https://goodworld.in A website by Madhav Bhope

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

 

*उतनुरचे दिवस..*

*थरार.. (४-क)*

के. जनार्दनचं भूत काही केल्या माझा पिच्छा सोडायला तयार नव्हतं. मी जेंव्हा जेंव्हा शामपुरच्या जनार्दन भाऊंना भेटायचो तेंव्हा तेंव्हा इथे काही तरी पाणी मुरतंय असा मला सतत संशय यायचा. ते कितीही “के. जनार्दनला ओळखत नसल्याचा” आव आणत असले तरी त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी नक्कीच काहीतरी जवळचा संबंध असावा, अशी माझं अंतर्मन मनोमन ग्वाही देत होतं.

एकदा सकाळी लवकर बँकेत जाऊन के. जनार्दन च्या लोन डॉक्युमेंट्स वरील फोटोला काळ्या पेन्सिलने लांब, भरगच्च कल्ले व फ्रेंच (बुल्गानिन) कट दाढी काढून, तो दाढी व कल्ल्यात कसा दिसला असता याबद्दल तर्क करीत होतो. त्या पोलिसी डिटेक्टिव्ह पद्ध्तीच्या क्रियाकलापात मी एवढा गुंग होऊन गेलो होतो की केंव्हा आमचे मॅनेजर साहेब माझ्या मागे येऊन उभे राहिले, हे मला कळलंही नाही.

memories at Utnoor 4c

मी अजूनही के. जनार्दनचाच छडा लावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे हे पाहून आंतून त्यांना जरी माझ्या कर्तव्यनिष्ठ चिकाटीचं कौतुक वाटलं तरी वरकरणी नाराजी दाखवत ते म्हणाले..

“मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की त्या के.जनार्दनचा व्यर्थ नाद सोडा. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा, आपला हैद्राबाद इथं होणारा सत्कार समारंभ अवघ्या महिन्या भरावर आलाय, त्याची तयारी करा..”

त्यांच्या समाधानासाठी के. जनार्दनची फाईल बंद करून कपाटात ठेवून दिली. मात्र शेंडी तुटो वा पारंबी, पण आता के. जनार्दनचा रहस्यभेद करण्याची वेळ आली असून लवकरच त्यावर अंतिम घाव घालायचा असा मी मनातून निर्धार केला.

गेल्या काही दिवसांपासूनच्या, के. जनार्दनच्या उरलेल्या सर्वच म्हणजे एकूण 35 एकर जमिनीवर बँकेचा बोजा नोंदवून घेण्याच्या माझ्या सततच्या प्रयत्नांना आता यश आलं होतं. मात्र त्या उर्वरित जमिनीपैकी बहुतांश जमीन ही उतनूर, नागापूर व शामपुर या गावांत असून बऱ्याच काळापासून ती पडीत अवस्थेतच असल्याचं आढळून आलं होतं.

के. जनार्दनच्या इंद्रवेल्लीच्या पत्त्यावर लागोपाठ कर्ज वसुलीच्या नोटीसा पाठविण्याचा मी धडाकाच लावला होता. साध्या नोटीसा तसंच वकिलाच्या कायदेशीर नोटीसा, साध्या पोस्टाने (ordinary post) आणि रजिस्टर्ड पोस्टाने पाठविण्यास मी सुरवात केली होती. ही पोस्टाची सर्व पाकिटे “ऍड्रेस नॉट ट्रेसेबल” अशा शेऱ्याने बँकेकडे परत यायची. त्या परत आलेल्या पाकिटांवर जनार्दन भाऊंचा शामपुरचा पत्ता म्हणजेच”न्यू ऍड्रेस C/o दामोदर बाजार” असं लिहून मी ती पाकिटं पुन्हा पोस्टात नेऊन देत असे. आश्चर्य म्हणजे शा re-directed पाकिटांपैकी बरीचशी पाकिटं जनार्दन भाऊंकडून (चुकून ?) accept ही केली गेली होती.

एक दोन वेळा स्वतः आदीलाबादच्या मोंढ्यात जाऊन चौकशी केली तेंव्हा तेथील जुन्या हमालांकडून व मुनिमांकडून के. जनार्दन बद्दल बरीचशी नवीन व आश्चर्यजनक माहिती मिळाली.

अशा प्रकारे भरपूर पुरावे गोळा केल्यानंतर एका दिवशी सकाळी नऊ वाजता शामपुरला जनार्दन भाऊंच्या वाड्यावर जाऊन धडकलो. स्वतः जनार्दन भाऊंनीच दार उघडल्यावर दोन्ही हात जोडून खणखणीत, आत्मविश्वासपूर्वक आवाजात म्हणालो..

“नमस्कार जनार्दन भाऊ उर्फ आमचे ट्रॅक्टर कर्जदार माननीय श्री. के. जनार्दन..!”

माझ्या त्या नाट्यपूर्ण गौप्यस्फोटानंतर जनार्दन भाऊंचा चेहरा एकदम पडून जाईल व त्यावर भीतीची छाया पसरेल अशीच माझी अपेक्षा होती. मात्र जनार्दन भाऊंच्या चेहऱ्यावरची रेष ही माझ्या त्या डायलॉग मुळे हलली नाही. उलट, बहुदा ते मी येण्याचीच वाट पहात असावेत. गंभीर, रुक्ष स्वरात ते म्हणाले..

“या..! आत या.. !!”

आम्ही सोफ्यावर बसल्यावर नेहमी प्रमाणे त्यांच्या पत्नीने पाणी आणून दिलं आणि चहा आणण्यासाठी ती आत निघून गेल्यावर जनार्दन भाऊ म्हणाले..

memories at Utnoor-4c

“हं.. ! बोला आता.. !! कुठून कुठून आणि काय काय पुरावे गोळा केलेत, मीच तुमचा तो ‘के. जनार्दन’ आहे हे सिद्ध करण्यासाठी..?”

जनार्दन भाऊंच्या चेहऱ्याकडे, ते कुरवाळत असलेल्या त्यांच्या हनुवटीवरील दाढीकडे क्षणभर मी रोखून बघितलं. आणि मग एक दीर्घ श्वास घेतला आणि एकेक शब्द सावकाशपणे उच्चारीत मी म्हणालो..

“मी महाराष्ट्रातून आलेला मराठी माणूस आहे हे कळूनही तुम्ही जेंव्हा माझ्याशी थोडं जास्त आपुलकीनं वागायच्या ऐवजी त्रयस्था सारखं अलिप्तपणे वागलात, तेंव्हाच मला तुमचा थोडासा संशय आला होता. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करीत आहात असं मला वाटलं. तुम्ही अट्टाहासानं माझ्याशी तेलगू भाषेत बोललात तेंव्हा तुम्ही मराठी भाषिकच आहात हे तुमच्या पत्नीशी खोटं बोलून मी शोधून काढलं. पण तोपर्यंत तुम्हीच के. जनार्दन आहात याची मला पुसटशीही कल्पना किंवा शंका नव्हती.”

हलकीशी जांभई देत कंटाळा आल्याचं दाखवीत जनार्दन भाऊ म्हणाले..

“त्याच त्याच, माहीत असलेल्या गोष्टी सांगू नका. मुद्द्याचं बोला..!”

त्यांच्या त्रासिक अविर्भावाकडे लक्ष न देता मी पुढे म्हणालो..

“त्या दिवशी तुम्ही थोड्या वेळासाठी वाड्याबाहेर गेला असताना दिवाणखान्यात लावलेले तुमचे फॅमिली फोटो पहात असताना तुमच्या वडिलांच्या फोटोखाली बारीक अक्षरात ‘कै. वामन गणपत केंद्रे’ असे नाव लिहिलेले मी वाचले. त्यावरून तुमचे आडनाव केंद्रे आहे हे समजले. तसं तुम्ही इथे ‘पी. जनार्दन’ हे नाव धारण केलं असून यातील ‘पी’ म्हणजे ‘पाटील’ असं तुम्ही इथल्या लोकांना सांगत असत, हे ही मला चौकशीतून समजलं होतं.

पुढे.. इंद्रवेल्लीच्या हॉटेलवाल्या चिन्नय्या कडून के. जनार्दनच्या नक्षलवाद्यांनी बळी घेतलेल्या मुलाचं नाव “दामोदर” असल्याचं समजलं आणि तुम्हीच जनार्दन केंद्रे उर्फ के. जनार्दन असल्याचा पहिल्यांदाच मला संशय आला.”

मी दामोदरचा उल्लेख केला तेंव्हा जनार्दन भाऊंच्या चेहऱ्यावर उमटून गेलेले शोकपूर्ण दुःखी भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांच्या नजरेला नजर न देता भिंतीवरील कोवळ्या वयाच्या मुलाच्या फोटोकडे पहात मी पुढे म्हणालो..

“अर्थात, या हॉलमध्ये लावलेला हा हार घातलेला फोटो तुमच्या मुलाचा म्हणजेच दामोदरचा असून त्याच्या स्मरणार्थच तुम्ही या कॉम्प्लेक्स चे नाव ‘दामोदर बाजार’ असे ठेवले आहे याचाही मग आपोआपच उलगडा झाला.

नक्षलवाद्यांनी तुमच्या चेहऱ्यावर कोयत्याने जे वार केले होते, त्याचे व्रण लपवण्यासाठीच तुम्ही गालांवर केसांचे कल्ले वाढविले आणि हनुवटीवर ही छोटीशी दाढी सुद्धा ठेवलीत. तसंच डोक्यावरील व्रण लपवण्यासाठीच तुम्ही सदैव गांधी टोपी घालता.”

एवढं बोलून, यावर जनार्दन भाऊंची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी मी हळूच त्यांच्याकडे पाहिलं. मात्र डोळे मिटून शांतपणे ते माझं बोलणं एकाग्र चित्ताने ऐकून घेत होते. त्यामुळे माझं बोलणं तसंच सुरू ठेवत मी म्हणालो..

“आदीलाबादच्या धान्य मोंढ्यात जाऊन मी तुमच्याबद्दल चौकशी केली तेंव्हा तुम्ही अजूनही ट्रॅक्टर मध्ये धान्य भरून मोंढ्यात विक्रीसाठी आणता असं समजलं. तसंच चेहऱ्यावरचे व्रण नष्ट करण्यासाठी तुम्ही मद्रास (आताचं चेन्नई) येथे जाऊन प्लास्टिक सर्जरीही केलीत, पण तरीही ते व्रण पूर्णपणे मिटले नाहीत, त्यामुळे नाईलाजाने तुम्ही गालावर लांब कल्ले व हनुवटीवर बुल्गानिन कट फ्रेंच दाढी ठेवलीत, ही माहिती देखील तेथील जुन्या मुनींमांकडून समजली.”

मी आणखी पुढे बोलणार तोच जनार्दन भाऊंनी डोळे उघडले आणि हातानेच मला “थांबा..!” अशी खूण करीत म्हणाले..

“बस.. बस..! पुरे झालं..! मीच तो, तुमचा कर्जदार के. जनार्दन..! आता तुमचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात सांगा..!!”

“बँकेचा कर्मचारी या नात्याने, ‘बँकेची थकबाकी ताबडतोब भरा’ यापेक्षा वेगळं ते काय म्हणणं असणार माझं..?” मी त्यांना प्रतिप्रश्न केला.

त्यावर एक दीर्घ उसासा सोडत खिन्न स्वरात जनार्दन भाऊ म्हणाले..

“दुर्दैवाने बँकेचं कर्ज परतफेड करू शकण्या एवढी आता माझी ऐपत राहिलेली नाही. मी पुरता कर्जबाजारी झालो आहे. अन्यथा फार पूर्वीच तुमचं सारं कर्ज मी फेडून टाकलं असतं..”

जनार्दन भाऊंचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी म्हणालो..

“एखाद्या सामान्य माणसानं हे म्हटलं असतं तर एक वेळ मी त्याच्यावर विश्वास ठेवला असता. पण.. तुमच्या नावावर अद्यापही 35 एकर जमीन आहे, पंधरा सोळा दुकानांचा एवढा मोठा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, पेट्रोल व खत विक्रीचा तुमचा व्यवसाय आहे, याशिवाय ठोक धान्य खरेदी विक्रीही तुम्ही करता.. असं असूनही तुम्ही कर्जबाजारी कसे..?”

“तुम्हाला वस्तुस्थिती माहीत नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय..” असं म्हणून जनार्दन भाऊंनी आपली दुखभरी दास्तान सांगायला सुरुवात केली..

“दामोदरच्या मृत्यूनंतर माझी पत्नी पुत्रशोकाच्या दु:खातिरेकानं भ्रमिष्ट झाली. तिला काही दिवसांकरता नागपूरच्या एका मानसोपचार केंद्रात उपचारांसाठी ठेवावं लागलं. माझ्या जिवालाही नक्षल्यांकडून धोका असल्याचा खात्रीलायकपणे सुगावा लागल्यामुळे तांतडीने घर व जमीन नातेवाईकांना विकून मी इंद्रवेल्ली कायमचं सोडून आदीलाबादला राहायला गेलो.

इंद्रावेल्ली गावातील नक्षल्यांच्या काही खबऱ्यांशी माझी खाजगी, व्यक्तिगत दुश्मनी होती. ते माझ्या मागावरच होते. सतत आदीलाबादला येऊन नक्षल्यांच्या नावाने ते माझ्याकडून खंडणी वसूल करायचे.

जखमांमुळे माझा चेहरा खूपच भेसूर दिसत होता. माझा विद्रुप चेहरा पाहताच माझ्या पत्नीला तो भयानक प्रसंग आठवायचा आणि तिचं बरं होत आलेलं वेड उफाळून यायचं. त्यामुळे मी सतत चेहऱ्यावर मोठा रुमाल बांधूनच वावरायचो. पुढे मद्रासला जाऊन मी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरीही करवून घेतली. अर्थात त्यामुळे जखमांचे व्रण बरेच कमी झाले असले तरी ते पूर्णपणे नाहीसे न झाल्यामुळे ह्या दाढी, कल्ले आणि गांधी टोपीच्या आड मी ते व्रण लपवले.

बराच काळ माझा सावकारीचा व्यवसाय व धान्य खरेदी बंद असल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन उरले नव्हते. शेती करण्याची तर हिम्मतच नव्हती. एकीकडे पत्नीच्या उपचारात बराच पैसा खर्च होत होता तर दुसरीकडे नक्षल्यांना अजूनही खूप मोठी रक्कम अधून मधून खंडणी म्हणून द्यावी लागत असे. माझ्या प्लास्टिक सर्जरीलाही खूप जास्त खर्च आला. लवकरच माझी सर्व जमापुंजी संपुष्टात आली.

सुदैवाने मला ओळखणारे व माझ्याकडून सतत खंडणी उकळणारे इंद्रवेल्लीचे नक्षली व त्यांचे खबरी अचानक एका अपघातात मरण पावले. आता मला ओळखणारं त्या परिसरात कुणीच नसल्याने माझी उरलेली शेतजमीन कसण्यासाठी मी शामपुरला येण्याचं ठरवलं. तत्पूर्वी मोठ्या हौसेनं बांधलेला माझा परभणीचा बंगला आणि घरातील सर्व सोनं नाणं विकून आलेल्या पैशातून मी हा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून काढला.

सावधगिरीचा उपाय म्हणून माझं नाव पी. जनार्दन आहे असं मी शामपुरच्या लोकांना सांगितलं. कॉम्प्लेक्स मागेच हा वाडा बांधून घेतला आणि पत्नीसह इथे रहायला आलो. वाड्यामागेच माझी वीस एकर जमीन आहे. स्थानिक मजुरांच्या मदतीनं मी ती शेती कसायला सुरवात केली. लवकरच शॉपिंग कॉम्प्लेक्सची सर्व दुकानं भाड्यानं गेली आणि घरबसल्या मला भरपूर उत्पन्न मिळू लागलं.”

अविश्रांत बोलून थकल्यामुळे जनार्दन भाऊ दम घेण्यासाठी क्षणभर थांबले. त्यांची पत्नीही माजघरातील दारात उभी राहून आमचं बोलणं ऐकत होती. तिला पुन्हा एकदा चहा करायला सांगून जनार्दन भाऊंनी आपली कर्मकहाणी कन्टीन्यू केली..

“माझ्या आवडत्या सूट, बूट, कोट, टाय, गुळगुळीत दाढी व डोक्यावर हॅट अशा साहेबी पेहरावाचा त्याग करून धोतर, सदरा, गांधी टोपी, लांब कल्ले, दाढी व पायात चप्पल असा नवीन देशी पेहराव मी धारण केला. वीज खातं, शेती खातं, तहसील, रेव्हेन्यू खातं अशा सर्वच सरकारी खात्यात माझे नातेवाईक असल्याने त्यांच्या मदतीने सगळ्या सरकारी रेकॉर्ड्स मध्ये मी माझे नाव सहजरित्या पी. जनार्दन असे बदलून घेतले.

सुरवातीचे काही दिवस सारं काही सुरळीत चाललं होतं. स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांकडून ठोक भावाने धान्य खरेदी करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने ते आदीलाबाद च्या मोंढ्यात विकण्याचा माझा जुना व्यवसायही आता मी पुन्हा सुरू केला होता. मात्र माझ्याकडून अनवधानाने एक बदल करायचा राहून गेला होता. मी माझी मोटारसायकल व ट्रॅक्टर ट्रॉली, तीच जुनीच ठेवली होती. आणि त्या एका चुकीनेच माझ्या मागे पुन्हा दुर्दैव हात धुवून लागलं.

इंद्रवेल्लीच्या अपघातातून वाचलेला एक नक्षली खबऱ्या योगायोगानं एकदा त्याच्या शामपुरच्या नातेवाईकाकडे आला होता. ट्रॅक्टर व मोटरसायकल वरुन तसंच माझ्या आवाजावरून त्याने मला ओळखलं आणि शामपुर एरियाच्या नक्षली कमांडरला त्याची खबर दिली.

एके दिवशी नक्षल्यांचं एक इशारेवजा धमकीपत्र मला प्राप्त झालं. तीन एकरपेक्षा जास्त जमीन कसू नये, शॉपिंग कॉम्प्लेक्स भाड्याने देऊ नये, मोटारसायकल वापरू नये, ठोक धान्य खरेदी बंद करावी किंवा आदिवासींना धान्याचा योग्य, वाढीव भाव द्यावा अशा आज्ञा त्यात दिल्या गेल्या होत्या. तसंच नक्षलींच्या पूर्वीच्या आज्ञापत्राचे उल्लंघन केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा खंडणीवजा दंड ही मला ठोठावण्यात आला होता.

इंद्रवेल्लीत नक्षल्यांनी माझ्या कुटुंबावर जो भयंकर अत्याचार केला होता त्याला आता दहा वर्ष उलटून गेली होती. या मधल्या काळात नक्षल्यांचा जोर खूप कमी झाला होता. जवळच उतनूरला पोलिसांचं खूप मोठं ठाणं झालं होतं. रस्ते, टेलिफोन, वीज या सोयींतही या काळात भरपूर सुधारणा झाली होती. आणि मुख्य म्हणजे माझ्याकडे गमावण्या सारखं आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे नक्षल्यांच्या मागण्या मी साफ धुडकावून लावल्या व त्यांच्या धमकीकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं.

माझ्या या कृतीमुळे चिडलेल्या नक्षल्यांनी सर्वप्रथम स्थानिक आदिवासी मजुरांना माझ्या शेतावर काम करण्यास मनाई केली. त्यामुळे माझी शेतीची कामे ठप्प झाली. मात्र त्यामुळे खचून न जाता आदीलाबाद-महाराष्ट्र सीमेवरील पिंपळखुटी गावातून जादा मजुरी देऊन मी मराठी मजूर आणले, त्यांची राहण्याची सोय केली आणि शेतीची कामे पूर्ववत सुरळीतपणे सुरू केली. त्यानंतर मला धान्य विकण्यास नक्षल्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना मनाई केली. त्यामुळे माझा तो व्यवसायही कायमचाच बंद झाला. नक्षल्यांची दहशत व त्यांचे फर्मान यामुळे दामोदर बाजारातील सर्वच गाळे ओस पडले. त्या दुकानांच्या भाड्यातून मला जे नियमित उत्पन्न मिळत होतं, ते ही आता मिळेनासं झालं.

एकदा उतनूर येथील विशेष पोलीस मुख्यालयाच्या उदघाटनासाठी राज्याचे गृहमंत्री तिथे आले होते. ह्या परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे शिपाई या कार्यक्रमाला हजर होते. नेहमीप्रमाणेच हा मोका साधून वीस पंचवीस सशस्त्र आदिवासी तरुणांनी माझ्या वाड्याला वेढा घातला. शामपुर गावातील जनतेला दवंडी पिटवून माझ्या वाड्याजवळ जमण्यास सांगण्यात आले. माझ्या शेतात काम करीत असलेल्या महाराष्ट्रातील मजुरांपैकी दोघांना पकडून वाड्यासमोरील चिंचेच्या झाडाला बांधण्यात आले. त्यानंतर नक्षली गटाच्या कमांडरने गावकऱ्यांना माझ्यावरील आरोप पत्र वाचून दाखविले..”

इतक्यात चहा आल्यामुळे जनार्दन भाऊंनी बोलणं थांबवलं. त्यांची कहाणी आता रोमांचक वळणावर आल्याने भराभरा चहा पिऊन पुढील प्रसंग ऐकण्यास मी सज्ज झालो. दारात उभ्या असलेल्या आपल्या पत्नीला आत जाऊन आराम करण्यास सांगून जनार्दन भाऊंनी उर्वरित कहाणी सांगण्यास सुरवात केली..

“माझ्यावरील आरोपपत्रात असा उल्लेख होता की ‘पीपल्स वॉर ग्रुप’ च्या नियमानुसार समाजात आर्थिक समानता यावी या साठी या परिसरात कुणालाही तीन एकरापेक्षा जास्त जमीन कसण्यास मनाई आहे. तसेच घर, दुकान भाड्याने देणे, स्वस्त दराने स्थानिकांकडून धान्य, मध, डिंक इत्यादी खरेदी करून त्यांची पिळवणूक करणे यास ही सक्त मनाई आहे. कार, स्कुटर व मोटारसायकल अशी जलदगतीची वाहने वापरण्यास ही सामान्य नागरिकांना मनाई आहे. या सर्व नियमांचा पी. जनार्दन यांनी भंग केल्यामुळे त्यांना खालीलप्रमाणे दंड ठोठावण्यात येत आहे.

  1. आम्ही आखून दिलेल्या सीमा रेषेच्या आतील जमिनीवरच त्यांना शेती करता येईल.
  2. धान्य व अन्य मालाची छुप्या मार्गाने खरेदी केल्यास त्यांचे व माल विकणाऱ्याचे घर जाळून टाकण्यात येईल.
  3. त्यांची मोटारसायकल जप्त करण्यात येत आहे.
  4. त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. सांगितलेल्या ठिकाणी एक दोन दिवसात त्यांनी हा दंड पोचता करावा.

अशाप्रकारे आरोप पत्राचे जाहीर वाचन करून झाल्यावर वाड्याच्या मागील शेतजमिनीवर अंदाजे दोन अडीच एकर क्षेत्रफळाच्या अंतरावर एका रांगेत त्यांनी चार फूट उंचीच्या लाकडी खुंट्या ठोकल्या आणि या रांगे पलीकडील जमिनीत जो कोणी पाय ठेवील त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले जातील असा जाहीर इशारा दिला.

bamboo boundary

त्यानंतर अत्यंत निर्दयपणे त्यांनी झाडाला बांधलेल्या दोन्ही मजुरांचा एकेक हात कुऱ्हाडीचे घाव घालून तोडून टाकला. मी महाराष्ट्रातून आणलेल्या सर्व मजुरांनी ताबडतोब येथून परत निघून जावे अन्यथा त्यांची ही गत अशीच होईल तंबी देऊन माझी मोटारसायकल घेऊन ते जंगलात निघून गेले.

या घटनेनंतर बरेच दिवस शामपुर गावात भीती व दहशतीचे वातावरण होते. पोलिसांनी तर माझ्या वाड्यासमोरच आपली तात्पुरती छावणी उभी केली होती. मी नक्षल्यांना खंडणी देऊ नये यासाठी त्यांनी माझ्यावर भरपूर दबावही आणला. मात्र नक्षल्यांच्या अत्यंत भीषण व कटू पूर्वानुभवामुळे मी गुपचूप त्यांच्याकडे खंडणीची रक्कम पोचती केली.”

जनार्दन भाऊ उर्फ के. जनार्दन यांची दुःखद कर्म कहाणी संपली होती. त्यानंतर मला घेऊन ते वाड्याच्या पाठीमागे गेले. तिथे पंधरा वीस एकर ओसाड जमीन पसरलेली होती. जवळच एका रांगेत अनेक लाकडी खुंट्या ठोकलेल्या होत्या. त्या काठ्यांकडे बोट दाखवीत जनार्दन भाऊ म्हणाले..

“जरी तिथपर्यंतच्या जमिनीवर शेती करण्याचा नक्षल्यांनी मला अधिकार दिला असला तरी प्राणभयामुळे या भागातील कुणीही माझ्या शेतीवर काम करण्यास तयार नाही. शेती, धंदा, दुकान भाडे या मार्गांनी पूर्वी मिळणारे सर्वच उत्पन्न बंद झाल्यामुळे मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो आहे. पेट्रोल व खत विक्रीच्या व्यवसायातून कसंबसं पोट भरण्यापुरतं उत्पन्न मिळतं. पण तो व्यवसायही तसा बेकायदेशीरच आहे. माझ्याकडे पेट्रोल वा खत विक्रीचं कोणतंही लायसन्स नाही. पोलीस, MRO व अन्य सरकारी विभागांना नियमित लाच देऊनच मी तो व्यवसाय कसातरी टिकवून ठेवला आहे.”

जनार्दन भाऊंची कहाणी जरी खरी वाटत असली तरी कुठेतरी मला त्यात मतलबी धुर्तपणा लपलेला दिसत होता. वाड्यामागेच एका पत्र्याच्या शेडखाली त्यांची मोटारसायकल उभी केलेली दिसत होती. मी त्या मोटारसायकल कडे निरखून पहात असताना माझ्या मनात आलेली शंका जनार्दन भाऊंनी लगेच ओळखली आणि ते म्हणाले..

“नक्षल्यांनी पळवून नेलेली माझी मोटारसायकल पुढे एका छाप्यात पोलिसांनी जप्त केली. अद्यापही ती उतनूरच्या पोलीस ठाण्यात गंजत पडली आहे. तशीही ती गाडी बरीच जुनी झाल्याने मला नवीन मोटरसायकल घ्यायचीच होती. इथे दळणवळणाच्या सोयी जवळपास नाहीतच. बरेचदा माझ्या पत्नीला वैद्यकीय उपचारासाठी नागपूर व आदीलाबादला घेऊन जावे लागते. तसंच आदीलाबादच्या मोंढ्यात धान्य अडतीचा व्यवसायही मी करतो. त्यासाठीही मला स्वतःचे वाहन असणे आवश्यकच होते. इथल्या नक्षली नेत्यांना मी माझी अडचण सांगितली. ते खूप लालची आहेत. थोड्याशा खंडणीच्या मोबदल्यात त्यांनी मला मोटारसायकल वापरण्याची परवानगी दिली. मात्र माझ्या खेरीज अन्य कुणीही ती वापरल्यास त्याला कठोर दंड केला जाईल असे त्यांनी बजावले.”

एवढं सांगून जनार्दन भाऊ म्हणाले..

“केवळ ह्याच कारणामुळे त्या दिवशी रात्री तुमच्या बँकेतील प्युन रमेशला मोटारसायकल देण्यास मी नकार दिला होता.”

एकंदरीत जनार्दन भाऊ उर्फ के. जनार्दन यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून त्यांच्या कर्ज खात्याच्या वसुलीची अजिबात शक्यता नाही याची जाणीव झाल्याने मी निराश झालो. तरी देखील एक शेवटची आशा म्हणून त्यांना म्हणालो..

“ठीक आहे, कर्ज परतफेड करण्याची तुमची ऐपत नाही हे जरी मान्य केलं तरी तुम्ही कर्जातून घेतलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचं काय ? ती तर बँकेचीच मालमत्ता आहे. त्यांच्या विक्रीतून आमची थोडी तरी कर्जवसुली होऊ शकेल. कुठे आहे सध्या तो ट्रॅक्टर व ती ट्रॉली..?”

माझ्या या प्रश्नावर मला हात धरून जवळच्या गुरांच्या गोठ्याकडे नेऊन त्यांनी तेथील कडब्याच्या पेंड्या किंचित बाजूला केल्या. त्या पेंड्यांच्या मागे पार गंजून गेलेल्या अवस्थेतील ट्रॅक्टर व ट्रॉली उभी होती. तिचा पत्रा एवढा गंजून सडून गेला होता की जरा हात लावला की त्याचे तुकडे गळून पडत होते. कुणी भंगार (स्क्रॅप) च्या भावाने देखील त्यांना विकत घेतले नसते.

old tractor

माझ्या शोध मोहिमेचा अंत असा अत्यंत निराशाजनक झाला होता. एवढा डोंगर पोखरूनही साधा मेलेला उंदिरही निघाला नव्हता. निराश, हतोत्साह मनानं मी उतनूर कडे निघालो.

(क्रमशः ४-ड)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading