लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*उतनूरचे दिवस…*
*थरार… (३ )*
उतनूर मध्ये आमच्या स्टेट बँके व्यतिरिक्त आदीलाबाद जिल्हा केंद्रीय मध्यवर्ती बँक (ADCC) व सरस्वती ग्रामीण बँक अशा दोनच अन्य बँका होत्या. त्यापैकी ADCC बँक ही अनागोंदी कारभार व पर्याप्त निधीच्या अभावी कायमची बंद पडण्याच्या मार्गावर होती तर सरस्वती ग्रामीण बँक ही स्टेट बँकेद्वाराच पुरस्कृत (sponsored) असल्याने तशी बरीचशी आमच्या अंकीतच होती.
सरस्वती ग्रामीण बँकेची शाखा आमच्या स्टेट बँकेच्या इमारतीच्या अगदी समोरच होती. पुरेसा व कार्यक्षम स्टाफ नसल्याने या ग्रामीण बँकेचा उतनूर परिसरात केवळ नाममात्रच बिझिनेस होता. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी त्या बँकेत राजकुमार रेड्डी नावाचे नवीन शाखाधिकारी आल्यापासून परिस्थिती बदलली होती.
सहा फूट उंच, धिप्पाड शरीरयष्टी, सावळा रंग आणि सदैव हसमुख चेहरा असलेले राजकुमार रेड्डी एक हुशार व तडफदार अधिकारी होते. सर्वांशी आदराने व हसून खेळून बोलण्याच्या त्यांच्या मैत्रीपूर्ण वागणुकीने त्यांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकून घेतली होती. ते अतिशय कष्टाळू होते व आपल्या बँकेचा बिझिनेस वाढावा यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असायचे.
दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शाखेतील फिल्ड ऑफिसर सूर्यकुमार बाबू यांचा पुलीमडगु गावात कर्ज वसुलीसाठी गेले असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेंव्हापासून शाखेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचून गेले होते. पर्यायाने बँकेच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. शाखेत नवीन स्टाफ येण्यास तयार नव्हता. कर्जवसुली ठप्प झाल्याने अनुत्पादित कर्जाचे (NPA- Non Performing assets) प्रमाणही खूप वाढले होते.
राजकुमार रेड्डी साहेबांना शाखेच्या वाढत्या NPA ची चिंता सतावत होती. फिल्ड ऑफिसर नसल्याने त्यांनी स्वतःच कर्जवसुली साठी खेडोपाडी जाण्यास सुरवात केली. कर्जदारांना नियमित कर्जफेडीचे फायदे गोड शब्दांत समजावून सांगत त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. पाहता पाहता कर्ज वसुलीचे प्रमाण वाढले आणि शाखेचा NPA झपाट्याने कमी झाला.
रोज सकाळी सहा वाजता रेड्डी साहेब रिकव्हरी साठी बाहेर पडून साडेनऊ पर्यंत घरी परत येत असत. मग जेवण करून साडेदहा वाजता ते शाखेत येऊन बसायचे. दुपारी एक वाजता ते पुन्हा कर्जवसुली साठी बाहेर पडायचे आणि चार साडेचार वाजेपर्यंत शाखेत परत यायचे. स्टाफ शॉर्टेज असल्याने खेडोपाडी जाताना ते नेहमी एकटेच जात. कुणालाही सोबत नेत नसत.
राजकुमार रेड्डी साहेब स्वतः जरी काळे सावळे असले तरी त्यांची बायको मात्र भरपूर गोरी तसेच सौंदर्यवती सुद्धा होती. रेड्डी साहेबांना मुलबाळ नव्हते. आमच्या स्टेट बँकेच्या इमारतीच्या वरच्या भागातच ते नवरा बायको रहायचे. रोज संध्याकाळी रेड्डी साहेब बायकोला घेऊन गावात मोटर सायकलवर फिरायचे तेंव्हा त्या देखण्या जोडीकडे सारे गावकरी कौतुकानं बघायचे.
कर्जवसुली समाधानकारक होऊन NPA आटोक्यात आल्यावर शाखेचे डिपॉझिट वाढविण्यावर जोर देण्यास रेड्डी साहेबांनी सुरवात केली. आमची बँक सरकारी बँक असल्याने उतनूर परिसरातील बहुतांश खातेदारांची डिपॉझिट्स आमच्या स्टेट बँकेतच होती. स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारी बँकांपेक्षा अर्धा टक्का जास्त व्याज देण्याची रिझर्व्ह बँकेने ग्रामीण बँकांना परवानगी दिली होती. या गोष्टीचा आक्रमक प्रचार करीत रेड्डी साहेबांनी स्टेट बँकेतील डिपॉझिट्स आपल्याकडे वळविण्यास सुरवात केली. लोकांनी आमच्या बँकेतून आपली जमा राशी काढून ती ग्रामीण बँकेत ठेवण्यास सुरवात केली. बघता बघता आमचे बरेच खातेदार त्यांच्या डिपॉझिट्स सह ग्रामीण बँकेत शिफ्ट झाले.
रेड्डी साहेबांच्या ह्या ऍग्रेसिव्ह बँकिंग मुळे स्टेट बँकेशी असलेल्या त्यांच्या मधुर संबंधात कडवटपणा निर्माण झाला होता. असं असलं तरी त्यांच्याशी असलेली माझी मैत्री मात्र कायम होती. रोज सकाळी एकाच वेळी आम्ही दोघेही इंस्पेक्शन व कर्ज वसुली साठी गावाबाहेर निघायचो. योगायोगाने आमची दत्तक गावेही एकाच रस्त्यावर होती. रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलातील गावे स्टेट बँकेकडे तर उजव्या बाजूच्या जंगलातील गावे ग्रामीण बँकेकडे, अशी दत्तक गावांची विभागणी होती.
नेहमीप्रमाणेच आजही दुपारी एक वाजता आम्ही दोघे रिकव्हरी साठी एकत्रच निघालो होतो. मला आज बिरसाई पेटच्या डावीकडील जंगलात पाच किलोमीटर अंतरावरील “भूपेट” या गावात जायचे होते. तर रेड्डी साहेबांना बिरसाई पेट च्या उजवीकडील जंगलात आठ किलोमीटर अंतरावरील “अल्लमपल्ली” या गावात जायचे होते. आम्ही दोघेही आपल्या ह्या गावांमध्ये पहिल्यांदाच जात होतो. तसंच ही दोन्ही गावं नक्षल्यांचा मुक्त वावर असलेली धोकादायक गावं असल्यामुळे दुपारी चार वाजण्यापूर्वीच व्हिजिट आटोपून बिरसाईपेट बस स्टॉप पाशी परत यायचे असे ठरवले.
बिरसाईपेट उतनूर पासून अकरा किलोमीटर दूर असलेलं रस्त्याला अगदी लागून असलेलं गाव होतं. तिथपर्यंत आम्ही तिघेही (मी, रेड्डी साहेब व प्युन रमेश) आपापल्या मोटार सायकलींवर आलो. तिथल्या बस स्टॉप नजीकच्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलो असतांनाच आम्हाला बिक्षुपती भेटला. “पाथा उतनूर” (old utnoor) नावाच्या छोट्याशा गावात राहणारा बिक्षुपती गावोगाव सायकलींवर फिरून चादरी, सतरंज्या, ब्लॅंकेट्स हप्त्याने विकायचा. त्याचा व्यवहार पाहून नुकतंच त्याला दहा हजार रुपयांचं कर्ज मी मंजूर केलं होतं. रेड्डी साहेबांशी बिक्षुपतीची ओळख करून दिली. चहा घेतल्यावर बिक्षुपती बिरसाईपेट गावात गेला तर आम्ही आपाल्याला गावांकडे निघालो.
भूपेट गावात आमचे फक्त दहा बाराच कर्जदार होते. त्यांची भेट घेऊन थोडीफार वसुली करून तीन वाजण्यापूर्वीच आम्ही बिरसाईपेटला परतलो आणि रेड्डी साहेबांची वाट पहात बसलो. मी झाडाखाली बसून इंस्पेक्शन रजिस्टर लिहून काढत होतो तर रमेश गावकऱ्यांशी गप्पागोष्टी करीत होता. दरम्यान बिक्षुपती ही बिरसाईपेट मधील विक्री आटोपून आमच्या समोरूनच सायकल दामटीत पुढील गावाकडे निघून गेला. साडे चार वाजले तरी अद्याप रेड्डी साहेबांचा पत्ता नव्हता.
अखेर पाच वाजले. उंच वृक्षांच्या सावल्या लांबून अंधार पडायला सुरुवात झाली. रोजची कॅश स्टीच करणे, नोटांचे बंडल बांधणे, कॅश स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणे ही कामे देखील रमेशलाच करायची असल्याने तो उतनूरला परतण्याची घाई करू लागला. मला मात्र रेड्डी साहेबांना न घेताच उतनूरला परत जाणे मनाला पटत नव्हते. शेवटी साडेपाच वाजता रमेशला एकट्यालाच बँकेची मोटारसायकल घेऊन उतनूरला परतण्यास सांगून मी तिथेच रेड्डी साहेबांची वाट पहात थांबलो.
त्याकाळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे रेड्डी साहेब नेमके कुठे आहेत हे समजण्यास मार्ग नव्हता. अल्लमपल्ली गावातून उतनूरकडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग होता. बिरसाईपेट गावाचे सरपंच हनमांडलू गारु मला सोबत करीत बस स्टॉप वर थांबले होते. त्यांच्याजवळ मोटारसायकल असल्याने यदाकदाचित रेड्डी साहेबांची भेट न झाल्यास मला उतनूर पर्यंत सोडून देण्याचे त्यांनी कबूल केले होते.
संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रस्त्यावरची वाहतूक मंदावली. गावकरी आपापल्या घरी परत गेले. गिऱ्हाईक नसल्याने बस स्टॉप वरील हॉटेलवालाही हॉटेल बंद करून आपल्या घरी गेला. आता तिथे फक्त मी आणि सरपंच हनमांडलू गारु असे दोघेच उरलो होतो. चादर विक्रेता बिक्षुपतीही अद्याप परतताना दिसला नसल्याने त्याबद्दल सरपंचांना विचारले असता.. “बिक्षुपतीचे भरपूर नातलग या परिसरातील विभिन्न गावांत रहात असल्याने विक्री करताना जिथे संध्याकाळ होईल त्याच गावात आपल्या नातेवाईकाकडे तो रात्रीचा मुक्काम करतो..” असे त्यांनी सांगितले.
साडेसात वाजता उतनूर मधील माझा सहकारी प्रसन्ना, मला परत नेण्यासाठी बँकेची मोटारसायकल घेऊन आला. रेड्डी साहेबांचा अद्यापही काहीच ठावठिकाणा नव्हता. आठ वाजता त्या मार्गावर रात्री गस्त घालणारी उतनूर पोलिसांची जीप (Patrolling vehicle) तिथे आली. रात्रीच्या वेळी रस्त्यावर असं एकट्या दुकट्यानं उभं राहणं धोक्याचं असल्याचं सांगून त्यांनी आम्हाला हटकलं, तेंव्हा आम्ही त्यांना रेड्डी साहेबांबद्दल सांगितलं. एवढ्या रात्री जंगलात शिरून त्यांचा शोध घेणं खूप रिस्की असल्याचं सांगून त्यांनी आम्हालाही ताबडतोब उतनूरला परतण्यास सांगितलं. नाईलाजानं रात्री नऊच्या सुमारास आम्ही उतनूरला परतलो.
एव्हाना रेड्डी साहेबां बद्दलची बातमी साऱ्या गावभर पसरली होती. आमच्या बँकेसमोर गावकऱ्यांचा घोळका जमला होता. शेजार पाजारच्या बायका रेड्डी साहेबांच्या बायकोला धीर देत होत्या. गाडी पंक्चर झाल्यामुळे किंवा बंद पडल्यामुळे कदाचित साहेबांना अल्लमपल्ली गावातच मुक्काम करावा लागला असेल असे सांगून लोक रेड्डी साहेबांच्या पत्नीची समजूत घालत होते. रात्री दहा वाजेपर्यंत वाट पाहून मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रेड्डी साहेबांची “मिसिंग कम्प्लेन्ट” नोंदवली.
त्या दिवशी आम्ही स्टेट बँकेचे सर्व कर्मचारी बँकेत जमून रात्रभर जागत राहून रेड्डी साहेबांची वाट पहात बसलो होतो. ग्रामीण बँकेचा स्टाफ ही आमच्या सोबतच होता. काही प्रतिष्ठित गावकरी, ADCC बँकेचे कर्मचारी व दोन पोलीस कॉन्स्टेबल देखील थोड्या वेळासाठी तिथे येऊन गेले. रेड्डी साहेबांची पत्नी सुद्धा अधून मधून बँकेत येऊन जात होती. पहाटे सहा वाजता सशस्त्र पोलिसांच्या दोन जीप रेड्डी साहेबांच्या शोधार्थ अल्लमपल्ली फॉरेस्ट कडे निघाल्या.
अल्लमपल्ली गावापर्यंत जाऊन पोलिसांच्या या दोन्ही जीप सकाळी दहापर्यंत उतनूरला परत आल्या. रेड्डी साहेब अल्लमपल्ली गावात आलेच नसल्याचे तेथील गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्या नंतर दुपारी बारा वाजता, त्या भागातील हिरापूर गावाजवळ एक मोटारसायकल अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याचे तेथील गावकऱ्यांनी उतनूर पोलिस स्टेशनला कळविले. ताबडतोब रिकामी जीप पाठवून पोलिसांनी ती मोटारसायकल ग्रामीण बँकेकडे आणवून घेतली. ती रेड्डी साहेबांचीच मोटारसायकल होती.
रेड्डी साहेबांसोबत निश्चितच काहीतरी घातपात झालेला दिसत होता. हिरापूर जंगलात त्या मोटारसायकल पासून काहीच अंतरावर पोलिसांना एक पॅन्ट शर्ट व बुटांचा जोड ही फेकून दिलेला दिसला. तोही पोलिसांनी सोबत आणला होता. ते कपडे व बूट रेड्डी साहेबांचेच असल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.
राजकुमार रेड्डी साहेबांची ती जळालेली मोटारसायकल व बूट, कपडे पाहताच त्यांच्या पत्नीचा आतापर्यंत कसाबसा राखलेला धीर संपला. अशुभाच्या आशंकेने त्यांनी हंबरडा फोडून विलाप करण्यास सुरुवात केली. त्यांचा आक्रोश ऐकून जमलेल्या साऱ्यांचेच काळीज पिळवटून निघत होते. ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज बँक बंदच ठेवली होती. थोड्याच वेळात ग्रामीण बँकेचे आदीलाबाद येथील रिजनल मॅनेजर आपल्या सोबत लीड बँक मॅनेजर साहेबांना घेऊन उतनूरला हजर झाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी बँकेभोवती जमलेल्या जमावास पांगवून तिथे पोलीस बंदोबस्त वाढविला. रेड्डी साहेबांना शेवटचे पाहणारे आम्हीच असल्याने माझी व रमेशची पोलिसांनी कसून चौकशी केली. आदीलाबादचे जिल्हा पोलिस अधीक्षकही उतनूर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना वारंवार सूचना देत तपास कार्याचा अपडेट घेत होते. अल्लमपल्ली व हिरापूरचे संपूर्ण जंगल पोलिसांनी पिंजून काढले होते. परंतु अद्यापही रेड्डी साहेबांचा कसलाही थांगपत्ता लागत नव्हता.
कदाचित नक्षलवाद्यांनी रेड्डी साहेबांचे अपहरण करून त्यांना महाराष्ट्राच्या गडचिरोली भागात नेले असावे असा पोलिसांचा कयास होता. तसे असेल तर खंडणीसाठी तरी त्यांचा फोन येईल याचीच पोलीस वाट पहात होते. परंतु दुपारचे चार वाजले तरी अद्याप तसा कुठलाही फोन आला नव्हता.
दिवस मावळू लागला तशीतशी रेड्डी साहेबांच्या परतण्याची आशा देखील मावळू लागली. त्यांच्या पत्नीची दयनीय अवस्था तर बघता बघवत नव्हती. पतीची आठवण काढून रडता रडता दु:खातिरेकाने ती विलापिता वारंवार बेशुद्ध पडत होती.
पाच वाजण्याच्या सुमारास कमरेला मळकंसं धोतर गुंडाळलेला एक जाडजूड उघडाबंब माणूस गर्दीतून वाट काढीत बँकेत आला. त्याचा चेहरा धुळीने माखलेला होता. माझ्याकडे पहात तो म्हणाला..
आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी त्या माणसाकडे निरखून बघितलं.. तो काय..
“अरे..! रेड्डी साब.. आप ? और इस हालत में..?”
माझ्या तोंडून आनंदाने व आश्चर्याने वरील उद्गार बाहेर पडले.
माझे ते शब्द ऐकून सर्वांच्याच नजरा त्या माणसाकडे वळल्या. ते रेड्डी साहेबच आहेत याची खात्री झाल्यावर बँकेत सर्वत्र आनंदाची एक लहर पसरली. जो तो त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी धडपडू लागला. रेड्डी साहेबांच्या पत्नीला ही बातमी समजताच ती धावतच बँकेत आली आणि सर्वांदेखत तिने आपल्या पतीला घट्ट मिठी मारली. आनंदातिरेकाने तिच्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला होता. रेड्डी साहेब व त्यांची पत्नी.. या दोघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले होते. त्यांचं ते प्रेमभरीत उत्कट मिलन पाहून आम्हालाही गहिवरून आलं.
थोड्या वेळाने भानावर आल्यावर रेड्डी साहेबांच्या पत्नीने त्यांना घरी नेऊन आधी स्वच्छ आंघोळ घातली. त्यानंतर त्यांना पोटभर खाऊ पिऊ घालून हसतमुखाने त्यांना ती बँकेत घेऊन आली. तोपर्यंत उतनूरचे पोलीस ठाणेदारही त्यांचा जबाब घेण्यासाठी बँकेत येऊन ठेपले होते. आम्ही सारे ही त्यांची हकीकत ऐकण्यास अत्यंत उत्सुक होतो. रेड्डी साहेबांनी माझ्याकडे पहात बोलायला सुरुवात केली.
“काल दुपारी दीडच्या सुमारास माझ्या स्टेट बँकेच्या या मित्राला ‘चार वाजेपर्यंत इथेच परत येतो..’ असं सांगून बिरसाईपेट हून मी अल्लमपल्लीच्या दिशेने निघालो. सुमारे पाच किलोमीटर आत गेल्यावर एका ठिकाणी जंगलातील तो रस्ता दोन वेगळ्या दिशांना विभागला गेला होता. त्या रस्त्याने पहिल्यांदाच जात असल्याने नक्की कुठल्या दिशेने जावे याचा अंदाज न आल्याने नेमक्या चुकीच्याच दिशेने जंगलात जाण्यास मी सुरवात केली.
बराच वेळ झाला तरी कुठलेही गाव किंवा वस्ती दिसेना, तेंव्हा आपण रस्ता चुकल्याची मला खात्री झाली. गाडी वळवून माघारी परत फिरण्याचा विचार करीत असतानाच खाकी रंगाचा पॅन्ट शर्ट घातलेले दोन बंदूकधारी तरुण रस्त्याच्या कडेला उभे असलेले मला दिसले. ते फॉरेस्ट गार्ड असावेत असं वाटून मी त्यांच्याकडे अल्लमपल्लीच्या रस्त्याबद्दल चौकशी केली. हा हिरापूर कडे जाणारा रस्ता आहे असं सांगून अल्लमपल्लीचा रस्ता तर मागेच राहिला असं त्यांनी सांगितलं.
त्या दोघांचे आभार मानून मी मागे फिरलो. मात्र तेवढ्यात कुठूनतरी खुणेची एक कर्कश्श शीळ जंगलात घुमली. मला अनामिक धोक्याची जाणीव झाली. पाहता पाहता आजूबाजूच्या जंगलातून हिरव्या रंगाच्या गणवेशातील आठ दहा बंदूकधारी बाहेर पडून त्यांनी मला घेरून टाकलं. मला मोटारसायकल वरून खाली उतरवून पायवाटेने त्यांनी मला खोल जंगलात नेलं.
तिथे एका ठिकाणी नक्षलवाद्यांचा तळ होता. त्यांच्या कमांडरने माझी उलट तपासणी करण्यास सुरुवात केली. माझे आयडेंटिटी कार्ड दाखवूनही मी बँक मॅनेजर आहे यावर काही केल्या त्याचा विश्वास बसत नव्हता. गाडीचे लॉग बुक, इंस्पेक्षन रजिस्टर वगैरे त्याने दूर भिरकावून दिले. माझ्या दणकट शरीरयष्टीकडे पाहून मी पोलीस अधिकारीच असल्याचा त्याचा पक्का गैरसमज झाला होता. माझ्याबद्दल त्या कमांडरने खूप बारकाईने चौकशी केली. माझे जन्मगाव, शिक्षण, नोकरी इत्यादीचा तपशील जाणून घेऊन त्याची खातरजमा करण्यासाठी ट्रान्समिटर मार्फत ती माहिती त्याने त्याच्या वरिष्ठांना कळवली.
माझे अंगावरचे कपडे काढून घेऊन तिथल्याच एका झाडाला त्या नक्षल्यांनी मला रात्रभर बांधून ठेवलं. माझे कपडे जंगलात फेकून देऊन माझी मोटारसायकल जाळून टाकण्याचाही कमांडरने आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला. माझा “फैसला” उद्या सकाळी होईल.. असं सांगून ते सारे झोपायला निघून गेले.
सकाळी तिथला तळ हलवून व दोरीने माझे हात पाठीमागे बांधून अनवाणी पायी चालवत त्यांनी मला तेजपूरच्या दिशेने नेण्यास सुरवात केली. पोलिसांनी जंगलात माझा शोध घेण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांना खबर मिळाली होती. अधून मधून वॉकी टॉकी आणि ट्रान्समिटर वर बोलून ते माझ्या बद्दल वरिष्ठांकडून सूचना घेत होते. अद्याप माझ्या बद्दल हाय कमांड कडे पाठविलेली माहिती त्यांच्याकडून व्हेरिफाय झाली नव्हती.
सकाळचे दहा वाजून गेले होते. जसा जसा वरिष्ठांकडून माझी माहिती व्हेरिफाय करण्यास उशीर होत होता तसा तसा आमच्या सोबत जंगलात पायपीट करणाऱ्या त्या नक्षली दलम् च्या कमांडरचा राग व अधिरपणा वाढत होता. अखेरीस, बहुदा कमांडरच्या सततच्या विचारणेला वैतागून त्यांच्या हाय कमांडने माझ्या भवितव्याचा निर्णय त्या नक्षली कमांडरवरच सोपवला.
त्या कमांडरला तर माझ्या लोढण्या पासून कधीचीच सुटका हवी होती. त्याने मला पुन्हा झाडाला बांधून माझे हात पाय तोडून शीर धडावेगळे करण्याचा निष्ठूरपणे आदेश दिला. त्यानुसार चालता चालता मधेच थांबून तिथल्याच एका झाडाला मला बांधून टाकण्यात आले. मी ओरडू नये म्हणून माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली. जगण्याची आशा तर मी केंव्हाच सोडून दिली होती.
हातात कुऱ्हाड आणि कत्ती घेऊन निर्विकार चेहऱ्याचे दोन क्रूरकर्मा नक्षली जणू हे नित्यकर्मच असल्याच्या अविर्भावात माझ्या समोर उभे राहिले. त्यापैकी एका नक्षल्याने माझ्यावर घाव घालण्यासाठी कुऱ्हाड उंचावली. माझ्या सर्व संवेदना बधिर झाल्या होत्या. मी डोळे गच्च मिटून घेतले.
त्या नक्षल्याचा वर गेलेला हात बराच वेळ झाला तरी खाली न आल्याने नवल वाटून मी हळूच डोळे किलकिले करून पाहिले. तो नक्षली कान देऊन कसला तरी कानोसा घेत होता. काल ऐकली होती तशी खुणेची शीळ पुन्हा जंगलात घुमली. त्या पाठोपाठ जंगलातून एका माणसाला धरून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला कमांडर पुढे आणण्यात आले. मला त्या माणसाची फक्त पाठच दिसत होती.
कमांडरने आदेश दिल्यावर त्या माणसाच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. पट्टी काढताच त्या माणसाने कमांडरला सॅल्युट ठोकला. कमांडरची त्या माणसाशी चांगलीच जान पहचान असावी. कारण कमांडरने त्याला आदराने आपल्या शेजारी बसवून घेतले. त्यानंतर त्या माणसाने माझ्याकडे पाहिले. तो कालच ओळख झालेला चादर सतरंजी विकणारा बिक्षुपती होता. बहुदा तो नक्षल्यांचा खबऱ्या असावा. सुरवातीला त्याने मला ओळखलेच नाही. मात्र नंतर कमांडरने माझ्याबद्दल माहिती सांगताच त्याला माझी ओळख पटली. तो कमांडरला म्हणाला..
“मी ओळखतो ह्यांना. मी खात्रीनं सांगतो, हे नवीन आलेले ग्रामीण बँकेचे मॅनेजरच आहेत.”
बिक्षुपतीच्या त्या उद्गारांनी जणू चमत्कारच झाला. त्या कमांडरने माझी माझी ताबडतोब सुटका करण्याचा आदेश दिला. माझी क्षमा मागून तो म्हणाला.. “बँकवाल्यांशी आमचं कसलंही वैर नाही. केवळ तुम्ही पोलीस असल्याचा संशय असल्यानेच सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्हाला देहदंड देण्याचे मी ठरवले होते. तुम्ही आता या बाजूने सरळ चालत जा. सुमारे दोन तास चालल्यावर तुम्हाला उतनूर कडे जाणारा रस्ता सापडेल..”
पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी निमूटपणे त्यांनी दाखविलेल्या दिशेने निघालो. बिक्षुपतीचे साधे आभार मानण्याचेही धैर्य आणि त्राण माझ्यात उरले नव्हते. माझ्या अंगावर फक्त अंडरवेअर होती. त्या निर्मनुष्य जंगलात एखाद्या वनमाणसा सारखा वाट काढीत मी चाललो होतो. वाटेत एका उध्वस्त झोपडी समोर वाळत टाकलेलं फाटक मळकं धोतर काढून घेऊन मी ते कमरेला गुंडाळून घेतलं.
काल पासून पोटात अन्नाचा कण ही नसल्याने मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे चालताना अनेकदा सावली पाहून तिथे थांबून मी विश्रांती घेत होतो. अशा प्रकारे कशीबशी मजल दर मजल करीत अगदी विरुद्ध दिशेने एकदाचा मी उतनूर गावात प्रवेश केला.”
रेड्डी साहेबांचे बोलणे संपले. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच ते या जिवावरच्या संकटातून बचावले होते.
बिक्षुपती हा नक्षल्यांप्रमाणेच पोलिसांचा ही खबऱ्या होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध काहीच कारवाई केली नाही.
या घटने नंतर ग्रामीण बँकेच्या मॅनेजमेंटने रेड्डी साहेबांची ताबडतोब अन्यत्र बदली केली. परंतु रेड्डी साहेबांनी नम्रपणे ही बदली नाकारली आणि आपल्याला उतनूरलाच राहू द्यावे अशी वरिष्ठांना विनंती केली. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व शाखेची प्रगती करण्यासाठी आपले उतनूरला राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी वरिष्ठांना पटवून दिले. विशेष म्हणजे रेड्डी साहेबांच्या पत्नीनेही आपल्या पतीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.
असे हे कर्तव्यनिष्ठ राजकुमार रेड्डी साहेब पुढे ग्रामीण बँकेचे जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले.
(क्रमश:)
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही सेवा केली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.