https://goodworld.in A website by Madhav Bhope

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

 

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (४-अ)*

उतनूर पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असलेलं शामपूर हे गाव मुख्य रस्त्याला अगदी लागून वसलेलं होतं. गावातील बराचसा भूभाग हा सपाट, जंगल विरहित व छान मोकळा मोकळा होता. त्यामुळे त्या गावात अनेक पक्की घरं होती तसंच रस्ते, नाल्या, पथ दिवे, पोस्ट ऑफिस अशा त्या परिसरातील अन्य गावात सहसा न आढळणाऱ्या सोयीही त्या गावात होत्या. आसपासच्या खेड्यांतील प्रवाशांनी तेथील बस स्टँड सदैव गजबजलेलं दिसायचं. बस स्टँड जवळच आठवडी बाजारही भरत असे.

उतनूर आदीलाबाद रस्त्यावरील उतनूर पासून दहा किलोमीटर दूर असलेल्या इंद्रवेल्ली गावापर्यंतचा भाग आमच्या शाखेच्या कार्यक्षेत्रात येत होता. इंद्रवेल्ली हे मंडल क्षेत्र (तालुका) असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर बँकेचा बोजा नोंदविण्यासाठी तेथील रेव्हेन्यू कार्यालयात वेळोवेळी जावे लागत असे. इंद्रवेल्लीस जातेवेळी शामपूर गावा वरूनच जावं लागायचं.

तसं पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामीण बँकेची शाखा उघडल्यापासून शामपूर गावात आमच्या स्टेट बँकेचा कुठलाही चालू फायनान्स नव्हता. त्यामुळे शामपूर गावात आवर्जून जाण्याचं कधी काम पडलं नाही. तरी देखील तेथील बस स्टँड जवळील ओळीने सलग पंधरा सोळा दुकानं असलेलं एक व्यापारी संकुल जाता येताना नेहमीच लक्ष वेधून घेत असे. “दामोदर बाजार” असं नाव असलेला तो शॉपिंग कॉम्प्लेक्स गावातील कुणा धनाढ्य व्यक्तीचा असावा असाच माझा समज होता. damodar bazaar

गेले काही दिवस आमच्या बँकेत जुनी थकीत कर्जे वसूल करण्याची जोरदार मोहीम सुरू झाली होती. सुदैवाने आमच्या शाखेत अशी जुनी थकीत कर्जे फारशी नव्हती. मात्र बुडीत कर्जाच्या यादीत तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांचं एकच मोठं जुनं खातं दिसत होतं. ते ट्रॅक्टर लोन होतं. मी त्या खात्याबद्दल माहिती काढण्यास सुरवात केली. आधी, सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच्या त्या कर्जखात्याची कागदपत्रे शोधून काढली. इंद्रवेल्ली इथं राहणाऱ्या कुणा “के. जनार्दन” नावाच्या संपन्न शेतकऱ्याने ट्रॅक्टर व ट्रॉली साठी दीड लाख रुपयांचं कर्ज आमच्या बँकेकडून घेतलेलं दिसत होतं.tractor-1

लोन डॉक्युमेंट्स वर कर्जदाराचा जो फोटो होता त्यावरून हा के. जनार्दन म्हणजे कोट, टाय, हॅट परिधान करणारी आणि बिन दाढीमिशांचा गुळगुळीत चेहरा असलेली पक्की सुटाबुटातली शहरी व्यक्ती वाटत होती.

k janardan

त्या व्यक्तीने बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेऊन “मॅसी फर्ग्युसन” कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली यांची खरेदी केली असल्याचेही कोटेशन व बिलांवरून दिसत होते. प्रामुख्याने शेती तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची आदीलाबादच्या मोंढ्यात वाहतूक करणे हाच कर्जदाराचा मुख्य व्यवसाय होता. इंद्रवेल्ली व आसपासच्या गावात असलेली आपली पंचावन्न एकर जमीन या कर्जासाठी त्याने बँकेला तारण दिली होती. कर्ज कागदपत्रांच्या फाईल वर मोठ्या लाल अक्षरात “Borrower absconding” असं लिहिलेलं होतं.

इंस्पेक्शन रजिस्टर वरील नोंदी नुसार असं दिसतं होतं की कर्ज घेतल्या नंतर अवघ्या दोनच महिन्यांनी कर्जदार इंद्रवेल्ली गाव सोडून अन्य कुठेतरी निघून गेला होता. बँकेत उपलब्ध कागदपत्रांवरून कर्जदाराची फारशी माहिती न मिळाल्याने आता शाखेतील कर्मचाऱ्यांकडूनच काही माहिती मिळते का ते पहावे असा विचार केला. दुर्दैवाने उतनूर शाखेतील एक जुना हेड गार्ड वगळता अन्य शाखेतील सर्वच कर्मचारी फार तर चार पाच वर्षं इतकेच जुने होते. त्यांना कुणालाच या “के.जनार्दन” बद्दल कसलीही माहिती नव्हती.

हेड गार्ड सूर्यपाल स्वामी येत्या सहा महिन्यांतच सेवानिवृत्त होणार होता. त्याला ट्रॅक्टर लोन वाल्या के. जनार्दन बद्दल काहीतरी अंधुकसं आठवत होतं. ट्रॅक्टर घेतल्या घेतल्या या के. जनार्दन वर कुठलं तरी जबरदस्त संकट ओढवलं, त्यात त्याच्या आयुष्याची ट्रॅजेडी झाली आणि त्यानंतर हा कर्जदार ट्रॅक्टर सहित बेपत्ता झाला होता. चार पाच वर्षे वाट पाहून बँकेने ते कर्ज खाते प्रतिवादीत कर्जे खात्यास (Protested Bills A/c) वर्ग केलं होतं.

खूप प्रयत्न करूनही या के. जनार्दन चा सध्याचा ठावठिकाणा कोणता आहे ? या बद्दल पत्ता लागू शकला नाही. बँकेकडे तारण असलेल्या जमिनीच्या कागदपत्रांवरून वेगवेगळ्या गावांमध्ये या के.जनार्दन च्या नावाने सुमारे पंचावन्न एकर एवढी जमीन असल्याचे दिसत होते. त्यापैकी पंधरा एकर जमीन इंद्रवेल्ली गावात असल्याने तसेच कर्जदाराचा पत्ताही इंद्रवेल्ली गावातीलच दिला असल्याने मी प्रथम इंद्रवेल्ली गावात जाऊन दिलेल्या पत्त्याच्या ठिकाणी चौकशी केली. तेंव्हा, खूप वर्षांपूर्वीच आपले इंद्रवेल्लीचे राहते घर व शेती विकून के. जनार्दन आदीलाबाद येथे शिफ्ट झाल्याचे तेथील रहिवाशांकडून समजले.

बँकेकडे तारण असलेली जमीन कर्जदाराने परस्पर कशी काय विकली ? याबद्दल आश्चर्य वाटलं आणि मनस्वी चीडही आली. के. जनार्दनचं जमिनीचं “पट्टा पासबुक” घेऊन मी इंद्रवेल्ली मंडल रेव्हेन्यू ऑफिसर (MRO) कडे जाऊन धडकलो. मात्र तिथल्या लॅंड रेकॉर्ड मध्ये या के. जनार्दनच्या जमिनीवर आमच्या बँकेच्या कुठल्याही बोजाची नोंदच नव्हती. “निदान आता तरी उर्वरित जमिनीवर बँकेचा बोजा नोंदवा..” असा कार्यालयात अर्ज दिला. त्यावर “तुम्ही दहा दिवसांनी भेटा..” असं संबंधित अधिकारी म्हणाला. तिथल्या अनागोंदी कारभारावर चरफडतच निराश मनानं उतनूरला परतलो.

एरवी सदैव माझ्या सोबत राहणारा माझा वाटाड्या, माझा दुभाषी.. प्युन रमेश हा आजारी पडल्यामुळे गेले काही दिवस बँकेत गैरहजर होता. बेपत्ता के. जनार्दन चा शोध लावण्यात त्याची नक्कीच मदत होईल असा माझा विश्वास होता. त्यामुळे तो कामावर पुन्हा रुजू होण्याची मी आतुरतेनं वाट पहात होतो. अखेरीस तब्बल वीस दिवसांची विश्रांती घेऊन ताजातवाना होऊन रमेश ड्युटीवर हजर होताच अधिरपणे त्याला ट्रॅक्टर लोन वाल्या के. जनार्दन बद्दल विचारलं.

“के. जनार्दन..? ट्रॅक्टर लोन..?”

स्मरणशक्तीला ताण देत नकारार्थी मान हलवीत रमेश म्हणाला.. “नही साब.. पिछले आठ सालोंमें आज तक किसी भी मैनेजर ने या फिल्ड ऑफिसरने इस नाम के किसी भी आदमी का कभी जिक्र नही किया..”

रमेशचं हे उत्तर ऐकून माझा अपेक्षाभंग झाला. माझ्या खिन्न चेहऱ्याकडे पहात रमेश म्हणाला..

“लेकिन.. एक दूसरे “जनार्दन” को मै अच्छी तरह जानता हूं.. यहां पास ही में.. शामपुर में रहता है.. बहुत खतरनाक आदमी है.. गांव में किसी से मेलजोल नही रखता.. बात भी कम करता है.. सब लोग डरते है उस से.. हो सकता है, अन्ना (नक्षली) लोगोंका आदमी हो.. या वो खुद ही कोई शरण आकर सुधरा हुआ रिटायर्ड नक्सली अन्ना हो.. पता नही..”

रमेशचं या जनार्दन बद्दल चांगलं मत दिसत नव्हतं. तरी देखील आणखी एक प्रयत्न करून पहावा म्हणून रमेशला विचारलं..

“क्या हम मिल सकते है इस शामपुर वाले जनार्दन से ? शायद उसे के. जनार्दन के बारेमे कुछ मालूमात हो..”

काहीशा अनिच्छेनंच खोल उसासा सोडत रमेश म्हणाला..

“ठीक है..! आप कहते है तो आज ही शाम को मिलेंगे उन से..! वैसे भी अपने जनरेटर का पेट्रोल खतम होने को आया है.. नागापुर पेट्रोल बंक पर भी स्टॉक नही है.. अब तो शामपुर से ही पेट्रोल लाना पड़ेगा..”

संध्याकाळी पेट्रोलच्या रिकाम्या कॅन घेऊन आम्ही शामपुर कडे निघालो. “दामोदर बाजार” कॉम्प्लेक्स जवळ येताच रमेशने त्या ओळीनं बांधलेल्या पंधरा सोळा दुकानांच्या मधोमध असलेल्या एका अरुंद बोळीत गाडी घातली. कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस एक जुनाट, दगडी, प्रशस्त वाडा होता. रमेशने त्या वाड्याच्या भक्कम लाकडी दरवाजाची कडी वाजवली.

“कोण..?”

आतून तेलगू भाषेत करड्या आवाजात विचारणा झाली..

“मी.. रमेश.. स्टेट बँक..”

रमेशनं थोडक्यात आपला परिचय दिला. थोड्या वेळानं एका गंभीर, करारी मुद्रेच्या उंच माणसानं दार उघडलं. धारदार नाक, कपाळाला लाल-काळा गंध बुक्का, डोक्यावर कडक इस्त्रीची टोकदार पांढरी गांधी टोपी, किंचित मग्रूर, तुसडी, क्रूर नजर, पांढरं शुभ्र धोतर आणि टेरिलीनचा चमचमता व्हाईट ओपन शर्ट अशा वर्णनाची ती व्यक्ती एखाद्या राजकीय पुढाऱ्या सारखी दिसत होती. लांब, गालापर्यंत वाढलेले केसांचे दाट कल्ले, तलवार कट टोकदार मिशा आणि फक्त हनुवटी पुरतीच ठेवलेली छोटीशी फ्रेंच कट दाढी त्या व्यक्तीच्या एकंदर ग्रामीण पेहरावाला किंचित विसंगत वाटत असली तरी त्या लांब कल्ले व दाढी मिशांमुळेच ते व्यक्तिमत्व अधिकच गूढ, करारी भासत होते. image of janardan

त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील “काय काम आहे..?” अर्थाचे त्रासिक, प्रश्नार्थक भाव पाहून रमेश माझ्याकडे बोट दाखवत तेलगू भाषेत लगबगीनं म्हणाला..

“हे आमच्या बँकेचे नवीन फिल्ड ऑफिसर साहेब.. महाराष्ट्रातून आले आहेत.. त्यांना तुमच्याकडून काही माहिती हवी आहे..”

मला आपादमस्तक न्याहाळून झाल्यावर मागे वळत तो धोतर टोपीधारी गृहस्थ तेलगू भाषेतच म्हणाला..

“आत या..!”

आम्हाला दिवाणखान्यात बसवून तो गृहस्थ आत निघून गेला. जुनाट लाकडी माळवदाचं छत असलेल्या त्या दिवाणखान्यात लावलेल्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या काचेच्या फ्रेम मधील मोठ्या आकाराच्या फोटोंनी माझं लक्ष वेधून घेतलं. शेजारीच पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांची ही छायाचित्रे टांगली होती. एका कोनाड्यात विठ्ठल रखुमाईंच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्या मूर्तींसमोर एक निरंजन तेवत होतं. कोनाड्याच्या वरती भरजरी पोशाखातील अंदाजे चौदा पंधरा वर्षाच्या मुलाचा ऐटीत खुर्चीत बसलेला फोटो होता. त्या फोटोला नुकताच ताज्या फुलांचा हार घातलेला दिसत होता. फोटो शेजारी लावलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध दिवाणखान्यात दरवळत होता.

“हे नक्कीच कुणा मराठी माणसाचं घर असलं पाहिजे..!” मी मनातल्या मनात अंदाज बांधला.

इतक्यात डोक्यावर पदर घेतलेली अस्सल मराठमोळ्या पद्धतीचं लुगडं नेसलेली एक घरंदाज सोज्वळ स्त्री हातात तांब्या भांडं घेऊन दिवाणखान्यात आली. तिचा चेहरा उदास वाटत होता. आम्हाला पाणी देऊन काही न बोलता ती आत निघून गेली. ती गेल्यावर जनार्दन भाऊ तेलगू भाषेत म्हणाले..

“हं.. बोला..! कसली माहिती हवी आहे तुम्हाला..?”

त्यावर नीट सरसावून बसत रमेश म्हणाला..

“के. जनार्दन या नावाच्या इंद्रवेल्ली इथं राहणाऱ्या कुणा माणसाला तुम्ही ओळखता का ? खूप वर्षांपूर्वी आमच्या बँकेकडून त्या माणसानं ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतलं होतं. अजूनही ते कर्ज तसंच बाकी आहे आणि तो माणूस इंद्रवेल्ली गाव सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून गेला आहे..”

रमेशने एका दमात सर्व सांगून टाकलं. जनार्दन भाऊंनी काही तरी आठवायचा प्रयत्न केला. डोकं खाजवीत ते म्हणाले..

“के. जनार्दन..? इंद्रवेल्ली..? अं..हं..! मी तर पहिल्यांदाच हे नाव ऐकतोय..”

नंतर थोडा वेळ खाली मान घालून हनुवटी वरील मुठभर दाढीचा पुंजका कुरवाळीत ते विचार करत बसले. मग नकारार्थी मान हलवत ठामपणे ते म्हणाले..

“नाही..! या नावाच्या कोणत्याही व्यक्तीबद्दल मला कसलीही माहिती नाही..! मी इथे शामपुरला आठ वर्षांपूर्वी आलो. त्यापूर्वी बरीच वर्षं मी आदिलाबाद इथं होतो. इंद्रवेल्ली गावात जायचं कधीच काही काम पडत नसल्यामुळे तेथील रहिवाशांबद्दल मला फारशी माहिती नाही..”

तोपर्यंत आतून आमच्यासाठी चहा आला होता. चहा पिऊन जनार्दन भाऊंचे आभार मानून आम्ही निघालो. परत जाताना वाटेत रमेश म्हणाला..

“हा जनार्दन खूप खडूस माणूस आहे. गेली पाच वर्षे मी ह्याच्याच दुकानातून बँकेच्या मोटारसायकल साठी व जनरेटर साठी भरपूर पेट्रोल खरेदी करतोय. मात्र पूर्वी एकदा आदीलाबादहून उतनूरला येतेवेळी रात्रीच्या वेळी माझी गाडी शामपुर जवळ बंद पडली होती. त्यावेळी मी या जनार्दनला त्याची मोटार सायकल फक्त रात्रीपुरती मागितली होती. एवढी ओळख असून आणि वारंवार विनंती करूनही जनार्दनने मला गाडी देण्यास त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता. तेंव्हा पासून हा जनार्दन माझ्या मनातून साफ उतरलाय. तुम्हाला कसा वाटला हा माणूस..?”

“मला, हा माणूस आपल्यापासून काही तरी लपवतोय असंच जाणवत होतं..” मी म्हणालो.

“कशावरून..?” रमेशने आश्चर्यानं विचारलं.

“एक तर हा माणूस त्याच्या व त्याच्या पत्नीच्या पेहरावा वरून तसंच त्याच्या घराच्या ठेवणी वरून पक्का मराठी माणूस वाटत होता. मी महाराष्ट्रातील आहे हे कळूनही त्याने माझ्याशी मराठी बोलणं कटाक्षानं टाळलं. आपलं सर्व संभाषण तेलगू भाषेतच झालं. तेंव्हाच मला संशय आला..”

माझं हे बोलणं रमेशला अजिबात पटलं नाही. “धोतर, लुगडं हा इथलाच पेहराव आहे आणि विठ्ठल रखुमाई हे आंध्र व कर्नाटकाच्या सीमेवरील बहुसंख्य लोकांचे दैवत असल्यामुळे त्यांच्या मूर्ती, फोटो येथील घरोघरी आढळतात.. ” असे तो म्हणाला. आदीलाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील बरीच गावे पूर्वी महाराष्ट्रात होती. त्यामुळे येथील अनेक जुन्या घरांत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे दिसून येतात, अशीही माहिती त्याने पुरवली.

दहा दिवसांनंतर वेळात वेळ काढून सकाळी एकटाच इंद्रवेल्लीच्या मंडल रेव्हेन्यू ऑफिस मध्ये गेलो आणि के. जनार्दनच्या जमिनीवर बँकेचा बोजा (चार्ज) नोंदविला की नाही याची चौकशी केली. त्यावर तेथील संबंधित कर्मचारी म्हणाला..

“गेल्या आठवड्यातच के. जनार्दन स्वतःच इथे आले होते. आपण कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले नसून स्टेट बँकेचा काहीतरी गैरसमज झाला आहे असे ते म्हणाले. जमिनीवर बोजा नोंदविण्यास त्यांनी विरोध दर्शवला आणि तसे लेखी पत्रही त्यांनी आमच्या ऑफिसला दिले आहे.”

हा के. जनार्दन भलताच चलाख दिसत होता. MRO ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना देखील त्याने पटवलं असावं. MRO ऑफिसला दिलेल्या पत्रावर कुठेही त्याने आपला पत्ता किंवा फोन नंबर दिलेला नव्हता. मात्र हा के. जनार्दन जवळपासच कुठेतरी रहात असावा आणि इंद्रवेल्ली गावातील लोक त्याच्या नियमित संपर्कात असावेत हा माझा संशय आता पक्का झाला. निराश होऊन इंद्रवेल्लीहून परततांना शामपुर जवळ आल्यावर अचानक काहीतरी मनात आलं आणि “दामोदर बाजार” जवळ मी मोटरसायकल उभी केली. तेथून पायीच जात जनार्दन भाऊंच्या वाड्यासमोर उभा राहून दाराची कडी वाजवली.

“यवरू..?” (कोण ?) अशी आतून बायकी आवाजात तेलगू भाषेत विचारणा झाली.

“मी.. गंगाराम ! नागापूर पेट्रोल बंक वाला.. जनार्दन भाऊ आहेत का ?”

मी विचारपूर्वक आणि आवर्जून “मराठी” भाषेत धडधडीत खोटं बोललो. जवळच्या नागापूर पेट्रोल बंक वर गंगाराम नावाचा एक मराठी बोलणारा कर्मचारी असल्याचे मला माहिती होते. या गंगाराम कडूनच जनार्दन भाऊ किरकोळ विक्रीसाठी पेट्रोलचे बॅरल मागवीत असत.

काही क्षण आतून काहीच प्रत्युत्तर मिळालं नाही. बहुदा आतील स्त्रीला काहीतरी संशय आला असावा. थोड्यावेळाने ती स्त्री “मराठीत” म्हणाली..

“ते परगावी गेलेत. दुपारी चार पर्यंत परत येतील..”

माझं काम झालं होतं. मी फेकलेला खडा अचूक लागला होता. हे घर मराठी माणसाचं असल्याचा माझा अंदाज खरा ठरला होता.

“ठीक आहे.. मी पाच वाजता येतो..”

असं बोलून मागं फिरून झपाझप पावलं टाकीत मी बाहेर ठेवलेल्या मोटारसायकल जवळ आलो. मी मागं फिरल्यावर आतील स्त्री ने दरवाजा उघडल्याच्या आवाज माझ्या कानावर पडला. कदाचित मी गंगारामच आहे किंवा नाही याची तिला खात्री करून घ्यायची असावी.

दुपारी पाच वाजता पुन्हा जनार्दन भाऊंच्या घरी गेलो. स्वतः जनार्दन भाऊंनीच दार उघडलं आणि मला पाहतांच मराठीत “या..!” असं म्हणाले. आम्ही दिवाणखान्यात जाऊन बसल्यावर मी म्हणालो..

“काही पत्ता लागला का त्या के. जनार्दन नावाच्या माणसाचा..?”

“नाही..! मात्र काही वर्षांपूर्वी इंद्रवेल्लीची जमीन व घर विकून ते कुटुंबासह आदीलाबादला गेले एवढं समजलं. तुम्ही आदीलाबादला जाऊन चौकशी केली तर कदाचित त्यांचा काहीतरी ठावठिकाणा कळू शकेल..”

एवढं बोलून माझ्याकडे रोखून पहात ते म्हणाले..

“सकाळी ‘नागापूरचा गंगाराम’ असं नाव सांगून तुम्हीच घरी आला होतात ना ? हा गंगाराम तोतरा असून किंचित अडखळत बोलतो. त्यामुळे तुम्ही गंगाराम नाहीत, हे माझ्या बायकोने लगेच ओळखलं होतं. तुम्ही असं खोटं का बोललात ?”

जनार्दन भाऊंनी विचारलेल्या या थेट प्रश्नाने मी गडबडून गेलो. खोटं बोलल्याबद्दल ते मला असा आमने सामने रोखठोकपणे जाब विचारतील याची मी कल्पनाच केलेली नव्हती. आता काय उत्तर द्यावे हे क्षणभर मला सुचेचना.. कसंबसं स्वतःला सावरून घेत कसंनुसं हसत म्हणालो..

“गेल्या वेळी प्युन रमेश सोबत तुमच्याकडे आलो होतो तेंव्हा, मी महाराष्ट्रातून आल्याचं कळूनही तुम्ही आमच्याशी कटाक्षानं तेलगू भाषेतच बोललात. तुम्ही घरी मराठीच बोलत असावात असा माझा अंदाज होता. केवळ त्याची खातरजमा करण्यासाठीच तुमच्या पत्नीशी आज सकाळी मी खोटं बोललो. त्यात माझा अन्य कोणताही वाईट, विपरीत हेतू नव्हता..”

माझ्या ह्या उत्तराने जनार्दन भाऊंचं अजिबात समाधान झालं नाही. रागानं तीक्ष्ण स्वरात ते म्हणाले..

“कुणाशी कोणत्या भाषेत बोलावं हा सर्वस्वी माझ्या मर्जीचा प्रश्न आहे. आणि, मी मराठी आहे किंवा नाही, हे तुम्ही खुद्द मला सरळ सरळ विचारू शकला असतात. त्यासाठी माझ्या घरच्यांशी असं खोटं बोलायची गरज नव्हती. मला हे मुळीच आवडलेलं नाही. माझी पत्नी हळव्या स्वभावाची असून हार्ट पेशंट आहे. त्यातून आधीच ती खूप दुःखी आहे. तुमच्या असं खोटं बोलण्यामुळे तिच्या मनात नाना शंका कुशंका येऊन ती घाबरून गेली आहे. तुमच्यासारख्या नवख्या, अनोळखी माणसाकडून यापुढे असलं कुठलं ही पोरकट, बेजबाबदार गैरकृत्य मी खपवून घेणार नाही..”

त्वेषानं बोलता बोलता जनार्दन भाऊंच्या नाकपुड्या संतापानं थरथरू लागल्या. अपराध्यासारखा खाली मान घालून मी निमूटपणे त्यांचे निर्भत्सनेचे कठोर बोल ऐकून घेत होतो. एवढ्यात बाहेरून कुणीतरी जनार्दन भाऊंना हाक मारली आणि त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी भाऊ वाड्याबाहेर गेले. थोडावेळ अस्वस्थपणे चुळबुळत मी जागीच बसून राहिलो आणि नंतर वेळ घालवण्यासाठी दिवाणखान्यात लावलेले भाऊंचे जुने फॅमिली फोटो पाहू लागलो.

थोड्यावेळाने जनार्दन भाऊ वाड्यात परत आल्यावर त्यांच्या नजरेला नजर न देता त्यांचा निरोप घेऊन एखाद्या चोरासारखा, खाल मानेनं वाड्यातून बाहेर पडलो.

(क्रमशः 4-ब)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading