्यांचा खाजगी नोकर-कम्-खानसामा तिथे आला. “आपण साहेबांचे नातेवाईक आहात का ? रेंजर साहेब तुमचे कोण लागतात ?” असे त्याने विचारले. “ते माझे दोस्त आहेत..” असे त्याला सांगताच,

“अरे साब, फिर आप इधर निचे जमीनपर क्यों बैठे हो ? साब देखेंगे तो मुझ पर बहुत गुस्सा करेंगे.. चलो, आपको साब का प्रायव्हेट रुम दिखाता हुं.. वहां आराम से बैठ कर वेट करो, साब आते ही होंगे, तब तक मैं आप के लिए चाय बनाकर लाता हूं..”

असे म्हणत तो मला बंगल्याच्या मागे घेऊन गेला. तिथे आणखी एक छोटीशी टुमदार बंगली होती. त्याच्या व्हरांड्यात दोन उत्कृष्ट कलाकुसरीच्या सागवानी झुलत्या (रॉकिंग) चेअर्स ठेवलेल्या होत्या. काळ्या शिसवी लाकडाचे उत्तमोत्तम मुखवटे व नाजूक कोरीव नक्षीकामाच्या सुंदर लाकडी वस्तूंनी व्हरांडा कलात्मकपणे सजविला होता.

या प्रायव्हेट बंगल्यातील दिवाणखान्याच्या फरशीवर जाडजूड गुबगुबीत उंची गालिचा अंथरला होता. चंदनी शिसमच्या भव्य शाही सोफ्यामुळे त्या हॉलला जणू राजवाड्याचाच लुक आला होता. छताला काचेची चमकणारी हंड्या झुंबरे टांगलेली होती. हॉलमधील सर्व दारे व खिडक्यांना आलिशान राजेशाही किनखापी पडदे लावलेले होते. हॉलभर फ्रेंच परफ्युमचा मंद सुगंध दरवळत होता.

हॉलच्या एका भिंतीवर पंचावन्न इंची रंगीत टीव्ही होता, तर बाजूलाच काचेच्या शो केस मध्ये काही फॅमिली फोटो फ्रेम्स ठेवलेल्या होत्या. त्या फ्रेम्स मध्ये सूर्यकुमार साहेबांचे पत्नी सोबत काढलेले लंडन, पॅरिस, रोम, न्यूयॉर्क येथील फोटो होते. सोफ्या समोरील कॉफी टेबलवर फिल्म फेअर, स्टारडस्ट, फेमिना, डेबोनेर, इव्हज विकली अशी रंगीत, गुळगुळीत पानांची मासिके होती. टेबलच्या काचेखालील शेल्फवर “प्ले बॉय”, “लेग शो”, “मेन्स वर्ल्ड”, “प्रायव्हेट”, “सेलेब्रिटी स्किन”, “चिक” अशी उघड्या नागड्या चित्रांनी भरलेली विदेशी पोर्न मॅगझिन्स होती.

हॉलमध्ये एका बाजूला छोटासा मिनी बार होता. तेथील एका शेल्फ वर काचेची नाजूक निमुळती मदिरा पात्रे होती तर बाकी साऱ्या शेल्फ मध्ये विविध ब्रँड्सची व्हिस्की, रम, वाईन, ब्रँडी, बियर होती. शिवास रिगल, जॉनी वॉकर, ओल्ड माँक, रॉयल स्टॅग, मॅकडोवेल नं.1, हवाना क्लब, स्मर्नऑफ, अब्सोल्युट व्होडका अशा प्रसिद्ध ब्रँडच्या बाटल्यांची लेबले बसल्या जागेवरून वाचता येत होती. याशिवाय एका शेल्फ मध्ये डनहिल, मार्लबरो, चेस्टरफिल्ड, कॅवेंदर्स, न्यूपोर्ट, बेन्सन अँड हेजेस अशा विदेशी ब्रँडच्या सिगारेटची पाकिटे ठेवली होती.

मिनी बारच्या भिंतीवर अर्धनग्न ओलेत्या मादक सौंदर्यवतीचे उभ्या आकारातील उत्तान छायाचित्र लावलेले होते. सोफ्यामागे मुख्य भिंतीवर सहा बाय चार फूट अशा मोठ्या आकाराचे शिकार करणाऱ्या आदिवासींचे हुबेहूब जिवंत दृश्य रेखाटलेले महागडे तैलचित्र पाहता क्षणीच लक्ष वेधून घेत होते. विलक्षण सुंदर लाकडाची कलाकुसर असलेले, सिनेमात श्रीमंतांच्या बंगल्यात दाखवितात तसे जाळीदार चेंजिंग पार्टिशन एका कोपऱ्यात ठेवले होते. अनेक उंची नाईट ड्रेस, जीन्स, टी शर्टस, कमरेचे बेल्टस पार्टिशन मागील लाकडी खुंटीवर मिरवत होते. खुंटीखाली आठ दहा प्रकारचे ब्रँडेड चपला बुटांचे जोड ओळीने लावून ठेवलेले होते.

एका भिंतीवर एअर कंडीशनर लावला होता. त्या एसी खाली काचेचा मोठा फिश पाँड होता. त्यातील रंग बदलणारे लाईट्स, खालून वर येणारे पाण्यातील बुडबुडे, आत फिरणारे रंगीबेरंगी मासे यामुळे खोलीतील वातावरण स्वप्नमय वाटत होते. फिश पाँड शेजारीच Sony ची स्टिरिओफोनिक म्युझिक सिस्टीम होती.

स्टडी टेबलवर छोट्याशा शेल्फ मध्ये रॉबर्ट लुडलम, सिडने शेल्डन, हॅरॉल्ड रॉबिन्स, अर्ल स्टॅन्ले गार्डनर या सारख्या तत्कालीन बेस्ट सेलर लेखकांची नॉव्हेल्स होती. आधुनिक डिझाईनचा टेबल लॅम्प, शुभ्र संगमरवरी व्हीनसचा अर्धपुतळा, ताज्या फुलांचा फ्लॉवरपॉट, कंबर, मान डुलवणारी जपानी बाहुली यांनी स्टडी टेबल सजला होता.

टेनिसच्या दोन रॅकेट्स आणि एक गिटार भिंतीची शोभा वाढवीत होते. श्रीमंती, लक्झरी लुक असलेला, लव्हली आर्ट मास्टरपीस भासणारा Boca Do Lobo या जगप्रसिद्ध ब्रँडचा बेल्जियम काचेचा ओव्हल शेपचा आरसा पाहूनच त्याच्या किमतीचा अंदाज येत होता. आरशा शेजारील ओपन पेंड्युलम असलेले स्विझरलँडचे अँटिक व्हिंटेज ककु क्लॉक घर मालकाच्या उच्च चोखंदळ कलासक्त वृत्तीची साक्ष देत होते.

एखाद्या गर्भश्रीमंत रसिक संस्थानिकाच्या रंग महालात बसल्यासारखं मला वाटत होतं. बाजूलाच रेंजर साहेबांचा खराखुरा रंगमहाल म्हणजेच शयनगृह (बेडरूम) होते. परंतु हॉल मधील श्रीमंतीचे हे ओंगळवाणे, बटबटीत प्रदर्शन पाहून त्या रंगमहालात साधं डोकावून पाहण्याची देखील इच्छा आता उरली नव्हती.

एवढ्यात साहेबांचा खानसामा एका ट्रे मध्ये चहा घेऊन आला. ट्रे मध्ये नेबिस्को, पिल्सबरी या सारख्या प्रसिद्ध विदेशी ब्रँडची सँडविच बिस्किटे व कुकीज तसेच जर्मनी, इटलीची मिल्क, व्हाईट आणि डार्क चॉकलेट्स होती. घट्ट दुधाचा अद्रक, लवंग, विलायची, दालचिनी घातलेला मसाला चहा पिताना मला सूर्यकुमार यांच्या अपरिग्रह, साधी राहणी व साम्यवादाच्या दांभिक गप्पा आठवत होत्या.

“हा माणूस दिसतो आणि दाखवतो तसा अजिबात नाही..” हे मॅनेजर साहेबांचे शब्द मला राहून राहून आठवत होते.

कसाबसा चहा संपवून मी उठलो. रेंजर साहेबांचे विलासी जीवन तसेच त्यांचा दुतोंडीपणा व ढोंगी मिथ्याचरण पाहून एकूणच साऱ्या प्रकाराचा उबग येऊन माझा जीव तिथे घुसमटू लागला होता. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व माझे व्हिजिटिंग कार्ड खानसाम्याच्या हातात देऊन खिन्न मनाने मी तेथून बाहेर पडलो.

एकीकडे दुनियेतील समस्त माणुसकीवरचा माझा विश्र्वासच उडाला होता तर दुसरीकडे स्वत:च्या बावळट, मूर्ख, भाबडेपणाचा मला प्रचंड राग येत होता..

(क्रमशः)

 

.(मागील लेखांची लिंक).*

1. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान

2. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2 

3.*लोकां सांगे ब्रह्मज्ञान-3 

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading