Memories-at-Utnoor
लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*उतनूरचे दिवस…*
*थरार… (४-ब)*
त्यानंतर आठवडाभर मी खिन्न, बेचैन होतो. जनार्दन भाऊंनी मला सुनावलेले कठोर बोल आठवले की आत्मग्लानीने मन विषादाने भरून जाई. माझी ही तगमग, तळमळ आमच्या मॅनेजर साहेबांनी ओळखली. सध्या मी के. जनार्दनचा छडा लावण्यात गुंग आहे याची त्यांना कल्पना होती. एक दिवस माझ्याजवळ येऊन ते म्हणाले..
“तुम्ही त्या के. जनार्दनचा माग काढण्यात एवढे डीपली ईनव्हॉल्व्ह होऊ नका. पंधरा वर्षे एवढ्या प्रदीर्घ काळापासून ती व्यक्ती बेपत्ता आहे. बँकेचं कर्ज फेडण्याची त्या व्यक्तीची मानसिकता नाही हे तर उघडच आहे. त्यातून हे आदिवासी क्षेत्र असून इथे एजन्सी ऍक्ट लागू आहे. त्यानुसार येथे फक्त आदिवासी, अनुसूचित जमातीची व्यक्तीच जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करू शकते. त्यामुळे कर्जदाराने बँकेकडे तारण ठेवलेली जमीन जप्त करून विकणे ही खूपच किचकट प्रक्रिया आहे. आता इतक्या वर्षांनंतर यदाकदाचित त्या के. जनार्दनचा शोध जरी लागला तरी त्याच्याकडून बँकेचे कर्ज वसूल होण्याची काडीमात्र शक्यता नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या के.जनार्दनचा नाद आता सोडून द्यावा.”
मॅनेजर साहेबांच्या बोलण्यात तथ्य होतं. त्यामुळे के. जनार्दनचा शोध घेणं थांबवून मी अन्य कामांत बिझी झालो.
त्याच सुमारास बँकेच्या “वसुली अभियान (Recovery Campaign)” स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. मेट्रो, अर्बन व रूरल/सेमीअर्बन असे शाखांचे तीन गट केले होते. आमची शाखा रूरल/सेमीअर्बन गटात येत होती. त्या गटातून आमच्या शाखेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यामुळे सर्वत्र आमचे अभिनंदन होत होते. या सर्व कौतुकात के. जनार्दनला मी जवळजवळ विसरूनच गेलो होतो.
त्याच सुमारास उतनूर आदीलाबाद रोड वरील इंद्रवेल्ली पासून सुमारे तीस किलोमीटर दूर असलेल्या “इच्चोडा” गावातील शाखेत आठ दिवसांसाठी मला डेप्युटेशन वर जावे लागले. या काळात माझ्या मोटारसायकलनेच मी इच्चोडा इथं जाणं येणं करीत असे. इंद्रवेल्ली गावा बाहेरील मुख्य रस्त्यापासून फक्त शे-दीडशे फूट दूर असलेला लाल भडक रंगाचा एक स्मृती-स्तंभ जाता येताना माझ्या दृष्टीस पडत असे. स्तंभाच्या वरच्या टोकाला लोखंडी गोलाकार फ्रेम मधील मार्क्स-लेनिन वादी कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह “कोयता-हातोडा” दुरुनही दिसत असे.
एकदा कुतूहलवश रस्त्यावर मोटारसायकल उभी करून स्तंभा जवळ गेलो. पायथ्याच्या सात आठ पायऱ्या चढून स्तंभाचे जवळून निरीक्षण करू लागलो. स्तंभाच्या आसपास बरीच ओसाड, मोकळी जागा होती. स्तंभाच्या खालच्या बाजूस एका संगमरवरी फलकावर ठळक इंग्रजीत “PEOPLE’S HEROES ARE IMMORTAL” असं लिहून त्याखाली तेलगू आणि हिंदी भाषेत *”प्रजावीर मृत्युंजय”* असं कोरलं होतं. त्याच्या खाली इंग्रजीत चार ओळी लिहिल्या होत्या.
मी खाली वाकून त्या ओळी वाचत असतानाच अचानक कुठूनतरी चार पाच आदिवासी तरुण तिथे आले आणि त्यांनी मला हटकले. मी बँक कर्मचारी असल्याचे सांगताच त्यांनी मला ताबडतोब तिथून निघून जाण्यास सांगितले आणि ते स्वतः सुद्धा वेगवेगळ्या दिशांना पांगून लगेच दिसेनासे झाले.
त्या आदिवासी तरुणांच्या सांगण्यानुसार स्तंभाच्या पायऱ्या उतरून रस्त्यावरील मोटारसायकल कडे जात असतानाच पोलिसांची एक जीप माझ्याजवळ येऊन थांबली. “तुम्ही कोण आहात आणि इथे कशाला थांबला आहात ?” असं दरडावून विचारत त्यांनी माझी कसून चौकशी केली आणि माझं ओळ्खपत्रही मागितलं. मी महाराष्ट्रातून इथे नोकरीसाठी आलेला स्टेट बँकेचा अधिकारी असल्याची खात्री होतांच त्यांच्यापैकी एकजण मला मराठीतून म्हणाला..
“साहेब, असा उगीच आपला जीव धोक्यात कशाला घालता ? या जागेच्या आसपास येणाऱ्या प्रत्येकाकडे नक्षली हेरांचे आणि आम्हा पोलिसांचे बारकाईने लक्ष असते. ही अतिशय संवेदनशील जागा आहे. भीतीमुळे लोक या स्तंभाकडे नुसतं पाहणंही टाळतात. तुम्ही देखील या पुढे अशी इथं थांबण्याची चूक करू नका..”
माझ्या अज्ञानाबद्दल पोलिसांकडे दिलगिरी व्यक्त करून कशीबशी तेथून सुटका करून घेतली.
त्यानंतर उतनूरच्या गावकऱ्यांकडे इंद्रवेल्लीच्या स्तंभा बाबत चौकशी केली असता खालील रोमांचक, रक्तरंजित कहाणी समजली..
ज्या घटनेच्या स्मृत्यर्थ हा स्तंभ उभारण्यात आला होता त्या घटनेची “इंद्रवेल्ली हत्याकांड” (Indravelli massacre) म्हणून इतिहासात नोंद असून 20 एप्रिल 1981 रोजी ही अमानुष, दुर्दैवी घटना घडली.
या दिवशी इंद्रवेल्ली इथे “गिरीजन रयतु कुली संघम” नावाच्या भारतीय कम्युनिस्ट (मा.ले.) पक्षाच्या एका संघटनेतर्फे आदिवासी गोंड समाजाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. आदिवासींना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काचे “पट्टाधारी पासबुक” देण्यात यावे तसेच बिगर आदिवासींच्या वाढत्या अतिक्रमणास पायबंद घालावा या मागण्यांसाठीच हा मेळावा होता. सुरवातीला पोलिसांनी या मेळाव्यास रीतसर परवानगी दिली होती. मात्र नंतर नक्षली उद्रेकाच्या भीतीने ऐनवेळी त्यांनी ही परवानगी रद्द केली. अर्थात मेळाव्यासाठी जमलेल्या आदिवासींना याची कल्पनाच नव्हती. त्याच दिवशी इंद्रवेल्लीचा आठवडी बाजारही होता.
या मेळाव्यास जमलेल्या आदिवासींवर तसेच बाजारासाठी आलेल्या लोकांना घेरून पोलिसांनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. सरकारी अहवालानुसार जमावाने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे 5 पोलीस अधिकारी व 30 शिपाई यांनी स्वसंरक्षणात्मक प्रतिकारार्थ गोळीबार केला, ज्यात 9 जण जखमी झाले तर 13 जण मृत्युमुखी पडले. मात्र नागरी स्वातंत्र्य आयोगाने केलेल्या निःपक्षपाती चौकशीतून असे आढळून आले की घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांची संख्या प्रत्यक्षात खूपच जास्त होती. तसेच फार मोठ्या संख्येने आदीलाबाद जिल्ह्यातील पोलिसांना आदल्या दिवशीच इंद्रवेल्ली इथे पाठविण्यात आले होते.
पोलिसांच्या पाच तुकड्या (Platoons) आदल्या रात्रीसच इंद्रवेल्लीच्या हायस्कुलात येऊन थांबल्या होत्या. त्यांनी रात्रीच गावातील घरोघरी जाऊन संपूर्ण परिसरात जमावबंदीचे कलम 144 लागू केल्याचे लोकांना कळविले. दुसऱ्या दिवशी मेळाव्यासाठी गावात येणाऱ्या आदिवासींना त्यांनी बाहेरच रोखले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. पळून जाणाऱ्या आदिवासींच्या अंगावर पोलिसांनी जीप गाड्या घालून त्यांना चिरडलं तर जीपमधील शिपायांनी अतिशय जवळून (point blank range) त्यांना गोळ्या घातल्या.
बरेचसे आदिवासी घाबरून जंगलात पळून गेले. मात्र तिथेही झाडांआड आधीच पोलीस (Snipers) बंदुकीचा नेम धरून लपून बसले होते. त्यांनी या बेसावध आदिवासींना अचूक टिपले. त्या दिवशी गावातील सर्व शाळा, दुकानं आणि कार्यालयं बंद करवून पोलिसांनी संपूर्ण गावाला वेढा घातला होता. प्रत्यक्षदर्शींनुसार गोळीबारानंतर आदिवासींची किमान साठ प्रेतं गावात इतस्ततः पडली होती. तसेच शंभरहून जास्त जखमींना आसपासच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यापैकी बरेच जण नंतर मरण पावले.
त्यावेळी राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार होते. अनेक प्रत्यक्षदर्शी काँग्रेस कार्यकर्त्यांनी असे नमूद केले आहे की इंद्रवेल्ली गावातील गोंड आदिवासींचे साठ पेक्षा जास्त मृतदेह पोलिसांनी आदीलाबादला नेऊन गुप्तपणे जाळून टाकले. तसेच गंभीर जखमी आदिवासींचे देह एकावर एक रचून दोन मोठ्या व्हॅन मधून त्यांना आदीलाबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यापैकी अनेकजण वाटेतच मरण पावले तर काही जणांनी नंतर प्राण सोडला.
पळून जाणाऱ्या वेगवेगळ्या गावांतील ज्या आदिवासींना पोलिसांनी पाठलाग करून गोळ्यांनी उडवले त्यांचे मृतदेह त्या त्या गावातील रस्त्याच्या कडेला कित्येक दिवस बेवारसपणे पडून होते. उतनूर (30 ते 40), ईच्चोडा (25), मुथनूर (30) अशी प्रत्यक्षदर्शींनुसार अशा बेवारस मृतांची संख्या होती. या व्यतिरिक्त खोल जंगलात मरण पावलेल्या आदिवासींचे मृतदेह त्यानंतरही अनेक दिवस सापडतच होते. आंध्र प्रदेश सिव्हिल लिबर्टीज कमिटी च्या अंदाजानुसार या हत्याकांडातील मृतांची संख्या किमान 250 इतकी होती. तर अन्य विविध गैर सरकारी नागरी संघटनांच्या मते या नरसंहारातील मृतांचा आकडा 350 ते 1000 इतका असू शकतो.
1983 साली या पोलिसी हत्याकांडातील बळीच्या स्मरणार्थ गिरीजन रयतु कुली संघम (GRCS) तर्फे इंद्रवेल्ली इथे एक स्तंभ (Pillar) उभारण्यात आला. चीन मध्ये पाहिलेल्या अशाच एका मेमोरियल पिलर वरून GRCS च्या अध्यक्षांना हा स्तंभ उभारण्याची प्रेरणा मिळाली. पुढे 1986 साली “कडेम” या गावी नक्षल्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिसांनी हा स्तंभ पाडून टाकला होता. मात्र पुढच्याच वर्षी पुन्हा नव्याने तो स्तंभ उभारण्यात आला.
इंद्रवेल्लीच्या घटने नंतर “पीपल्स वॉर ग्रुप” (PWG) ह्या सशस्त्र क्रांतिकारी बंडखोर नक्षली संघटनेत सामील होणाऱ्या आदिवासींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. पुढील काळात जेंव्हा जेंव्हा हे नक्षली बंडखोर पोलिसांवर व त्यांच्या खबऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारीत असत तेंव्हा तेंव्हा त्यांचे मृतदेह या लाल शहीद स्तंभाजवळ आणून टाकीत असत. अशारितीने एकप्रकारे इंद्रवेल्लीच्या निष्पाप हुतात्म्यांसच जणू ते श्रद्धांजली अर्पण करीत असत. त्याला प्रत्युत्तर म्हणून कधी कधी पोलीस देखील चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांचे गोळ्यांनी चाळण झालेले मृतदेह या लाल स्मृती स्तंभाच्या पायऱ्यांवर फेकून देत नक्षल्यांच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळीत असत.
इंद्रवेल्लीच्या लाल स्मारकाचा हा क्रूर, रक्तरंजित इतिहास ऐकून मी प्रचंड हादरून गेलो. त्यामुळेच, उरलेल्या दिवसांत ईच्चोड्यास जाता येताना इंद्रवेल्लीतील त्या स्तंभाकडे नुसती मान वळवून पाहण्याचे देखील मला कधी धैर्य झाले नाही.
एकदाचं माझं ईच्चोडा येथील डेप्युटेशन संपलं आणि मी उतनूर कडे जाण्यास निघालो. नेमकं इंद्रवेल्ली गावात आल्यानंतरच जोरदार पाऊस सुरू झाला आणि इच्छा नसतांना ही मला तिथे थांबावं लागलं. गावाच्या एका टोकाला असलेल्या हॉटेल समोर मोटारसायकल उभी करून मी चहाची ऑर्डर दिली. हॉटेलचा वयस्क दिसणारा मालक.. चिन्नय्या, खूपच उत्साही, बडबडा आणि चौकस होता. त्याने मी कोण, कुठून व कशासाठी आलो आहे, याबद्दल विचारपूस केली. तो स्वतः इंद्रवेल्लीच्या रेव्हेन्यू ऑफिसचा रिटायर्ड चपराशी होता.
त्याच्या तोंडून इंद्रवेल्लीच्या रेव्हेन्यू (MRO) ऑफिसचे नाव ऐकताच के. जनार्दन बद्दल चौकशी करण्याचा मोह मला आवरला नाही. चिन्नय्याला के. जनार्दन बद्दल बरीच माहिती होती. त्याने सांगितलेली माहिती थोडक्यात अशी होती…
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून आलेला सधन वंजारा कुटुंबातील हा के. जनार्दन त्याच्या ऐन तरुण वयात, 1970 च्या सुमारास इंद्रवेल्ली इथं आला. अत्यंत स्वस्त भावात त्याने या भागात भलीमोठी शेतजमीन खरेदी केली. शेती सोबतच त्याने सावकारीही सुरू केली आणि प्रचंड पैसा कमावला.
कॉलेजच्या एकदोन वर्षांपर्यंत शिकलेल्या के. जनार्दनला सूट-बूट, कोट-टाय, हॅट अशा साहेबी पेहेरावात राहण्याची सवय होती. महाराष्ट्रातील “वंजारी” व “लमाणी” जातीला आंध्र प्रदेशात “बंजारा” व “लंबाडा” या नावाने ओळखले जाते व त्यांचा समावेश “अनुसूचित जमाती” (Scheduled Tribe-ST) मध्ये केला जातो. त्यामुळेच के.जनार्दनला या भागात जमीन खरेदी करता आली.
इंद्रवेल्लीला आल्यानंतर के.जनार्दनने थोड्या बहुत शिकलेल्या महाराष्ट्रातील आपल्या सगळ्याच नातेवाईकांना इकडेच बोलावून घेतले आणि या राज्यातील ST आरक्षणाचा फायदा घेत त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. इन्द्रवेल्लीच्या MRO ऑफिसमध्येही त्याचे अनेक जवळचे नातेवाईक नोकरी करीत होते.
हळूहळू राठोड, जाधव, पवार, मुंडे, गीते अशा नावांच्या महाराष्ट्रातून आलेल्या वंजारी लोकांनी येथील आदिवासींच्या हक्काच्या जवळ जवळ सर्वच सरकारी नोकऱ्या बळकावून टाकल्या. त्याबरोबरच आंध्र प्रदेशातील श्रीमंत व शक्तिशाली रेड्डी आणि राव लोकांशी संगनमत करून आदिवासींच्या शेत जमिनींवर अतिक्रमण करण्यासही त्यांनी सुरुवात केली. साहजिकच स्थानिक आदिवासीं मध्ये या बाहेरून आलेल्या बंजारा व लंबाडा जमातीबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला. आदिवासींकडून तेंदू पत्ता, धान्य, मध, डिंक अत्यल्प दरात खरेदी करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या नफेखोरी, भांडवलदार व्यापाऱ्यांविरुद्धही त्यांच्या मनात अशीच द्वेषभावना धुमसत होती. पुढे, हा वाढत चाललेला द्वेष व असंतोषच हळूहळू नक्षलवादी चळवळीत रूपांतरित झाला.
नक्षलवादी चळवळ ही भारतातील डाव्या विचारसरणीची सशस्त्र चळवळ असून गरीब शेतमजूर, आदिवासी आणि इतर वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढत असतात. आर्थिक असमानता दूर करणे, शेतजमिनीचे पुनर्वितरण करणे, राज्य व्यवस्थेतील अन्याय व भ्रष्टाचार नष्ट करणे आणि दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देणे या त्यांच्या मागण्यांसाठी ते सशस्त्र संघर्ष करीत असतात.
के.जनार्दनने मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली शेतजमीन, सावकारीतून व धान्यखरेदीतून मिळवलेला अफाट नफा यामुळे लवकरच तो स्थानिक नक्षली नेत्यांच्या टार्गेट वर आला. याच सुमारास त्याने स्वतः साठी नवीन मोटारसायकल विकत घेतली तसेच स्टेट बँकेतून कर्ज घेऊन ट्रॅक्टर व ट्रॉली देखील खरेदी केली. नक्षल्यांनी के.जनार्दन कडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली तसेच सावकारी व्यवसाय ताबडतोब बंद करावा व फक्त पाच एकर जमीन स्वतःकडे ठेवून बाकी जमिनी वरील हक्क सोडून द्यावा असा त्यास आदेश फर्मावला.
नुकतंच इंद्रवेल्लीचं नृशंस हत्याकांड घडलं होतं. सर्वत्र पोलिसांची क्रूर दहशत पसरली होती. पोलिसांच्या विरोधाला न जुमानता काही नक्षली आदिवासींनी मोठया धाडसानं त्या हत्याकांडाच्या जागी चार पाच पायऱ्या व छोटासा तात्पुरता स्तंभ उभारून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. नक्षल्यांच्या या कृतीमुळे पोलिस क्रोधाने खवळून गेले होते. नि:शस्त्र, निरपराध आदिवासींना दिसेल तिथे अमानुष मारहाण करण्याचा, प्रसंगी गोळ्याही घालण्याचा त्यांनी सपाटाच लावला होता. पोलिसांच्या या नक्षल-सत्रामुळे घाबरून जाऊन सारे नक्षली भूमिगत झाले होते.
के. जनार्दनची पोलिसांशी घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या मागण्या त्याने साफ धुडकावून लावल्या. नक्षली नेत्यांच्या सांगण्या वरून आदिवासी मजुरांनी त्याच्या शेतात काम करण्यास नकार दिला तेंव्हा त्याने शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातून दुप्पट मजुरी देऊन शेतमजूर बोलावले. के. जनार्दनच्या या उद्धामपणा बद्दल त्याला चांगलीच अद्दल घडवण्याचा नक्षली हायकमांडने निर्णय घेतला.
1981 सालचा तो सप्टेंबर महिना होता. त्या दिवशी दुपारी बारा वाजता राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हस्ते आदीलाबाद येथे पोलिसांना सन्मान पदके प्रदान करण्यात येणार होती. उतनूर व इंद्रवेल्लीचे झाडून सारे पोलीस अधिकारी व शिपाई या कार्यक्रमासाठी सकाळीच आदीलाबादला गेले होते. हीच वेळ साधून दुपारी अकराच्या सुमारास तीस ते चाळीस सशस्त्र आदिवासी तरुणांनी के. जनार्दनच्या इंद्रवेल्ली येथील राहत्या वाड्याला वेढा घातला.
सर्व गावकऱ्यांना जमवून के. जनार्दनला हात मागे बांधून वाड्यातून खेचतच बाहेर आणण्यात आलं. त्या आदिवासी तरुणांपैकी एकदोन गणवेषधारी नक्षल्यां जवळ बंदुका होत्या तर बाकीच्यांकडे विळा, कोयता, भाले व तिरकमठे अशी परंपरागत शस्त्रे होती. भीतीने के. जनार्दन थरथरा कापत होता. त्याच्या घराकडे जाणाऱ्या टेलिफोनच्या तारा नक्षल्यांनी आधीच तोडून टाकल्या होत्या.
“ताबडतोब पाच लाख रुपये आणून दे अन्यथा मरायला तयार हो..” असा नक्षल्यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर त्यांच्यापुढे गयावया करणाऱ्या के. जनार्दनच्या पत्नीने घरातून काही रोकड रक्कम व आपले सोन्याचे दागिने त्यांना आणून दिले. त्या सर्वांची किंमत पाच लाखांपेक्षा खूप जास्त होती. त्यानंतर के. जनार्दन कडे असलेली सावकारीची सर्व कागदपत्रे बाहेर आणवून त्यांची होळी करण्यात आली तसेच त्याने गहाण ठेवून घेतलेल्या सर्व चीजवस्तू संबंधित गावकऱ्यांना परत करण्यात आल्या. अगदी चित्रपटातील डाकुंच्या दरोड्यात दाखवतात तसाच हा सर्व घटनाक्रम चाललेला होता.
एवढ्यात, गावातील कुणीतरी पोलिसांना फोन करून बातमी कळविल्यामुळे आदीलाबाद येथून जादा कुमक घेऊन पोलीस इंद्रवेल्ली कडे निघाल्याचे समजताच पैसे व दागिने गोळा करुन घाईघाईने जंगलात पळून जाण्यापूर्वी त्या नक्षल्यांच्या कमांडरने के.जनार्दनला पुढील आदेश सुनावले..
१.. स्थानिक मजुरांच्या मदतीने फक्त पाच एकर जमीनच कसावी. तसेच महाराष्ट्रातून आणलेले सर्व शेतमजूर ताबडतोब त्यांच्या गावी परत धाडण्यात यावेत.
२.. आदिवासींचा शेतमाल योग्य भावात खरेदी करावा. आंध्र प्रदेशातील लुटारू वृत्तीच्या भांडवलदार व्यापाऱ्यांना हाताशी धरून आदिवासींची आर्थिक पिळवणूक करू नये.
३.. सावकारी व्यवसाय ताबडतोब बंद करावा. खेडोपाडीच्या आदिवासींना त्यांची गहाण मालमत्ता व चीजवस्तू परत करण्यात यावी.
४.. यापुढे जेंव्हा जेंव्हा नक्षली नेत्यांतर्फे खंडणीची मागणी करण्यात येईल तेंव्हा तेंव्हा ताबडतोब व निमूटपणे ती मागणी पूर्ण करण्यात यावी.
५.. या क्षणापासून मोटरसायकलचा वापर कायमचा बंद करावा. मोटारसायकल हे पोलिसांच्या दडपशाहीचे प्रतीक आहे. या संपूर्ण परिसरात फक्त पोलिसांकडेच मोटारसायकली आहेत. त्यामुळे जो मोटारसायकल वापरत असेल तो पोलीस आहे असे समजून त्याला ताबडतोब ठार मारण्याचे आम्हाला आदेश आहेत.
५.. आजच्या घटनेबद्दल पोलिसांकडे तक्रार करू नये. तसेच पोलिसांचे संरक्षण ही घेऊ नये. तसे केल्यास बॉम्ब टाकून तुमचा हा वाडा उडवून देण्यात येईल.
वरीलप्रमाणे आदेश सुनावून परत जाताना अचानक काहीतरी आठवल्याने तो नक्षल्यांचा चीफ कमांडर पुन्हा के. जनार्दन जवळ आला. शेजारीच उभ्या असलेल्या आदिवासी तरुणाच्या हातातील कोयता हिसकावून घेत के. जनार्दनच्या दोन्ही बाजूंच्या गालांवर तसेच डोक्यावर आणि खाली हनुवटीवर असे चेहऱ्याच्या चार ही बाजूंना त्याने निर्दयपणे सपासप वार केले आणि के. जनार्दनच्या रक्तबंबाळ चेहऱ्याकडे पहात तो म्हणाला..
“यापुढे जेंव्हा जेंव्हा तू आरशात पाहशील तेंव्हा तेंव्हा नक्षली क्रांतिकारकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे काय परिणाम होतात याची तुला सतत आठवण, जाणीव होत राहील.. तसंच अन्य गावकरीही तुझ्या चेहऱ्यावरील जखमांच्या खुणा बघून आमच्याशी दगाबाजी करण्याचा कधी विचारही मनात आणणार नाहीत..”
नक्षली जंगलात निघून गेल्यानंतर ताबडतोब आदीलाबादच्या सरकारी दवाखान्यात नेऊन जखमी के. जनार्दन वर उपचार करण्यात आले.
सुदैवाने के. जनार्दनचा पंधरा सोळा वर्षांचा एकुलता एक मुलगा त्यावेळी आपल्या आजोळी परभणीला गेला असल्याने त्याच्यावर या भीषण प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ आली नाही. चार पाच दिवसांनी एका संध्याकाळी जरा उशिरानंच तो इंद्रवेल्लीला परत आला. झालेल्या प्रकाराबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती. जखमा पूर्णपणे बऱ्या न झाल्याने के. जनार्दन अद्यापही आदीलाबादच्या दवाखान्यातच होते.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून नेहमीच्या सवयीप्रमाणे के. जनार्दनचा तो मुलगा गावाच्या आसपास फेरफटका मारण्यासाठी वडिलांची मोटारसायकल घेऊन गेला.
अवघ्या तासाभरानंतरच के. जनार्दनच्या मुलाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह इंद्रवेल्लीच्या त्या तात्पुरत्या शहीद स्मृती-स्तंभाच्या पायऱ्यांवर फेकून दिलेला आढळून आला. शेजारीच त्याने नेलेली के. जनार्दनची मोटारसायकल आडवी पाडली होती. त्यावर “याद रहे..! हर कोई, जो नक्सली आदेश का उल्लंघन करेंगा, उसका भी यही हाल होगा..!” असा लाल अक्षरात इशारा लिहिलेला कापडाचा तुकडा अडकवलेला होता.
के. जनार्दन व त्याच्या कुटुंबियांवर या नक्षली कृत्याचा जबरदस्त आघात झाला. एकुल्या एक मुलाच्या मृत्यूमुळे त्यांची अवस्था अक्षरशः वेड्यागत झाली. त्यांनी या घटनेचा एवढा धसका घेतला की आपला इंद्रवेल्लीचा वाडा आणि गावातील जमीन आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून त्यांनी तडकाफडकी गाव सोडलं. तेंव्हापासून आजतागायत त्यांना या गावात आलेलं कुणीही पाहिलेलं नाही.
हॉटेलवाल्या चिन्नय्याने सांगितलेली के.जनार्दनची करुण कहाणी ऐकल्यावर माझ्या मनात त्याच्याबद्दल अपार सहानुभूती दाटून आली. त्याचबरोबर माझ्या मनात के. जनार्दन बद्दल शंका कुशंकांचा जो गुंता साचला होता तो देखील हळूहळू सुटतोय असं मला वाटू लागलं.
चहा पिऊन झाल्यावर उतनूरला परत जाताना मोटरसायकलला किक मारण्यापूर्वी न राहवून चिन्नय्याला विचारलं..
“के. जनार्दनच्या मुलाचं नाव काय होतं..?”
(क्रमशः ४-क)
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही सेवा केली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.






